पाकिस्थान आणि इस्रायल या देशात कोणतेही राजनैतिक संबंध नाहीत. पाकिस्थान स्वतःला एक कट्टर इस्लामी देश म्हणवून घेतो आणि त्याच्या नुसार यहुदी इस्रायल हा पाकिस्थानचा क्रमांक एकचा शत्रू आहे. ही शत्रूता इतकी आहे की, पाकिस्थानच्या पारपत्रावर पण, " या पारपत्रा व्दारे इस्रायलचा दौरा केला जाऊ शकत नाही." असे स्पष्टपणे लिहले असते.
आज बाकीचे कट्टर अरब मुस्लिम देश इस्रायल सोबत आपले राजनैतिक संबंध सुरळीत करण्यावर भर देत असतांना, इस्रायल सोबत लढलेला इजिप्त असो किंवा सध्या इस्लामी देशांचा दादा सौदी अरेबिया असो, की संयुक्त अरब अमिरात जे अनेक वर्षे इस्रायल पासून अतिशय दूर होते ते आज इस्रायल सोबत जुळवून घेत असतांना पण पाकिस्थान मात्र अजून इस्रायलला आपला शत्रू मानतो.
मात्र याच पाकिस्थाच्या १५ लोकांचे एक प्रतिनिधी मंडळ इस्रायलच्या दौऱ्यावर गेले आहे. सध्या हे प्रतिनिधी मंडळ इस्रायलमध्ये त्याच्या संसदे सकट अनेक महत्त्वाच्या सरकारी संस्थांना भेट देत आहेत. इतकेच नाही तर इस्रायलच्या राष्ट्रपती समवेत त्यांची चर्चा झाल्याचे पण वृत्त येत आहेत. मात्र या पार्श्वभूमीवर पाकिस्थान मध्ये आता राजकीय वाद रंगला आहे. पाकिसथनाचे नवीन पंतप्रधान आणि त्यांचे मंत्रिमंडळ या इस्रायलला गेलेल्या प्रतिनिधी मंडळाशी आपला काहीही संबंध नाही असे सांगत आहेत. तर पाकिस्थानचे माजी पंतप्रधान इम्रान खान नियाजी यांच्या तेहरिक ए इंसाफ पक्षाच्या नेत्या आणि माजी मानवाधिकार मंत्री शिरीन मजारी या इस्रायलला गेलेल्या प्रतिनिधी मंडळा वरून पाकिस्थान सरकार आणि पाकीस्थानी सेनेवर शरसंधान करत आहेत. त्यातही त्यांच्या मुख्य रोख पकीस्थानी मूळ असलेल्या दोन लोकांवर आहे. त्यातील पहिले आहेत पत्रकार अहमद कुरेशी हे पाकिस्थानचे नागरिक आहेत, तर दुसऱ्या आहेत सामाजिक कार्यकर्त्या अनिला अली! अनिला अली पाकिस्थानी मूळ असलेल्या अमेरिकन नागरिक आहेत, यांचा संबंध अमेरिकेतील डेमॉक्रॅटिक पक्षाशी आहे. मात्र शिरीन मजारी यांनी काही जुने छायाचित्र समोर आणत त्यांचा संबंध वर्तमान सरकार असलेल्या मुस्लिम लीग (एन) सोबत असल्याचा दावा केला आहे. या दोन अमेरिकन नागरिक असलेल्या पाकिस्थानिंना समोर करत इम्रान खान नियाजी यांचे सरकार पाडण्यात अमेरिका आणि इस्रायल यांची हातमिळवणी होती आणि वर्तमान सरकार पण तोच कित्ता गिरवत असल्याचा आरोप करत आहे. या संबंधी त्यांनी ट्विट केले आहेत.
यात महत्वाचा मुद्दा हा आहे की पाकिस्थानच्या पारपत्रावर इस्रायल संबधी स्पष्ट निर्देश असतांना या प्रतिनिधी मंडळातील अनेकांना इस्रायल दौरा करायला कसा मिळाला? पाकिस्थान सरकारच्या संमती शिवाय असे शक्य नाही. मात्र पत्रकार असलेल्या अहमद कुरेशी यांनी हा दावा फेटाळला आहे. त्यांचे म्हणणे असे की मी सामान्य पाकिस्थानी नागरिक म्हणून हा दौरा करत आहे. पाकिस्थानच्या पारपत्रावर इस्रायल मध्ये प्रवेश मिळतो फक्त इस्रायल मध्ये येताना आणि जातांना त्यावर इस्रायल सरकार कोणताही स्टॅम्प मारत नाही. सोबतच आजही अनेक पाकीस्थानी सामान्य नागरिक इस्रायलमध्ये नोकरी करत आहेत अशी पुस्तीही जोडली आहे.
या दौऱ्यात पाकिस्थानी नागरिक असलेला एक यहुदी धर्मीय नागरिक या प्रतिनिधी मंडळाला आणि पाकीस्थानी सरकार, सेनेला मदत करत असल्याचा आरोप पण शिरीन मजारी यांनी केला आहे. मात्र पत्रकार अहमद कुरेशी आणि पाकिस्थानचे सरकार यांनी हा आरोप खारीज केला आहे.
पत्रकार अहमद कुरेशी यांच्या नुसार हा इस्रायल दौरा पाकिस्थान सरकारच्या नियंत्रणा बाहेर असून या दौऱ्याचा उद्देश फक्त आणि फक्त दोन देशातील, संस्कृतीमधील शांतीचा मार्ग शोधण्याचा प्रयास आहे. असा त्यांचा दावा आहे. या दौऱ्या करता खर्च पाकिस्थानी अमेरिकन कम्युनिटी आणि दुबई मधील शराका नावाची एक संस्था करत आहे. ही शराका संस्था फक्त शांतीपूर्ण उद्देशांसाठी आपला निधी देते असा दावा पण अहमद कुरेशी यांनी केला आहे.
तर अनिला शिरीन यांनी या आरोपांना उत्तर देतांना आपण फिलिस्थिनी नागरिकांच्या उत्तम जीवनाची कामना आणि त्या साठी प्रयत्न करण्यासाठी आलो आहोत, फिलिस्थिनी बालक आणि तरुणांना युद्धा पेक्षा योग्य शिक्षणाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित करत आपल्या संघटनेचे घोषवाक्याच मुळी "बुक्स नॉट बॉम्बस" आहे असे म्हणत, उलट आपण जगातील सगळ्या धर्मांना हजरत इब्राहमच्या झेंड्याखाली एकत्र करत असल्याची पुष्टीही जोडली आहे. सोबतच पाकिस्थानच्या इम्रान खान नियाजी मंत्रिमंडळातील परराष्ट्रमंत्री खुर्शीद मोहम्मद कसुरी यांनी तुर्कस्थानच्या एका दौऱ्यात तुर्की परराष्ट्र मंत्र्यासोबत इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्याची पण भेट घेत चर्चा केल्याची आठवण करून दिली.
खरे तर अरब इस्लामी देशातील महत्वाचे देश आणि भारत जेव्हा पासून खुलेपणाने इस्रायल सोबत आपले राजनैतिक संबंध वाढवत आहेत, तेव्हा पासून पाकिस्थान मधील एक वर्ग पण इस्रायल सोबत राजनैतिक संबंध वाढवण्यावर भर देत आहे. हा प्रतिनिधी मंडळाचा दौरा पण त्याचाच भाग असू शकतो. इस्रायलच्या मते पाकिस्थानने इस्रायलला मान्यता दिल्यावर आज जे इस्लामिक देश इस्रायल सोबत संबंध वाढवण्याला कचरत आहेत ते पण निर्धोकपणे इस्रायल सोबत संबंध वाढवतील. इस्रायल या पाकिस्थानच्या प्रतिनिधीमंडळाच्या दौऱ्याचा संपूर्ण राजकीय फायदा घ्यायचा प्रयत्न करत आहे. त्यातूनच या प्रतिनिधी मंडळाला आजपर्यंत वर्जित अश्या गोलन टेकड्यांवर पण अधिकृतरित्या पाठवत आहे.
बाकी या सगळ्या कवायती मधून इस्रायल - पाकिस्थान संबंध किती वाढतील हे माहीत नाही. मात्र पाकिस्थान मध्ये धार्मिक आणि राजकीय वादळ नक्की येईल. या सरकारवर आधीच डूख धरून बसलेल्या इम्रान खान नियाजीच्या हातात आपसूक एक मुद्दा आला आहे असे दिसत आहे आणि विद्यमान सत्ताधारी सध्यातरी बॅकफूटवर गेले आहे. पाकिस्थान सेना मात्र हे राजकारणाची आरामात मजा घेत आहे असे सध्यातरी चित्र दिसत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा