मशिदीचे भोंगे, राज ठाकरे आणि राजकारण



राज ठाकरे यांनी मशिदी वरील भोंग्या वरून केलेल्या आवाहनामुळे सध्या राजकीय अवकाश चांगलेच ढवळून निघाले आहे. अर्थातच मशिदीवरील भोंगे हे "सृष्टीकर्त्याच्या आदेशाने" लागले असल्यामुळे ते कोणत्याही कारणाने काढायला लावणे किंवा त्या विरोधात बोलणे हे पुरोगामी पद्धतीतच बसत नसल्याने राज ठाकरे यांच्या विरोधात बोलायला एक विषय मिळाला आहे. 



बाकी आज मशिदीवरील भोंग्यांवरून भांडणारे राज ठाकरे मात्र दोन वर्षा पूर्वी मानखुर्द येथे याच मशिदीवरील भोंग्यांमुळे सृष्टीकर्त्याच्या शांतिप्रिय समूहाने करिष्मा भोसले नावाच्या हिंदू तरुणीला त्रास दिला, सरकारने त्या पोरीच्या विरोधात कारवाई केली तेव्हा मात्र मूग गिळून बसले होते. इतकेच नाही तर ज्या वेळी प्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी याच पद्धतीने या भोंग्यांविरोधात आवाज उठवला आणि त्या विरोधात समस्त शांतिप्रेमी एक झाले होते तेव्हा राज ठाकरे नक्की कुठे होते? 


अर्थात मशिदी वरील भोंगे उतरवण्याचा न्यायालयीन आदेश काही काल - परवा आलेला नाही. मग इतके दिवस राज ठाकरे यावर चकार शब्द का बोलले नाही? हा प्रश्न नक्कीच समोर येऊ शकतो. बाकी राज ठाकरे यांचे हे हिंदुत्वप्रेम एकाएकी वाढले या मागे नक्की काय राजकीय गणित आहे, हे एक तर राज ठाकरे यांना, नाहीतर त्याचे काका शरद पवार यांना जास्त माहिती ! 



२०२० साली भाषण करतांना, त्याच सभेत ज्या सभेत राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची कफनी अंगावर चढवायला म्हणून आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा बदलवला तेव्हा, शिवसेनेला टोला मारतांना म्हणाले होते की, "मी सत्तेसाठी रंग बदलत नाही." मात्र खरी गोष्ट अशी की राज ठाकरे यांनी सत्तेसाठी फक्त स्वतःचेच रंग बदलले नाहीत तर आपल्या पक्षाच्या झेंड्याचेही रंग बदलले. पहिले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या झेंड्यात हिरवा, निळा, पांढरा आणि भगवा रंग घेत आपला पक्ष सर्वसमावेशक असल्याचा चांगलाच देखावा करण्याचा प्रयत्न केला. सोबतच मराठीच्या मुद्यावरून राज्यात चांगला आवाज पण उठवला. मात्र या सगळ्याने सत्ता सोपान काही चढता आला नाही. खरे हे की तो चढता येणार पण नव्हता, कारण पडद्यामागील सूत्रधार तसे होऊ देणार नव्हता. जेव्हा हे नाटक जमले नाही तेव्हा सुप्त अवस्थेत गेलेले राज ठाकरे पुन्हा निवडणुकीच्या वेळी "लाव रे तो व्हिडीओ" म्हणत राज ठाकरे यांनी रंग बदलले. या वेळी मात्र पडद्यामागचे सूत्रधार प्रत्यक्ष समोर येऊन मार्गदर्शन करत होते. आज ज्या राज ठाकरे यांना शरद पवार यांनी राज्यात जातीय राजकारण वाढवणारे म्हणत आहेत. त्याच शरद पवार यांची गुडीगुडी मुलाखत घेतांना, औरंगाबाद ते मुंबई विमान प्रवासात योगायोगाने आजूबाजूची खुर्ची मिळतांना माहीत नव्हते का? पण खरे कारण हेच की राज ठाकरे यांच्या कोणत्याही भूमिकेच्यापाठी सूत्रधार नक्की कोण हे बघायला हवेच, कारण आघाडी आणि युतीच्या या राजकारणात येणारा तिसरा "कोन" नक्की कोणाच्या फायद्याचा आहे हे लक्षात येईलच. मग राज ठाकरे यांच्या बदलत्या रंगाचे महत्व पण लक्षात येईल. 



बाकी "भोंग्याचे राजकारण" हा अजूनच वेगळा विषय आहे. पुरोगामी पक्ष या सगळ्याला उघड विरोध करणारच यात काही वाद नाही. पण इतर वेळेस संविधान, कायदा, न्यायालय आणि न्याय या सगळ्या शब्दांचे इमले रचणारे वंचित आघाडीचे सुजित आंबेडकर का पेटले? हे कळायला काही मार्ग नाही. अर्थात या मागे गेल्या निवडणुकीत फसलेली "जय भीम, जय मीम" ची नशा काम करत असेल आणि आंबेडकरवादाच्या मागे लपत आंबेडकरांच्या वंशजांचे एकूणच इस्लाम आणि वामपंथी विचारांवर स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचे मत नक्की काय हे माहीत नाही. या अगोदर सुजय आंबेडकर यांचे वडील प्रकाश आंबेडकर यांनी कोरेगाव भीमा प्रकरणात अशीच भूमिका घेत स्वतःचे हसे करून घेतले होते. मात्र आपल्या हिंदू द्वेषाच्या विचारातून आत्मघात करण्या व्यतिरिक्त दुसरे काही वंचितांच्या हातात लागणार नाही. बाकी अफगाणमध्ये तालिबान्यांनी बामीयान येथील बुद्ध मुर्त्या फोडल्यावर हिंदू संघटनांनी प्रकर्षाने केलेला विरोध मात्र वंचितांना तेव्हा जमला नव्हता हे पण तितकेच सत्य. बाकी हिंदूंच्या सणांना काही काळ वाजणारे भोंगे दिसत असतील, त्यातही मुख्यतः गणपती, नवरात्र या सणाला मुख्यतः जास्त, ते पण विशेष परवानगी घेत, कायद्याने ! हेच काम आंबेडकरवादी पण कायद्यानेच आंबेडकर जयंती, धम्मचक्र प्रवर्तक दिन आणि त्यांच्या इतर महत्वाच्या दिवशी करतातच की ! 



बाकी भोंगे उतरणार की नाही याचे उत्तर नाही असेच आहे. कारण राज्यातील कायदा आणि हिंदू जो पर्यंत झोपलेले राहतील तो पर्यंत तथाकथित "सृष्टीकर्त्याचे" राज्य कायम राहिल. लक्षात ठेवा आज आघाडी सरकार आहे म्हणून भोंगे काढा म्हणणारे, जेव्हा भाजपचे राज्य होते तेव्हा शांतच होते. तेव्हा हा विषयावर तेव्हाच बोला जेव्हा तो तुम्ही पूर्णत्वास नेऊ शकाल.

टिप्पण्या