"शिया सुन्नी" वाद वाढवणारा चित्रपट



समजा तुम्हाला कोणी म्हंटले की, "इस्लामी आतांकवादाची पहिली भुक्तभोगी दुर्दैवाने इस्लामचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांची मुलगी फातिमा होती." तर तुम्हाला काय वाटेल? 


ज्यांना इस्लामचा इतिहास माहीत नाही, त्यांच्या करता थोडक्यात ! पैगंबर मुहम्मद यांची पहिली पत्नी खदिजा यांची मुलगी फातिमा ! (बाकी इतिहासात न पडता.) फातिमा यांचे लग्न वयाच्या १९ व्या वर्षी हजरत अली यांच्या सोबत झाले, विवाहा नंतर ९ वर्षे त्या जीवित राहिल्या. यांना चार मुल झालीत, दोन मुल हजरत इमाम हसन, हजरत इमाम हुसेन, तर दोन मुली हजरत जैनब आणि हजरत उम्मे कुलसुम ! 


आपले पिता मोहम्मद पैगंबर यांच्या मृत्यू नंतर फातिमा केवळ ९० दिवसच जीवित होत्या. कारण पैगंबर मोहम्मद यांच्या मृत्यू नंतर इस्लामचा नेता कोण होणार यावरून झालेली भांडणे आणि यावरून इस्लाममध्ये पडलेली दुफळी "शिया आणि सुन्नी" ! याच लढाईत फातिमा यांच्यावर सुन्नी इस्लाम कडून अत्याचार केल्या गेले, जे सहन न होता त्यांचा मृत्यू झाला, मृत्यू आधी त्यांना आपल्या मुलांचे मृत्यू पण बघावे लागले आणि मृत्यू समयी या स्वतः गर्भार होत्या. जेव्हा शत्रूंनी फातिमा यांच्या घराचा दरवाजा तोडला तेव्हा त्या दरवाजा आणि भिंत या मध्ये दबल्या गेल्या, ज्यामुळे त्यांच्या बरगड्या तुटल्या आणि गर्भातील शिशुचा पण मृत्यू झाला. नंतर त्या दुखण्यातच त्यांचा मृत्यू झाला. हा झाला थोडक्यात इतिहास !



मग लेखाच्या सुरवातीला आलेले वाक्याचा संदर्भ काय? तर सध्या ब्रिटन मध्ये एका चित्रपटवरून सुरू असलेला वाद ! नाव आहे "द लेडी ऑफ हेवेन" ! इस्लामच्या इतिहासावर आता पर्यंत एकूण तीन चित्रपट बनले आणि तिन्ही चित्रपट वादात आहे. विशेषतः सुन्नी मुस्लिम असे चित्रपट बनवण्याच्या विरोधात आहेत. १९७६ साली मुस्तफा अकत यांनी "द मेसेज" नावाचा चित्रपट, इस्लामच्या मान्यतेनुसार पैगंबर मोहम्मद यांना दाखवणे किंवा त्याचा आवाज एकवणे निषिद्ध आहे. तेव्हा या चित्रपटात पण पैगंबर मोहम्मद यांना दाखवण्यात किंवा एकवण्यात आले नव्हते. इतकेच काय तर त्यांची सावली सुद्धा दिसणार नाही याची काळजी घेण्यात आली होती. तरी इस्लामी जगतात या चित्रपटवरून रोष व्यक्त झाला होता आणि यावर बंदी आली होती. या नंतर दुसरा मोठा चित्रपट म्हणजे, २०१५ साली आलेला मजीद मजदी यांचा "मोहम्मद : दि मेसेंजर ऑफ गॉड" ! यावरून पण बराच गदारोळ झाला होता. भारतात पण रजा अकादमीने या चित्रपटावर बंदी घालायची मागणी केली होती. सरसकट बंदी घातल्या गेली नाही मात्र हा चित्रपट भारतात प्रदर्शित पण होऊ शकला नाही. आताच काही महिन्यांपूर्वी हा चित्रपट ओ टी टी वर प्रदर्शित करण्यात येणार होता. मात्र भारतात त्याचे स्ट्रीमिंग करण्यास बंदी घालण्याची मागणी पुन्हा रजा अकादमी आणि इतर सुन्नी इस्लामी संघटनांनी केली, जी मान्य करण्यात आली. 



तर या दोन चित्रपटा सोबत आता अजून एका चित्रपटाचे नाव जुळले ते म्हणजे "द लेडी ऑफ हेवेन" ! दिगदर्शक इलाय किंग यांनी हा चित्रपट बनवला आहे. या चित्रपटाची कथा लिहली आहे शिया मुस्लिम धर्मगुरू शेख यासीर अल हबीब यांनी ! हा चित्रपट दोन कारणांनी विवादित झाला आहे. पहिले कारण तर सर्वश्रुत आहे की पैगंबर मोहम्मद किंवा त्यांच्या जवळच्या लोकांना चित्रित करता येणार नाही ही इस्लामी धार्मिक मान्यता ! पण हा चित्रपट विवादित होण्याचे दुसरे मोठे कारण म्हणजे या चित्रपटाची कथा सांगण्याची पद्धत ! ही पद्धतच लेखाच्या सुरवातीला आलेले वाक्य प्रेक्षकांच्या मनात प्रकर्षाने ठसवतो.


हा चित्रपटाची कथा दोन वेगवेगळ्या काळात समोर जाते, पहिला आजचा, तर दुसरा १४०० वर्षा पूर्वीचा ! कथा सुरू होते इराण मधील एका गावात, ज्या गावावर सुन्नी दहशतवादी संघटना आयसिसने कब्जा केलेला आहे. या गावातील एक मुलगा ज्याच्या आई वडिलांची हत्या या संघटनेच्या अतिरेक्यांनी केल्यामुळे अनाथ झाला आहे. एक बाई त्याला आश्रय देते आणि त्याला या आतांकवादा विरोधात लढण्यासाठी हिम्मत यायला म्हणून इस्लामिक इतिहासातील कथा सांगते. ती कथा म्हणजे मोहम्मद पैगंबर यांच्या मुलीची फातिमाची ! वेळोवेळी हा चित्रपट आजच्या काळातील आतंकवाद आणि फातिमा यांच्यावर झालेल्या अत्याचाराची तुलना कोणतेही प्रकट भाष्य न करता, फक्त काळ बदलत आणि फातिमा यांची कथा सांगत करतो. 


आणि हा चित्रपट विवादित व्हायला हीच कथा फुलवण्याची पद्धत कारणीभूत ठरली आहे. मुख्यतः सुन्नी मुस्लिमांचे मत आहे की या चित्रपटात सुन्नींना सरळ सरळ खलनायक ठरवण्यात आले आहे. हा चित्रपट जातीय (पंथीय) द्वेष परवणारा आहे.  हा चित्रपट इस्लामचा इतिहास हा फक्त शियांच्या मान्यतेनुसार दाखवत आहे, या इतिहासाची दुसरी बाजू दाखवण्यात येत नाहीये. मुख्यतः या चित्रपटाचा उद्देशच मुळी इस्लाममध्ये फूट पडण्याचा आहे. या चित्रपटात ऐतिहासिक सत्याला डावलल्या गेले आहे किंवा त्याला तोडमरोड करत दाखवले आहे. (हे सगळे आरोप आपण पण ऐकले आहे ना, काही दिवस आधी) 


या चित्रपटा विरोधात ब्रिटन मधील अनेक शहरात आंदोलने केली जात आहे. हा चित्रपट प्रदर्शित करणारी इंग्लंड मधील मोठी थेटर चेन सिने वर्ल्ड या कंपनीवर या आंदोलनाने इतका दबाव आला की त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचे कारण समोर देत चित्रपटाचे पुढील प्रदर्शन स्थगित केले आहे. 



ब्रिटिश सरकारने अधिकृत रित्या या विवादावर अजून काहीही टिपणी केली नसली तरी त्यांनी आपल्या "इस्लामफोबिया एडव्हाझर" इमाम कारी असीम यांना आपल्या पदा वरून बडतर्फ केले. "इस्लामोफोबिया अडव्हाजर" असा माणूस आहे जो इस्लाम बद्दल भ्रामक माहिती, भीती प्रसारित करण्याऱ्या कोणत्याही प्रकारच्या साहित्याला सरकारच्या निदर्शनात आणून देतो, सोबत सरकारला पण त्याच्या आदेशात "इस्लामफोबिया" येणार नाही याची काळजी घेतो. इमाम कारी असीम यांची २०१९ मध्ये या पदावर नियुक्ती झाली होती. मात्र तेच या चित्रपटाला विरोध करत आहेत आणि या चित्रपटावर बंदी आणावी म्हणून होणाऱ्या आंदोलनांना सक्रिय मदत देत असल्याचे सरकारला निदर्शनात आले, म्हणून हि बडतर्फी ! 


असो, तर या चित्रपटाचा वाद लगेच ब्रिटिश सीमा ओलांडत मध्य पूर्व आशिया, आफ्रिका आणि भारतीय उपमहाद्वीप पर्यंत पोहचला आहे. सौदी अरब, संयुक्त अरब अमिरात, इजिप्त, तुर्की, मोरोक्को पासून पाकिस्थान पर्यंत सुन्नी बहुसंख्य असलेल्या देशांनी या चित्रपटावर बंदी घातली आहे. तर भारतासारख्या काही सरधर्मसमभाव असलेल्या देशात या चित्रपटावर बंदी घालायची मागणी होत आहे.

टिप्पण्या