आज काँग्रेसने सुरू केलेल्या "भारत जोडो" यात्रेमुळे काँग्रेसमध्ये आणि त्यांच्या समर्थकांमध्ये कधी नव्हे तो उत्साह दिसत आहे. कॉंग्रेसीना या यात्रेमुळे राहुल गांधी एकदम चार पावले पंतप्रधान पदाच्या जवळ पोहचल्याचा साक्षात्कार होत आहे, तर भाजपा विरोधक असलेल्या कॉंग्रेसबाह्य अनेकांना या यात्रेने २०२४ च्या पुढील लोकसभा निवडणुकीत भाजपाला बसणारे हादरे दिसत आहेत. मात्र खरेच असे होऊ शकते काय? काँग्रेसच्या यात्रेचे नक्की फलित काय? आणि भारतीय राजकारणात या राजकीय यात्रांचा इतिहास काय? हे जरा बघू !
भारतात शंकराचार्य, गौतमबुद्ध आणि गुरूनानक यांनी स्वतःला भारतीयांशी जोडायला आणि भारतीयांना अध्यात्माची नवी दिशा द्यायला अश्याच यात्रा केल्या होत्या. आज भारतीय जनतेच्या वैचारिक मूल्यात या महानुभवांच्या विचारांची जी बीजे दिसतात त्यांच्यातच यांच्या यात्रा किती सफल होत्या हे लक्षात येते. भारतीय राजकारणात "राजकीय यात्रा" या प्रकाराला एक वेगळं वलय आहे. १२ मार्च १९३० रोजी महात्मा गांधी यांनी ब्रिटिश सरकारने मिठावर लादलेल्या करा विरोधात सुरू केलेली "दांडी यात्रा" ही माझ्या मते भारतीय इतिहासातील सगळ्यात जास्त यशस्वी अशी एकमेव यात्रा होती. भारत स्वतंत्र झाल्यावर पण राजकीय आणि सामाजिक, मार्च - यात्रांचे आयोजन वेळोवेळी, वेगवेगळ्या पक्षांकडून झाले. मात्र त्याला मिळालेले यश हे संमिश्र राहिले. एखाद्या राजकीय पक्षाने, नेत्याने यात्रा काढली आणि तो पक्ष किंवा नेता सत्ता सोपानावर सोप्या पद्धतीने चढला असा प्रकार इतिहासात विरळाच.
भारताचे माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांनी १९८३ साली अशीच एक यात्रा कन्याकुमारी ते दिल्लीतील राजघाट (महात्मा गांधी यांच्या समाधी पर्यंत) काढली होती, "भारत यात्रा" ! या यात्रेच्या वेळेस त्यांनी यात्रेचा उद्देश कोणताही आडपडदा न ठेवता जाहीर करत, ही निव्वळ राजकीय यात्रा असून, याद्वारे सत्ताधारी पक्षाच्या विरोधात जनमत तयार करत, सत्ता सोपान गाठायचा आहे, असे जाहीर केले होते. अर्थातच समाजवादी विचारधारेच्या चंद्रशेखर यांच्या तत्कालीन यात्रे दरम्यानच्या प्रत्येक वक्तव्यात भारतातील गरीब, मेहनती सामान्य भारतीय जनता आणि त्या जनतेचे सुख-दुःख अग्रस्थानी होते. या यात्रेचा उल्लेख देशातील "राजकीय परिवर्तन" घडवणारी यात्रा म्हणून विशेष उल्लेख केला गेला. या यात्रेला तत्कालिन काळात प्रचंड जनसमर्थन मिळत असल्याचे दिसत होते. त्या काळात ना इंटरनेट होते, ना आजच्या सारखे मोबाईल फोन तरीही या यात्रेला आणि त्यांच्या यात्रेदरम्यानच्या भाषणांना होणारी गर्दी बघत भारतीय राजकारणावर नजर ठेवणारे देशी विदेशी वृत्तसमूह आकृष्ठ झाले. त्यांना तत्कालीन काळात आंतराष्ट्रीय प्रसिद्धी मिळाली. इंदिरा गांधी यांना हरवण्याची खरी ताकद म्हणून चंद्रशेखर यांचा चेहरा समोर आला. मात्र यात्रा झाल्यावर काही काळातच १९८४ साली इंदिरा गांधी यांची हत्या झाली आणि भारतीय जनतेचा राजकीय नूर पालटला. पुढील निवडणुकीत भारतीय विरोधी पक्षांचा पार धुव्वा उडाला. चंद्रशेखर यांची ५००० किलोमीटर पाई यात्रा करण्याची मेहनत एका फटक्यात वाया गेली. अर्थात इंदिरा गांधी यांची हत्या झाली नसती तरी या यात्रेचा चंद्रशेखर यांना राजकीय फायदा अत्यंत कमी मिळाला असता असा तत्कालीन अनेक राजकीय विश्लेषकांचा कयास होता. मात्र इंदिरा गांधी यांच्या हत्येमुळे चंद्रशेखर यांची झाकली मूठ सव्वालाखाची राहिली ! असो या नंतर तब्बल ६ वर्षांनी चंद्रशेखर देशाचे पंतप्रधान बनले, तत्कालीन राजकीय परिस्थितीत दैवाने ते पंतप्रधान बनले होते, ज्या काँग्रेस विरोधात रस्त्यावर उतरले होते, त्याच काँग्रेसच्या पाठींब्याने ! आणि मग एक दिवस काँग्रेसने पाठींबा काढला आणि चंद्रशेखर पायउतार झाले.
मात्र चंद्रशेखर यांच्या "भारत यात्रेच्या" अगोदर इंदिरा गांधी यांनी पण एक छोटीशी पद यात्रा केली होती. ही यात्रा त्या प्रकारे नियोजित नव्हती जशी ती झाली, मात्र या अनपेक्षित पद यात्रेमुळे मात्र इंदिरा गांधी यांनी लावलेली आणीबाणी वगैरेची सगळी पाप विसरून भारतीय जनता त्यांच्या मागे उभी राहिली. ही घटना आहे बिहारच्या बेलछी येथील. बेलछी येथे झालेल्या धार्मिक दंगलीत १४ लोकांची हत्या झाली होती. केंद्र सरकारच्या विरोधात आपल्याला चांगला मुद्दा हातात असल्याचे चाणाक्ष इंदिरा गांधी यांना लगेच लक्षात आले. मात्र घटनास्थळी जातांना मध्ये असलेल्या नदीने रस्ता अडवला तेव्हा गाडी मधून बाहेर पडत चालत त्यांनी घटनास्थळ गाठले, आपसूकच आजूबाजूच्या गावातील जनता त्यांच्या सोबत चालू लागली आणि त्या दौऱ्याला अनपेक्षितपणे पद यात्रेचे स्वरूप आले. त्यांची ही कृती देशात प्रसिद्धी मिळवून गेली आणि त्याचा फायदा त्यांना पुढील निवडणुकीत म्हणजे १९८० च्या लोकसभेत झाला आणि त्या सत्तेत आल्या.
राजीव गांधी पंतप्रधान असतांना त्यांनी पण एक यात्रा काढली होती १९८५ साली. खरे तर १९८४ साली लोकसभेच्या ४०० जागा जिंकत राक्षसी बहुमत राजीव गांधी सरकारला होते, तरी अशी यात्रा आयोजित करावी असे त्यांना का वाटले? या यात्रेचा मुख्य उद्देश सांगितल्या गेला काँग्रेस संघटना मजबूत करण्याचा ! मात्र खरे कारण असे की राजीव गांधी, आपल्या आईच्या मृत्यू नंतर एकदम पक्षाच्या शिर्ष स्थानी आले. जरी संजय गांधी यांच्या मृत्यू नंतर राजीव गांधी राजकारणात आईच्या मदतीला आले असले तरी, त्यांना अजून पूर्ण राजकारणी म्हणून ओळख नव्हती. सोबत राजीव गांधी यांना भारतीय जनतेसोबत नाळ जुळवून घेण्यासाठी, जनतेला ओळखण्यासाठी भारत भ्रमणाचा सल्ला मिळाला होता. ही यात्रा "रेल्वे यात्रा" म्हणून ओळखल्या गेली तेव्हा, राजीव गांधी रेल्वेच्या दुसऱ्या दर्जाच्या डब्यातून प्रवास करत जनतेसोबत संवाद साधत होते. अर्थात या यात्रेचा काँग्रेसला कितपत फायदा झाला ? तर १९८८ साली श्रीलंकेत सेना पाठवण्याचा निर्णय आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाचे किटाळामुळे राजीव गांधी १९८९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले.
अजून एक गाजलेली यात्रा आठवणीत आहे. अर्थात ही राजकीय यात्रा नव्हती, मात्र देशात वाढत जाणारी धार्मिक असहिष्णुता आणि होणाऱ्या दंगली, सोबतच तत्कालीन काळात वाढत जाणारे फुटीरतावादी विचार याच्या विरोधात ही यात्रा होती. महाराष्ट्रातील वरोरा येथील आनंदवनचे निर्माते, कृष्ठरोगी लोकांच्या सेवेसाठी आयुष्य वेचणारे बाबा आमटे यांनी ही यात्रा आयोजित केली होती. ही यात्रा राजकीय नव्हती, तर सामाजिक होती. १९८५ साली काश्मीर ते कन्याकुमारी निघालेल्या या यात्रेचे नाव होते "भारत जोडो" यात्रा ! होय, आता राहुल गांधी याच नावाने यात्रा करत आहे आणि त्यांनी आपल्या यात्रेची प्रेरणा हीच "भारत जोडो" यात्रा असल्याचे सांगितले आहे. बाबा आमटे यांच्या यात्रेला अनेक सामाजिक संघटनांचे, वैचारिक संघटनाचे आणि काही राजकीय पक्षांचे समर्थन लाभले होते. तरी फक्त १०० पुरुष आणि १६ महिला यांच्या सोबत ही यात्रा केल्या गेली. मात्र तरीही ही यात्रा विवादित राहिली, कारण काश्मीर मध्ये वाढत चाललेल्या धार्मिक अशहिष्णुतेवर या यात्रेत काहीही भाष्य केल्या गेले नाही, तसेच तेव्हा खलिस्तानवादी आंतकवादात होरपळण्याऱ्या पंजाबात तर ही यात्रा गेलीच नाही, तर तत्कालीन काळात मध्य भारतात फोफावलेल्या नक्षलग्रस्त भागाला टाळत ही यात्रा पूर्ण केल्या गेली, या समस्येचा उल्लेख पण या यात्रेदरम्यान टाळण्यात आला. या सगळ्यावरून या यात्रेवर बरीच टीका केल्या गेली. मात्र लक्षात घ्या ही राजकीय यात्रा नव्हती आणि जे राजकीय पक्ष फायदा घेण्याच्या उद्देशाने यात्रेत आले त्यांचा फायदा होणार याची दक्षता कदाचित बाबा आमटे यांनी घेतली.
मात्र भारतीय राजकारणाच्या इतिहासात सगळ्यात गाजलेली यात्रा म्हणजे भाजपचे तत्कालीन अध्यक्ष लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वात काढल्या गेलेली १९९० सालची सोमनाथ ते अयोध्या यात्रा ! असे म्हणतात की या यात्रेमुळे पूर्वाश्रमीच्या जनसंघ आणि आताच्या भाजपचा राजकीय पुनरजन्म झाला. या यात्रे नंतर भाजपा सत्तेत आली, पक्षाला होणारे मतदान वाढले आणि आज भाजपा जे सत्तेचे फळे चाखत आहे त्याचे मूळ या यात्रेत आहे. मात्र या यात्रेला मिळालेले यश हे संमिश्र असे होते. १९८४ साली भाजपचे फक्त दोन खासदार यश मिळवू शकले होते. मात्र त्या वेळेस इंदिरा गांधींच्या घातपाती मृत्यूमुळे सगळ्याच विरोधी पक्षाच्या जागा कमी झाल्या होत्या. पुढील निवडणुकीत भाजपाने इतक्या जागा मिळवल्याच होत्या की तत्कालीन व्ही पी सिंग यांच्या नेतृत्वात आलेल्या जनता दल सरकारला बाहेरून पाठींबा देत आपली शक्ती दाखवता येईल. होय, अयोध्या यात्रेमुळे एक बूस्टर डोज नक्कीच भाजपाला मिळाला. मात्र याच एकमेव यात्रेवर भाजपा थांबले नाही. या नंतर १९९२ साली तत्कालीन भाजपा अध्यक्ष मुरली मनोहर जोशी यांनी कन्याकुमारी ते श्रीनगर "एकता यात्रा" काढली. काश्मीर मधील वाढता धार्मिक आतंकवाद आणि शेजारील पाकिस्थानचा त्या प्रदेशातील वाढता दखलाच्या विरोधात काढलेली ही यात्रा, श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवून पूर्णत्वास आणली होती. या यात्रा आणि त्यानंतर जनतेजवळ जाण्याचे सातत्य भाजपने दाखवले. तरी त्या पक्षाला बहुमताने सत्तेत यायला २०१४ साल पर्यंत वाट पहावी लागली, तो पर्यंत भाजपात अनेक बदल पण झाले.
एकूण काय? तर देशव्यापी स्तरावर अश्या काढलेल्या राजकीय यात्रा हमखास यश देतील त्याची काहीही शाश्वती नाही. सरळ आहे, यात्रा काढण्याचा काळ आणि निवडणूकीची वेळ यात असलेला काळात बऱ्याच राजकीय, सामाजिक घडामोडी घडतात ज्यावर कोणाचेही जास्त नियंत्रण नसते, त्याच बरोबर यात्रा काळात मिळालेली प्रसिद्धी आणि लोकप्रियता वगैरे टिकवून ठेवणे, तेव्हाच्या घोषित मुद्यामध्ये सातत्य ठेवणे, जनतेत त्या मुद्यावर सतत पाठींबा मिळवत जाणे, अश्या अनेक गोष्टी निवडणूक जिंकण्यासाठी आणि जनतेचा नेता म्हणून प्रस्थापित होण्यासाठी आवश्यक असतात. तेव्हा अश्या यात्रा देश पातळीवर संमिश्र यश देते.
मात्र या उलट राज्य पातळीवरील अश्या यात्रामुळे नेत्यांना प्रचंड यश मिळाल्याचे चित्र पाहायला मिळते. २००७ मध्ये सत्ताधारी डाव्यांच्या विरोधात ममता बॅनर्जी यांनी सिंगुर ते नंदीग्राम यात्रा काढली होती, या नंतर डाव्यांची सत्ता जात, पश्चिम बंगाल येथे ममता बॅनर्जी सत्तेत आल्या. २०१३ मध्ये आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू यांनी अशीच यात्रा काढली आणि नंतर २०१४ साली ते सत्तेत होते, तर २०१७ साली याच चंद्राबाबू नायडू सरकार विरोधात जगन मोहन रेड्डी यांनी यात्रा काढली आणि २०१९ साली ते मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले.
तर हा आहे भारतातील गाजलेल्या राजकीय यात्रांचा इतिहास ! यावरून कोणत्याही राजकीय यात्रेचे भवितव्य आपणाला लक्षात येईल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा