फ्रांस निवडणूक : "उदारमतवादी" लक्षात घेतील काय?



फ्रांस मधील बहुचर्चित राष्ट्रध्यक्ष निवडणूक झाली आणि त्यात फ्रांसचे विद्यमान राष्ट्रपती इम्युनल मॅक्रोन जिंकले. जवळपास ५८.२% मत घेत मॅक्रोन यांनी ही निवडणूक जिंकली. ही निवडणूक जिंकतांना त्यांनी विरोधात असलेल्या उजव्या विचारधारेच्या मरीन ली पे यांचा पराभव केला. मरीन ली पे यांना फक्त ४१.८% मते मिळाली. इम्युनल मॅक्रोन यांच्या पुन्हा राष्ट्रपती निवडणूक जिंकल्यामुळे जगभरातील कथित उदारमतवादी आणि समाजवादी सर्वधर्मसमभावादी लोकांना आनंद झाला आहे. 


असाच आनंद इम्युनल मॅक्रोन जेव्हा पहिल्यांदा फ्रान्सचे राष्ट्रध्यक्ष निवडणूक जिंकले होते तेव्हा पण झाला होता. तत्कालीन काळात जगभरात उजव्या विचारधारेचे खंदे समर्थक वेगवेगळ्या देशात जिंकत होते. डाव्या विचारधारेतील नेत्यांसाठी हा निश्चितच संकटाचा काळ वाटत होता. त्यातच फ्रांस आणि जर्मनीमध्ये आलेल्या सीरियन शरणार्थींमुळे तेथील समाजजीवन ढवळून निघाले होते. मुस्लिम कट्टरतेचा विरोध करतांना विरोधात उजव्या कट्टरतेचा बोलबाला सुरू झाला होता. तेव्हा फ्रांसमध्ये पण सत्तेत उजव्या विचारधारेचा समूह सत्तेत येऊन फ्रान्सच्या वैचारिक जडणघडणेत तफावत आणेल ही भीती व्यक्त होत असतांना इम्युनल मॅक्रोन यांचे राष्ट्रध्यक्ष बनणे ही सुखावह बाब होती. 



मात्र इम्युनल मॅक्रोन यांचा पुन्हा झालेला विजय फक्त त्यांच्या "उदारमतवादी" विचारांमुळे झाला आहे असे वाटत असेल तर तुम्हाला पुन्हा विचार करण्याची गरज आहे. गेल्या दहा वर्षात फ्रांसमध्ये मोठ्या प्रमाणावर वैचारिक घुसळण सुरू आहे. आपल्या देशाला आणि लोकशाहीला उच्च स्थानी नेणाऱ्या "लसीते तत्व" म्हणजेच सेक्युलर आणि निधर्मी राज्य शासनाच्या तत्वालाच बाहेरून आलेल्या मुस्लिम शरणार्थींमूळे आणि आपल्या "उदारमतवादाच्या" भलत्या कल्पनेपाई धक्का लागत आहे का अशी भावना वर यायला लागली. 


याला कारण ठरले एक व्यंगचित्र ! फ्रांस मधील शर्लि हेब्दो नावाच्या साप्ताहिकात आलेले पैगंबर मोहम्मद यांच्या व्यंगचित्र आणि त्यामुळे संपूर्ण मुस्लिम जगतात उठलेले वादळ. याची परिणीती शर्लि हेब्दोच्या कार्यालयावर इस्लामिक आतंकवादी हल्ल्यात झाली. फ्रांस मधील निधर्मी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हा हल्ला मानल्या गेला. फ्रांस मधील इस्लाम विरोधकांना या हल्ल्यामुळे नैतिक बळ मिळाले. मात्र उदारमतवाल्यांना या सगळ्या परिस्थितीला कसे सांभाळायचे असा प्रश्न निर्माण झाला. यावर उपाय म्हणजे मुस्लिमांना अधिक धार्मिक स्वातंत्र्य देत त्यांना शांत ठेवणे हाच उपाय उदारमतवाल्यांकडे होता आणि त्याचा अवलंब पण झाला. 



मात्र त्यामुळे फ्रान्सच्या हातात नक्की काय आले? तर धार्मिक दहशद, इस्लामी कायद्याची अमलबजावणी करण्याची मागणी आणि आतंकवादी हल्ले ! १६ ऑक्टोम्बर २०२० या दिवशी फ्रांसची राजधानी पॅरिस येथे ४७ वर्षीय शिक्षक सॅम्युअल पॅटी यांची गळा चिरून हत्या करण्यात आली. ही हत्या मूळ चेचेन येथील फ्रांस मध्ये शरण घेतलेल्या १८ वर्षीय मुस्लिम युवकाने केली. कारण होते, इतिहासाचे शिक्षक असलेल्या सॅम्युअल पॅटीने फ्रांस मधील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे धडे देतांना शर्ली हेब्दोच्या त्या तथाकथित विवादित व्यंगचित्राला वर्गातील मुलांना दाखवले. हा प्रकार मुस्लिम कट्टरपंथी मुलांना आवडला नाही आणि त्यातून ही घटना घडली. या घटनेमुळे फ्रांस हादरून गेले. आपल्या "धर्मनिरपेक्ष" आणि "अभिव्यक्ती स्वातंत्र्य" या मूल्यावरच धार्मिक मुळतत्ववाद्यांनी घाव घातल्याची भावना फ्रान्सच्या जनतेमध्ये पसरली. 


