जय शहा विवाद - विरोधकांचा पराचा कावळा !



खरे तर या वेळेस भारत विरुद्ध पाकिस्थान क्रिकेट मॅच मी बघितली नाही. तसेही जेव्हा मॅच फिक्सिंग वगैरे बातम्या सुरू झाल्या तेव्हा पासून माझा क्रिकेट आणि क्रिकेटर यांच्या पासून मोहभंग झाला आणि क्रिकेट हा फक्त पैशासाठी, पैशासोबत खेळला जाणारा खेळ इतकाच त्याचा हिशोब राहिला. तरी पण भारत विरुद्ध पाकिस्थान मॅच आकृष्ट करते हे नक्की ! मात्र या वेळेस माझ्या कामाची वेळ मला ती मॅच बघण्याचे स्वतंत्र देत नव्हती. 


बाकी सध्या भारतीय खेळाच्या फडरेशन आणि कंट्रोल बोर्ड वगैरे वर अनादी अनंत काळापासून राजकीय नेत्यांचेच वर्चस्व राहिले आहे. मग कोणी स्वतःला राजकीय आखाड्यात 'तेल लावलेला पहेलवान" वगैरे जरी म्हणवून घेणारा असला तरी खऱ्या आखाड्यात लंगोट घालून तो कधी दिसला नाही. 


असो, मूळ मुद्दा हा..की, ती भारत पाकिस्थान मॅच मी बघितली नव्हती म्हणून तो विवादित भाग आणि त्या मागील विवाद पण मला माहित नव्हता. मात्र भलत्या विषयावर भलती प्रतिक्रिया देणारे काही मित्र मात्र मला या बद्दल अर्धवट माहिती देऊ करत होते. म्हणून माहिती काढली आणि मुद्दाम तो व्हिडीओ बघितला. 



तर या मॅच मध्ये भारताचे गृहमंत्री अमित शहा यांचे सुपुत्र जय शहा हे उपस्थित होते. भारतीय खेळाडूंच्या चांगल्या फटाक्यांवर आणि चांगल्या बॉलिंगवर ते संपूर्ण मॅच भर उत्तम प्रतिसाद पण देत होते. मात्र जेव्हा भारतीय टीमने मॅच जिंकली तेव्हा होणाऱ्या जल्लोषात ते त्या उस्फुर्ततेने सामील झालेले दिसले नाही. त्यांनी अत्यंत सौम्य आनंद व्यक्त केला. त्यातच त्या जल्लोषात एक माणूस भारताचा राष्ट्रध्वज घेऊन त्यांच्या जवळ आला आणि राष्ट्रध्वज असलेला हात जय शहा यांच्या कडे करत काहीतरी बोलला, त्याला जय शहा यांनी प्रतिउत्तर दिले आणि तो माणूस पुन्हा बाजूला झाला, असे त्या व्हिडिओत दिसते. त्या दोघांमध्ये नक्की काय बोलणे झाले ते मात्र त्या व्हिडिओतून नक्कीच कळत नाही. अर्थात विरोधक विशेषतः समाज माध्यमांवरील गुलाम ज्या प्रमाणे समोरील माणसाने जय शहा यांना राष्ट्रध्वज हातात द्यायचा प्रयत्न केला आणि जय शहा यांनी तसे करण्याचे नाकारले हे जे तारे तोडत आहे ते नक्कीच या कथित व्हडिओ मधून समोर येत नाही. 


तरी एका क्षणासाठी आपण ती घटना गुलाम म्हणत आहे तशी झाली असे मान्य करू ! पण मग जय शहा यांनी राष्ट्रध्वज हातात घेण्याचे का नाकारले असेल असा प्रश्न नक्कीच निर्माण होतो ! ते पण जेव्हा देशाचे गृहमंत्री म्हणून जय शहा यांचा "बाप" देशातील जनतेला घरा घरात तिरंगा लावायला सांगतात. पण यांचा स्वतःचा मुलगा मात्र तिरंगा हातात धरत नाही असे का? 


यातील पहिला मुद्दा हा की, कोणी तुमच्या हातात जबरदस्ती राष्ट्रध्वज देत आहे तर तो तुम्ही धरला पाहिजे असा कोणताही कायदा किंवा नियम नाही. अर्थात सिनेमागृहात राष्ट्रगीत वाजत असतांना त्याच्या सन्माना करता उभे न राहण्याचे किंवा राष्ट्रध्वजाला आपल्या धार्मिक मान्यतेसाठी सलामी न देणाऱ्यांच्या मागे "वयक्तिक व्यक्तिस्वातंत्र्याचा" जयघोष करणारे गुलाम मात्र जय शहा यांच्या "व्यतिस्वातंत्र्याचा अधिकार" मानत नाही हे मोठे आश्चर्यच आहे. पण ते जय शहा आहेत आणि गृहमंत्र्यांचे मुलगे आहेत, जे नियमित राष्ट्रवादी विचाराने ओतप्रोत भाषणे देत असतात, त्यांच्या मुलाने असे करावे? अर्थात हे प्रश्न मलापण पडले तेव्हा मी अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा समोर आलेली माहिती अशी ! 


पहिल्या मुद्द्यात मी सांगितले आहेच की राष्ट्रध्वज हातात न धरून जय शहा यांनी कोणताही नियम तोडला नाही. मात्र त्यांनी राष्ट्रध्वज हातात घेतला असता तर नियम तुटणार होते ! ते कसे? 


जय शहा बी सी सी आय म्हणजेच बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर इंडियन क्रिकेट म्हणजेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सचिवपदी आहेत. मात्र या पदा सोबतच ते आय सी सी म्हणजेच इंटरनॅशनल क्रिकेट कॉन्सिल मध्ये मेंबर बोर्ड रिप्रेझेंटटेटिव्ह आहे. त्याच सोबत ते ए सी सी म्हणजेच एशियन क्रिकेट कॉन्सिल मध्ये अध्यक्ष म्हणून आहेत. म्हणजेच राष्ट्रीय सोबत आंतराष्ट्रीय क्रिकेट संघटनेत पण ते मोठ्या पदावर काम करत आहेत. या आंतराष्ट्रीय संघटनेचे काम करतांना काही नियम नक्कीच आहेत जे जय शहा यांना पाळावे लागतात. त्याचमुळे त्यांनी राष्ट्रध्वज हातात घेणे टाळले असण्याची शक्यता आहे. आता हे नियम कोणते? 


आय सी सी च्या "लॉ ऑफ एथिक्स २.२.२.२" नुसार, "संचालक, समिती सदस्य किंवा कर्मचारी सदस्य कोणत्याही विशिष्ट भागधारक (राष्ट्रीय क्रिकेट महासंघ किंवा राष्ट्रीय क्रिकेट महासंघाचा गट) किंवा कोणत्याही तृतीय पक्षाच्या (जसे की सरकारी किंवा राजकीय संस्था) यांच्या हिताचा प्रचार करू शकत नाहीत. असे करणे आय सी सी सोबत संबंधित लोकांच्या आणि क्रिकेट खेळाच्या सर्वोत्तम हितासाठी कार्य करण्याच्या त्याच्या कर्तव्याच्या विरोधात असेल."  याचा अर्थ असा झाला की जय शहा यांनी तेव्हा राष्ट्रध्वज हातात घेतला असता, ते पण एका वेगळ्या देशात आंतराष्ट्रीय क्रिकेट सामना सुरू असतांना तर ते आय सी सी च्या "लॉ ऑफ एथिक्स" च्या आचारसंहितेचे उल्लंघन ठरले असते. बाकी मैदानावर लागणारे चौके - छक्यांवर टाळ्या वाजवणे हे उत्तम खेळाचे कौतुक असते. मात्र जेव्हा तुम्ही एखादा झेंडा हातात घेता तेव्हा तुम्ही एकाचा पक्ष घेत असता, हे आय सी सी च्या नियमाच्या विरोधात आहे आणि आंतराष्ट्रीय स्तरावरील एखाद्या सार्वभौम संस्थेचे असे नियम तोडणे आपल्या देशाच्या इभ्रती करतापण योग्य नाही. 



आता इतके फोड करून सांगितल्यावर तरी गुलामांच्या डोक्यात प्रकाश पडेल अशी आशा. नाहीच पडत असेल तर निदान तेल लावलेल्या पहिलवाना कडे एकदा शिकवणी घ्यावी. सगळी कडून बाहेर निघाल्यावर आताच आपले भारत जिंकल्यावर जल्लोष करणारे फोटो आणि व्हिडीओ ते कसे आणत आहेत ते विचारावे. बाकी ते आंतराष्ट्रीय क्रिकेट संस्थेची कामे बघत असतांना केंद्रीय मंत्री पण होते, तेव्हा त्यांचा भारत जिंकल्यावर राष्ट्रध्वज हातात घेऊन तर सोडाच पण,भारता करता जल्लोष करणारे फोटो आणि व्हिडिओपण पुढे आले नव्हते, ते पण असेल संयमित पणे टाळ्या वाजवत उभे राहायचे ते का? एकदा विचारून या ! 

टिप्पण्या