हिंदुत्वा मधील गर्दी आणि गारदी !



राज्यातील एकूणच सध्याची राजकीय परिस्थिती बघता राज्याच्या इतिहासात आता एक वेगळा वैचारिक लढा सुरू होणार. आता पर्यंत शाहू-फुले-आंबेडकरांच्या नावांचा जप करत मत मागणारे कथित पुरोगामी, उदारमतवादी पक्षांचा बोलबाला होता. मग ती भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो, वंचित बहुजन आघाडी असो किंवा रिपब्लिकन पक्षाचे मोजता येणार नाही इतके गटतट असो ! 



मात्र आता राज्याच्या राजकारणात "कट्टर हिंदुत्ववादी पक्ष" कोणता ? या करता रस्सीखेच सुरू होईल. शिवसेना (ठाकरे) या पक्षाचे हिंदुत्व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर शिवाजी पार्क मैदानावर पंचतत्वात विलीन झाले आहे. २०१९ नंतर राष्ट्रवादी - काँग्रेस सोबत महाआघाडीत सामील होत सत्ता काबीज केल्यावर शिवसेना (ठाकरे) पक्षाचा प्रवास झपाट्याने पुरोगामी पक्षाच्या वैचारिक पदपथावर सुरू झाला होता. 


हा प्रवास इतका विलक्षण वेगात होता की, आता बंडखोर शिवसेना (शिंदे) पक्षासोबत गुवाहाटी येथे बसलेल्या अपक्ष पुरोगामी आमदार बच्चू कडू पण काही उदाहरणे देत "शिवसेनेचे बेडगी हिंदुत्व" दाखवायला लागले. म्हणावा तर हा विनोद आहे आणि म्हणावे तर दुःखद घटना ! 



असो, मात्र एकूणच आता राज्याच्या राजकीय भविष्यात हिंदुत्वाच्या चलत्या नाण्याला सगळेच चालवू बघतील ! आताच गेल्या वर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज ठाकरे यांनी त्या अगोदर गेल्या निवडणुकीत ओढलेला पुरोगामी पक्षाचा चोगा उतरवला ! छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा असलेला भगवा आता त्यांच्या पक्षाचा ध्वज झाला आहे. दोन महिन्यांपूर्वी मशिदीवरील भोंग्यांचा विरोधात आवाज उठवत त्यांनी आपले कट्टर हिंदुत्त्व जनतेसमोर आणले. 


आता एकनाथ शिंदे यांनी पक्षात होणारी मुस्कटदाबी सोबतच शिवसेना (ठाकरे) पक्षाने सोडलेला "हिंदुत्व विचार" हे कारण समोर केले आहे. म्हणजेच भविष्यात राज्याच्या राजकारणात शिवसेना (शिंदे) पक्ष पण आपल्या मुरलेल्या जुन्या शिवसेना स्वभावप्रमाणे कट्टर आणि कर्कश्य हिंदुत्व विचार मांडू शकतात. कदाचित त्यात एकनाथ शिंदे, राज ठाकरे यांच्या पेक्षा जास्त यशस्वी होऊ शकतील जर त्यांचात राज ठाकरे यांच्यासारखी धरसोड वृत्ती नसेल तर ! 



तेव्हा आता प्रश्न उभा राहतो की या सगळ्यात भाजपा कुठे उभी राहणार? भाजपाने साधारणतः १९८८ पासून मेहनतीने हिंदुत्वाचा वैचारिक पायावर देशांबरोबर राज्यात आपले राजकारण उभे केले. त्याचीच चमक बघून तत्कालीन काळात स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी क्षेत्रावाद बाजूला ठेवत हिंदुत्वाची कास धरली. मुंबई, तिच्या आजूबाजूचा परिसर आणि कोकण इतकीच व्याप्ती असलेली शिवसेना तेव्हा झपाट्याने पार विदर्भातील गडचिरोली पर्यँत पोहचली. भाजपाचे सौम्य हिंदुत्व आणि शीवसेनेचे त्या समोर काहीसे कट्टर हिंदुत्व हे समीकरण राज्यात तब्बल २५ वर्षे आपला अवकाश टिकवून होते. तत्कालीन काळात कदाचित भाजपाचे सौम्य सगळ्यांना साधत जाणारे हिंदुत्वाच्या राजकारणाने भाजपाचा फायदा करून दिला. मात्र आता भाजपा या परिस्थितीशी त्याच सौम्य हिंदुत्वाच्या आणि राजकारण साधण्याच्या विचारांनी पुढे जाऊ शकेल काय? 


आता राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे सारख्या लोकांना शह देण्यासाठी कदाचित शिवसेना (ठाकरे) आपल्या हिंदुत्वाच्या पातळ विचारांना अजून थोडे घट्ट करू शकते, म्हणजे राज्यात तीन पक्ष स्वतःला कट्टर हिंदुत्ववादी म्हणवून घेतील. त्यातच २०१९ नंतर भारतातील आणि राज्यातील हिंदू मतदार हिंदुत्ववादी पक्षाकडून अधिक व्यापक पेक्षा अधिक भेदक भूमिका अपेक्षित करतो. या हिंदुत्ववाद्यांचे नायक आता बाळासाहेब ठाकरे किंवा अटल बिहारी वाजपेयी राहिले नसून उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा आहेत. योगीनाथ यांच्या "बुलडोझर" चा महिमा इतका की भाजपच्या जुन्या सौम्य हिंदुत्वाच्या शाळेत शिकलेल्या मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मामा शिवराजसिंग चव्हाण यांना पण "बुलडोझर" चालवायचा मोह आवरला नाही. या सगळ्यात देवेंद्र फडणवीस नक्की कुठे बसू शकणार? देवेंद्र फडणवीस स्वतःला बदलतील की भाजपा पुन्हा कोणत्यातरी कट्टर हिंदुत्वाची जाहिरात करणाऱ्या पक्षाच्या मागे फरफटत जाईल? 



सगळ्यात महत्वाचे म्हणजे हिंदुत्ववादी विचारांच्या पक्षांची संख्या वाढून अगोदरच कमी मत असलेल्या मतांना पक्ष संख्या वाढवत खिंडार पाडून नक्की फायदा कोणाला होणार? हा पण विचार करण्यासारखा आहे. 


बाकी काही दिवसांपूर्वी कथितपणे भाजपच्या मर्जीतील खास उद्योगपती बारामतीला कार्यक्रमाला उपस्थित राहतात, त्यांच्या आदरतिथ्याचा भाग म्हणून त्याच्या गाडीचे सारथ्य पुतण्या अगत्याने करतो. नंतर होणाऱ्या निवडणुकीत नेमके शिवसेनेचे उमेदवारच पडतात. मग एक मंत्री ज्याला पोलीस सुरक्षा (इस्कॉर्ट) उपलब्ध आहे तो रात्रीत राज्याच्या सीमा ओलांडतो आणि आपलेच गृहमंत्री असून कोणाला त्याची कानोकान खबर लागत नाही हे सगळे पचनी पडत नाही. 


तेव्हा विचार करा, नाटक बघा आणि अंदाज घ्या की, "कुणाचा उंट कोणत्या बाजूने बसत आहे !"

टिप्पण्या