लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी!

                      बऱ्याच शाळांमध्ये आठवी पासून विशेष विषय म्हणून संस्कृत असतो, हा पूर्ण आणि अपूर्ण या पद्धतीत. पूर्ण म्हणजे १०० मार्कांचा संस्कृतचा पेपर असणार, आणि अपूर्ण म्हणजे ५० मार्क हिंदी आणि ५० मार्क संस्कृत. आमच्या शाळेत आमची पहिलीच तुकडी होती ज्यांना संपूर्ण संस्कृत  दिल्या गेले होते. पण शाळेने या करता एक विशेष शिक्षकाची नेमणूक केली, जे शाळा सुरू होण्या अगोदर एक तास आम्हाला संस्कृत शिकवतील. त्यांनी पहिले काम काय केले असेल तर आमच्या कडून अक्षरशः बालवाडीतील मुलांसारखे अ, आ पासून क्ष, ज्ञ पर्यंत सगळ्यांचे उच्चार सुधरवून घेतले. आम्हाला राग यायचा पहिले की हे असे काय करत आहे म्हणून. पण एकदा उच्चार करायला जीभ वळायला लागली तेव्हा पूर्वी जे संस्कृत शब्द कठीण वाटायचे ते पण सोप्या पद्धतीने म्हणता येऊ लागले. इतकेच नाही तर मराठी आणि इतर विषयातील शुद्धलेखनाच्या चुका पण कमी झाल्यात. 

                        सांगायचा मुद्दा हा की शिक्षकांनी मुलांना शिकवतांना योग्य वेळ दिल्या शिवाय पर्याय नाही. पूर्वी पाढे शिवतांना सरळ सरळ अकरा, बारा, तेरा असे शिकवत होते काय? तर नाही पाढे शिकवताना 
एकावर शुन्य दहा - १०
एकावर एक अकरा - ११
एकावर दोन बारा - १२
अश्या पद्धतीने शिकवत, यात दहा मधील १ हा दशमस्थानी आहे हे आपोआप मनावर पक्के ठसवले जायचे, सोबतच एकावर एक (११) असे म्हणतांना आपोआप "अकरा" (११) डोळ्या समोर यायचेच. आता ज्यांना ह्या पद्धतीने शिकवणे पण जमत नाहीये, ते "दहा एक एकरा" असे कसे शिकवणार? बरे "दहा एक" म्हणजे कोणी पोराने उद्या "१०१" असे लिहले तर चूक कोणाची?  कारण गणिती भाषेत "दहा अधिक एक" अकरा असा त्याचा अर्थ आहे हे तरी यांच्या डोक्यात आहे का?
                             अशिक्षित पार्श्वभूमी आहे म्हणून गणित शिकायला कठीण जाते हे म्हणणे तर अति हास्यास्पद आहे. आपल्याच आजूबाजूला भाजी विकणाऱ्यापासून अनेक छोटी कामे करून कमावणारे अशिक्षित तुमच्या पेक्षा लवकर बेरीज वजाबाकी करून तुमच्याशी व्यवहार करतांना गणित करतच असतो की! भाजीवाले तर किलोचा भाव सांगतानाच त्याला अर्ध्या पावा पर्यंत किंमत सहज पद्धतीने सांगतो. ते याच पारंपरिक पद्धतीने याचा विचार बालभारतीवाल्यांनी केला आहे का?

                           बर बालभारतीने जो शब्द उच्चारायला कठीण आहे, लिहायला कठीण आहे असा जो दावा केला आहे त्याची काही आकडेवारी यांच्या कडे आहे काय? खरे तर भारतातून "फूट" हे परिमाण हद्दपार करून "मीटर" वापरायचा निर्णय झाला. पण कागदावर मीटर लिहून पण प्रत्यक्ष बांधकाम करतांना मात्र अजूनही फुटचाच हिशोब होत असतो आणि नवीन अभियंते मात्र "मीटर चे फूट" आणि "फुट चे मिटर" करतांनाच भांबावून जातात.

                       मुळातच आपल्या मराठी भाषेबद्दल जितका न्यूनगंड आपल्याला आहे तितका अजून कोणाला नाही. मराठी आपली "मातृभाषा" म्हणतो, मातृ म्हणजे "आई",  पण आपण जगातील कोणत्याही दुसऱ्या भाषेचा दुस्वास नक्कीच करत नाही, "मावशी" सारखे प्रेम करतो. पण खेदाने हे म्हणावे आपण मराठीतील एक म्हण "माय मरो, मावशी जगो" ला शब्दशः आचरणात आणायचा तर प्रयत्न करत नाहीये ना!

                       पहिले मराठीतील व्याकरण कठीण होते, आज जोडाक्षरे कठीण आहेत म्हणून आपण रडत आहोत. भारतीय भाषांमध्ये दक्षिणी भाषा सगळ्यात कठीण, त्यातही मल्यायम भाषा कठीण असते. म्हणून मल्यायम लोकांनी आपली भाषा सोडून दिली काय? विदेशात पण चिनी लिपी सगळ्यात कठीण म्हणून चिनी संगणक आणि स्मार्ट फोन वापरतांना रोमन लिपीत चिनी भाषा लिहतात काय? पण आपल्या मराठीत हे वेड जास्त आणि पुन्हा आपल्याला मराठीत लिहिता येत नाही, वाचायला कठीण जाते याचा अभिमान जास्त. हे कुठेतरी थांबायला हवे!
                    खरे तर मराठी भाषे सारखी श्रीमंत भाषा नाही. देवनागरी लिपी ही त्या श्रीमंतीत भरच घालते. १४ स्वर आणि ३६(क ते ज्ञ )+श्र= ३७ व्यंजने इतकीच मराठी भाषा नाही. तर ३७ व्यंजने गुणिले १४ स्वर , खरेतर १५ ( अॅ, ऑ , ऍ , यातील १४ स्वर मान्य आहेतच ) म्हणजे     ३७ x१५ =  ५५५
रफार                      ३७
रुकार                     ३७
रुकार                      ३७                
उदा . मृ, प्रु ,र्म इ ,ऋ मूळ स्वर. १४ / १५या प्रत्येकावर अनुस्वार, चंद्रबिंदीसह अनुस्वार , प्रत्येक व्यंजनाचे दुसऱ्या व्यंजना सोबत जोडाक्षरx१५ शिवाय ओंकार किती अक्षरे आहेत हो ? यांना लागणारी विभक्ती प्रत्यये आणखी वेगळी .
ही खरी मराठी आहे !  

                   "ण, ळ, ऋ" ही व्यंजने फक्त आणि फक्त मराठीतच आहेत. ओठ , जीभ ,दंत , कंठ, टाळू यावर आधारीत उच्चार ही मराठी / संस्कृत यांची देण आहे .या सगळ्यांच्या एकत्रित परिणाम म्हणजे ज्ञानदेवाने "अमृतातेहि पैजा जिंके!" असे वर्णन या भाषेचे केले होते, त्यालाच हे तथाकथित तज्ञ नाकारत आहेत ही खेदाची गोष्ट आहे.

                        खरे तर भाषा सुलभीकरणाच्या नावाखाली आपण आपल्याच भाषेचा गळा तर घोटत नाहीये ना? याचा विचार जरूर व्हावा आणि मुलांना भाषा सुलभ रीतीने शिकवायची तर फक्त मराठीच सुलभ का करायची? आज इंग्लंड पेक्षा जास्त लोकसंख्या भारतात इंग्रजी बोलतात तर मग आपण अजूनही "क्विन्स इंग्लिश" अगदी ऑक्सफर्ड डिक्शनरी घेऊन का शिकवत आहे? आपण त्या इंग्रजीचे भारतीय रूपांतर का नाही करू शकत? मग या पद्धतीनेच PSYCHOLOGY (सायकॉलॉजी) किंवा PHYSICS (फिजिक्स) चे स्पेलिंग पण उच्चारा नुसार करायला लावून लहान मुलांवर स्पेलिंग घोकून पाठ करायच्या दिव्यातून सुटका करावीशी कोणत्याही तथाकथित तज्ञ लोकांना वाटली का नाही?
                     तसेही शिक्षण व्यवस्थेचा खेळखंडोबा मुलांना १ली ते १० वी पास करून ढकलण्याचा योजने मुळे झालाच आहे. कसाही अभ्यास केला तरी पास करायचेच आहे या भावनेने शिक्षक पण पाट्या टाकतात (काही सन्मानीय अपवाद आहेत). आता तर सरळ आकलनशक्तीच खुंटवायची पद्धत समोर आणत आहे, तीही "तज्ञ समितीच्या" नावाखाली. 

                   अभ्यास पद्धती बदलणे याला विरोध नाही, प्रयोग करून बघायला पण अजिबात हरकत नाही, पण त्या करता सारासार विचार नक्कीच हवा, ही पद्धत मुलांची आकलन शक्ती, सृजनशिलता आणि भाषा या तिन्हीला मारक होईल आणि ते पण आपली मातृभाषा असलेली मराठी बोलायला कठीण आहे या वाह्यात करणाखाली! या बिनबुडाच्या कथित अभ्यासाचा विरोध व्हायलाच हवा.

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी

टिप्पण्या