माझ्या लहानपणी माझी आई मला एक गोष्ट सांगायची. या आधीपण या गोष्टीचा संदर्भ मी अनेकदा दिला आहे.
ती गोष्ट अशी की, एका आटपाट नगरात एक अट्टल गुन्हेगार रहात होता. नगरवासी त्या अट्टल गुन्हेगाराच्या कारवायांना बळी पडून वैतागले होते. लहानपणा पासून चोरी करण्याची सवय असणारा हा गुन्हेगार, हळूहळू लूट आणि दरोडे घालत बक्कळ पैसे बाळगायला लागला. आता तर त्याने नागरिकांना मारझोड वगैरे सुरू केली. शेवटी त्यांच्या बद्दलच्या वाढत्या तक्रारी बघता, नगरच्या राजाने त्याला पकडून आणायचा आदेश दिला. सैनिकांनी त्या अट्टल गुन्हेगाराला पकडून राजासमोर उभे करत, त्याच्या गुन्ह्यांचा पाढा वाचला. त्याच्या गुन्हे बघता याला फाशीचीच शिक्षा द्यायला हवी या निर्णयावर राजा आला आणि त्याला फाशीची शिक्षा सुनावली. फाशीचा दिवस ठरवण्यात आला. फाशीच्या दिवशी त्याला शेवटची इच्छा विचारण्यात आली. तेव्हा त्याने स्वतःच्या आईसोबत भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्या गुन्हेगाराच्या आईला त्याच्या समोर आणण्यात आले. आई आपल्या मुलाला फाशी होणार म्हणून अतिशय दुःखात होती. त्यातच राजाने गुन्हेगाराची संपत्ती जप्त केल्यामुळे या माऊलीचे आरामचे दिवस संपले होते आणि म्हातारपणी काबाडकष्ट नशिबात आल्यामुळे ती पण अतिशय हताश होती. फाशी जायच्या आधी मुलाने आपली आठवण काढली म्हणून तिला एक आशेचा किरण दिसत होता. मुलाने गुप्तपणे काही धन लपवून ठवले असेल आणि आता त्याची माहिती मुलगा आपल्याला देईल अशी आशा तिला निर्माण झाल्यामुळे ती आपल्या फाशी जाणाऱ्या मुला समोर उभी झाली.
त्या वधस्तंभावर या माय लेकरांची भेट झाली. मुलाने विचारले, "आई कशी आहेस?" त्या बरोबर त्या आईचा बांध फुटला, ती जोरजोरात विलाप करायला लागली आणि त्याला अटक झाल्यावर, राजाच्या सैन्याने कसे सगळे धन आपल्यापासून हिरावून घेतले, आता तिला या वयात कसे कष्ट करावे लागत आहेत, पुन्हा तू फाशी गेल्यावर माझ्या सरख्या म्हातारीचे कसे अजून हाल होतील याचा पाढा तिने वाचण्यास सुरवात केली.
तिचा विलाप शांतपणे ऐकल्यावर त्या अट्टल चोराने आपल्या आईला कान तोंडाजवळ आणण्यास सांगितले. त्या आईला अतिशय आनंद झाला, आता पोरगा आपल्याला गुप्तधनाची माहिती देणार आणि आपले पुढील आयुष्य सुखात जाणार या विचाराने ती सुखावली आणि तिने घाईत आपला कान पोराच्या तोंडाजवळ नेला. त्या क्षणी त्या गुन्हेगाराने आपल्या आईचा कान दातात पकडत जोरात चावा घेतला. आई त्या चाव्याने कळवळली, ओरडली, मात्र त्या गुन्हेगारांवर या आरडा ओरड्याचा काहीही परिणाम झाला नाही, उलट अजून जोरात त्याने कान दातात पकडला. ही घटना बघून राजा आणि राजाचे सैनिक आश्चर्यात पडले. त्या नंतर घाई करत काही सैनिक त्या आईला आपल्या पोरापासून वाचवायला सरसावले. मात्र त्या पोराच्या दातांची पकड इतकी पक्की होती की त्या आईच्या कानाचा तुकडा पडला तेव्हाच ती आई पोरापासून दूर जाऊ शकली.
एकीकडे सुख न मिळता दुःख वाढले म्हणून विलाप करणारी आई आणि दुसरीकडे आपल्या आईच्या रक्ताने माखलेला चेहरा असलेला फाशी जाणारा भेसूर गुन्हेगार ! हे बघून राजाने त्या गुन्हेगाराला विचारले की, "तू आईच्या कानाला का चावला? त्याने तुला काय आनंद मिळाला?" त्यावर त्या गुन्हेगाराने म्हंटले,"आई भेटायला आली कारण तिला आशा होती की मी लपवून ठेवलेल्या धनाचा पत्ता तिला सांगेन. तिने इथे आल्यानंतर एका शब्दाने माझ्या बद्दल काही विचारले नाही किंवा माझ्या येणाऱ्या मरणावर दुःख व्यक्त केले नाही. उलट स्वतःला कसा त्रास आहे, मी फाशी गेल्यावर तो त्रास कसा वाढेल, माझे पुढील जीवन कसे कष्टमय होईल याचाच पाढा वाचत बसली. खरे तर मी गुन्हे करून जी काही कमाई करायचो ती पूर्णपणे आईच्याच हातात द्यायचो. त्या मुळे मी कुठेही कोणत्याही स्वरूपात गुप्तधन लपवले नाही. मात्र आज मला जाणवले की आईने स्वतःच्या सुखासाठी मला गुन्हेगारी कडे ढकलले. मी माझ्या जीवनातील पहिली चोरी, एक हिऱ्याची अंगठी चोरून आणली तेव्हा हिने माझे कौतुक केले आणि ती अंगठी विकून त्यातून मौज मजा केली. मात्र त्याच वेळेस हिने माझ्या कानाखाली जाळ काढत मला गुन्हे करण्यापासून परावृत्त केले असते तर आज ऐन तारुण्यात फाशीच्या मरणाची शिक्षा झाली नसती. तिला तिच्या चुकीची जन्मभर आठवण आता हा तुटलेला कान बघून होत राहील."
मात्र आज ही गोष्ट, शिवसेनेच्या मुखपत्राचे महान संपादक आणि आजच्या राज्याच्या राजकारणातील स्वयंघोषित चाणक्य संजय राऊत यांना ई.डी. ने अटक केली, तेव्हा त्यांची आईने त्यांना ओवाळले म्हणून छायाचित्र प्रसिद्ध होत असतांना आठवली.
आता संजय राऊत यांचे बंधू प्रवीण राऊत या कथित पत्राचाळ प्रकरणात मुख्य आरोपी आहेत. ते हा घोटाळा का करू शकले ? याचे स्पष्ट कारण त्यांच्या मागे संजय राऊत यांच्या रूपाने एक राजकीय शक्ती उभी होती, यात काही शंका नाही. टीचभर विक्री असलेल्या सामनाचे संपादक असलेल्या संजय राऊत यांच्या कडे अकरा लाखाची रोकड कशी काय सापडू शकते? असा प्रश्न कोणालाही पडत नाही याचे अतिशय आश्चर्य वाटते. त्यातच जेल मध्ये जाणाऱ्या पोराला ओवळतांनाचे छायाचित्र आणि चलचित्र प्रसारित करणे हा अतिशय निर्लज्ज आणि ओंगळवाणा प्रकार आहे असे निदान मला वाटते. अहो त्यांनी चोरी केल्याचा संशय आहे म्हणून जेल मध्ये जात आहेत, पुण्य केले म्हणून नाही...इतके तारतम्य तर ठेवायचे.
बाकी राजकीय, वैचारिक विरोध वगैरे सगळे ठीक ! मात्र भ्रष्टाचार विरोधात आंदोलन करणारे पर्यावरणवादी बुद्धिवंत म्हणून नावाजलेले विश्वंभर चौधरी सारखे बुद्धिवंत या अटकेचा निषेध करतात तेव्हा मात्र त्याच्या बुद्धीची कीव येते.
बाकी राहिला प्रश्न भाजपाच्या लोकांवर ई डी कारवाई का करत नाही याचा. तर विरोधकांनी पुरावे समोर ठेवावेत की भ्रष्टाचाराचे. विरोधी पक्षाचे कामच ते आहे. नुसते आरोप करून काहीही होत नाही, पुरावे न्यायालयात सादर करावे लागतात. तुमच्याकडे पक्के पुरावे असतील तर न्यायालयात जावे आणि प्रकरण दाखल करावीत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा