![]() |
सेंट जॉर्ज |
ग्रीक कप्पाडोसिया भाग म्हणजेच आताच्या तुर्कीच्या आजूबाजूचा भागात असलेल्या लिडा मध्ये जन्माला आलेला जॉर्ज ! हा काळ होता तत्कालीन रोमन धर्म आणि त्याच भागात फोफावणाऱ्या ख्रिश्चन धर्मातील भांडणाचा ! तर लिडाचा जॉर्ज हा तत्कालीन रोमन सैन्यात एक शिपाई होता. तत्कालीन रोमन सम्राट डायोक्लेटीनच्या प्रेटोरियन गार्ड (राजाचे विशेष अंगरक्षक आणि गुप्तचर ) चे सदस्य होते. मात्र जॉर्ज याने ख्रिस्ती धर्म अंगिकरला होता. तत्कालीन काळात वेगवेगळ्या रोमन सम्राटांच्या काळात ख्रिस्ती लोकांना त्यांच्या धर्मामुळे प्रताडीत केले गेले होते. साधारण इसविसन ५४ पासून इसवीसन २६८ पर्यंत जवळपास ७ वेळा काही काळ हा ख्रिस्ती प्रताडणेचा काळ म्हणून ओळखल्या जातो. सम्राट निरो (तोच जो रोम जळत असतांना बासरी वाजवत बसला होता.) पासून या ख्रिस्ती प्रताडनेला सुरवात झाली ती ऑगस्ट सम्राट डायोक्लेटीनच्या काळापर्यंत सुरू होती. यात इसविसन २८३ ते ३०५ या काळात झालेली ख्रिस्ती प्रताडणा हा ख्रिस्ती लोकांचा रोमन साम्राज्यामधील शेवटचा कठीण काळ. याच काळात रोमन साम्राज्याचा साधा सैनिक असलेल्या लिडाच्या जॉर्ज याला त्याने ख्रिस्ती धर्म सोडण्यास नकार दिल्या मुळे जीव गमवावा लागला. तत्कालीन रोमन सम्राट डायोक्लेटीनच्या आदेशाने जॉर्ज याला त्रास दिला गेला आणि नंतर मारले.
याच जॉर्जला नंतर चर्चने "संत" पदवी बहाल केली. ख्रिस्ती धर्मात १४ पवित्र संतांचा एक समूह पूजल्या जातो, ज्यांना "चौदा पवित्र सहायक" म्हणून ओळखल्या जाते. वेगवेगळ्या आजारांना बरे करणारे संत म्हणून मान्यता आहे. तर त्या समूहात संत जॉर्ज यांना संरक्षक सैनिकी संत म्हणून मान्यता दिल्या गेली. ऐतिहासिक काळात इंग्लंड, जॉर्जिया, इथिओपिया, स्पेन मधील आरागॉन, रशिया मधील मास्को आणि कैटेलोनिया वगैरे भागांनी सेंट जॉर्ज यांना आपले संरक्षक संत म्हणून मान्यता दिली. सेंट ऑफ इनलोद, इस्रायल येथे एक कबर आहे, अनेक ख्रिस्ती लोकांची मान्यता आहे की ही कबर या सेंट जॉर्ज यांची आहे. हे तेच सेंट जॉर्ज आहे ज्यांचे चिन्ह "पांढऱ्या पार्श्वभूमीवर असलेला लाल क्रॉस" होते आणि आता पर्यंत हेच चिन्ह भारतीय नौसेनेच्या ध्वजावर अंकित होते.
![]() |
दुसऱ्या क्रुसेड दरम्यान प्रसिद्ध झालेला क्रॉस |
मात्र या मात्र सेंट जॉर्ज आणि त्यांचे चिन्ह याचा इतिहास अजून नंतरचा ! आपल्याला माहीतच आहे की, ख्रिस्ती आणि मुस्लिमांमध्ये एकूण सात वेळा धर्मयुद्ध झाले, यालाच आपण "क्रुसेड" म्हणून ओळखतो ! तर दुसऱ्या धर्मयुद्धात प्रसिद्ध "नाईट्स टेम्पलर" किंवा "ऑर्डर ऑफ सोलोमन टेंपल" म्हणून एक येरुसेलम वरील हल्ल्याचे युद्ध ओळखल्या जाते. या युद्धात फ्रांस आणि इंग्लंडच्या सैनिकांनी ज्यांना टेम्पलर म्हणून ओळखले जाते त्यांनी हे चिन्ह पहिल्यांदा वापरले. तेव्हा मात्र तो ध्वज वर अर्धा काळा आणि खाली अर्धा पांढरा होता आणि त्याच्या मध्ये लाल रंगाचा क्रॉस होता. मात्र तिसऱ्या धर्मयुध्दात मात्र या चिन्हाचा व्यापक उपयोग केला गेला आणि याच काळात सेंट जॉर्ज यांना सैन्य संत म्हणून व्यापक प्रसिद्धी मिळाली. या काळातच या "क्रॉस ऑफ सेंट जॉर्ज" बद्दल अनेक चमत्कारिक आख्यायिका जोडल्या गेल्या. या नंतर मात्र काही काळ पांढऱ्या पार्श्वभूमीवरील लाल क्रॉस म्हणजेच "क्रॉस ऑफ सेंट जॉर्ज" हा इंग्लंडचा राष्ट्रध्वज म्हणून मान्यता प्राप्त झाला. आजही हा ध्वज इंग्लंडचे राष्ट्रीय प्रतीक आहे.
नेव्हीची सुरवात १५४६ सालची. इंग्लंडचा राजा आठवा हेन्री याने याची स्थापना केली. तेव्हा कदाचित इंग्लंडचे प्रतीक म्हणून हाच "क्रॉस ऑफ सेंट जॉर्ज" असलेला ध्वज ब्रिटिश नौकांवर लागला असेल. ब्रिटिश साम्राज्य मोठे आणि मजबूत झाले ते याच ब्रिटिश नौसेनेच्या भरवश्यावर ! जेव्हा ब्रिटिश साम्राज्याचा ध्वज म्हणून युनियन जॅक आला, तेव्हा या ब्रिटिश नेव्हीच्या "क्रॉस ऑफ सेंट जॉर्ज" ध्वजाच्या एका बाजूला "युनियन जॅक" येऊन बसला. कालांतराने या क्रॉसच्या मध्ये ब्रिटिश राणीचे राजचिन्ह पण विराजमान झाले. आजच्या घडीला रॉयल ब्रिटिश नौसेनेचा ध्वज हाच आहे.
![]() |
रॉयल इंडियन नेव्ही चिन्ह |
जेव्हा इंग्रजांच्या राज्यात भारतीय नौसेना तयार करण्यात आली तेव्हा तिला रॉयल इंडियन नौसेना असे नाव मिळाले. अर्थातच ब्रिटिश राणी आणि ब्रिटिश नौसेनेच्या अधीन असणाऱ्या या नौसेनेचा ध्वज हा ब्रिटिश नौसेनेच्या ध्वजा सारखा एका कोपऱ्यात ब्रिटिश युनियन जॅक असलेला "क्रॉस ऑफ सेंट जॉर्ज" चा ध्वज होता. फक्त क्रॉसच्या मध्ये "RIN" (रॉयल इंडियन नेव्ही) आणि राणीचा मुकुट असलेले राजचिन्ह अंकित असलेला हा ध्वज होता.
पुढे भारताला स्वातंत्र्य मिळतांना देशाची फाळणी झाली. त्यात तत्कालीन रॉयल इंडियन आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स ला भारत आणि पाकिस्थान मध्ये विभागण्यात आले. तत्कालीन काळात रॉयल इंडियन आर्मीचा ध्वज आणि रॉयल इंडियन एअर फोर्सच्या ध्वजात किरकोळ बदल करत त्यात स्वतंत्र भारताचे राजचिन्ह टाकत त्याला भारतीय लष्कर आणि भारतीय वायुसेनेचा ध्वज म्हणून मान्यता मिळवल्या गेली. अर्थात या ध्वजात असलेली प्रतीक ही कोणत्याही प्रकारे धार्मिक नव्हती. त्यामुळे असलेली गुलामगिरीची राजचिन्हे जात, त्यावर भारतीय राजचिन्हे अंकित केल्या गेली. तोच प्रकार भारतीय नौसेनेसोबत केला गेला. नौसेनेच्या ध्वजातील युनियन जॅक जाऊन तेथे भारतीय तिरंगा आला, पण तो "क्रॉस ऑफ सेंट जॉर्ज" मात्र तसाच राहिला. नाही म्हणायला त्या क्रॉसच्या मध्ये असलेले ब्रिटिश राणीचे राजचिन्ह गायब केल्या गेले.
१५ ऑगस्ट २००१ साली तत्कालीन वाजपेयी सरकारने, भारतीय नौसेनेचा ध्वज बदलायचा प्रयत्न केला. भारतीय नौसेनेच्या ध्वजाच्या रूपाने अजून वसाहती गुलामगिरीचे प्रतीक जिवंत आहेत, ते बदलायची गरज अधोरेखित केली होती. आपल्या वसाहतवादी भूतकाळापासून दूर जाण्यासाठी या चिन्हात बदल केला, जॉर्ज क्रॉसच्या जागी IN च्या शिखरावर ठळकपणे अशोक सिंहाचा समावेश केला. त्याच्या मध्यभागी विस्तृत अँकर. तिरंगा मूळ जागेवरच राहिला. मात्र माझ्या मते गुलामगिरीच्या प्रतिका पेक्षा पण जास्त ते धार्मिक प्रतीक होते, हे कदाचित योग्य कारण असेल हा ध्वज बदलवायचे.
जेव्हा हा नौसेना ध्वज बदलवल्या गेला तेव्हा पण आजच्या सारखा नौसेनेच्या आत आणि बाहेर म्हणजे जनतेमधून आनंद व्यक्त केला गेला.
परंतु आश्चर्यकारक पणे २००४ साली पुन्हा जुना नौसेनेचा "क्रॉस ऑफ सेंट जॉर्ज" वाला ध्वजच पुन्हा नौसेनेत दाखल झाला. फक्त त्यात फरक इतकाच केला गेला की पहिले रॉयल इंडियन नेव्हीच्या काळात क्रॉसच्या मध्ये RIN या अध्यक्षरासोबत ब्रिटिश राणीचा मुगुट असलेले राजचिन्ह होते, जे नंतर काढून ती जागा रिकामी ठेवण्यात आली होती, तेथे भारतीय राजचिन्ह चार मुख असलेला सिंह आला. मात्र हा बदल करतांना दिलेले कारण एकदम हास्यास्पद होते. या अगोदर वाजपेयी सरकारने दिलेल्या ध्वजात असलेला निळा रंग हा महासागर आणि आकाशाच्या निळ्या रंगापेक्षा वेगळा होता असे ते कारण !
मात्र अनेकांना हे कारण पटत नाही. वाजपेयी सरकारने केलेला बदल हा नंतर आलेल्या काँग्रेस सरकारला पटला नाही, याचे कारण धार्मिक आहे असे अनेकांचे म्हणणे आहे. अर्थात यात काहीही शंका असण्याचे कारण नाही. जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारताला एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून समोर आणण्यात आले. भारतीय संविधान याच धर्मनिरपेक्ष तत्वावर आधारित होते आणि आहे. मात्र तत्कालीन संविधानात कुठेही "सेक्युलर" किंवा "धर्मनिरपेक्ष" असा शब्दप्रयोग संविधानात नव्हता. इंदिरा गांधी पंतप्रधान असतांना लावलेल्या आणीबाणीत लोकशाहीला धाब्यावर बसवत भारतीय संविधानात "धर्मनिरपेक्ष" हा शब्द घुसवण्यात आला. मात्र इतके सारे करून सुद्धा भारतीय नौदलाच्या ध्वजात असलेला "क्रॉस ऑफ सेंट जॉर्ज" हा ढळढळीत धार्मिक ओळख सांगणारे चिन्ह कोणत्याही धर्मनिरपेक्ष सरकारला खुपले नाही हे समजणे स्वतःची फसवणूक असेल.बरे "क्रॉस ऑफ सेंट जॉर्ज" हे केवळ धार्मिक प्रतीक नसून एका धर्मयुध्दाच्या इतिहासाचे पण प्रतीक आहे, ज्याचा भारताशी आणि भारतीय संस्कृती आणि भारतातील मुख्य धर्मसोबत काहीही देणेघेणे नाही. तरीही स्वातंत्र्यानंतर ते प्रतीक कायम राहिले आणि बदललेले पुन्हा वापस आणल्या गेले हे कसे?
असो, आता भाजपच्या मोदी सरकारने पुन्हा एकदा भारतीय नौसेनेच्या ध्वजात बदल केला आहे. पांढऱ्या पार्श्वभूमीवर एका कोपऱ्यात भारतीय राष्ट्रध्वज तिरंगा आणि मध्ये नौसेनेचे भारतीय राजचिन्ह जे अष्टकोनात अधोरेखित आहे. या अष्टकोणाचे पण दोन अर्थ आहेत. पहिला भारतीय नौसेना महासागराच्या आठही दिशांना आपले वर्चस्व प्रस्थापित करून आहे, तर दुसरा ऐतिहासिक आहे. महत्वाचे म्हणजे तो आपल्या।मराठी लोकांसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी तत्कालीन काळात नौसेनेचे महत्व ओळखत आपली नौसेना आणि सागरी किल्ल्यांची श्रुखला उभारण्याची सुरवात केली होती. आधुनिक भारतीय नौसेनेचा तो पाया होता असे गृहीत धरले जाते. त्याचा सन्मान म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा ज्या अष्टकोणात होती, तोच अष्टकोन येथे वापरण्यात आला आहे.
एक गोष्ट लक्षात ठेवा की भारताचा नौसेनेचा इतिहास खूप पुरातन आहे. दक्षिण भारतातील चौल राजघराण्याची नौसेना पण तितकीच मजबूत होती. तत्कालीन काळात श्रीलंके पासून थेट व्हिएतनाम पर्यंत चौल राजांनी आपले साम्राज्य आणि हिंदू धर्म त्याच नौसेनेच्या भरवश्यावर पसरवला होता. मात्र कालांतराने हा वारसा लुप्त झाला. त्या नंतर पश्चिम किनारपट्टीवर छत्रपती शिवाजी महाराज यांनीच नौसेनेचे महत्व ओळखले आणि नौसेना उभी केली, म्हणून हा सन्मान !
तर हा आहे नौसेनेच्या आपण टाकून दिलेल्या ध्वजाचा आणि त्यावर असलेल्या "क्रॉस ऑफ सेंट जॉर्ज" चा इतिहास ! आता तुम्ही विचार करायचा की, झालेला बदल चांगला आहे की वाईट !
खूप छान माहिती
उत्तर द्याहटवा