आता रात्री आठ वाजता चंदिगढ जवळील मोहाली येथे असलेल्या पंजाब पोलीस मुख्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर, जेथे पंजाब पोलीस गुप्तवार्ता विभागाचे मुख्य कार्यालय आहे तिथे मोठा स्फोट झाला. पंजाब पोलिसांच्या सुचने नुसार या स्फोट मोठा असला तरी यात कोणतीही प्राणहानी झालेली नाही. मात्र मुख्यालायची इमारत आणि आजूबाजूच्या इमारतींना या स्फोटामुळे बरेच नुकसान झाले आहे.
आता आलेल्या बातम्यांनुसार हा स्फोट RPG म्हणजे रॉकेट प्रोपोलर ग्रेनेड ने केलेला आहे. काय आहे हे RPG तर हे खांद्यावरून मारा करता येईल असा मिसाईल लॉन्चर. विशेषतः आपण अफगाण युद्धात याचा वापर बघितला आहे. युद्धात या RPG चा उपयोग चिलखती गाड्या आणि रणगाडे उडवायला केला जातो.
ही खूप गंभीर घटना आहे. चार दिवसांपूर्वीच पंजाब मधील कर्नाल येथे चार खलिस्थानवादी दहशतवाद्यांना अटक केल्या गेली होती. त्यांच्या कडून बरीच शस्त्र आणि गोळाबारुद सोबतच तीन IED बॉम्ब पण मिळाले होते. या चारी दहशतवाद्यांचा संबंध बब्बर खालसा इंटरनॅशनल या दहशतवादी संघटनेशी होता असे कळते. या अतिरेक्यांनी आपल्या ड्रोनच्या साह्याने पाकिस्थानातून हत्यारे येत असल्याचा गौप्यस्फोट पण केला होता.
गेल्या काही दिवसात, साधारण शेतकरी आंदोलनापासूनच पंजाब मधील फुटीरतावादी आपले हातपाय पसरवत आहेत. त्यातच आपचे भगवंत मान सरकार पंजाबमध्ये सत्तेत आल्यापासून पंजाब मधील फुटीरतावादी उघडपणे समोर यायला लागले आहेत. काही दिवसांपूर्वी पटियाला शहरात पण स्थानिक शिवसेना (बाळ ठाकरे) नावाच्या संघटनेने खलिस्थान विरोधी मोर्चा काढला असता, काही शीख संघटना उघडपणे विरोधात बाहेर आल्या. त्यानंतर दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण होत, शहरातील वातावरण तणावपूर्ण झाले होते.
पटियाला शहरातील दंगल असो किंवा पंतप्रधानांचा अडवला गेलेला ताफा असो, या सगळ्या प्रकरणात पंजाब गुप्तवार्ता विभागावर आणि पोलिसदलावर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. आता तर थेट पंजाब पोलीस मुख्यालयावर हल्ला करत दहशतवाद्यांनी आपली तयारी दाखवून दिली आहे.
खलिस्थान आतांकवाद्यांची ही लाट फक्त पंजाब पुरती सीमित राहिली नाहीये. "शीख फॉर जस्टीस" (SFJ) नावाच्या २००७ साली स्थापन झालेल्या या संघटनेने आता पंजाब मध्ये बरेच हातपाय पसरले आहेत. या संघटनेचे मुख्यालय न्यूयॉर्क, अमेरिका येथे असल्याचे सांगितले जाते. तर याचे एक कार्यालय पाकिस्थान मधील लाहोर येथे आहे. मुख्यतः या संघटनेच्या वतीने १९८४ साली झालेल्या शीख विरोधी दंग्या बाबत काँग्रेस विरोधी घेतलेली भूमिका, काही वर्षातच स्वतंत्र खलिस्थानवादी भूमिकेत बदलली. स्वतंत्र खलिस्थान बनावा म्हणून पंजाब मध्ये "मतदान २०२०" (जनमत संग्रह २०२०) नावाचे अभियान पण या संघटनेने चालवले. पाकिस्थान मधील शीख कम्युनिटी आणि भारतातील पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशचा काही भाग मिळून खलिस्थान बनवायचा असा या करता शीख जनतेची मते मिळवण्याचा यांचा प्रयत्न आहे. या करता नुकतेच सुरू झालेल्या भारत - पाकिस्थान मधील "कर्तारपूर कॅरिडॉर" चा पुरेपूर वापर ही संघटना करत असल्याचा संशय आहे. या संघटनेचा मुख्य गुरपतवंत सिंह पन्नू आहे. हा अमेरिकेत राहतो आणि तेथून इंटरनेट आणि व्हिडिओच्या माध्यमातून वेगवेगळे आंदोलने करायला प्रोत्साहन देत असतो.
शेतकरी आंदोलनाच्या वेळेस २६ जानेवारीला दिल्लीत झालेल्या दंगलीत याच्या जहाल भाषणाचा हात असल्याचा आरोप होता. तेव्हा गुरपतवंत सिंह पन्नू याने लाल किल्ल्यावर खलिस्थानी झेंडा फडकवायचे आवाहन करत, जो झेंडा फडकवेल त्याला भरगोस रकमेचे बक्षीस दिल्या जाईल असे घोषित केले होते. पंजाब मधील सगळ्या जिल्हा मुख्यालयावर खलिस्थान झेंडा फडकवण्याचे आवाहन त्याने काही दिवसांपूर्वी केले होते. याच विरोधात पटियाला शहरात शिवसेना (बाळ ठाकरे) संघटनेने मोर्चा काढला होता, ज्या मुळे तणाव निर्माण झाला.
९ मे २०२२ ला मात्र हिमाचल प्रदेशची राजधानी सिमला येथे, हिमाचल प्रदेश विधानभवनाच्या मुख्य दरवाजावर खलिस्थानी झेंडे आणि विधानसभेच्या बाह्य भिंतीवर "खलिस्थान जिंदाबाद" च्या घोषणा मात्र लावल्या गेल्या. हिमाचल सरकारने त्वरित कारवाई करत राज्यात "रेड अलर्ट" घोषित करत, राज्या बाहेर जाणाऱ्या आणि राज्यात येणाऱ्या सगळ्यांची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे.
निवडणुकांच्या काळात याच "शीख फॉर जस्टीस" संघटनेने आम आदमी पक्षाला आपले समर्थन आल्याचे पत्र जाहीर केले असल्याचा दावा केला जात होता. अरविंद केजरीवाल पंजाब निवडणूक जिंकण्यासाठी खलिस्थान समर्थकांना पाठींबा देत असल्याचा आरोप त्याच्या सोबत काही काळ राजकारणात घालवलेले प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांनी केले होते. हे आरोप आप वर पहिल्यांदाच झालेत असे नाही तर या आधी पण झाले आहेत.
पंजाब मधील परिस्थिती बिकट होत असतांना मात्र पंजाब पोलीस "पोलीस प्रोसिजर" न पाळता दिल्ली मध्ये राजकीय अटक करत फिरत आहेत. तर भगवंत मान आणि अरविंद केजरीवाल आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी गुजरात आणि महाराष्ट्रात दौरे करत आणि भाषणे देत फिरत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा