११ जुलै हा "जागतिक लोकसंख्या दिवस" असतो. दरवर्षी हा दिवस साजरा होत असतो आणि आपल्या देशात दरवर्षी या दिवसावरून एक वाद समोर येत असतो. तो वाद म्हणजे धार्मिक लोकसंख्येच्या अनुपातमध्ये होणारा बदल ! अर्थात या वादाला धार्मिक किनार असल्यामुळे आणि त्यात पण हा वाद हिंदू विरुद्ध मुस्लिम असल्यामुळे हा वाद अजून संवेदशील होतो. मग काही तथाकथित तज्ञ लगेच काही आकडेवारी देत मुस्लिम जनसंख्या कशी कमी आहे आणि मुस्लिम जनसंख्या वाढत असल्याचा दावा कसा खोटा आहे असा दाखला देण्यास सुरुवात करतात आणि काही हिंदू नेते हा दावा खोटा असल्याचे आपल्याला ओरडून सांगतात. मग आपल्या सारख्या सामान्य लोकांच्या मनात अनेक प्रश्न उभे राहतात. मग त्याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न होतो आणि उत्तर सापडते ते "लोकसंख्या नियंत्रण कायद्यात" ! मात्र मग पुन्हा या कायद्याच्या समर्थनामुळे हिंदू - मुस्लिम एकमेकांसमोर उभे राहतात ही वस्तुस्थिती आहे. मात्र खरे काय?
खरे तर एखाद्या देशाच्या लोकसंख्या वाढीची कारणे वेगवेगळी असतात. त्यात देशाच्या जन्मदरा सोबतच, देशाच्या मृत्युदराचा वाटा पण महत्वाचा असतो. आज संयुक्त राष्ट्र संघाने घोषित केल्या प्रमाणे भारताची लोकसंख्या लवकरच सध्या जगात सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेल्या चीनला मागे टाकत पहिल्या नंबर वर येणार आहे. म्हणजे भारत जगातील सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला देश बनेल. पण जगातील सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला देश म्हणून भारतात काही चांगले बदल झालेत म्हणून पण ही लोकसंख्या वाढली असे तुम्हाला सांगितले तर? होय, वरती सांगितल्या प्रमाणे भारताचा मृत्युदर कमी झाला, म्हणजेच भारतातील जीवनमान वाढले, भारतात वैद्यकीय सुविधा वाढल्या आणि त्याचा असर आपल्या देशातील सरासरी वयात वाढ झाली. उदाहरणच द्यायचे तर साधारण १९७० ते ७५ च्या काळात भारतीय सरासरी ४९.७ वर्षे जगायचे तर २०१५ - १६ या वर्षात मात्र भारतीय सरासरी ६९. ७ वर्षे जगत आहे. म्हणजे आता पूर्वीच्या काळापेक्षा भारतीय सरासरी २० वर्षे अधिक जगत आहेत. पुढील काही वर्षात हे वय अजून वाढणार आहे. म्हणजेच पुढील ३ ते ४ वर्षात भारतीयांचे सरासरी वय हे ८० वर्षे वयाच्या आसपास राहणार आहे. अर्थात हा बदल फक्त भारतातच नाही तर जगातील अनेक देशात झाला आहे. जपान, चीन आणि अनेक युरोपियन देशात वृद्ध लोकांची संख्या वाढणे ही एक समस्या म्हणून जरी समोर येत असली तरी, तेथील राहणीमान, वैद्यकीय सुविधा वाढल्याचे ते लक्षण असल्यामुळे सकारात्मक पद्धतीने त्याचा विचार केला जात आहे. भारतात पण लोकसंख्या वाढीला हे एक कारण जवाबदार आहे. वैद्यकीय सुविधा वाढल्यामुळे जसे वृद्धांचे जीवनमान वाढले तसेच नवजात बालकांचे मृत्यूचे प्रमाणपण कमी झाले आहे.
मात्र सगळ्यात कळीचा मुद्दा आहे तो जन्मदर किंवा प्रजाजन दराचा ! या साठी आपल्याला आधार घ्यावा लागेल "राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाचा" ! यात भारताचा "प्रजनन दर" आपल्याला कळतो. आता हा "प्रजनन दर" म्हणजे भारतातील महिला आपल्या संपूर्ण जीवनात सरासरी किती मुलांना जन्माला घालते तो आकडा! या "प्रजनन दराच्या" आकड्यांवरून काही निष्कर्ष काढले जातात. समजा हा प्रजनन दर २.१ असेल तर त्याला "रिप्लेसमेंट लेव्हल फर्टिलिटी रेट" म्हंटले जाते, या मध्ये जनसंख्या पुढील अनेक पिढ्यापर्यंत स्थिर राहील असा निष्कर्ष काढला जातो. मात्र प्रजनन दर २.१ पेक्षा जास्त असेल तर जनसंख्या वाढ ही पुढील अनेक पिढ्यात वाढत राहील असा निष्कर्ष निघतो, तर हाच प्रजनन दर २.१ पेक्षा कमी झाला तर जनसंख्या पुढील काळात कमी होत राहील. मग आता या प्रमाणात सध्या आपल्या देशाचा प्रजनन दर नक्की काय? तर २०१९ ते २०२१ या काळात झालेल्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण - ५ च्या निष्कर्षा नुसार भारताचा प्रजनन दर २.० आहे. आता वर सांगितलेल्या निष्कर्षा नुसार भारतात लोकसंख्येच्या होणाऱ्या विस्फोटाला आपण आळा घालण्यात नक्कीच यशस्वी ठरलो आहे. पण भारताची लोकसंख्या वाढणार आहेच, कारण तुम्हाला वर सांगितलेली आहेच. पण या सर्वेक्षणा वरून एक गोष्ट नक्की की भारताने कोणत्याही पद्धतीने सक्ती न करता, फक्त आणि फक्त प्रबोधनाच्या मदतीने आपल्या प्रजनन दरावर नियंत्रण ठेवले आहे. या मुळे पुढील काळात फक्त आपण लोकसंख्या वाढ थांबवणार तर आहोतच, पण त्या पुढे जाऊन आपण लोकसंख्येत घट पण दाखवणार आहोत.
पण...हा "पण" खूप महत्त्वाचा आहे. मग तुम्हाला हिंदू - मुस्लिम लोकसंख्येतील फरक आणि काही हिंदू विचारकांना वाटणारी भीती का आहे हे लक्षात येईल. संपूर्ण भारताचा विचार करता प्रजनन दर जरी २.० असा असला तरी, भारताच्या धार्मिक लोकसंख्येच्या प्रमाणात जेव्हा आकडेवारी समोर येते तेव्हा हा आकडा बदललेला असतो.
मात्र या आधी भारताच्या लोकसंख्येत मुस्लिम समाजाच्या योगदानाचा इतिहास नक्की काय ? हे बघायला हवे. का हिंदुत्ववादी नेते मुस्लिम लोकसंख्या सातत्याने वाढत असून एक दिवस मुस्लिमांची लोकसंख्या हिंदू लोकसंख्येच्या पुढे जाईल ही भीती व्यक्त करत असतात.
भारताच्या स्वातंत्र्यानंतर १९५१ साली झालेल्या पहिल्या जनगणनेत भारताची एकूण लोकसंख्या ३६,१०,८८,०९० इतकी होती यातील ३०.६ करोड (८४.१%) हिंदू , तर ३.५४ (९.८%) मुस्लिम होते. बाकी ६.१% मध्ये शीख, ख्रिश्चन, जैन आणि इतर येत होते.
तर भारताची शेवटची जनगणना जी २०११ मध्ये झाली त्या नुसार भारताची लोकसंख्या १,२१,०८,५४,९७७ इतकी झाली आहे यात ७९.८०% हिंदू लोकसंख्या तर १४.२३% मुस्लिम लोकसंख्या आहे. बाकी ५.९७% मध्ये शीख, ख्रिश्चन, जैन आणि इतर येतात.
ही आकडेवारी बघितली तर सरळ लक्षात येईल की मुस्लिम लोकसंख्या वाढायचा दर इतर कोणत्याही धर्माची लोकसंख्या वाढायच्या कितीतरी अधिक आहे. धर्मांतराच्या वादात सतत अडकलेला ख्रिशन धर्माची लोकसंख्या पण १९५१ मध्ये लोकसंख्येच्या २.३% होती तर २०११ मध्ये पण ती २.३% कायम राहिली. बाकी शीख, बुद्ध, जैन यांची लोकसंख्या वाढ कमीच झाली आहे.
मात्र ही वाढ लक्षात आणून दिल्यावर मात्र काही अभ्यासक लगेच मुस्लिमांचा"प्रजनन दर" सातत्याने कमी होत आहे असा दावा करतात. त्यांचा दावा असा असतो की, लोकसंख्या वाढीच्या कारणामागे "धार्मिक विचार" कमी असून, सामाजिक आणि आर्थिक कारणे जास्त आहे. देशातील हिंदू, शीख, बौद्ध, जैन आणि ख्रिश्चन धर्मीयांचा मोठ्या प्रमाणावर आधुनिक शिक्षणाचा प्रसार झाला, त्यातून त्यांना अधिक संधी उपलब्ध झाल्या, त्यांची आर्थिक स्थिती बळकट झाली. त्यामुळे त्यांना कमी मनुष्यबळात जास्त पैसा उपलब्ध झाल्यामुळे त्यांचा प्रजनन दर आपसूक खाली आला. मुस्लिम समाजात नेमका भारतात मागास राहिला आहे. सहाजिकच मोल मजुरी करणाऱ्या या समाजाला आर्थिक उन्नतीसाठी अधिक मनुष्यबळाची गरज आहे आणि त्या पाई त्या धार्मिक समाजाचा प्रजनन दर पण जास्त आहे. या आपल्या निष्कर्षासाठी पुन्हा उदाहरण देतांना मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, झारखंड या राज्याची उदाहरणे दिली जातात जिथे हिंदू प्रजनन दर जा भारतातील इतर राज्यांपेक्षा जास्त आहे. काही प्रमाणात हा मुद्दा बरोबर आहे. मात्र राष्ट्रीय पातळीवर विचार केला तर हा मुद्दा तितकासा लागू होत नाही. यात पहिला मुद्दा हा की आजही मुस्लिम समाजात मोठ्या प्रमाणावर "धार्मिक शिक्षणाकडे" ओढा जास्त आहे. मदरस्यातील शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या मुस्लिम समाजातील मुलांना आधुनिक शिक्षणाशी जुळवून घेणे कठीण आणि मग त्या शिक्षणामुळे आधुनिक काळात रोजगाराच्या संधी मिळणे अजून कठीण अश्या दृष्टचक्रात अडकलेल्या समजला बाहेर कसे काढणार?
असो, मूळ मुद्दा मुस्लिमांचा कमी होणाऱ्या प्रजनन दराचा आहे. आपल्या देशातील तथाकथित तज्ञ आणि मुस्लिम अभ्यासक सतत आपल्याला सांगत असतात की मुस्लिम प्रजनन दर सातत्याने कमी होत आहे आणि मुस्लिम लोकसंख्या पण कमी होत आहे. मात्र आपण वरती मुस्लिमांची भारतातही वाढती लोकसंख्या बघितली, तेव्हा खरे काय?
तर उत्तर आहे, होय, हे खरे आहे की मुस्लिम प्रजनन दर हा १९४७ नंतर सातत्याने कमी होत आहे, पण तो किती कमी झाला हे महत्वाचे आहे. या करता पुन्हा आधार घ्यावा लागेल तो राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या निष्कर्षांचा !
१९९८-९९ पासून हे आकडे जर आपण बघितले तर मुस्लिम धर्मियांचा प्रजनन दर होता ३.६, म्हणजे एक मुस्लिम महिला आपल्या आयुष्यात जवळपास सरासरी ४ मुलांना जन्म देत होती. २००५ - ०६ मध्ये हाच प्रजनन दर झाला ३. ४, २०१५ - १६ मध्ये मुस्लिम धर्मियांचा प्रजनन दर होता २.६१, तर २०१९ -२१ सालच्या सर्वेक्षणाची आकडेवारी दाखवते की, मुस्लिम समाजाचा प्रजनन दर हा झाला २.३६ ! ही आकडेवारी बघतांना सहज लक्षात येते की मुस्लिमांचा प्रजनन दर हा सातत्याने खाली घसरत आहे.
पण जर याची तुलना हिंदू धर्मियांच्या प्रजनन दरासोबत केली तर चित्र अजून स्पष्ट होते आणि हिंदुत्ववादी नेते दाखवत असलेली भीती आधारहीन नाही हे स्पष्ट होते. वर दिलेल्या काळात हिंदू प्रजनन दर काय होता, १९९८ - ९९ या काळात मुस्लिम ३.६ या प्रजनन दराच्या अपरोक्ष हिंदू प्रजनन दर होता २.८, तर २००५-०६ या काळात हिंदू प्रजनन दर होता २.५९, तर २०१५ - १६ या काळात हिंदू प्रजनन दर होता २.१३, तर आता २०१९-२१ च्या सर्वेक्षणा नुसार हिंदू प्रजनन दर आहे १.९४ !
म्हणजे जर आकडेवारी बघितली तर हिंदू प्रजनन दर हा मुस्लिम प्रजनन दरापेक्षा सातत्याने कमी होता आणि आजही आहे. मुस्लिम प्रजनन दर हा कमी होत आहे हे सत्य असले तरी, मुस्लिम प्रजनन दर हा हिंदू प्रजनन दरापेक्षा कितीतरी अधिक आहे हे सत्य पण प्रकर्षाने अधोरेखित होते. आपण वर बघितलेच आहे की जर प्रजनन दर २.१ पेक्षा कमी असेल तर त्या देशाची लोकसंख्या सातत्याने घट दाखवत असते. आज हिंदू प्रजनन दर हा १.९४ आहे म्हणजे हिंदू जनसंख्या आता सातत्याने घटती राहणार आहे. तर मुस्लिम प्रजनन दर हा अजूनही २.३६ आहे, म्हणजेच मुस्लिम जनसंख्या पुढील अनेक पिढ्या सतत वाढती राहणार आहे. भारताचा सध्या असलेला प्रजनन दर हा २.० असण्याला हिंदू आणि इतर धर्मियांचे योगदान जास्त आहे, ना की मुस्लिमांचे.
आता या वर उपाय काय? गेल्या वर्षीच मोदी सरकारने लोकसंख्या नियंत्रण कायदा आपण आणणार नाही अशी ग्वाही लोकसभेत दिली होती. सरकारच्या म्हणण्यानुसार भारतासारख्या लोकशाही देशात असे न करता पण समाज प्रबोधनाच्या माध्यमातून अनेक राज्यांनी आपली लोकसंख्या वाढीवर यशस्वीपणे नियंत्रण ठेवले आहे. तेव्हा असा कोणताही कायदा करण्याचे सरकारच्या मनात नाही.
मात्र तरीही मुस्लिम समाजाची वाढती लोकसंख्या आणि देशाच्या काही भागात धार्मिक अनुपात बदलल्यामुळे समोर आलेल्या सामाजिक घटना आणि समस्या याचा विचार नक्कीच केला जायला हवा. सोबतच भारतातील जे कोणी तज्ञ मुस्लिम लोकसंख्या आणि प्रजनन दर सातत्याने कमी होत असल्याचे सांगत असतात त्यांना ही वस्तुस्थिती दाखवायला हवी. हिंदूंनी दहा अपत्ये जन्माला घालावी असे आवाहन करणाऱ्या हिंदू धार्मिक पुरुषांना आपण हिणवतो हे योग्यच आहे. मात्र भारतातील लोकसंख्येचा धार्मिक समतोल सतत बिघडत आहे आणि सातत्याने वाढणार आहे या कडे डोळेझाक करून कसे चालेल? तेव्हा विचार करा आणि उपाय शोधा !
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा