काँग्रेस "भारत जोडो" यात्रा करत आहे की "भारत तोडो" हा आता नक्कीच चर्चेचा विषय होत आहे. मात्र २०१४ पासून काँग्रेसमध्ये जसा विरोधाभास दिसत आहेत, तेच विरोधाभास या यात्रेच्या निमित्याने समोर येत आहेत.
बघा एकीकडे राहुल गांधी "भारत जोडो" यात्रा करत आहेत, मात्र काँग्रेस तुटत आहे. ही यात्रा सुरू असतानाच गोव्यातील ११ पैकी ८ आमदार तुटले ! तर दुसरीकडे काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा पेच चमत्कारिक रित्या फसला आहे. आगामी काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीत सोनिया गांधी आणि राहुल गांधी लढणार नाही अशी घोषणा केल्या गेली आणि काँग्रेसचे नेते ज्यांना वाटते आपण अध्यक्ष व्हावे त्यांनी या निवडणुकीत भाग घेण्याचे आवाहन केल्या गेले होते. मात्र गांधी परिवार खास करून सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांना राजस्थानचे वर्तमान मुख्यमंत्री गहलोत यांना काँग्रेसचे अध्यक्ष व्हावे असे वाटत आहे. त्यामुळे गहलोत काँग्रेसचे अध्यक्ष होणार हे नक्की मानल्या जात आहे.
मात्र यात पुन्हा एक पेच आहे ! स्वतः गहलोत यांना काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवायला काहीही समस्या नाही. मात्र राजस्थानमध्ये मात्र आपल्या नंतर मुख्यमंत्री नक्की कोणाला करायचे हा प्रश्न खूप मोठा झाला आहे. राजस्थानमध्ये गहलोत नंतर मोठा नेता सचिन पायलट हे आहेत. मात्र गहलोत यांना सचिन पायलट मुख्यमंत्री झालेले कोणत्याही किमतीत आवडणार नाहीये. तेव्हा गहलोत काँग्रेस अध्यक्ष होणार? आणि ते अध्यक्ष झाले तर राजस्थान मध्ये मुख्यमंत्री कोण होणार? या सगळ्या मारामारीत काँग्रेस संघटनेत आता नवीन विचार समोर येत आहे की, काँग्रेस अध्यक्ष पुन्हा सोनिया गांधी यांनाच करावे आणि चार कार्यकारी अध्यक्ष करत त्यांना भारताच्या चार भाग ताब्यात द्यावे. मात्र या सगळ्या राजकीय आणि संघटनात्मक राजकारणातून संपूर्ण अलिप्त राहात फक्त यात्रा करत राहुल गांधी आणि काँग्रेसच्या हातात नक्की येणार काय हा प्रश्नच आहे.
बाकी वदंता अशी की, काँग्रेसमध्ये पण दोन काँग्रेस तयार झाल्या आहेत. पहिली तर काँग्रेस संघटन आणि दुसरी राहुल काँग्रेस. या राहुल काँग्रेसवर अनेक गंभीर आरोप आजपर्यंत केल्या गेले. गुलाम नबी आझाद यांचे काँग्रेस सोडतांनाचे पाच पानी पत्र आणि त्यांनी राहुल गांधी आणि त्यांच्या आजूबाजूला असलेल्या कंपूवर केलेले आरोप आता सार्वजनिक आहेत. मात्र आता काँग्रेस न सोडणारे आणि गांधी घरण्यासोबत एकनिष्ठ असणारे पण या बाबतीत दबक्या आवाजात बोलायला लागले आहेत.
गांधी घराण्याशी एकनिष्ठ असणाऱ्या नेत्यांना या "भारत जोडो" यात्रेत खूप काम नाहीये, मात्र सोबत ठेवले असले तरी, त्याचे मत विचारात घेतले जात नाहीये. या विवादाची ठिणगी पडली ती, काँग्रेस आय टी सेल ने टाकलेल्या संघाच्या जळणाऱ्या चड्डी बद्दल ट्विट केल्या नंतर ! आश्चर्य वाटेल मात्र काँग्रेस मधील गांधी घराणेनिष्ठ अनेक जेष्ठ्य नेत्यांना खरे तर या भारत जोडो यात्रेत संघाच्या विरोधात कडक भूमिका घेण्याचे टाळावे असे वाटत होते. उलट दिग्विजयसिंग (यांचे नाव फक्त मुख्य म्हणून घेतले आहे, असे अनेक नेते आहेत) सारख्या अनेक काँग्रेसी नेत्यांनी आणि सुधेन्द्र कुलकर्णी सारख्या काँग्रेस प्रेमी बुद्धिवाद्यांनी उलट राहुल गांधींना असे सुचवले होते की, केरळ मध्ये कम्युनिस्ट हिंसाचाराला बळी पडलेल्या संघाच्या कार्यकर्त्यांच्या घरी या यात्रेच्या निमित्याने भेट द्यावी. मात्र या सूचनेला राहुल गांधी आणि त्यांच्या सवंगड्यांनी पूर्णतः वाटाण्याच्या अक्षदा लावल्याच पुन्हा संघाच्या विरोधातील ट्विट करत अकारण संघ कार्यकर्त्यांना अंगावर ओढवून घेतले. बाकी यात अजून एक गोम अशी की, सध्या ही यात्रा काही करणाने अजून दक्षिणेत रेंगाळली आहे आणि कम्युनिस्ट पक्ष आता जोरदार विरोध या यात्रेला करत आहे, याच वेळी संघाला आणि त्यांच्या समर्थकांना आपल्या विरोधात अकारण करून घेऊ नये. आता हे नेत्यांनी काँग्रेस आय टी सेलला सूचना दिली आहे की, या पुढे जे काही ट्विट कराल ते आम्हला दाखवण्यात यावे. मात्र या सुचनेचे किती पालन काँग्रेस (राहुल) करेल हा प्रश्नच आहे.
काँग्रेसची यात्रा सध्या दक्षिण भारतातच अडकलेली असतांना काँग्रेसला उत्तरेत अजून काही झटके लागणार आहेत. गुलाम नबी आझाद प्रकरण असो की, राजस्थान आणि गहलोत प्रकरण असो काँग्रेसच्या यात्रेचे महत्व कमी करणाऱ्या या बातम्या आहेच, मात्र पुढील बातमी पंजाबमधून येत आहे. काँग्रेसची पंजाबमध्ये बरीच पडझड झाली आहे. पंजाब निवडणुकांआधी काँग्रेसची सगळी मदार ज्या चन्नी यांच्यावर होती, तेच चन्नी आता भारत सोडून विदेशात स्थायिक होण्याच्या विचारात आहेत. काँग्रेसची "भारत जोडो" यात्रा पंजाबमध्ये पोहचायच्या अगोदर जर चन्नी यांनी आपले विचार प्रत्यक्षात आणला तर काँग्रेसकरता पंजाबमध्ये मोठा धक्का राहील.
तेव्हा बघत रहा काय होते ते...!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा