चिंतन शिबिरा नंतर गुजराती चिंता


काँग्रेस पक्षाने नुकतेच राजस्थान मधील उदयपूर येथे चिंतन शिबीर घेतले. २०१४ पासून सतत पराजयाच्या छायेत असलेल्या कॉंग्रेस मधील मरगळ या चिंतन शिबिराने दूर होईल आणि काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी आवश्यक बदल केले जातील अशी आशा होती. 


कॉंग्रेस अंतर्गत असलेली "नोकरशाही" ला लगाम लावण्यात येत, पक्षात सरंजामशाही जोपासणाऱ्या नेत्यांवर लगाम कसण्यात येईल अशी अपेक्षा होती. मात्र अजूनही काँग्रेस या सगळ्या चक्रव्यूहतून बाहेर पडतांना दिसत नाहीये. 


काँग्रेस मधील निष्ठवंतांनी या वेळेस पुन्हा आपला विश्वास सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावरच आहे, म्हणजेच काँग्रेस बदलाची प्रक्रिया अजून खूप दूर आहे. अश्या वातावरणात मग एका कुटुंबात एकच तिकीट किंवा पद हा ठरवलेला नियम काँग्रेसी कसे पाळणार? सगळ्यात पहिले गांधी घराण्याची २ जागा कमी कराव्या लागतील, त्याचे काय? आणि गांधी घराणे अपवाद केले की, मग काँग्रेसचा प्रत्येक प्रांतात असलेला नेता स्वतःला अपवाद करून घेईल. 



मात्र या चिंतन शिबिरानंतर लवकरच होऊ घातलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी चैतन्य निर्माण होईल अशी आशा होती. मात्र "सर मुंडवाते ही ओले पडे" चा अनुभव काँग्रेसला येत आहे. 


गुजरात मधील पटेल आंदोलनाचा चेहरा आणि मोठा गाजावाजा करत काँग्रेस प्रवेश करणाऱ्या हार्दिक पटेल यांनी काँग्रेसला आज राम राम केला. तसेही हार्दिक पटेल हे काँग्रेस बद्दल नाराज असल्याची चर्चा होतीच, गेल्या काही महिन्यात हार्दिक पटेल यांनी काँग्रेस पक्षांतर्गत संस्कृती आणि काँग्रेसच्या शिर्ष नेतृत्वाच्या विरोधात उघड भूमिका घेतली होती, टीका केली होती. तेव्हा हार्दिक पटेल लवकरच काँग्रेस सोडतील अशी अपेक्षा होतीच, मात्र केव्हा ? या प्रश्नाचे उत्तर आज मिळाले.  चिंतन शिबिरानंतर महत्वाच्या राज्यातील, महत्वाची व्यक्ती पक्ष सोडत असेल तर हा काँग्रेस करता महत्वाचा विषय असायला हवा. 


मात्र तसा तो नाहीये ! तसेही काँग्रेस सोडून भाजपासह इतर पक्षात गेलेले तरुण नेते आज वेगवेगळ्या पक्षात मंत्री आणि मुख्यमंत्री बनले आहेत. ममता बॅनर्जी - पश्चिम बंगाल, हेमंत विश्व शर्मा - आसाम, वाय एस जगमोहन रेड्डी - आंध्र प्रदेश, तर केंद्रीय मंत्री श्री ज्योतिरादित्य शिंदे ही काही महत्वाची उदाहरणे आहेत. यातील काहींनी तर स्पष्टपणे राहुल गांधी यांच्या नेतृत्वावरच शंका उपस्थित करत काँग्रेस सोडली होती. 


आता या यादीत अजून एक नाव हार्दिक पटेल पण लिहले जाईल. आपल्या राजीनामा पत्रात हार्दिक पटेल यांनीही काँग्रेसच्या शिर्ष नेतृत्वाबद्दल, अप्रत्यक्षपणे राहुल गांधी विरोधात आपले मत मांडले आहे. याच बरोबर CAA-NRC, राम जन्मभूमी मंदिर, कलम ३७० बद्दल काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. सोबतच काँग्रेस मधील प्रांतीय नेत्यांपासून थेट शिर्ष नेत्यांपर्यंत सगळ्यांचीच जनतेशी असलेली नाळ तुटली असून, जनतेच्या राजकीय, सामाजिक, भावनिक आणि धार्मिक आशा आकांक्षा काँग्रेस नेत्यांना अजिबात कळत नाही आणि त्यात त्यांना काही स्वारस्य पण नाही असा थेट आरोपच केला आहे. 



काँग्रेसच्या चिंतन शिबिरातील भाषणात राहुल गांधी यांनी पण काँग्रेसची नाळ जनतेपासून तुटली असल्याची वाच्यता केली होती. मात्र ती जुळवायची कशी हाच मोठा प्रश्न अगदी राहुल गांधी यांच्या पासून गल्लीतील काँग्रेस नेत्या पर्यंत सतावत आहे. 


आता हार्दिक पटेल यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस गुजरात निवडणुकीत त्रास सहन करते की या धक्क्याला पचवून नव्याने उभी राहते हे पाहणे मनोरंजक ठरेल. बाकी हार्दिक पटेल समोर नक्की करणार काय? यावर बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळतील. हार्दिक पटेल गुजरातमध्ये स्वतःची ताकद काँग्रेस आणि भाजपा विरोधात आजमावत की आपली ताकद भाजपाला देत काँग्रेसला शह देतात हे बघणे मनोरंजक राहील. बाकी हार्दिक पटेल यांचा उंट कोणत्याही कडावर बसला तरी गुजरातमध्ये भाजपला सध्या एक मार्क आपसूकच मिळाला आहे.

टिप्पण्या