"भगव्याचे" समर्थक - डॉ बाबासाहेब आंबेडकर



आज राष्ट्रध्वजाच्या वादात अनेक पुरोगामी आपला राष्ट्रध्वज असलेला "तिरंगा" १९४७ सालीच मुक्रर झाला असल्याचा छाती ठोक पणे म्हणत आहे. मात्र हे तितकेसे बरोबर नाही. देशाचा राष्ट्रध्वज कसा असावा या बद्दल देशाच्या स्वातंत्र्य लढ्याच्या वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या गटांनी अनेक संकल्पना दिल्या. यातील काही ध्वज काही काळासाठी राष्ट्रध्वज म्हणून समोर पण आले, मात्र काँग्रेसचा उदय आणि काँग्रेसला देशाच्या स्वातंत्र्याच्या चळवळीत मिळालेल्या स्थानसोबतच काँग्रेसकडून संकल्पित झालेला चरखा असलेला तिरंगा जास्त प्रचिलीत आणि लोकप्रिय झाला. 



जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळणार असे पक्के झाले तेव्हा प्रथमतः त्याच तिरंग्यातील चरखा काढून तिथे अशोकचक्र आणण्यात आले. बाकी महात्मा गांधी यांना चरखा असलेला तिरंगाच राष्ट्रध्वज म्हणून हवा होता. त्यातही हा चरखा असलेला तिरंगा आणि एका कोपऱ्यात ब्रिटिश युनियन जॅक असला ध्वज पण राष्ट्रध्वज म्हणून महात्मा गांधींना चालला असता, ज्याला जास्त विरोध झाला. मात्र राष्ट्रध्वज नक्की कोणता असणार ? यावर अखेरचा शिक्का मात्र संविधान सभाच मारणार होती, तो पर्यंत राष्ट्रध्वजा बद्दल आपले आक्षेप आणि संकल्पना संविधान सभे समोर ठेवता येणार होते.



बाकी तत्कालीन हिंदू विचारांचा सगळ्यात मोठा पक्ष असलेल्या हिंदू महासभेला मात्र भारताचा राष्ट्रध्वज "भगवा" असावा असे वाटत होते. मात्र "भगवा" ध्वज कसा असावा या बाबतीत वेगवेगळ्या हिंदू गटात एकवाक्यता नव्हती. जिथे हिंदू महासभा फक्त भगव्या ध्वजा करता प्रयत्नरत होती, तिथेच सावरकर गट भगव्या रंगावर कमळ, कृपान आणि चांदकतारा असलेल्या ध्वजाची संकल्पना मांडत होता. 



बाकी वाद काहीही असला तरी संविधान सभेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना भगवा राष्ट्रध्वज आणि देशाची राष्ट्रभाषा "संस्कृत" असावी म्हणून आवाज उठवण्याची विनंती करण्यात आली. विशेष म्हणजे स्वतः डॉ बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही करता अतिशय अनुकूल होते. गमतीने तेव्हा बाबासाहेबांना उपरोक्त विषयाची विनंती करण्यास आलेल्या हिंदू नेत्यांना "महाराच्या पोरावर ही कसली जवाबदारी देता." या आशयाची टिपणी पण केली. मात्र "संस्कृत" ही आपल्या संस्कृतीची भाषा असून तिला राष्ट्रभाषेचा दर्जा मिळाला तर, आज पर्यंत ही भाषा, जी बहुसंख्य लोकांपासून दूर होती, ती त्यांना व्यवस्थित शिकता येईल, त्या बद्दलचे गैरसमज दूर होतील आणि हिंदू शास्त्रात असलेला प्रचंड ज्ञानसंसार सगळ्यांकरता खुला होईल. बासाहेबांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील अतिशय साधा असा "त्रिकोणी भगवा ध्वज" राष्ट्रध्वज म्हणून अपेक्षित होता. या बाबत आपण जेव्हा संविधान सभेत बोलू तेव्हा देशात सर्वत्र या बाबतीत जनजागृती घडवून जनतेच्या आतून पण ही मागणी यायला हवी असे बाबासाहेबांचे मत होते. 



मात्र उत्तर आणि पूर्व भारतातील फाळणीची धामधूम, त्यात हिंदू हित बघण्यासाठी अडकलेले बहुसंख्य हिंदू कार्यकर्ते, कदाचित नंतरच्या काळात नथ्थुराम गोडसे याने केलेली महात्मा गांधी यांची हत्या आणि त्या "हत्येच्या षड्यंत्राच्या" आरोपात अडकलेले, बंदी आलेले हिंदू विचारांच्या संघटना, नेते या सगळ्या पार्श्वभूमीचा कदाचित या जनजागृती वर परिणाम झाला असेल. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत या बाबत केलेल्या प्रयत्नांना जनतेचा पाठींबा मिळू शकला नाही. 


शेवटी संविधान सभेमध्ये राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत म्हणून तेच कायम राहिले जे काँग्रेसला अपेक्षित होते.

टिप्पण्या