प्रायोजित पक्ष आणि राज्य भाजपा



राज्यात मोठी निवडणूक जवळ आली की राज ठाकरे यांच्या सभा आणि वंचित आघाडीचे वादग्रस्त वक्तव्ये सुरू होतात. बर ही दोन्ही पक्ष उघड "गुंडावादी" राज ठाकरे यांची "खळ.. खटक" गाजत असतेच. फक्त मनसेचा "उंट किस करवट बैठेगा" यावर बरेच काही निर्भर असते. २०१४ साली हा उंट "नरेंद्र मोदी" यांच्या बाजूने बसला, तेव्हा नरेंद्र मोदी यांची उघड लाट आहे हे विरोधकांना चांगले लक्षात आले होते. तेव्हा राज ठाकरे यांना सोबत कोण घेणार? मग राज ठाकरे यांनी सरळ सरळ मोदींना पाठींबा दिला, गुजरात मॉडेलचे कौतुक केले, त्यावेळेस राज ठाकरे यांना भाजपाचे हिंदुत्व दिसत नव्हते तर फक्त विकास दिसत होता, "गाजराची पुंगी वाजली तर वाजली मोडून खाल्ली" कारण विरोधात लढून काहीच मिळणार नव्हते, मात्र समर्थन केले तर "फुल ना फुलाची पाकळी" काही तर हातात येईल. 

त्यातून फायदा नाही हे बघितल्यावर, २०१९ साली "लाव रे तो व्हडिओ" म्हणत निवडणूक न लढता, स्वतःला राज्यातील सुपरहिरो म्हणून सिद्ध करू बघायला तत्कालीन काँग्रेस - राष्ट्रवादीच्या कुशीवर बसला. मात्र तरीही हातात काहीच लागत नाही आणि काकांनी पण त्यांच्या करता मेहनत घेतलेल्या पुतण्यापेक्षा. सत्ता अलगत हातात देणाऱ्या पुतण्याला मांडीवर बसवत भ्रमनिरास केला. त्यामुळे आता ते हिंदुत्वावर स्वार होऊन पुढे येत आहे. 



राज ठाकरे यांनी दोन वर्षांपूर्वी गुडीपडव्याच्या सभेत आपल्या पक्षाचा नवीन झेंडा जाहीर केला. भगव्या झेंड्यावर छ. शिवाजी महाराजांची "राजमुद्रा" ! एकाच वेळी राज्यातील शिवप्रेमी आणि हिंदुत्ववादी जनतेला पंखाखाली घ्यायचा प्रयत्न होता हा. या भाषणात राज ठाकरे यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतांना,"मी राजकारणा साठी रंग बदलत नाही." असा टोमणा मारला. मात्र राज ठाकरे यांनी राजकारणासाठी स्वतःचेच नाही तर पक्षाच्या झेंड्याचेही रंग बदलले हेच सत्य आहे. तेव्हा पण राज ठाकरे यांनी घेतलेली हिंदुत्वाची भूमिका ही त्यांची नसून "प्रायोजित" असल्याची शंका होती. ती शंका आता दोन वर्षा नंतर झालेल्या गुडीपडवा मेळाव्यातील भाषण आणि त्यानंतर उठलेला गदारोळ पाहता खरी आहे असेच म्हणावे लागेल. 


आता मुद्दा काय तो पहा ! गुडीपडव्याला राज ठाकरे यांचे भाषण झाले, त्यांनी कथितपणे हिंदुत्वाचा मुद्दा हातात घेतला. या मुद्याला धरून मशिदीवरील भोंग्या विरोधात आवाज उठवला. सोबतच जिथे भोंगे वाजतील त्या समोर हनुमान चालिसा मोठ्या आवाजत लावायचे आदेश आपल्या कार्यकर्त्यांना दिले. राज्यातील तमाम हिंदुप्रेमी लोकांना या सगळ्या घोषणेची भुरळ पडली. मशिदीवरील भोंगे आणि त्यामुळे होणारा त्रास हा अनेक हिंदूंसाठी महत्वाचा विषय आहे. या अगोदर पण या वरून अनेक लोकांनी आवाज उठवला आहे. त्या मुळे या मुद्यावर लगेच राज ठाकरे यांच्या मागे अनेक हिंदू समूह उभे राहिले असे चित्र दिसत आहे. त्यातही राज्य भाजपाचे मुद्दे आणि एकूण राजकारण बघता अनेकांचा राज्य भाजपाच्या नेतृत्वाबद्दल शंका आहेत. तो समुह पण राज ठाकरे यांना प्रसिद्धी देत आहे. मात्र हे सगळे करतांना एकाच्या मनात एकदाही हा विचार आला नाही की, राज ठाकरे यांना आताच नेमकी या भोंग्यांची आठवण कशी आली? या अगोदर गायक अभिजित आणि सोनू निगम यांनी मशिदी वरील भोंग्यां विरोधात आवाज उठवला होता. मोठा गदारोळ तेव्हा उठला होता, मात्र राज ठाकरे आणि मनसे तेव्हा शांत झोपूनच होती. बरे हे मोठे लोक होते. मात्र मानखुर्द येथील करिष्मा भोसले या युवतीने पण या भोंग्यां विरोधात आवाज उठवला होता. तेव्हा पण कोणताही पक्ष तिच्या सोबतीला आलेला दिसला नाही. उलट राज्य सरकारने तिच्यावरच प्रतिबंधात्मक कारवाई केली. विशेष म्हणजे मनसे आणि राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा आवाज बुलंद केल्यावर ही घटना घडली होती. मग राज ठाकरे यांना भोंग्या विरोधात जाग यायला २०२२ चा गुडीपडवा का उगववा लागला? 



बाकी राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष प्रयोजित मालिकेचा भाग आहे हे का? तर जेव्हा पासून राज ठाकरे यांनी आपले कार्यक्रम जाहीर केले त्या दिवसापासून राज्यात अचानक राजकारण आणि राजकीय वक्तव्य वेगळ्या दिशेला वळले. या मुद्यावरून मग राज ठाकरे, मनसे नेते आणि राष्ट्रवादीचे नेते यांच्यात खडाजंगी सुरू झाली. एकीकडे शरद पवार यांनी राज ठाकरे यांना आपण महत्व देत नाही असे वक्तव्य केले, मात्र दुसरीकडे राज ठाकरे यांचा आरोपाला उत्तर द्यायला पत्रकार परिषद घेत मुद्दा गरम राहील याची तजवीज केली. बाकी कसर राष्ट्रवादीचे इतर नेते आणि शिवसेनेच्या तोंडाळ नेत्यांनी पूर्ण केली. 


मात्र इथे अजून एक राजकीय कोन अचानक समोर आला. राजकारणात कुठेही नसलेला आणि गेल्या दोन वर्षात कुठेही आवाज न केलेल्या वंचित आघाडीने या वादात उडी घेतली. मग वंचितचे नवे तरुण नेते सुजाता आंबेडकर यांनी राज ठाकरे यांना त्यांच्या मुलाला हनुमान चालिसा म्हणायचे आव्हान दिले, भोंगे काढण्याची बळजबरी खपवून घेणार नाही असे प्रतिआव्हान तर केलेच, शिवाय ब्राम्हणांमुळे दंगली होतात अश्या प्रकारचे वादग्रस्त वक्तव्य पण केले. त्या पाठोपाठ सुजाद आंबेडकर यांचे पिता प्रकाश आंबेडकर यांनी आपण आघाडीत सामील व्हायला तयार आहोत असे पिल्लू सोडून दिले. गेल्या अनेक निवडणुकांपासून वंचित आघाडी पक्ष काँग्रेस किंवा राष्ट्रवादी सोबत पाट लावण्यासाठी तयार आहे. मात्र हे दोन्ही पक्ष काही त्याला दाद देत नाही. गेल्या वेळेस काँग्रेसने पण जागा वाटपात वेळ घालवत प्रकाश आंबेडकर यांना तोंडघशी पडले. मग हैद्राबादच्या ओवेसी सोबत प्रकाश आंबेडकरांनी पाट लावला.


 

"जय भीम, जय मीम" ची घोषणा झाली. मात्र ही घोषणा फसवी निघाली, राज्यातील भीमशक्तीने तर मीम शक्तीला साथ दिली, मात्र मीम शक्तीने भीमशक्तीला साथ दिली नाही हे वास्तव निकलावरून समोर आले. ओवेसींचा पक्ष राज्यात वाढवण्याखेरीज वंचितच्या हातात काहीच लागले नाही. शेवटी घटस्फोट झाला. तेव्हा पुन्हा आपला आघाडीत चंचू प्रवेश करायला हा राज ठाकरे यांच्यावर वार करणे सोपे हे वंचितचे समीकरण. 


बाकी आता राज ठाकरे यांच्या मुद्याला आव्हान देताना राष्ट्रवादी हनुमान मंदिरातच इफ्तार पार्टी आयोजित करणार आहे. मात्र या पेक्षा मशिदीच्या भोंग्यां वरून नमाज झाल्यावर हनुमान चालिसा म्हंटल्या गेली असती तर राज्यातील सर्वधर्मसमभावाचे अधिक चांगले प्रदर्शन झाले असते. 


या सगळ्यात भाजपा कुठे? खरे सांगायचे तर, राज्य भाजपा आपल्या पायावर कुर्हाड मारून घेत आहे. राज्यातील कोणताही भाजपा नेता हिंदुत्वाच्या बाबतीत "फायर ब्रांड" नाही हे वास्तव आहे. सोबतच राज्यातील भाजपा नेत्यांना शरद पवार यांचे भलतेच आकर्षण आहे. राजकारण करावे तर शरद पवारांसारखे आणि राजकारणातून पैसे कमवावे तर तेही शरद पवारांसारखे हे ते मुख्य आकर्षण. यातून राज्यातील राजकारण नकळत शरद पवारांभोवती फिरत राहते ही मुख्य मेख आहे. शरद पवारांनी प्रयोजित केलेले मुद्दे समोर येतात आणि भाजपाचे नेतृत्व त्या कडे बघत बसते. बाकी मशिदी वरील भोंग्यां विरोधात न्यायालयीन आदेशाचे पालन का होत नाही? हा प्रश्न भाजप नेतृत्वाला पण विचारायला हवा. 


तर सध्या येणाऱ्या काळात मुंबईसह राज्यातील महापालिकांच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीच्या निकालांमुळे राज्यातील जनतेचा राजकीय कल पण ओळखता येणार आहे. भ्रष्टाचार, अनागोंदी असलेला राज्य कारभारावर आता आघाडीततील कोणताही पक्ष जनतेला मत मागू शकत नाही. राज्यातील भाजपा नेतृत्व भ्रष्टाचारावर भरभरून बोलेल मात्र हिंदुत्वाच्या मुद्यावर मात्र सध्या जनतेला हवी असलेली आक्रमकता दाखवू शकत नाही हे राष्ट्रवादीला माहीत आहे. तेव्हा आक्रमक हिंदुत्वाचा मुद्दा समोर करायची सुपारी राज ठाकरे यांच्या कडे ! राज्य भाजपच्या नेतृत्वाला अजून शरद पवारांकडून बरेच काही शिकायचे आहे.

टिप्पण्या