"भारत जोडो" : प्रयोजन आणि फळ !



आज काँग्रेसने सुरू केलेल्या "भारत जोडो" यात्रेमुळे काँग्रेसमध्ये आणि त्यांच्या समर्थकांमध्ये कधी नव्हे तो उत्साह दिसत आहे. कॉंग्रेसीना या यात्रेमुळे राहुल गांधी एकदम चार पावले पंतप्रधान पदाच्या जवळ पोहचल्याचा साक्षात्कार होत आहे, तर भाजपा विरोधक असलेल्या कॉंग्रेसबाह्य अनेकांना या यात्रेने २०२४ च्या पुढील लोकसभा निवडणुकीत भाजपाला बसणारे हादरे दिसत आहेत. 


मात्र, आज पर्यंत भारतीय राजकारणाच्या इतिहासात अश्या यात्रांना अत्यंत मर्यादित यश मिळाले आहे. साधारणतः भारतात १९९० सालच्या भाजपाच्या अयोध्या यात्रेपूर्वी कोणती राजकीय यात्रा निघाली नाही आणि २००२ च्या गुजरात दंगली आधी भारतात कोणत्याच राज्यात भयानक दंगल झाली नाही असा आताच्या पिढीचा समज करून देण्यात येतो. मात्र इतिहास अजिबात तसा नाही. त्या अगोदर पण राजकीय यात्रा निघाल्या आहेत आणि त्या यात्रांमुळे काही काळ खळबळ जरी मजली तरी फारसे काही हातात ना यात्रा काढणाऱ्या पक्षाच्या हातात काही लागले, ना जनतेच्या ! हीच वस्तुस्थिती आहे. मग आता प्रश्न असा आहे की काँग्रेसच्या "भारत जोडो" यात्रेने काँग्रेसला नक्की फायदा काय होणार? राहुल गांधींची जनमानसात असलेली "पप्पू" इमेज किंवा अकार्यक्षम किंवा बेजवाबदार इमेज बदलणार का? 



इथे एक गोष्ट प्रकर्षाने नमूद करावीशी वाटते की, "भारत जोडो" यात्रेचा जो काही मार्ग आखल्या गेला आहे तो काँग्रेसने अत्यंत सावधानीने आखलेला आहे. राहुल गांधी यांची जी प्रतिमा या यात्रेच्या निमित्याने बनवण्यात येणार आहे त्याला बट्टा लागणार नाही याची दक्षता कमीतकमी या यात्रेचा मार्ग आखतांना केली आहे. ही यात्रा तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली, पंजाब आणि काश्मीर या राज्यातून ही यात्रा जात आहे. यातील केरळ, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात भाजपची उपस्थिती अतिशय कमी आहे. त्यातही या तिन्ही राज्यातील सरकारचे वेगवेगळ्या कारणाने केंद्र सरकारसोबत सध्या खटके उडालेले आहेत. ही राज्य सरकारे काँग्रेसच्या यात्रेला प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष मदत देऊ करतील ही रणनीती होती. यात्रेच्या सुरवातीला मिळणारा जनतेचा प्रतिसाद हे त्याचेच द्योतक आहे आणि अपेक्षित पण होते. 


कर्नाटकात आज काँग्रेस सत्तेत नसला तरी या राज्यात काँग्रेस संघटन अतिशय मजबूत आहे. इतके मजबूत की पुढील निवडणुकी नंतर मुख्यमंत्री कोण बनणार या करता काँग्रेस मधील तीन नेत्यांची आपसातच चढाओढ लागली आहे. 



महाराष्ट्र जरी काँग्रेस संघटन कमजोर वाटत असले तरी, काँग्रेसचे अस्तित्व संपले नाहीये. साधारण काँग्रेसचा कधीकाळी बाले किल्ला राहिलेला विदर्भ आणि सध्या काँग्रेस जमिनीवर अस्तित्व दाखवत असलेल्या मराठवाड्याच्या सीमेवरून ही यात्रा नेणे हे यात्रेला मिळणारा प्रतिसादात खोडा पडणार नाही याची काळजी घेतल्याचा उत्तम नमुना आहे. मध्य प्रदेशातील ज्या भागातून ही यात्रा जाणार आहे तिथे काँग्रेसचे चांगले बस्तान आहे. राजस्थानमध्ये सध्या गहलोत सरकारने आताच चार पाच महिन्यांपूर्वी राजस्थान मध्ये झालेल्या धार्मिक हिंसाचारानंतर एक अश्याच तिरंगा यात्रेचे आयोजन केले होते. आता या  "भारत जोडो" यात्रेच्या गर्दीचे नियोजन त्यांना सोपेच जाणार आहे. या यात्रेचा कस यात्रेच्या शेवटच्या टप्प्यात पंजाब आणि काश्मीर मध्ये लागेल. तिथे काय नियोजन होते त्यावर सगळे अवलंबून. मात्र प्रथमदर्शनी तरी यात्रा संमिश्र यश मिळवत संपेल असे दिसते. 


खरे तर आता लगेच दोन राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, गुजरात आणि हिमाचल प्रदेश ! यातील हिमाचल प्रदेश मध्ये सध्या भाजपा सरकार असले तरी, येत्या निवडणुकीत काँग्रेसला जिंकण्याच्या बऱ्याच आशा आहेत. गुजरात जरी साध्य भाजपाचा गड झाला असला तरी गेल्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपला चांगलाच दमवला होता ही वस्तुस्थिती लक्षात घेत, या यात्रेचा मार्ग या दोन राज्यातून गेला असता तर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्याचा फायदा काँग्रेसला झाला असता. मात्र यदाकदा या निवडणुकीत पराजय हातात आला तर ? "भारत जोडो" यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी यांच्या डोक्यावर या पराजयाचे खापर फुटेल अशी भीती कदाचित यात्रेच्या नियोजनकर्त्यांमध्ये असेल. मात्र हा धोका काँग्रेसने पत्करायला हवा होता. त्यातून राहुल गांधी यांच्या बनलेल्या पलायनवादी प्रतिमेतून बाहेर पडता आले असते. एकीकडे या यात्रेत संघाला लागलेली आग दाखवत खिजवता येत आहे, मात्र आपल्या प्रत्येक भाषणात संघाला लक्ष करणाऱ्या राहुल गांधी यांना आपली "भारत जोडो" यात्रा घेऊन संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरात येणे मात्र जमले नाही, ही त्याची पलायनवादी वृत्ती समोर आणते. लक्षात घ्या अडवाणी यांची यात्रा खऱ्या अर्थाने तेव्हा गाजली जेव्हा बिहार मध्ये लालू प्रसाद यादव यांनी अडवाणी यांना अटक केली. बाकी कोणत्याही राज्याच्या नेत्याने ही हिम्मत केली नव्हती. मात्र अडवाणी यांना अटक करून लालू पण तितकेच हिरो बनले आणि भाजपाने पण त्या अटकेचा फायदा करून घेतला. लालू अटक करणार याची कल्पना असून सुद्धा भाजपाने यात्रेचा मार्ग बदलला नाही, तो धोका भाजपने पत्करला ! 



बाकी सध्या या यात्रेच्या विरोधात मतप्रदर्शन करायला भाजपने नेहमी प्रमाणे स्मृती इराणी आणि आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांना समोर केले आहे. स्मृती इराणी ही काँग्रेसची दुखती नस आहे, राहुल गांधी यांना आपल्या वडिलोपार्जित अमेथी वरून बाहेरचा रस्ता दाखवणारी स्मृती इराणी यांच्या राहुल विरोधी वक्तव्याला थोडे वजन प्राप्त होते. तर हेमंत विश्व शर्मा हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसी ज्यांनी राहुल गांधी आणि त्यांच्या करता महत्वाच्या त्यांच्या कुत्र्याची बरीच कीर्ती भारतात केली होती. मात्र भाजपाकडे फक्त हे दोन नेते नाहीत, भाजपाच्या आत आणि बाहेर असे पूर्व काँग्रेसी गांधी घराण्याचा विरोधात असलेले, त्यातही राहुल गांधी यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेले अनेक आहेत. ज्याचा फायदा भाजपा वेळोवेळी घेईल. अर्थात काहींना असे वाटेल की, राहुल गांधी यांच्या "भारत जोडो" ला मिळणारा प्रतिसाद बघून भाजपा जोरदार विरोध करत आहे, टीका करत आहे. 


मात्र भाजपा काँग्रेस विरोधी पक्ष आहे, तेव्हा काँग्रेसच्या कोणत्याही वक्तव्यावर, आयोजनावर टीका करणे हा भाजपचे हक्क आहे हे लोकशाहीवादी कसे विसरतात, हे लक्षात आले नाही. मात्र आपल्या कार्यक्रमामुळे, वक्तव्यामुळे आणि जाहिरातींमुळे आपण टीकेचे लक्ष व्हायला नको याची काळजी काँग्रेसने पण केली पाहिजे, जी काँग्रेस घेतांना दिसत नाही. 



बाकी जेव्हा पासून जयराम रमेश यांनी काँग्रेसच्या प्रसिद्धी अभियानाची कमान आपल्या हातात घेतली आहे, तेव्हा पासून काँग्रेस समाज माध्यमांवर चांगलाच सक्रिय झाला आहे. आज पर्यंत समाज माध्यमांवर भाजपाचा वरचष्मा होता किंवा आहे याचे रडगाणे गाणारी काँग्रेस आता बरीच सक्रिय आहे. मात्र तरीही समाज माध्यमांवर काँग्रेस कडून काय टाकल्या जाईल यावर अंकुश मात्र त्यांना ठेवता येत नाहीये असे दिसत आहे. खरे तर राहुल गांधी यांच्या कपड्यांच्या किमती वरून खिजवणे ही फक्त लिटमस चाचणी होती आणि काँग्रेसी आय टी ला आक्रमक करण्याची रणनीती होती, असे म्हणावे लागेल. जास्त आक्रमक होत कॉंग्रेसिनी संघाची हाफ पॅन्ट जळत असल्याचे चित्र समाज माध्यमांवर टाकून भाजपला आता एक कोलीत मिळवून दिले. तसेही तामिळनाडूमधील विवादित पाद्री सोबत राहुल गांधी यांचा संवाद आणि त्या पाद्रीचे खेद जनक वक्तव्य ज्या कोण्या काँग्रेसीने उघड केले त्याचे आभार पण भाजपाने मानायला हवे. असो, एकूण काय? तर काँग्रेस सोडून जाणार्यांनी राहुल गांधी यांच्या आजूबाजूला असलेल्या त्यांच्या सवंगड्यांवर जे आरोप केले ते योग्य असल्याचा निर्वाळाच या सगळ्यातून दिसतो. अजून जशी यात्रा समोर जाईल तसे राहुल गांधी हे अश्या लोकांना आपल्या "भारत जोडो" मध्ये जोडत जातील या अपेक्षेवर भाजपा नक्कीच असणार. 


बाकी सध्या राहुल गांधी यांचे म्हातारे, तरुण आणि मध्यम वयीन लोकांसोबत बोलतांनाचे, मिठी मारतांनाचे, लहान मुलांना चुंबन देत असल्याचे छायाचित्रे मोठ्या प्रमाणावर टाकल्या जात आहेत. या मुळे विशेष काही भारतीयांचे मत परिवर्तन होईल असे नाही. कारण अशी छायाचित्रे या अगोदर पण बरेच वेळा वेळोवेळी काँग्रेस कडून समोर आली आहेत आणि त्या चित्रांच्या अनुषंगाने भावनिक लेख पण! मात्र भारतीय जनतेने त्याची एकतर खिल्ली उडवली किंवा त्याला राजकीय नाटके म्हणून जास्त महत्व दिले नाही. दुसरे असे की राहुल गांधी यांची स्वतःची कार्यशैली आणि विचारपद्धत! उद्या राहुल गांधी एखादे वक्तव्य करतील आणि जयराम रमेश यांच्या सगळ्या मेहनतीवर पाणी पडेल. तामिळनाडू मधील पाद्रीसोबतचा संवाद त्याचेच उदाहरण आहे. 



एकूण काय? तर या इतक्या मोठ्या यात्रेचे फलित काय होणार? एकीकडे कॉंग्रेस आपली सगळी मेहनत या यात्रेवर लावत असतांना, दुसरी कडे भारतातील भाजपा विरोधी खेमा मात्र आपली वेगळी चूल मांडतांना दिसत आहे. शरद पवार, ममता बॅनर्जी, आता नवीन प्रवेश नितीश कुमार वगैरे आपली वेगळ्या रणनीतीवर काम करत आहे, हा विरोधाभास नक्कीच लक्षात घेण्यासारखा आहे. एकूण काय तर, काँग्रेस या यात्रेच्या माध्यमातून भाजप आणि संघ यांना शह देण्यापेक्षा, वेगळी चूल मांडत विरोधाचे राजकारण करण्याच्या प्रयत्न करणाऱ्यांना संदेश देण्याचे काम जास्त करत आहे आणि तीच सध्या तरी काँग्रेसची प्राथमिकता आहे.

टिप्पण्या