इराक मधील राजकीय पेच!



श्रीलंकेत ज्या प्रमाणे जनतेने तेथील राष्ट्रपती भवन, त्यांचे कार्यालय आणि पंतप्रधान निवास, कार्यालय ताब्यात घेतले होते. आता तशाच परिस्थितीचे चित्र आपल्याला इराक मधून पण दिसत आहे. त्यातही आता इराकमध्ये सत्तासंघर्ष इतर इस्लामिक देशांप्रमाणे उग्र रूप धारण करत आहे. सद्दाम हुसेनला पदच्युत केल्यानंतर इराक हा सतत संघर्षशील राहिला आहे. अमेरिका या सत्ता संघर्षाला थांबवू शकली नाही. 


१९ फेब्रुवारी १९९९ साली सद्दाम हुसेन यांच्या सत्तेला आव्हान देणारे इराक मधील नजफ शहरात राहणारे आयतुल्लाह मोहम्मद सादिक अलसद्र यांची हत्या झाली होती. या हल्ल्यात आयतुल्लाह मोहम्मद सादिक अलसद्र यांच्या बरोबर त्यांच्या दोन मुलांचा बळी गेला होता. हत्येचा सरळ आरोप अर्थातच तत्कालीन सत्ताधीश असलेल्या सद्दाम हुसेन यांच्यावर करण्यात आला. मात्र तेव्हा सद्दाम हुसेन यांनी हा आरोप फेटाळला आणि या मागे विदेशी ताकद असल्याचा दावा केला. मात्र इराक मधील प्रत्येकाला माहीत होते की या हत्येची योजना सद्दाम हुसेन यानेच नियोजित करून प्रत्यक्षात आणली आहे. पण कोण होते हे आयतुल्लाह मोहम्मद सादिक अलसद्र ? ज्यांच्या हत्येने तत्कालीन इराकमध्ये राजकीय धुमशान झाले? 


तर आयतुल्लाह मोहम्मद सादिक अलसद्र होते इराक मधील शिया मुस्लिमांचे एक मोठे धर्मगुरू ! मात्र तत्कालीन काळात ही एकच हत्या झाली नव्हती, तर इराक मधील अनेक शिया मुस्लिम धर्मगुरूंची हत्या केल्याचा आरोप सद्दाम हुसेन आणि त्याच्या बाथ पक्षावर होता. आयतुल्लाह मोहम्मद सादिक अलसद्र यांची हत्या या सगळ्यांवर कडी होती. अर्थात इराकमध्ये शिया मुस्लिम सरकारच्या निशाण्यावर १९८० पासून, म्हणजे इराण - इराक युद्ध सुरू झाल्यापासूनच होते. इस्लामिक क्रांतीमुळे गाजलेला इराण हा शिया मुस्लिम देश आहे. तर इराक मध्ये सुन्नी मुस्लिम असलेले सद्दाम हुसेन सत्तेत होते. पण त्यातही मेख अशी की इराक मध्ये बहुसंख्यांक जनता शिया मुस्लिम होते आणि सद्दाम हुसेनला संशय होता की इराक मधील शिया मुस्लिम, इराणला मदत करत आहेत, या मागे इराक मधील शिया धर्मगुरूंचा हात आहे. 



या नंतर सद्दाम हुसेनने कुवैतवर हल्ला केला. या नंतर सौदी अरेबियाला मदत करायला आणि कुवैतला सद्दामच्या तावडीतून सोडवायला अमेरिका आखातात आली. सद्दाम हुसेन याने बरीच रासायनिक हत्यारे जमा केल्याचा आरोप करत अमेरिकेने सद्दामचा पडाव केला आणि इराकची राजकीय घडी बिघडली. पहिले अल कायदा, नंतर इसिसने इराक मध्ये भरपूर उत्पात घडवला. ही सगळी कहाणी आपल्याला माहीत आहेच. 


मात्र आता इराक मध्ये सुरू असलेला सत्ता संघर्षाची बीजे पण इराकच्या याच इतिहासात गुंतलेली आहे. आता इराक मधील राजकीय संघर्षात एक नाव समोर येत आहे मुक्तदा अलसद्र ! हे मुक्तदा अलसद्र इराकच्या शिया मुस्लिमांचे मोठे नेते आहेत. आज इराकच्या राजकीय संघर्षातील मोठे नाव आहे. पण त्याच सोबत १९९९ साली सद्दाम हुसेन यांनी हत्या केलेल्या आयतुल्लाह मोहम्मद सादिक अलसद्र यांचे ते पुत्र आहे. पण इराक मधील सत्तासंघर्ष नक्की काय आहे? 



इराकच्या एकूण लोकसंख्येत ५५% शिया मुस्लिम आहेत, तर ३०% च्या आसपास सुन्नी मुस्लिम आहेत, तर तिसरी मोठी लोकसंख्या कुर्द मुस्लिमांची जी १२% ते १५% आहे. बाकी मग इतर अल्पसंख्यांक आहेत. या लोकसंख्येवरून स्पष्ट होते की इराक मध्ये शिया मुस्लिम हा सगळ्यात मोठा समूह आहे. अर्थातच त्यांची राजकीय शक्तीही जास्त आहे. अमेरिकेने जेव्हा सद्दाम हुसेन याला पदच्युत केले तेव्हा इराक करता त्यांनी नवीन संविधान तयार केले. २००५ साली इराक मध्ये हे नवीन संविधान लागू करण्यात आले. या संविधानात इराक मधील प्रत्येक मोठ्या समूहाला राजकीय प्रतिनिधित्व मिळेल याची हामी देण्यात आली होती. या संविधानानुसार इराकचा राष्ट्रपती हा नियमितपणे कुर्द मुस्लिम राहील, संसद अध्यक्षपद हे सुन्नी मुस्लिमांसाठी आरक्षित केले गेले. तर सरकारमधील सगळ्यात ताकदीचे पंतप्रधान पद शिया मुस्लिमांसाठी आरक्षित केल्या गेले. पण हे आरक्षण ठरवतांना इराणचे १८ राजकीय विभाग केल्या गेले. यातील चार विभाग हे कुर्द बहुल होते. यात कुर्द मुस्लिमांना अधिक स्वायत्तता दिली गेली, त्यांना विशेष अधिकार देत स्वतःचे सुरक्षा दल स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली. याचे कारण स्पष्ट होते की, या भागातून उठणाऱ्या स्वतंत्र कुर्दीस्थानच्या मागणीला लगाम लावायचा. 


आता नवीन संविधाना नुसार संसद स्थापन झाली, त्याचे नाव "क्वान्सिल ऑफ रिप्रेझेंटटेंटिव्हस" ! या संसदेत एकूण ३२९ सदस्य संख्या आहे. हे सदस्य थेट लोकांमधून मतदानाने निवडून येतात. हेच सदस्य देशाच्या राष्ट्रपतीला निवडतात. राष्ट्रपतीपदासाठी एकूण सदस्य संख्येपैकी दोन त्रितीअंश सदस्यांनी मत घेणे आवश्यक असते. राष्ट्रपतींचा कार्यकाळ चार वर्षाचा असतो आणि एक माणूस फक्त दोनदाच हे पद भूषवू शकतो. 



मात्र पंतप्रधानपदासाठी मात्र सर्वसाधारण बहुमत असले तरी चालून जाते. म्हणजेच ३२९ सदस्य संख्या असलेल्या संसदेत १६५ मत ज्या व्यक्तीला, पक्षाला मिळतील तो व्यक्ती किंवा त्या पक्षाचा पंतप्रधान पदी विराजमान होतो. इराक मध्ये बहुपक्षीय प्रणाली असल्यामुळे अनेकदा या करता इतर पक्ष एकत्रित येत आघाडी - युती बनवतात. 


तर आता इराक मधील सध्याचे राजकीय संकट कसे आले? तर याची सुरवात झाली अक्टोंबर २०२१ ला ! या काळात इराक मध्ये सार्वजनिक निवडणूक झाली. या निवडणुकीत मुक्तदा अलसद्र यांचा पक्ष सद्री मूव्हमेंट हा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून समोर आला. या पक्षाला ३२९ पैकी ७३ जागांवर ते विजयी झालेत. पण पेच तिथेच आला की, सद्री मूव्हमेंटला बहुमतापेक्षा कमी जागा मिळाल्या. १६५ चा आकडा पार करण्यासाठी सद्री मूव्हमेंटला इतर पक्षांच्या मदतीची आवश्यकता होती. मात्र सद्री मूव्हमेंट हा पक्ष जरी शिया मुस्लिमांचा असला तरी तो कट्टर इराक राष्ट्रवादाच्या बाजूचा आहे. इराकच्या राजकारणात इराणची ढवळाढवळ या पक्षाला अजिबात मान्य नाही. त्याचमुळे इराक मधील इतर शिया मुस्लिम पक्ष सद्री मूव्हमेंटला आपला पाठींबा देण्यास नकार देत आहे. अर्थात बाकी शिया पक्ष इराण सोबत चांगले संबंध ठेवण्यात उत्सुक आहेत. कारण इतिहासात सुन्नी मुस्लिमांनी केलेले अत्याचार जर पुन्हा झाले तर इराक मधील शियांना मदत करू शकेल असा देश म्हणजे इराण आहे असे त्यांचे मत आहे. मात्र मुफ्तदा अलसद्र यांना असे वाटत नाही. उलट ईराक मधील शिया पक्षांना मदत करत इराण आपला राजकीय प्रभाव इकडे वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचा त्यांचा आरोप आहे. 


तरी ऑक्टोबर २०२१च्या निवडणुकीनंतर काही शिया पक्षांनी सद्री मूव्हमेंट सोबत आघाडी बनवली. या आघाडीला कुर्द आणि सुन्नी पक्षांचा पाठींबा पण मिळाला. पण तरीही फेब्रुवारी २०२२ पर्यंत या आघाडीला पंतप्रधानाच्या नावावर एकमत करण्यात अपयश आले. त्या नंतर मात्र सद्री मूव्हमेंटने वेगळीच खेळी खेळली. मुफ्तदा अलसद्र यांनी आपल्या जिंकलेल्या सगळ्या संसद सदस्यांना राजीनामा द्यायचे आवाहन केले आणि सद्री मूव्हमेंटच्या विजयी झालेल्या सगळ्या म्हणजे ७३ सदस्यांनी राजीनामे दिलेही. 


यातून अजून नवीन पेच तयार झाला. संसद सदस्यांची आकडेवारी कमी झाल्याने, पंतप्रधान पदाचा बहुमताचा आकडा पण कमी झाला. मग पुन्हा पंतप्रधानपदासाठी शिया पक्षांची आघाडी करण्यासाठी चाचपणी सुरू झाली. "कॉर्डिणेशन फ्रेमवर्क" नावाची एक आघाडी पण बनवल्या गेली. या आघाडीला पण इराक मधील इतर पक्षांनी समर्थन दिले. पंतप्रधानांच्या पदा करता या आघाडीकडून दोन नावे पण समोर आली. यातील पहिले नाव होते पूर्वपंतप्रधान नुरी अल मलकी आणि दुसरे नाव होते मोहम्मद शिया अल सुदानी ! 


मात्र २० जुलै २०२२ रोजी एक ध्वनीफित समोर आली ज्यात नुरी अल मलकी यांचा आवाज होता. ज्यात नुरी अल मलकी, मुफ्तदा अलसद्र यांना ब्रिटिश मदत मिळत असल्याचा दावा करत होते. त्यांनी आरोप असा लावला की, ब्रिटिश मुफ्तदा अलसद्र यांना इराकच्या पंतप्रधानपदी बसवतील आणि नंतर त्यांची हत्या करतील, जेणे करून इराकवर पुन्हा सुन्नी मुस्लिमांचे वर्चस्व स्थापित होईल. या नंतर पुन्हा इराक मध्ये राजकीय गोंधळ माजला. 


अर्थात, या परिस्थितीत सद्री मूव्हमेंट आणि मुफ्तदा अलसद्र यांची नाराजी कोणताही शिया पक्ष ओढवून घ्यायला तयार नव्हता. कारण या परिस्थितीत काहीही झाले तरी सद्री मूव्हमेंट हा शिया मुस्लिमांचा सगळ्यात मोठा पक्ष होता आणि मुफ्तदा अलसद्र हे शियांचे लोकप्रिय नेते. मग कॉर्डिणेशन फ्रेमवर्क आघाडीने आपण नुरी अल मलकी यांच्या ऐवजी मोहम्मद अल शिया सुदानी यांना पंतप्रधान म्हणून पसंती देत असल्याची घोषणा केली. मात्र पंतप्रधानपदाच्या निवडणुकी आधी राष्ट्रपती निवडणे आवश्यक होते. मात्र हे सगळे व्हायच्या आधीच अलसद्रचे समर्थक रस्त्यावर उतरले. मुफ्तदा यांचा आरोप होता की पंतप्रधानांची नवीन निवड निव्वळ धुळफेक आहे, कारण मोहम्मद अल शिया सुदानी हे नुरी अल मलकी यांचे प्यादे आहे. म्हणजेच पंतप्रधानपदी जरी सुदानी बसले तरी खरी सत्ता मलकी यांच्याच हातात राहणार आहे. साधारण २० जुलै २०२२ रोजी अलसद्रच्या सर्थकांनी इराकच्या संसदेवर कब्जा केला. या अलसद्रच्या समर्थकांनी घोषणाबाजी केली, सुदानी यांच्या पंतप्रधानपदी येण्याच्या निर्णयाचा जोरदार विरोध केला. राजधानी बगदादच्या "ग्रीन झोन" म्हणजेच अतिशय सुरक्षित भागात असलेल्या संसद भवनात झालेल्या या घुसखोरीमुळे संपूर्ण इराक स्तंभित झाला होता. या सगळ्या घटनाक्रमात कोणतीही हिंसा झाली नाही. शेवटी मुफ्तदा अलसद्र यांनी एक ट्विट करत आपल्या समर्थकांना संसद भवनावरील कब्जा सोडायचे आवाहन केले. या ट्विट नंतर लगेचच अलसद्र समर्थकांनी संसद भवन रिकामे केले. मात्र या सगळ्या प्रसंगात तब्बल चार तास संसद भवन या समर्थकांनी वेठीला धरले होते. 


पण यात अजून एक पेच राष्ट्रपती पदाचा पण आहे. संविधानानुसार इराकचा राष्ट्रपती कुर्द मुस्लिम समुदयातून यायला हवा. इथेपण कुर्द मुस्लिमांचे दोन पक्षांचे आपसात मतभेद आहे. पहिला पक्ष आहे पेट्रीयटीक युनियन ऑफ कुर्दीस्थान आणि दुसरा पक्ष आहे कुर्दीस्थान डेमोक्रॅटिक पार्टी ! पेट्रीयटीक युनियन ऑफ कुर्दीस्थान या पक्षाची अपेक्षा आहे की इराकचे वर्तमान राष्ट्रपती बहरम सालेद हेच राष्ट्रपती पदावर कायम राहावे. मात्र कुर्दीस्थान डेमोक्रॅटिक पार्टीला मात्र राष्ट्रपतीपदावर दुसरा कोणीतरी बसावा असे वाटते. 


एकूण काय ? तर आपापल्या राजकीय महत्त्वाकांक्षा आणि धार्मिक एकाधिकारा करता इराक मध्ये निवडणुका होऊन सुद्धा अजून इराक राजकीय अस्थिरता अनुभवत आहे. जुलै २०२२ च्या संसद भवनामधील राजकीय नाटकानंतर इराण मधील पुढील राजकीय मार्ग अधिक खडतर आणि हिंसक राहील याची जाणीव इराक मधील जनतेला आणि राजकीय पक्षांना झाली होती. 


त्यातच आता अलसद्र यांनी इराक मध्ये पुन्हा सार्वत्रिक निवडणूका घेण्याचा आग्रह धरला होता. मात्र यावर काही निर्णय व्हायच्या आधीच आपण राजकारणातून संन्यास घेत असल्याची घोषणा त्यांनी केली आणि इराक मधील त्यांचे समर्थक हिंसक झाले. इराकच्या राष्ट्रपती निवासस्थान ते इराकच्या संसदे पर्यंत अलसद्र यांच्या समर्थकांनी कब्जा केला. अलसद्र समर्थक आणि इराकी सुरक्षा दलात हिंसा पण झाली, या हिंसेत दोन दिवसात जवळपास २३ लोक मेले तर, ३०० च्या आसपास जखमी झाले आहेत. सध्या तरी अलसद्र यांच्या आवाहना नंतर आंदोलक शांत झाले आहेत आणि घरी परतले असल्याच्या बातम्या येत आहे. मात्र इराकचे राजकीय आणि सामाजिक भविष्य पुन्हा अधांतरी लटकले आहे. इराकी जनता आता पुन्हा एका नव्या संघर्षाच्या तोंडावर आहे. 


टिप्पण्या