व्हिस्की वॉर : एक सभ्य युद्ध



दोन देशांमध्ये सीमावाद किंवा क्षेत्रवाद असणे हे आपल्यासाठी काही नाविन्याची गोष्ट नाही. जगातील अनेक देशांचे सीमा आणि प्रदेशाबद्दल वेगवेगळ्या देशांसोबत वाद सुरू असतात. 


आपल्याच देशाचा पाकिस्थान सोबत काश्मीर वरून वाद सुरू आहे. चीन सोबत असलेल्या सीमावादातून डोकलाम येथे चिनी सैन्याला अडवतांना आपल्या सैनिकांना वीरमरण आले होते. आपल्या शेजरी असणारा साम्यवादी अजस्त्र चीनचे तर त्याच्या सीमेला लागून असलेल्या जमीन आणि समुद्रातील प्रत्येक देशा सोबत सीमावाद आहे. पाकिस्थान आणि अफगाणिस्थान यांच्यात पण त्याची सीमा असलेल्या "ड्युरांट लाईन" बाबत एकमत नाही. तालिबान शासन आल्यापासून हा वाद आता पाकिस्थानकरता डोकेदुखी वाढवत आहे. हा झाला भारतीय उपमहाद्वीप मधील सीमा आणि क्षेत्र संघर्ष ! 


मात्र जागतिक स्तरावर अनेक बडे देश अश्या वादात अडकलेले आहेत. जागतिक राजकारण किंवा देशातील अंतर्गत राजकारण बघत कधी हे वाद सुप्त अवस्थेत जातात आणि वेळप्रसंगी उकरून काढले जातात. मात्र कोणताही देश विवादित प्रदेशावरील आपला दावा सोडायचा विचारसुद्धा करत नाही. उलट काही वादात तर युद्धाचा मार्ग धरण्यात येतो.  भारतासारखा एखादा देशच वेळप्रसंगी क्षेत्रफळाचा तोटा सहन करत आपल्या शेजारील राष्ट्रसोबत सीमे बाबत तडजोड करत सीमा प्रश्न मिटवतो. भारत - बांगलादेश मधील सीमा प्रश्नांची गुंतागुंत भारताने अशीच मिटवली आणि आंतरराष्ट्रीयस्तरावर आपली प्रतिमा अधिक चांगली केली. 



असाच एक जुना वाद होता डेन्मार्क आणि कॅनडा देशामधला. हा वाद आहे डेन्मार्कच्या अधिपत्यात असणारा ग्रीनलँड आणि कॅनडा मधील इलेमोयर आयलंड यांच्या मध्ये असलेल्या केनेडी खाडी मधील असलेल्या एका दगडाच्या  (जिथे गवताचे एकही पाते उगवत नाही अश्या) बेट ज्याचे नाव हेन्स आयलंड आहे त्याच्यावरून ! बरे किती मोठे आहे हे बेट ? तर फक्त १.३ वर्ग किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या बेटासाठी हा वाद ! 


हा वाद सुरू झाला होता खरा १९७३ साली. जेव्हा कॅनडा आणि डेन्मार्क यांनी सीमा करार केला तेव्हा ! तत्कालीन काळात या हेन्स बेटाकडे कदाचित काहीसे दुर्लक्ष झाले. मात्र १९७८ साली डेन्मार्कच्या वतीने हेन्स बेटावर दावा ठोकल्या गेला आणि कॅनडाने याचा विरोध केला. यानंतर जवळपास ७ वर्षे दावे - प्रतिदावे यांच्यातच गेले आणि १९८४ साली कॅनडाच्या सैन्याने या बेटावर आपले अस्तित्व दाखवले. ते या बेटावर आले आणि तेथे कॅनडाचा राष्ट्रध्वज फडकवत आणि एक महागडी कॅनडामध्ये बनलेल्या व्हिस्कीची बाटली ठेवून निघून गेले. मग डेन्मार्कने याचा खणखणीत निषेध नोंदवला आणि कॅनडाच्या या कृती विरोधी कारवाई करत आपले सैनिक या हेन्स बेटावर पाठवले. या सैनिकांनी मग तेथील कॅनडाचा राष्ट्रध्वज उतरवला आणि डेन्मार्कचा राष्ट्रध्वज फडकवला सोबतच डेन्मार्कमध्ये बनलेली महाग आणि उंची व्हिस्कीची बाटली तेथे ठेवली, (पण कॅनडाने ठेवलेल्या व्हिस्कीच्या बाटलीचे नक्की काय केले हे माहीत नाही.) मग या विरोधात पुन्हा कॅनडाने तशीच कारवाई केली. प्रत्येक वेळेस दोन्ही देश दुसऱ्याचा राष्ट्रध्वज काढून स्वतःचा फडकवायचे आणि आपल्या देशात बनलेली उंची व्हिस्कीची बाटली तेथे ठेऊन यायचे. या वेगळ्या युद्धाला नावही मिळाले "व्हिस्की वॉर" म्हणून. 



पण हे सगळे होत असतांनाच दोन्ही देशांचे वैज्ञानिकांना आणि इतर देशांच्या पण वैज्ञानिकांना तेथे जाण्यासाठी कोणत्याही देशाने अडवणूक केली नाही. कॅनडाने या बेटावर काही हवामान संशोधनाला आवश्यक उपकरणाला लावले त्याला डेन्मार्कने विरोध केला नाही, ना डेन्मार्कने लावलेल्या उपकरणला कॅनडाने. एका बाजूने हे व्हिस्की वॉर सुरू असतांनाच दुसरीकडे हा वाद सोडवण्यासाठी कॅनडा आणि डेन्मार्कमध्ये बोलणी सुरूच होती. 


११ एप्रिल २०१२ साली या हेन्स बेटाचे दोन भाग करण्याचा प्रस्ताव प्रथम देण्यात आला. या नंतर अनेक बैठकी आणि करार होत शेवटी १० जून २०२२ मध्ये दोन्ही देशांनी आमच्यातील हेन्स बेटावरून असलेला वाद आता आम्ही मिटवत असल्याचे जाहीर केले. 



१४ जून २०२२ अखेर या हेन्स बेटाचे दोन भाग करत एका भागावर कॅनडा तर दुसऱ्या भागावर डेन्मार्क नियंत्रित ग्रीनलँड नियंत्रण ठेवेल. १४ जूनला दोन्ही देशांमध्ये असा करार करण्यात आला आणि व्हिस्कीच्या बाटली एकमेकांना भेट देत आता हे "व्हिस्की वॉर" संपल्याचे अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले. जागतिक इतिहासातील सगळ्यात "सभ्य" युद्ध अश्या तर्हेने आता इतिहास जमा झाले आहे.

टिप्पण्या