देवेंद्र फडणवीस : शिकार की सावज



महाराष्ट्राचे राजकारण अनेक वळणे, वेल्यांट्या आणि धक्के देत शेवटी एका स्थानकावर पोहचले. इतकी वळणे आणि धक्के माझ्या मते चांदा ते बांदा लालपरीचा प्रवास करतांना पण लागत नसतील. असो, पण, "इस पिक्चर मे ट्राजडी है, इमोशन है, मनोरंजन है, सन्स्पेन्स भी है।" सारखी कथा सतत बदलली, सुरवात जितकी जोरदार झाली, मध्यंतरला थोडी रेंगाळली आणि शेवटी जोरदार वेग घेत, अनपेक्षित वळणार पहिला भाग संपला. (आजकाल सिक्वेलचा जमाना असल्यामुळे) 


शिवसेनेचे काय होणार ? या प्रश्नाने सुरू झालेला चित्रपट, देवेंद्र फडणवीस सोबत नक्की काय झाले ? या प्रश्नावर येऊन संपला ! 


उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून राजीनामा दिल्या नंतर, भाजपा आणि शिवसेना (शिंदे) गट सरकार स्थापन करणार हे पक्के होते. त्यातही सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस नक्की ही राज्यातील जनतेची अटकळ होती. एकूण परिस्थिती बघता ती काही चुकीची पण नव्हती. 


मात्र दुपारी देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले की मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे बसतील. भाजप जरी सत्तेत सामील होणार असली तरी ते स्वतः सत्तेच्या बाहेर असतील, मात्र आपले संपूर्ण समर्थन एकनाथ शिंदे सरकारला असेल ! 


या एका निर्णयाने देवेंद्र फडणवीस यांनी एका दगडात अनेक पक्षी गारद केले होते. शिवसेनेच्या ठाकरे गटाची डोकेदुखी अजून वाढवली होती, काँग्रेस - राष्ट्रवादीच्या "सत्तेच्या लालसेच्या" आरोपाची हवा काढून टाकली होती. भाजपाचा अंतर्गत सत्ता संघर्ष पण काही प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न म्हणून या निर्णयाकडे बघायला हरकत नव्हती. मात्र या निर्णयाने स्वतः देवेंद्र फडणवीस एका झटक्यात स्व. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्या बरोबरीत येऊन बसत होते. 


कदाचित हेच कारण असेल की हा निर्णय विरोधकांना न आवडण्यापेक्षा भाजपच्या राज्य आणि केंद्रातील काहींना आवडला नसेल. विशेषतः या विरोधात राज्यातूनच बोंब झाली असेल. विशेषतः राज्य भाजपातील अनेकांनी तसा तत्काळ विरोध केंद्रीय नेतृत्वाकडे नोंदविला पण असेल. त्याची परिणीती अखेरच्या क्षणी देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यात झाली. 


देवेंद्र फडणवीस यांना भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी ज्या पद्धतीने जाहीरपणे आवाहन करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला लावली त्या बद्दल अनेक कथित राजकीय अभ्यासकांनी आक्षेप नोंदवला. त्यांचे म्हणणे असे की, "अशी चूक कधी काँग्रेसने पण केली नाही." मात्र माझ्या मते जे पी नड्डा यांनी असे जाहीर आवाहन करत, राज्य भाजपा मधील फूट झाकण्याच्याच प्रयत्न अत्यंत हुशारीने केला. लक्षात घ्या राजकारण मोठे पद हातात येण्या पेक्षा, ते दुसऱ्याला देण्यात आपला मोठा विजय असू शकतो ! फक्त पुढील पत्ते हुशारीने फेकता आले पाहिजे. सध्या तरी सरकार मध्ये सामील न होण्याचा निर्णय असो किंवा अनपेक्षित पणे केंद्र नेतृत्वाकडून आलेल्या आदेशाचे पालन केल्याचे निमित्य असो, देवेंद्र फडणवीस राजकारण आणि संघटन यात आपल्या खात्यात जास्तीचे अंक घेऊन समोर आहेत हे विसरता येणार नाही. 



मात्र असे का झाले? फक्त वरील कारण असू शकते? तर नाही, कदाचित भाजपाची ही समजून उमजून केलेली खेळी असू शकते. अडीच वर्षा करता मुख्यमंत्रीपद स्वतःच्या गळ्यात घेऊन विरोधकांना संधी द्यायची नाही हे पक्के होते. मग स्वतःहून उपमुख्यमंत्री बनत राष्ट्रवादी, शिवसेना सारख्या तोंडाळ विरोधकांसोबत, भाजपातील अंतर्गत विरोधकांना विनोद निर्मिती करता कारण द्यायचे का? या प्रश्नाचे उत्तर म्हणजे जे पी नड्डा यांचे "जाहीर आवाहन" हे उत्तर असू शकते. आता जास्तीजास्त देवेंद्र फडणवीस यांना काही विनोद ऐकावे लागले तरी त्याची धार खूप कमी झालेली राहील, विशेषतः भाजपा अंतर्गत विरोधक तर एकदम गपगार होतील ! कारण संघटनेची शिस्त, संघटनेचा आदेश अंतिम आणि तो कोणालाही पाळावाच लागणार हे अत्यंत मोठया प्रमाणात अधोरेखित झाले. मग "मनातील मुख्यमंत्री" वगैरे सगळे आपोआप मनात कैद करावे लागेल. त्यातही सध्या राज्यात ई डी, सीबीआय सारख्या माध्यमातून विरोधक जेरीस आलेले आहेत. विसर्जित झालेल्या सरकार मधील दोन मंत्री चक्क कारागृहाची हवा खात आहेत, तो तपास राज्याच्या पोलीस यंत्रणेच्या हातात आहे. तेव्हा राज्याचे गृहमंत्रीपद योग्य माणसाच्या हातात असणे अत्यंत महत्वाचे आहे. फक्त कठोर पणे कायद्यात अडकवणे हेच उद्दिष्ट नसून, कायद्यात अडकलेल्यांकडून फायदा घेणे पण राजकारणच असते. हा "सेटलमेंट" चा अनुभव भाजपाच्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उत्तम आहे, नव्हे हीच त्यांची खासियत आहे, म्हणून हा खेळ उभा केला असल्याचे नाकारता येत नाही. 


बाकी २०१९ मध्ये शिवसेनेशी युती नको या मानसिकतेत असलेल्या केंद्रीय नेतृत्वाला युती करण्याची गळ घालणे. निवडणुकी नंतर शिवसेनेने गोंधळ घातला असता, त्याला महत्व न देता, सकाळी केलेला शपथविधी आणि पुढील ४८ तासात त्या खेळीला आलेले अपयश, या सगळ्यात पक्षाची झालेली बदनामी वगैरे चुकांची ही शिक्षा आहे असे विचार समोर येत आहे. मात्र मला यात काही दम वाटत नाही. कारण या सगळ्या नंतर पण केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेक महत्वाची कामे सोपवली होती. तेव्हा काय किंवा आता काय कोणतेही पाऊल देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय नेतृत्वाला अंधारात ठेऊन उचलले असे मानायला सध्या जागा नाही. कारण तसे असते तर मोदी-शहा यांच्या कार्यपद्धतीप्रमाणे देवेंद्र फडणवीस गेल्या पाच वर्षात अडगळीत गेले असते. तेव्हा हा विचार बाजूला ठेवणे चांगले. 


बाकी राजकारण कसे वळते याची चांगली प्रचिती गेल्या दोन दिवसात आली. आता पुढील कथा शिवसेनेचे नक्की काय होणार ही आहे. सध्या तरी शिवसेनेचे मोठे खलनायक म्हणून संजय राऊत समोर येत आहेत. तेव्हा ते खरेच खलनायक राहतात की नायक म्हणून समोर येतात हे बघणे मनोरंजक ठरेल.

टिप्पण्या