याच वेळेस इम्युनल मॅक्रोन यांनी फ्रान्सचे राष्ट्रध्यक्ष म्हणून घेतलेली भूमिका त्यांच्या आताच्या विजयाची पायरी होती. शिक्षकाच्या हत्येनंतर या घटनेची गंभीर दखल घेतली आणि या घटनेला देशावरील आतंकवादी हल्ला म्हणून संबोधित केले. सोबतच त्यांनी कडक शब्दात "इस्लाम धोक्यात आहे" सारखे वक्तव्य करत फ्रांस आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूल्याला प्राणपणाने जपेल असे सांगितले. फ्रांसच्या राष्ट्रपतींच्या या वक्तव्याने इस्लाम जगत चांगलेच खवळले. तमाम इस्लामी देशांनी फ्रांसच्या राष्ट्रपतींच्या वक्तव्याचा निषेध केला, फ्रांस वर व्यापरिक निर्बंध लावण्यापासून ते राजनैतिक संबंध तोडण्यापर्यंत धमक्या दिल्या. पाकिस्थान सारख्या देशात तर सरकारने फ्रांस सोबत संबंध तोडावे म्हणून देशभरात दंगली केल्याचे आपण बघितले. मात्र ही प्रतिक्रिया फक्त इस्लामी देशांकडून आली असे नाही तर काही कथित उदारमतवादी गैरइस्लामी देशांकडून, डाव्या विचारांच्या नेत्यांकडून पण इम्युनल मॅक्रोन यांचा निषेध व्यक्त केल्या गेला. भारत सरकारने जरी या बाबत तो फ्रांसचा अंतर्गत प्रश्न असल्याचे वक्तव्य दिले असले तरी, भारतीय मुस्लिमांनी मोठ्या प्रमाणावर मॅक्रोन यांच्या विरोधात निदर्शने केली, भारतातील डाव्या विचारधारेच्या कथित बुद्धीमंतांनी मॅक्रोन यांचा स्पष्ट शब्दात निषेध नोंदवला. 



मात्र या सगळ्याला इम्युनल मॅक्रोन बधले नाहीत. त्यांनी फ्रांसमध्ये इस्लामला फ्रान्सच्या वैचारिक बांधिलकीशी इमान ठेवणारे बनवायचा विडा उचलला. ज्या पद्धतीने फ्रांसमध्ये "लसीते तत्वाची" अमलबजावणी करण्यासाठी  "ऑब्झरिटायर दे लासीते" म्हणजेच "धर्मनिरपेक्षतेची संस्था" स्थापन केल्या गेली आहे, त्याच पद्धतीने इस्लामला "सेक्युलर" करण्यासाठी संस्था तयार करण्यात आली. फ्रांसमधील इस्लामी धार्मिक शिक्षण आणि धार्मिक स्थळावर होणाऱ्या शिकवणीवर ही संस्था लक्ष ठेवल. फ्रान्सच्या वैचारिक स्वातंत्र्यावर, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर किंवा व्यक्ती स्वातंत्र्यावर कोणत्याही पद्धतीने घाला घालण्याची शिकवण येथे देता येणार नाही. 



एव्हड्यावर न थांबता इम्युनल मॅक्रोन यांनी फ्रांसमध्ये झालेल्या इस्लामी आतंकवादी हल्ल्याचे समर्थन करणाऱ्या किंवा त्याला धार्मिक आयाम देणाऱ्या मुल्ला-मौलविंविरोधात पण मोठी आघाडी उघडली. इस्लामी कट्टरपंथीयांना शरण देणाऱ्या मशिदी आणि धार्मिक शिकवणुकी केंद्रांना बंद केले. फ्रांस मध्ये कट्टर इस्लामी आतंकवाद विरोधी कायदा पारित केला. या कायद्याने मस्जित आणि मदरस्यावर लक्ष ठेवण्याच्या सरकारी तत्वाला बळ मिळाले. तसेच फ्रांसमध्ये बेकायदेशीररित्या "शरिया" लागू करण्यास पण चाप लागला. बुरखा, हिजाब बंदी केल्या गेली. बेकायदेशीर इस्लामी विवाह पद्धती, बहु विवाह, जबरी विवाह यांना पण चाप बसवण्याचा प्रयत्न केला गेला. 



याच सगळ्या गोष्टींमुळे एकेकाळी डाव्या विचारांच्या डोळ्यातील तारा असलेले इम्युनल मॅक्रोन आता तसे राहिले नाहीत. गेल्या निवडणुकीत मॅक्रोन जिंकल्यानंतर उदारमतवाद्यांचे शेवटचे आशास्थान वगैरे मिळालेल्या उपाध्या मॅक्रोन यांनी पार धुळीला मिळवल्या. 


मात्र मॅक्रोन यांनी आपल्या पहिल्या कारकिर्दीत जागतिक रेटा, उदारमतवाल्यांचे कौतुक आणि मतपेठी बनवत पुढील निवडणूक जिंकण्याची बेगमी न करता विशुद्ध राष्ट्रीय हित आणि आपल्या वैचारिक पृष्ठभूमीची कठोरतेने रक्षा केली. याच मुळे फ्रांस मध्ये आताच्या निवडणुकीत त्यांना उजव्या मताचा पूर अडवता आला यात काही शंका नाही. तरी फ्रांस मध्ये उजव्या विचारधारेला मिळालेले ४१.८% मते काही कमी नाहीये. 

आता फ्रांसची पुढील वाटचाल काय राहील हे बघणे आवश्यक राहील. 

टिप्पण्या