भारतात काय किंवा जगात काय भारतीय सामिष भोजनात "बटर चिकन" माझ्या मते सगळ्यात जास्त विकली जाणारा पदार्थ असेल. अनेक शाकाहारी लोकांची मांसाहाराची सुरवात याच बटर चिकनने झालेली असेल. त्याच मुळे भारतीय पदार्थ विकणाऱ्या देशा सकट जगातील प्रत्येक उपहारगृहात बटर चिकन त्याच्या पदार्थांच्या यादी मध्ये नक्कीच असतो.
मात्र या बटर चिकनचा आणि भारत पाकिस्थान फाळणीचा फार जवळचा संबंध आहे असे तुम्हाला सांगितले तर? तुम्हाला काय वाटेल? मात्र तो तसा आहे.
१९४७ साली भारताच्या स्वातंत्र्यासोबतच देशाच्या "धार्मिक फाळणीची" जखम भारतीयांना विशेषतः हिंदू आणि शीख जनतेला भोगावी लागली. कधी काळी भारताचा भाग असलेल्या आणि १९४७ साली इस्लामी पाकिस्थान बनलेल्या पश्चिम आणि पूर्व भागातून लाखो हिंदू आणि शीख भारताकडे यायला लागले. मुस्लिम बाहुल क्षेत्रात होणारा धार्मिक हिंसाचार, त्यात गमावलेले आप्तजन आणि रातोरात जमेल तितकी पुंजी घेऊन आपली स्थावर मालमत्ता तिथेच सोडून किंवा कवडीमोलात विकून भारताकडे धावणारा हा समूह पश्चिम पाकिस्थान मधून अमृतसर, दिल्ली, जम्मू इत्यादी ठिकाणी आश्रय घ्यायला लागले. तर पूर्व पाकिस्थान मधून पण मोठ्या प्रमाणावर आसाम आणि कलकत्ता सारखे भाग शरणार्थी लोकांनी भरायला लागले.
दिल्लीत किंवा देशातील कोणत्याही भागात आलेल्या लोकांना ना डोक्यावर छत होते, ना पोट भरायला रोजगार ! अश्या अवस्थेत मग प्रत्येक जण आता जिवंत राहायला हातपाय मारायला लागले. अनेकांनी अनेक प्रकारची कामे करायला सुरुवात केली.
असेच तिघे जण पाकिस्थान मधील पेशावर येथुन आपला जीव वाचवत दिल्लीत आले. वेगवेगळ्या वेळी आलेले हे तिघेही पेशावर मध्ये वेगवेगळ्या भागात, वेगवेगळ्या उपहारगृहात काम करणारे ! हे तिघे होते, कुंदनलाल गुजराल, ठाकूर दास आणि कुंदनलाल जग्गी ! दिल्लीत आल्यावर तिघे एकत्र आले आणि त्यांनी दिल्लीत पोट भरण्यासाठी तेच करायचे ठरवले जे ते पाकिस्थानात गेलेल्या पेशावर इथे करत होते म्हणजे उपहारगृहात काम ! पण कसे?
त्यांनी मग दिल्लीतील दरीयागंज भागात एक छोटीशी जागा किरयाने घेतली आणि मोती महल नावाने आपल्या उपहारगृहाची सुरवात केली. उपहारगृहात शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची व्यवस्था ठेवण्यात आली. तत्कालीन काळात फ्रीज घेणे अतिशय खर्चिक काम होते. जवळपास असलेल्या छोट्या पुंजीवर सुरू केलेल्या या उपहारगृहाकरता फ्रीज वगैरे घेणे या तिघांसाठी अतिशय कठीण गोष्ट होती. मात्र मग रात्री उपयोगात न येणाऱ्या मासाचे करायचे काय? फेकून दिले तर सरळ आर्थिक नुकसान आणि दुसऱ्या दिवशी वापरले तर वातड मास दिले म्हणून ग्राहक नाराज होणार परिणामी धंद्याचे नुकसान ! मग यावर उपाय म्हणून उरलेले मास रात्री टमाटो, क्रीम आणि बटरच्या ग्रेव्हीत ठेवायचे म्हणजे ते मास न खराब होणार नाही, नरम राहील. सकाळी याच ग्रेव्हीला पंजाबी मसाल्याचा तडका दिला की याची चव अप्रतिम लागे. अल्पावधीत मोती महलचा हा पदार्थ लोकप्रिय झाला, त्याला नाव पडले "बटर चिकन" !
आज हा पदार्थ जगभरात नाव कमावून आहे, भारतीय चवीची जगभरातील एक ओळख आहे, मात्र या मागे धार्मिक फाळणीच्या, त्या पाई झेललेल्या धार्मिक हिंसाचाराच्या, आपल्या हक्काच्या घरातून परंगदा होण्याच्या, त्या पाई येणाऱ्या कफल्लकपणाच्या वेदना आहेत. मात्र त्याच बरोबर या सगळ्या कफल्लकपणातून उन्मळून पडल्यावर पण पुन्हा भरारी घेण्याची, त्या करता मार्ग शोधण्याच्या मानवी महत्वाकांक्षेची किनार आहे. कदाचीत म्हणूनच या "बटर चिकनची" चव जगाला भुरळ पडण्याइतकी अप्रतिम आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा