"काली" वादाच्या निमित्याने



२४ अक्टोंबर २०२१ मध्ये लोकसत्ता लोकरंग मध्ये "आरतें ना पारतें......आयना का बायना !" नावाचा श्री प्रवीण दशरथ बांदेकर यांचा एक लेख आला होता. लेखात कोण्या पारशा ठाकर नावाच्या देवांची सोंगे करून पोट भरणाऱ्या एका सोंगाड्याच्या कथित मृत्यूवर आणि त्या निमित्याने आजकाल जागृत झालेल्या हिंदूंवर आणि हिंदुत्वावर ताशेरे ओढले आहेत. नेमके प्रकरण लिहतांना त्यांनी आरोप केला होता की मृत पारशा ठाकर याने हिंदू देवाचे सोंग घेत, पैसे मागत असल्यामुळे "एका हिंदुत्ववादी" संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आपल्या धार्मिक भावना दुखवण्याचे निमित्त सांगत त्याला मारहाण केली, त्या मारहाणीचा परिणाम म्हणून पारश्याचा मृत्यू झाला. 



या अत्यंत गंभीर प्रकरणावर लेख लिहण्याची हिम्मत दाखवणाऱ्या आणि मृत पारशाचे नाव लिहणाऱ्या या लेखक महाशयांना तेव्हा मात्र या "एका हिंदुत्ववादी संघटनेचे" नाव लिहता आले नाही, जे पारशाचे झाले तेच आपले होईल ही भीती या मागे होती का? तर नाही कारण बाकीच्या सगळ्या खऱ्या गोष्टी सांगतांना नेमके त्यांनी तेच नाव का वगळावे ? बरे लेखक महाशयांनी स्वतः तरी निदान या कथित स्थानीय वृत्तपत्रात आलेल्या बातमीचा फोटो किंवा पोलीस एफ आय आर तरी जोडायला हवा होता, तो पण तेव्हा जोडला नव्हता. 



खरे तर अशी काही घटना घडली असती तर याचा राजकीय फायदा बघत ही घटना नक्कीच फक्त स्थानीय वृत्तपत्रात थांबली नसती, निदान लोकसत्ताच्या बुद्धिवान संपादकांनी तरी छापली नक्कीच असती. एकवेळ समजून घेऊ की लोकसत्ताचे विद्वान संपादक कदाचित कोण्या पाश्चात्य अति विद्वान बुद्धिवाद्याच्या लेखाचे मराठीत भाषांतर करण्याच्या कामात गुंतले असल्यामुळे त्यांचे या बतमीकडे लक्ष गेले नाही, मात्र सकाळ, सामना, लोकमत अश्या कोणत्यात वृत्तपत्राचे अश्या गरम बतमीकडे लक्ष गेले नाही असे म्हणणे धारिष्ठ्यचे ठरेल. इतकेच नाही तर राज्यातील एकाही गरीब आणि वंचितांचे कैवारी असणाऱ्या नेत्यांचे, समाज सुधारकाचे लक्ष या नृशंस हत्येकडे कसे गेले नाही? या वरून हिंदू धर्मातील अहिष्णूते विरोधात तेव्हा बराच गदारोळ उठवता आला असता हा फायदा नव्हता का? 


मात्र तेव्हा पण हा लेख लिहीत लेखकाने मोठ्या खुबीने हिंदू धर्मात वाढत चाललेली कथित असहिष्णुता यावर बरेच तोंडसुख घेतले होते. आज मला हा लेख आठवायचे कारण काय? जवळपास एक वर्षा नंतर हा सगळा आलेख द्यायचे कारण नक्की काय? 


तर याचे कारण आहे, सध्या गाजत असलेले कॅनडा स्थित चित्रपट दिगदर्शक मणिमेकलाई या बाईने आपल्या "काली" या चित्रपटाची केलेली जाहिरात आणि त्यावरून सुरू झालेला विवाद ! 


आपल्या "काली" महितीपटाची जाहिरात करण्यासाठी वापरलेले पोस्टर ज्यात काली मातेच्या रुपात असलेल्या अभिनेत्रीला सिगरेट पितांना दाखवतांनाच तिच्या एका हातात समलैगिंकतेचे समर्थन करणारा इंद्रधनुषी झेंडा दाखवण्यात आला. अर्थातच या वरून वादळ उठले. या जाहिरातीचा जगभरातील हिंदू धर्मीयांकडून विरोध करण्यात आला आणि पुन्हा आरोप प्रत्यारोपांना सुरवात झाली. 



"काली" महितीपटाची ही जाहिरात ट्विटर वरून सामायिक करण्यात आली होती. यावर आक्षेप नोंदवल्यावर ट्विटरने तो संदेश आपल्या माध्यमातून हटविला. याचा निषेध म्हणून मणिमेकलाई बाईंनी मग भारतातील देवाचे सोंग घेत आपले पोट भरणाऱ्या दोन कलाकारांचा देवांच्या वेशात सिगरेट-विडी पित असतानांचे छायाचित्र ट्विट केले आणि या ट्विटच्या माध्यमातून आपल्या खोडसाळ जाहिरातीचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार बघून मला एकदम गेल्या वर्षी लोकसत्ताच्या पुरवणीत आलेला वरील लेखाची आठवण झाली. 

ही डाव्या विचारांच्या लोकांची पद्धत असते. आता एक वर्षांपूर्वी कोणत्याही सज्जड पुराव्याशीवाय लिहलेली घटना आणि त्या आडून हिंदू धर्मीयांच्या कथीतपणे वाढत असलेला कट्टरतावादावर आणि असहिष्णुतेवर केलेले भाष्य मात्र आज कामात पडेल अशी स्थिती आहे. सरळ सरळ बुद्धीभेद कसा केला जातो याचा हा उत्कृष्ट नमुना आहे. पुन्हा "काली" चे समर्थन करायला मोईना मित्रा आणि प्रकाश राज सारखे गबाडे असतातच ! 


यातील पहिला मुद्दा हा की, देवाचे सोंग घेण्याची परंपरा फक्त महाराष्ट्रात नाही तर जवळपास सगळ्या राज्यात आहे. देवाचे सोंग घेत लोकांच्या धार्मिक भावनांना हात घालत आपले पोट भरणे हाच ज्यांचा व्यवसाय आहे त्यांना या "धार्मिक भावना" कथीतपणे कुठे आणि कश्या दुखवू शकतात याची पूर्ण जाणीव असते. कारण सरळ आहे, एका व्यवसाईकला आपल्या व्यवसायामधील खाचखळगे, फायदे - धोके व्यवस्थित माहीत असतात. म्हणूनच जेव्हा हे देवाचे सोंग घेत पैसे कमवायला उभे असतात तेव्हा ते कोणतेही अनैतिक आणि अधार्मिक कृत्य करत नाहीत. एखादा सोंगाड्या देवाचे सोंग घेऊन पैसे मागत असतांना विडी पितांना मी तरी बघितला नाही. मात्र जेव्हा त्या कामातून तो मध्यंतर घेतो तेव्हा मात्र तो देव नसतो आणि कलाकारही ! तो असतो सामान्य माणूस आणि त्याच मुळे तो जे काही करतो ते सामान्य माणूस म्हणून कार्य करतो. हे तारतम्य हिंदू धर्मीयात नक्कीच होते आणि आहे, त्याच मुळे यांच्यावर हल्ला करण्याचा कोणताही इतिहास नाही. 


दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची तर,  मुळातच हिंदू धर्मात स्वतःच्याच धर्मावर माफक विनोद करायची एक वेगळी परंपरा आहे आणि धर्मावर होणारी माफक टीका पचवण्याची ताकद आहेच. त्याचमुळे हिंदू धर्मियांनी वस्त्रहरण, ओ एम जी सारखी नाटके आणि चित्रपट समजून घेतले. मात्र हिंदूंच्या समंजसपणाचा अधिक फायदा घेतल्या जातो, जेव्हा हिंदू धर्मावर अकारण टीका केली जाते आणि हिंदू देवतांचे विकृत चित्रण केले जाते तेव्हा काय? 


आता जेव्हा "काली" महितीपटाचा वाद वाढला तेव्हा कॅनडात बसलेल्या या महितीपटाच्या दिगदर्शिका मणिमेकलाई यांनी ऐका मुलाखतीमध्ये आपल्याला जीवाची भीती वाटत असल्याचे वक्तव्य केले. मात्र हे करत असतांना त्यांनी "काली मातेवर" अजून एक वक्तव्य केले. त्यात त्यांनी जाहीर केले की त्या "नास्तिक" आहेत. आता त्या नास्तिक असल्यावर कोणत्याही धर्माच्या आस्थेवर आघात करणार हे आपण समजून घेतले पाहिजे. अर्थात त्या "नास्तिक" असल्यामुळे त्यांनी "काली" या पद्धतीने दाखवली त्यात काहीही गैर नाही. मात्र स्वतः नास्तिक असल्याच्या वक्तव्याला तडा देतांना त्या म्हणतात की, "मी ज्या "काली" वर आस्था ठेवते ती, "काली" समलौगिक आहे, अपेयपान करणारी आहे, मांसाहारी आहे आणि धूम्रपान करणारी पण आहे." मात्र हे वक्तव्य पूर्णतः बुद्धिभेद करणारे आहे. एक तर मणिमेकलाई बाई या पूर्णपणे आस्तिक आहे किंवा पूर्णपणे नास्तिक ! मात्र हिंदू श्रद्धा, परंपरा आणि आस्थांचा विचार करतांना या बाईला आपण नास्तिक असल्याचा साक्षात्कार होतो, मात्र इतर वेळेस ती मग "काली" मध्ये आस्था कशी दाखवते? ही सरळ सरळ हिंदूंची खोडी काढण्याचे काम नाही काय?



पुन्हा लक्षात घेण्यासारखी आणि महत्वाची गोष्ट अशी की हिंदू धर्माचे विचार हे सर्वसमावेशक आहेत. देवाचे जसे रूप तुम्हाला भावेल त्या पद्धतीने त्याला पूजायची परवानगी तुम्हाला देतो, तरी पण संस्कृतीक आणि आध्यात्मिक दृष्ट्या प्रत्येक देवाचे एक रूप आणि मान्यता प्रचिलीत आहेत, ज्या आपल्याला मर्यादेची जाणीव करून देत असते. मात्र हिंदू धर्मातील सर्वसमावेशकतेचा गैरफायदा नक्कीच घेऊ नये ही माफक अपेक्षा हिंदू धर्मीय करतात. मात्र ही डावी पिल्लावळे नेमके या सर्वसमावेशकतेचा उपयोग करत बुद्धिभेद आणि सामाजिक दरी वाढवण्याचा प्रयत्न करत आपले राजकीय ईप्सित साध्य करण्याच्या प्रयत्नात असतात.


बाकी मोईना मात्रा किंवा प्रकाश राज सारखे भडभुंजे या आगीवर आपले फुटाणे भाजण्याचे काम करण्यात जास्त आवडीने करणारे. यात त्यांना राजकीय आणि सामाजिक फायदा दिसतो. इथे पैगंबरांच्या बाबतीत वक्तव्य दिलेल्यांना समर्थन दिल्यामुळे गळे कापले जात असतांना, हिंदू मात्र या नतद्रष्ट लोकांविरोधात कायदेशीर मार्गाने जात आहेत ही हिंदूंची सहिष्णुता आहे हे लक्षात घेणे जास्त गरजेचे आहे.

टिप्पण्या