अनेक दिवस गाजत असलेला सत्तासंघर्षाचा मुद्दा अखेरीस निर्णयास लागला. हा मुद्दा राज्यातील सरकार विषयी किंवा विरोधी पक्षात २०२४ च्या निवडणुकीनंतर भावी पंतप्रधान कोण होणार? या देशात गाजणाऱ्या मुद्यांविषयी बोलत नाहिये ! तर आंतराष्ट्रीय स्तरावर गाजत असलेल्या आणि एकेकाळी जगावर राज्य करणाऱ्या, जगाला लोकशाही देणाऱ्या इंग्लंड मधील गाजत असलेल्या पंतप्रधान पदाच्या निवडणुकीबद्दल बोलत आहे.
ज्या प्रमाणे महाराष्ट्रात एक एक मंत्री तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सोडून गेले आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. तशीच काहीशी गत ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची झाली होती. बोरिस जॉन्सन यांच्यावर झालेल्या वेगवेगळ्या आरोपानंतर त्यांचा जनतेमधील विश्वास डळमळीत झाला होता. त्यांच्यावर राजीनामा देण्याचा दबाव निर्माण झाला. मात्र स्वतः बोरिस जॉन्सन राजीनामा देण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्याच वेळी त्यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री असलेले भारतीय वंशाचे ऋषी सूनक यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देत बोरिस जॉन्सन विरोधात बंड पुकारले. या नंतर ऋषी सूनक यांच्या मागे अनेक बोरिस मंत्रिमंडळातील अनेक मंत्री बोरिस जॉन्सन यांच्या मंत्रीमंडळातून बाहेर पडले. पंतप्रधानांनी विश्वास मत गमावलेले असल्याची ही सूचना होती. शेवटी ब्रिटिश संसदेत पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणल्या गेला, ज्यात ते हरले. शेवटी बोरिस जॉन्सन यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. पुढील पंतप्रधानाची निवड होई पर्यंत ते काळजीवाहू पंतप्रधान म्हणून काम पाहणार होते.
तर, एकूण ब्रिटिश लोकशाही संकेतानुसार नवीन पंतप्रधानांची नीवड प्रक्रिया सुरू करण्यात आली. सध्या सत्ताधारी असलेल्या मजूर पक्षातील (कंझर्व्हेटिव्ह पार्टी) आठ उमेदवार या पदासाठी शर्यतीत दाखल झाले. या आठही उमेदवारांना देशभरातील आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपल्या बाजूने वळवायचे होते. शेवटी त्यांना आपल्या पक्षातील संसद सदस्य आणि इतर संवैधानिक सदस्यांना आपल्या बाजूला वळवत पंतप्रधान पदाला गवसणी घालायची होती. (ही प्रक्रिया थोडक्यात संगीतलेली आहे, साधारण प्रक्रियेचा अंदाज यावा म्हणून)
साधारण जून २२ पासून सुरू असलेली ही कवायत, सप्टेंबर २२ मध्ये पूर्ण झाली. या सगळ्या कवायतीचा शेवट झाला. जून पासून वेगवेगळ्या मतदानात एकूण आठ इच्छुक उमेदवार हळूहळू गळत गेले, शेवटी ऋषी सूनक आणि लिस ट्रस यांच्यात ही लढत झाली. लीज ट्रस या बोरिस जॉन्सन मंत्रिमंडळात परराष्ट्र खाते संभाळत होत्या. या बोरिस जॉन्सन यांच्या विश्वासातील महत्वाच्या मंत्री होत्या. बोरिस जॉन्सन यांच्या विरोधात घडलेल्या संपूर्ण घडामोडीत त्या बोरिस जॉन्सन यांच्या मागे भक्कमपणे उभ्या होत्या. शेवटच्या चरणात झालेल्या निवडणुकांमध्ये पहिल्या काही चरणात आघाडीवर असलेले ऋषी सूनक मागे पडले आणि लीज ट्रस या महिला पंतप्रधानपदाच्या मजबूत दावेदार म्हणून समोर आल्या. मार्गारेट थ्यांचर, थेरेसा मे यांच्या नंतर आता लीज ट्रस्ट या ब्रिटनच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान म्हणून पदावर बसतील. एकेकाळी लिबरल डाव्या विचारांवर चाललेल्या लीज ट्रस, गेल्या काही वर्षात प्रतिगामी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कँझेव्हेटिव्ह पक्षात पंतप्रधानपदा पर्यंत पोहचल्या. लीज ट्रस स्वतः समोर मार्गारेट थ्यांचर आदर्श म्हणून असल्याचा दावा करतात.
असो, एकूण आता ब्रिटन मधील सत्ता संकट संपण्याच्या मार्गावर आहे. तेथील परंपरेनुसार आता लीज ट्रस ब्रिटनच्या महाराणीची भेट घेतील आणि सत्तेचा दावा करतील. गंमत अशी की एकेकाळी याच लीज ट्रस आपल्या लिबरल डाव्या वैचारिक काळात ब्रिटन मधून राजेशाही संपवण्याची वकिली अगदी जोरात करायच्या!
मात्र ब्रिटनच्या या पंतप्रधानपदाच्या निवडणुकीत आपल्याकडे नाव गाजले ते ऋषी सूनक यांचे ! साहजिक आहे, भारतीय वंशाचा माणूस एका अश्या देशाचा पंतप्रधान होणार ज्या देशाने अनेक दशके भारताला गुलाम केले होते. हा "काळाचा सूड" आहे या प्रमाणे अनेक लोक या घटने कडे पहात होते. तर काही भारतीय ऋषी सूनक ब्रिटिश पंतप्रधानपदी बसतील इतक्याच बातमीने आनंदित होते. तर अनेक जण या निवडणुकी वरून आणि ऋषी सूनक यांच्या संभाव्य विजया बाबत भाष्य करतांना भारतीयांना लोकशाहीचे ज्ञान पाजायचा पण प्रयत्न करत होते, त्यांचा रोख इटालियन मूळ असलेल्या सोनिया गांधी यांना पंतप्रधान म्हणून झालेला विरोध कसा चुकीचा होता, असे जनमानसावर बिंबवायचे होते. पण ऋषी सूनक हरले आणि प्रत्येकाचे आनंद व्यक्त करायचे आणि खऱ्या लोकशाहीचे धडे द्यायचे स्वप्न भंग झाले. पण प्रश्न असा की, आधी सतत पंतप्रधानपदाच्या शर्यतीत पुढे असलेले ऋषी सूनक नंतर मागे का पडले? हाता तोंडाशी आलेला हा घास ते घेऊ का शकले नाहीत?
याची चार मुख्य कारणे समोर येत आहेत. ऋषी सूनक एक संपन्न व्यक्तिमत्व आहे. त्याचे लग्न भारताची आणि जगातील मोठी आय टी कंपनी इन्फोसिसच्या मालकाच्या पोरीशी झाले आहे. मध्यंतरी कर चोरीचा आरोप पण त्यांच्यावर आला होता. तो, त्यांचे जनतेला दिसणारे संपन्न जीवनमान आणि ते भरत असलेला कर याचा ताळमेळ न लागल्यामुळेच. अर्थात त्या चौकशीतून ते सही सलामत बाहेर निघाले, ते कर वाचवायला जे काही करत होते ते कायदेशीर असल्याचा निष्कर्ष चौकशीत निघाला. मात्र ब्रिटिश जनतेला मात्र त्यांचे ते वागणे फारसे पटले नव्हते. मुख्यतः तेव्हा त्यांनी कोविड नंतरच्या परिस्थितीत ब्रिटनची अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी म्हणून करात वाढ करून सामान्य ब्रिटिश जनतेवरील भार वाढवला असतांना, स्वतः मात्र कायदेशीर पळवाटा घेत कर वाचवत असलेला मंत्री म्हणून त्यांची प्रतिमा समोर आली होती.
या निवडणूक प्रचारात पण ऋषी सूनक कोणत्याही प्रकारे कर कमी करण्याच्या मनस्थितीत आपण नसल्याचे सूतोवाचन करत होते. कोविड काळा नंतर ब्रिटन मध्ये "सप्लाय चेन" च्या गोंधळामुळे तुटवड्याच्या काळाला ब्रिटिश जनता सामोरी गेली. परिणामी ब्रिटन मध्ये पण वाढलेली महागाई, आर्थिक मंदी आणि त्यायोगे येणारी बेरोजगारी असे मुद्दे महत्वाचे होते. त्याच दृष्टीने करकपात आणि इतर भत्त्यात वाढ अशी जनतेची मागणी होती. मात्र ऋषी सूनक अश्या कोणत्याही आर्थिक मदतीला तयार नव्हते. असे करून ब्रिटनची आर्थिक तंगी अजून वाढेल असे त्यांचे मत होतेच, उलट काही कर अजून वाढवावे लागतील अशी वक्तव्य ते देत होते. त्यांचा हा विचार मान्य होणे शक्यच नव्हते.
दुसरे कारण म्हणजे त्यांचे विलासी जीवन ! त्याच्या विरोधकांनी त्यांच्या कथित विलासी जीवनाला या काळात बरीच प्रसिद्धी दिली. ऋषी सूनक यांच्या घरी चहाला आमंत्रित केलेल्यांना ज्या कपातून चहा दिल्या गेला, तो कपच चहा पानाला आमंत्रित लोकांच्या दोन महिन्यांच्या पगारा इतक्या किमतीचा आहे अश्या कथा बरोबर पेरल्या गेल्या. अर्थात राजकारणी असूनही ऋषी सूनक यांनी राजकारणातील काही तत्वे पाळली नाहीत. अगदी खाण कामगार कार्यकर्त्यांच्या सभेला जातांना ऋषी सूनक यांनी तीन लाखाचा सूट घातल्याची टीका करण्यात आली होती. तर अश्याच एका सभेत त्याची प्रतिद्वंदी लीज ट्रस अत्यंत साधे आणि स्वस्त कपडे - बूट कशी घालून गेली याच्या बऱ्याच कहाण्या प्रसारित झाल्या. ऋषी सूनक पैसा हा त्यांनी मेहनतीने कमावला असून एकेकाळी ते पण मधमवर्गीय जीवन जगले आहेत आणि त्यातील हालपेष्टांची त्यांना जाणीव आहे वगैरे, अश्या प्रकारच्या त्यांच्या वक्तव्यांना काहीही महत्व दिल्या गेले नाही. एकूण काय ? तर ऋषी सूनक यांच्याकडे असलेला पैसाच त्यांच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत अडसर ठरला.
तिसरे महत्वाचे कारण म्हणजे पक्षांतर्गत बोरिस जॉन्सन यांच्या समर्थनात असलेली मते. बोरिस जॉन्सन यांना पंतप्रधान पदावरून जरी पायउतार व्हावे लागले तरी कट्टर कंझर्व्हेटिव्ह सदस्य हे बोरिस जॉन्सन यांचे कट्टर समर्थक अजूनही आहे. त्यातच बोरिस जॉन्सन यांनी कोविड काळात ब्रिटनमध्ये जगात सगळ्यात आधी सुरू केलेली कोविड विरोधी लसीकरण मोहीम, पहिल्या आणि दुसऱ्या कोविड लाटेत झालेले आर्थिक आणि मानवी नुकसान बघत, नंतर केलेले काळजीपूर्वक नियोजन, सुरू केलेला व्यापार वगैरे गोष्टी बोरिस जॉन्सन यांच्या करता काही प्रमाणात सहानभूती निर्माण करणारे होते. या सगळ्यांचा एकच निर्णय होता की, जो बोरिस जॉन्सनच्या विरोधात आपण त्यांच्या विरोधात. ऋषी सूनक यांनी तर जॉन्सन विरोधात उघड बंड केले होते, या नंतर सूनक आणि जॉन्सन यांचे वयक्तिक संबंध पण बिघडले आहेत. तशी कबुलीच एका मुलाखतीत सूनक यांनी दिलेली. परिणामी बोरिस जॉन्सन यांच्या मागे भक्कम पणे उभ्या राहणाऱ्या लीज ट्रस ह्या या लोकांच्या पहिली पसंद ठरल्या ! अर्थात या सगळ्यात उघडपणे जरी नाही तरी अप्रत्यक्षपणे स्वतः बोरिस जॉन्सन यांनी पण लीज ट्रस यांना मदत केलीच. निवडणूक जिंकल्यानंतर केलेल्या आभार प्रदर्शनाच्या वक्तव्यात लीज यांनी बोरिस जॉन्सन यांचे विशेष आभार मानले यातच सगळे येते.
चौथे महत्वाचे कारण म्हणजे ऋषी सूनक यांचे भारतीय वंशाचे असणे आणि त्यांचा कातडीचा रंग हा "ब्राऊन" असणे हे आहे. कोणी कितीही मान्य करायचे नाकारले तरी ते तसे आहेच. सूनक ज्या पक्षात आहेत, त्या पक्षाचा इतिहास ब्रिटिश साम्राज्याचा जयघोष करण्याचा आणि आपले "गोरे" पण मिरवण्याचा आहे. त्या पक्षातून एका भारतीयाला पंतप्रधानपदी बसवणे अजून खूप दूरची कौडी आहे.
अर्थात हे झाले माझे सूनक यांच्या पराभवा विषयी आकलन. बाकी आता नवीन पंतप्रधान लीज ट्रस ब्रिटनला आर्थिक संकटातून, कोविड नंतर निर्माण झालेल्या आर्थिक - सामाजिक संकटातून, ब्रेंझीक्ट मुळे ब्रिटवर आलेल्या दबवातून आणि आता रशिया-युक्रेन युद्धानंतर वाढत चाललेल्या अन्नटांचाई मधून कश्या बाहेर काढतात हे बघण्यासारखे असेल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा