राज ठाकरे : हिंदुत्वाचा रंग खोटा



राज्यातील बेकायदेशीर भोंगे उतरवणे आणि कायदेशीर भोंग्यांवरून आवाजाची मर्यादा पाळण्याची सक्ती करणे, या दोन गोष्टी केल्या तरी राज्यात सुरू असलेल्या या भोंग्यांच्या राजकारणाला बराच चाप बसू शकतो. मात्र राज्य सरकार जाणूनबुजून या राजकारणाला हवा देत आहे. या सगळ्यामागे राज ठाकरे आणि राज्य सरकार, विशेषतः गृहखाते हाती असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनात नक्की काय सुरु आहे ते बघणे आवश्यक आहे. बाकी या वादात आणि आजच्या राज ठाकरे यांच्या सभेनंतर येणाऱ्या शिवसेनेच्या प्रतिक्रिया "कोन तू और मै, खांम खां" सारख्या आहे. 


आज आधी राज ठाकरे यांना सभेसाठी दिलेली परवानगी नाकारली. मग अचानक परवानगी दिल्या गेली, त्या करता जवळपास १६ अटी टाकत परवानगी दिली. राज ठाकरे यांनीही जास्त गमजा न करता अटी स्वीकारत सभेची तयारी केली आणि सभेकरता मुंबई ते औरंगाबाद प्रवासाचा दोन दिवसीय "इव्हेंट" तयार केला. 


यातून काय दिसते? तर सरळ सरळ शिवसेना जरी आपणच खरे हिंदुत्वाचे वारसदार असल्याचे त्याच्या नेहमीच्या "जहाल" वक्तव्यातून दावा करत असले, तरी आता शिवसेना "हिंदुत्ववादी" त्यातही ती पूर्वीची "जहाल हिंदुत्ववादी" राहिली आहे असे राज्यातील जनतेला वाटत नाही. परिणामी राज्याच्या जहाल हिंदुत्वाच्या राजकारणाची पोकळी तयार झाली आहे ती भरण्याची तयारी राज ठाकरे कसोशीने करत आहेत. याचा फायदा नक्कीच राज ठाकरे यांना मिळणार. मात्र राज ठाकरे यांच्या राजकारणात सातत्याचा अभाव आहे. आता सुरू केलेले भोंग्याचे आंदोलन किती काळ टिकून राहते यावर सगळी भिस्त आहे. या पूर्वी मनसे ने गाजावाजा करत सुरू केलेले टोल विरोधातील आंदोलन "साडे तीन तास" पण चालले नव्हते. यावेळी तर परिस्थिती अजून वेगळी आहे. मनसेला मिटवायला आसुसलेल्या शिवसेनेच्या हातात मुख्यमंत्रीपद आहे, तर शिवसेना - मनसे यांचे भांडण लावत स्वतःचा फायदा बघणाऱ्या राष्ट्रवादीच्या हातात गृहमंत्रीपद ! 



बाकी अजूनही राज ठाकरे स्वतःच्या ताकदीवर इतक्या मोठ्या प्रमाणात राजकीय आंदोलन सुरू करत असतील यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. मराठीचे राजकारण करतांना कुथायला होणाऱ्या राज ठाकरे यांच्या एकाएकी शरद पवार यांच्या सोबत गाठीभेटी वाढतात, त्यातून मग "लाव रे तो व्हिडीओ" म्हणत राज ठाकरे भाजपा विरोधात "एल्गार" करतात. काल सभा झाली त्याच औरंगाबाद वरून विमानाने राज ठाकरे मुंबईत परततांना योगायोगाने शरद पवार त्याच विमानात असतात. मग प्रदीर्घ राजकीय चर्चा होते, वगैरे वगैरे ! आणि निवडणुका झाल्यावर या राज ठाकरे पुन्हा शांत होतात. 


मग अचानक दोन वर्षांपूर्वी राज ठाकरे जागे होतात, आपल्या झेंड्याचा रंग बदलतात आणि हिंदुत्वाचे राजकारण करणार म्हणून जाहीर करतात.....आणि जागा झालेला पुन्हा झोपी जातो, तो एकदम आता उठतो. 


अनेकांना असे वाटते आहे की राज ठाकरे शरद पवार यांच्यावर जातीयतेच्या राजकारणाचे आरोप करत आसूड ओढत आहेत आणि त्याचा फायदा हिंदुत्ववादी राजकारणाला, म्हणजे भाजपाला पण मिळेल. मात्र माझ्या मते हे मृगजळ आहे. राज्य भाजपाच्या मनात तयार झालेला "युती कॉम्प्लेक्स" त्याला जवाबदार आहे. तत्कालीन काळात शिवसेना भाजपा विरोधात असतांनापण तिच्या सोबत युती करणे याच "युती कॉम्प्लेक्स" चा भाग होता. "शतप्रतिषद भाजपा" असा निर्धार कधी काळी आपण केला होता हेच कदाचित आताचे राज्य भाजपा नेते विसरले आहेत असे वाटण्यासारखे वर्तन आणि वक्तव्य राज्य भाजपा नेत्यांचे आहे. त्यात जसे राज्य भाजपच्या अंतर्गत राजकारणाचे पडसाद आहेत, तसेच उत्तर प्रदेशच्या योगी आणि आसामच्या हेमंतविश्व शर्मा सारखे हिंदुत्वाचे वलय अंगावर घ्यायला कोणी तयार नाही, कारण शरद पवार यांचे राजकारण ! सध्या राजकारणात असलेल्या नेत्यांमध्ये शरद पवार यांच्याबद्दल असलेले सुप्त आकर्षण आणि शरद पवार कसेही राजकारण फिरवू शकतात अशी असलेली अंधश्रद्धा ! याचाच वापर करत शरद पवार चाणाक्षपणे करत आहेत. 



एकूणच राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर कितीही जातीयतेचे आरोप केले तरी शरद पवार यांना त्याचा काहीही तोटा होणार नाही. गेल्या काळातील त्यांचे राजकारण आणि त्यांच्यावर झालेले जातीयता आणि भ्रष्टाचाराचे आरोपाचे त्यांचे कोणतेही नुकसान झालेले दिसत नाही. कदाचित त्या राजकारणाचा फायदा म्हणावा तसा झाला नसेल, मात्र त्यातून शरद पवारांनी आपली मताची बेगमी नक्कीच करून ठेवली आहे. सोबतच मुद्दाम जातीयता करणारे मिटकरी सारखे बेणे पण सोबत बाळगले आहे. शरद पवार यांच्या राजकारणातील जी ताकद आहे ती फूट पाडण्यात. मग त्या करता भाजपाला बाहेरून पाठींबा देण्याचा स्टंट असो, की शिवसेनेला सोबत घेण्याचा ! 


बाकी राज ठाकरे यांच्या जहाल हिंदुत्वामुळे का असेना, काल राज ठाकरे यांच्या सभेच्या वेळेस सुरू असलेल्या मुंबईतील भाजपाच्या सभेत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना पहिल्यांदा बाबरी पडली तेव्हा मी तेथे हजर होतो, बाबरी आम्ही पाडली हे वक्तव्य करावे लागले. जरी शिवसेनेला उत्तर द्यायला हे वक्तव्य केले असले तरी, त्या मागे राज ठाकरे यांचा हिंदुत्वाचा झंझावात अडवायचा विचार असेलच. 


बाकी राज ठाकरे यांना राष्ट्रवादी मोठे करत आहे याचे पुरावे, सभा होण्या करता केलेली नाटके आणि शरद पवार यांच्या कह्यात असलेल्या वृत्तवाहिन्यांनी राज्याच्या सरकारचे अधिकृत मुख्य विरोधकाचे भाषण न दाखवता, राज ठाकरे यांना दिलेले फुटेज यात येतात. 



तेव्हा भाजपाने राज्यात आपली ताकद वाढवावी, हिंदुत्वाच्या राजकारणात आम्हीच पहिले आणि शेवटचे हे दाखवण्याची हीच वेळ आहे हे लक्षात ठेवावे. जी काही युती किंवा आघाडी करायची असेल ती निवडणुकी नंतर, तेही जर आवश्यकता वाटली तर...आणि महत्वाचे तशी आवश्यकताच पडणार नाही असे काम करावे. 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा