एकूणच शिवसेना फुटीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी कितीही भावुक भाषण केले आणि मुख्यमंत्री निवास सोडतांना कितीही नाटके आणि शक्ती प्रदर्शन केले तरी या प्रकरणात उद्धव ठाकरे यांच्या मर्यादा समोर आल्यात.
मुख्यमंत्री म्हणून आपल्याला अजिबात प्रशासकीय अनुभव नव्हता ही त्यांनी दिलेली प्रांजळ कबुली हे उशिरा आलेले शहाणपण समजायचे की कावा हे प्रत्येकाने स्वतःचे स्वतः ठरवायचे.
एक मात्र खरे की मुख्यमंत्री म्हणून जसे उद्धव ठाकरे प्रशासन हकण्यात अयशस्वी ठरले, तसेच ते कार्याध्यक्ष म्हणून शिवसेनेत वचक ठेवण्यात, आपल्या नेत्यांसोबत संवाद साधण्यात पण कमालीचे अयशस्वी राहिले. गेल्या २५ वर्षात भाजपा सोबत युती करून शिवसेना कुजली असा आरोप करणारे कार्याध्यक्ष अडीच वर्षात फुटीला आली हे कसे समजू शकले नाही?
उद्धव ठाकरे यांचा मितभाषिपणा आणि दिसणारी कथित सज्जनता ही त्यांची आंतरिक प्रेरणा नसून, कश्यावरच प्रभुत्व नसल्याने आलेल्या हतबलतेचे प्रतीक आहे असे म्हणायला अर्थातच जागा आहे.
बाकी हे सरकार वाचले होते, किंबहुना शिवसेना सत्तेत आल्या आल्या फुटली नाही याचे कारण लगोलग आलेला चिनी करोना ! या काळात जसे भाजपाने पण सरकारवर जास्त दबाव बनवणे सोडले होते, तसेच शिवसेनेतील बंडखोर गट सुद्धा कदाचित योग्य वेळेची वाट बघत थांबला होता. कारण करोना काळात सरकार पडल्या गेले असते तर वेगळी सहानुभूती सरकारला मिळू शकली असती.
कथितपणे उद्धव सरकार असे या सरकारला म्हणत असले तरी सरकारच्या सगळ्या चाब्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातात होत्या. त्यातच देशमुख आणि मलिक सारख्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे शिंतोडे मात्र सरकार प्रमुख म्हणून सज्जन मुख्यमंत्र्यांच्या अंगावर उडालेच होते. या उप्पर तर काही ठिकाणी गरज नसतांना संजय राऊत, अनिल परब सारखे योध्ये काहीबाही वक्तव्य करत अंगावर ओढवून घेत होते. उद्धव ठाकरे आपल्या सल्लागारांवर पण अंकुश ठेवू शकले नाही.
बाकी शिवसेनेचे अनेक मंत्री - आमदार विशेषतः ज्यांना ही आघाडी मनापासून आवडली नव्हती किंवा जे खरेच आपल्या "हिंदुत्वाला" सोडचिठ्ठी दयायच्या मनस्थितीत नव्हते त्याची कामे होत नाही, निधी मिळत नाही सारख्या तक्रारी होत्या, तर बच्चू कडू सारखे अपक्ष मंत्री पण नाराज असल्याच्या बातम्या अधूनमधून येत होत्या. मग आज संवाद साधा म्हणून आर्जव करणारे उद्धव ठाकरे यांनी आधीच तसा संवाद साधायचा प्रयत्न का केला नाही? की, उद्धव ठाकरे यांनी या लोकांसोबत संवाद साधला मात्र राष्ट्रवादीच्या घट्ट पकडीत अडकेलेल्या प्रशासनाला मुख्यमंत्री म्हणून पण हलवू शकले नाही आणि हे अपयश बघून शेवटी ही लोक बाहेर पडली.
बाकी शरद पवार यांच्या बद्दल स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे मत एकदम योग्य होते. २०१४ साली भाजपा सरकारला बाहेरून पाठींबा देत शिवसेनेला कोंडीत पकडले, शेवटी सेनेला भाजपासोबत युती करत, आपली फरफट करायला लावली. २०१९ साली मुख्यमंत्री पदाचे आमिष दाखवत सोबत घेऊन शिवसेना संपवली !
आता पुण्याच्या शनिवार वाड्या नंतर मुंबईतील दादर मधील शिवसेना भवनात सुद्धा एकच आवाज आकायला मिळेल "काका मला वाचवा !"
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा