बोलीवूडचे गंडलेले धार्मिक गणित



बॉलिवूडच्या चित्रपटांना सध्या ग्रहण लागलेले दिसत आहे. बॉलिवूड मधील चित्रपट धडधड पडत आहेत किंवा वाद उत्पन्न करत आहेत. संपूर्ण भारतात सध्या दक्षिण भारतीय चित्रपटांची मागणी वाढत आहे. बाहुबली, पुष्पा, के एफ जी सारख्या दक्षिणी भाषेत बनलेल्या आणि हिंदी मध्ये डब झालेल्या चित्रपटांनी भारतात केलेला धंदा अनेकांना तोंडात बोट टाकायला लावत आहे. बरे दक्षिणी चित्रपट डब होऊन संपूर्ण भारतात धंदा करतात, मात्र त्याच दक्षिणी चित्रपटाला अधिकृतपणे हिंदीत येथील हिंदी कलाकार घेऊन बनवला तर ते चित्रपट पण डब्यात जात आहेत हे विशेष !




असे का? हा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. याचे खरे कारण हिंदी किंवा बॉलिवूड चित्रपटातून दूर झालेली हिंदू संस्कृती. बाहुबली चित्रपट जेव्हा सुपर हिट झाला तेव्हा अनेक बॉलिवूड वाल्यांनी नाक मुरडली होती. चित्रपटाचे समीक्षण करणाऱ्या अनेकांना बाहुबली चित्रपट "हिंदुत्वाचे अतिरंजित दर्शन" देणारा वाटला होता. तरी तेलगू नायक नानी यांच्या अभिनयाने गाजलेला "जर्सी" चित्रपट, बलिवूडने हिंदीत त्याच नावाने बनवला. शाहिद कपूर या चित्रपटात नायक होता. मात्र हा चित्रपट सपशेल कोसळला.




आता याच नानीचा एक तेलगू चित्रपट होता एम सी ए (मिडल क्लास अभी) नावाचा यात भूमिका चावला आणि साई पल्लवी त्याच्या सोबत मुख्य भूमिकेत होत्या. हा चित्रपट दक्षिणेत खूप चालला, या चित्रपटाचे कन्नड, तामिळ भाषेत रिमेक निघाले आणि त्यांनीही चांगला धंदा केला. याच चित्रपटाचा आता हिंदी रिमेक आला आहे, "निकम्मा" नावाने. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आला आहे. कदाचित हिंदी "जर्सी" ची चित्रपटगृहात झालेले हाल बघता या चित्रपटाला सरळ ओ टी टी वर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेत संभाव्य नुकसान आणि मानहानी टाळण्याचा प्रयत्न असेल.




या चित्रपटात नायक आहे "मैने प्यार किया" वाल्या भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू दसानी, शिल्पा शेट्टी आणि श्रिया सेठिया ! आता कथा तीच तेलगू एम सी ए वाली असल्याने शिल्पा शेट्टी आणि भूमिका चावला यांच्या भूमिका सारख्या आहेत. यात या दोघी नायकाच्या वाहिनीचा रोल करत आहेत जी आर टी ओ मधील इमानदार आणि कर्तव्यदक्ष अधिकारी आहे. सोबत असलेल्या श्रिया सेठिया आणि साई पल्लवी यांची भूमिका पण एकदम सारखी आहे. नायकाची प्रेयसी आणि नायकाच्या वहिनीची बहीण म्हणून ! आता कथा जशीच्या तशी घेतली. उत्तर भारतातील संस्कृती आणि भाषे नुसार कदाचित अतिशय छोटे छोटे बदल केले असतील. मात्र आता या सगळ्यांची वेशभूषा बघा ! (खाली दोन्ही चित्रपटाचे पोस्टर दिले आहेत.) तेलगू चित्रपटात भूमिका चावला व्यवस्थित साडी, कुंकू, बांगड्या आणि ठसठशीत पणे दिसणारे मंगळसूत्र घालून वावरते, मात्र हिंदी चित्रपटात शिल्पा शेट्टी साडी तर घालते पण कपाळ कोर, हात भुंडे आणि मंगळसूत्र तर दिसतच नाही. जी गत वहिनीच्या भूमिकेची तीच गत नायकाच्या प्रेयसीच्या भूमिकेची ! तेलगू चित्रपटात पण नायिका काहीशी बदमाश आणि बोल्ड दाखविली आहे, मात्र त्या चित्रपटातील नायिका साई पल्लवी पारंपरिक भारतीय परिधनात आणि टिकली - कुंकू करून व्यवस्थित भारतीय दाखविली आहे. तर तीच भूमिका करणारी हिंदी मधील श्रिया सेठिया अनावश्यक पणे अंगप्रदर्शन करणारे कपडे आणि तेच बिना कुंकू, बांगड्या संपूर्ण चित्रपटात वावरते.




कथेची मागणी असेल, एखाद्या मोठ्या समारंभात आधुनिक रुपात दाखवायची असेल तर खरे तर काहीच हरकत नाही, पण संपूर्ण चित्रपटभर, पूजा वगैरे करतांना आपल्या घरातील कोणती बाई बिना कुंकवाची पूजा वगैरे करते? हा प्रश्न सतत भेडसावत राहतो.

बाकी ज्या लोकांना "नो बिंदी, नो बिझनेस" सारखी घोषणा पार्श्वभागाला आग लावते त्यांच्या कडून दुसरी अपेक्षा तरी काय करणार? तर हिंदी चित्रपटसृष्टी भारतीय मनातून उतरण्याच्या अनेक कारणांपैकी हिंदू बहुल जनतेकरता बनणाऱ्या चित्रपटात नेमका हिंदू संस्कृतीची अहवेलना करणारा का असतो ? ज्या चित्रपटात मुस्लिम धर्म, परंपरा आणि रूढी पाळणारा असतो, त्याच चित्रपटात हिंदू तसा का दाखवता येत नाही? याचे उत्तर ज्या दिवशी बॉलिवूड वाले अत्यंत इमानदारीने शोधतील त्या दिवशी बॉलिवूड चित्रपट चालतील. 

टिप्पण्या