राष्ट्रवादी विचार आणि हिंदू संस्कृती जोपासणाऱ्या चित्रपटांची व्यथा !



२०१४ पासून देशात हिंदुत्ववादी - राष्ट्रवादी विचारांची वावटळ उठली आहे. २०१४ साली संपूर्ण बहुमताने सत्तेत आलेल्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सत्तेत आलेल्या भाजपा सरकारने देशातील राजकारणाचा, समाजकारणाचा, इतकेच काय, तर मनोरंजनाचा पण पोत बदलला. शेवटी काय ? तर, "जे विकल्या जाते, तेच पिकवल्या जाते" हा नियम महत्वाचा. 


मनोरंजन क्षेत्रातपण भारतीय चित्रपट सृष्टी गेली अनेक वर्षे डाव्या विचारांवर पोसलेल्या लोकांच्या हातात होती. "बिग बजेट, बिग स्टारकास्ट, बिग डायरेक्टर" वगैरे आपसूक त्यांच्या हातात पडत होते आणि या चित्रपट सृष्टीत ते प्रस्थापित म्हणून मान्यता प्राप्त करत होते. मग त्यातून "हिंदुत्ववाद्यांना" बदनाम करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा वापर केला गेला. 



एक लेखक होते भीष्म सहानी, त्यांनी भारत - पाकिस्थानच्या धार्मिक विभाजनावर एक कादंबरी लिहली "तमस" ! १९७५ साली ही कादंबरी प्रकाशित झाली. स्वातंत्रउत्तर फाळणी काळातील ५ दिवसांवर आधारित कथा आहे. मात्र त्या कथेला आलेले सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि आर्थिक संदर्भ बघता हा तत्कालीन भारताचा जवळपास १०० वर्षाचा इतिहास मांडते. भारताची फाळणी धार्मिक आधारावर झालेली असल्यामुळे सहाजिकच त्यात धार्मिक राजकारणाची छाया सतत कथेवर पडत राहते. अश्या कादंबरीवर चित्रपट निर्मात्यांचे लक्ष जाणार नाही हे कसे? १९८६ साली गोविंद निलहानी यांनी या कादंबरीवर आधारित मालिका आणि चित्रपट बनवला, नाव तेच "तमस" ! आजही भारतातील डावे विचारवंत "तमस" कादंबरी वाचण्यापेक्षा "तमस" मालिका किंवा चित्रपट बघायचा सल्ला देतात. कारण सरळ आहे ! जेव्हा ही मालिका सुरू झाली तेव्हापण या मालिकेची कथा आणि दृष्टिकोन, मूळ कादंबरीच्या कथा आणि दृष्टिकोणापेक्षा वेगळा असल्याचा आरोप झाला होता. ही कथा ऐतिहासिक असली तरी काही दृश्यात मुद्दाम १९८६ सालचे संदर्भ वापरण्यात आले होते. मूळ कादंबरीत कुठेही नसलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यात १९८६ च्या गणवेशात दाखवल्या गेला होता. मात्र तत्कालीन काँग्रेस सरकारच्या कृपा प्रसादाने या मालिकेच्या प्रसारणात काहीही फरक पडला नाही. इतिहासाचा अत्यंत चुकीचा दृष्टिकोन या मालिकेतून मांडल्या गेला. ही मालिका आजही आंतरजालावर केजरीवालला अपेक्षित असलेल्या फुकट पद्धतीत बघता येईल. 



मात्र असे नाही की हिंदुत्ववादी आणि राष्ट्रवादी विचारातून अशी निर्मिती होत नव्हती किंवा त्याला स्थान मिळत नव्हते. १९९१साली चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी "चाणक्य" नावाची मालिका बनवली, तिचे दूरदर्शनवर प्रसारण पण सुरु झाले. मात्र जशी जशी मालिका लोकप्रिय व्हायला लागली, देशातील डाव्या विचारधारेतील लोकांच्या पोटात दुखायला लागले. कारण सरळ होते, या मालिकेचा काळ मुस्लिम आक्रमकांच्या आधीचा असल्यामुळे कुठेही त्यांचा उदो उदो नव्हता. सोबतच चाणक्य यांचे संपूर्ण भारताविषयी असलेले विचार तसेही डाव्या मेंदूला पचणारे नव्हतेच. हिमालया पासून हिंदी महासागरा पर्यंत भूमीला "भारत" म्हणतात आणि "भारत" एक राष्ट्र आहे या विचाराने देशावर आक्रमण करणाऱ्या अलेक्झांडरचा मुकाबला करणारा चाणक्य त्यांना पचणार कसा होता? कारण डाव्यांच्या नुसार भारताचा जन्मच मुळी मुघल आणि इंग्रजांमुळे झाला. हिंदू काळात तर देशच नव्हता आणि सभ्यतापण ! तेव्हा या मालिकेला विरोध करतांना अत्यंत हास्यास्पद कारणे दिली गेली, या मालिकेत "हर हर महादेव" सारख्या घोषणा आहेत, यात मुख्य पात्र मुख्यतः केशरी, लाल किंवा तत्सम रंगाचे कपडे घालतात, आणि ही मालिका "राष्ट्रवादाची" भालमण करते ही ती कारणे ! अर्थात या मालिकेचा काळात भारतात हिंदू सोबतच बुद्ध, जैन मतावलंब करणारेच होते, सहाजिकच त्याचे रंग हा भगवा, लाल किंवा पंढराच असणार होता. बाकी या मालिकेत राम - कृष्ण - महादेवाचा जयजयकार होणार होता, कारण तेव्हा "अल्लाह" भारतात पोहचलाच नव्हता. बाकी "राष्ट्रवाद" आणि डाव्यांचा छत्तीसचा आकडा आहेच. मात्र असले आरोप करत या मालिकेचे निर्माते - अभिनेते यांना भाजपाचा निकटवर्तीय म्हणून घोषित केले गेले. सोबतच दूरदर्शनवर दबाव आणत या मालिकेचे प्रसारण थांबवण्यात आले. न्यायालयीन लढाई नंतर पुढील प्रसारणाला मान्यता मिळाली, मात्र एपिसोडची संख्या वाढवायला नकार देण्यात आला आणि मालिका घाईत गुंडाळण्यात आले. मात्र या मालिकेची लोकप्रियता मात्र डाव्यांना थांबवता आली नाही. १९९३ साली बीबीसी दोन या वाहिनीवर या मालिकेचे प्रसारण करण्यात आले, जे अतिशय लोकप्रिय झाले, १९९७ साली भारतातील खाजगी वाहिनी "झी" ने याचे पुनरप्रसारण केले. पुन्हा २००७ - ८ साली 9 एक्स वाहिनीने हिंदीत आणि मल्यायम वाहिनी अमृत टीव्ही ने पण मल्यायममध्ये डब करत ही मालिका दाखवली. 



ही भारतातील तथाकथित अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या पुरस्कारकर्त्या डाव्या विचारांच्या लोकांची मानसिकता होती. त्यामुळे हिंदू, हिंदुत्व आणि राष्ट्रवाद हे शब्द त्यांच्यासाठी विटाळ होते. मनोरंजन क्षेत्रात असे अनेक किस्से आहेत. मराठी संगीतामधील देशातील मोठे प्रस्थ पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना पण त्यांनी फक्त स्वातंत्र्यवीर सावरकर या हिंदुत्ववादी नेत्याने लिहलेल्या कविता संगीतबद्ध केल्यामुळे मुंबई आकाशवाणी वरील नोकरीला मुकावे लागले होते. 



मात्र डाव्या विचारधारेचे नशीब मात्र खराब निघाले, देशात हळू हळू "राष्ट्रवाद आणि हिंदुत्वाचा" विचार समोर यायला लागला. अर्थात याला कारण डाव्यांचा अकारण असणारा थयथयाट आणि हिंदूंवर, हिंदू धर्मावर सतत अकारण वैचारिक हल्ले करण्याची प्रवृत्ती हे कारण होते. भारतातील कोणत्याही फुटीरतावादी चळवळीच्या मागे आपली वैचारिक ताकद लावनारे डावे भारतीय राजकारणात आक्रसत होते. 



मात्र वळवळ कमी झाली नव्हती, अजूनही सत्तेच्या जवळ असण्याचा आणि इतक्या वर्षात तयार केलेल्या व्यवस्थेचा फायदा त्यांना मिळत होताच. मनोरंजन क्षेत्रातील चित्रपट, मालिका वगैरे मधून आपला राजकीय अजेंडा आणि प्रपोगंडा समोर आणायचे त्यांचे काम इमाने-इतबारे केले जात होते. मुंबईतील १९९३च्या दंगलीत हिंदूंचे नृशंस हत्याकांड "राधाबाई चाळ प्रकरण" २००४ मध्ये देव नावाच्या चित्रपटात मात्र मुस्लिमांवर अत्याचार म्हणून दाखवले गेले. असे अनेक चित्रपट आहेत ज्यात आधी सांगितलेल्या "तमस" च्या कथेसारखे, बेमालूमपणे आपला दूषित दृष्टिकोन कथेत आणून दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. 



इतकेच नाही तर एखाद्या चित्रपटात "राष्ट्रवाद" किंवा डाव्या दृष्टोकोणाच्या वेगळा कथाभाग वाटत असेल तर त्या चित्रपट निर्मितीलाच खो घालायचा किंवा सरळ त्याच कथेवर दुसरा चित्रपट तयार करत मूळ चित्रपटाला धोक्यात टाकायचे असा प्रयत्न पण केला गेला. 



२००४ साली रामायण सारखी लोकप्रिय मालिका बनवणारे रामानंद सागर यांचे नातू अमृत सागर यांनी एक चित्रपट बनवायची तयारी केली. अमृत सागर यांचे वडील मोतीलाल सागर यांनी १९७३ साली लिहलेल्या कथेवर ! जी कथा आधारित होती १९७१ साली झालेल्या भारत - पाकिस्थान युद्धावर ! भारताने बांगलादेश पाकिस्थानच्या तावडीतून मुक्त केला, पाकिस्थान सेनेच्या जवळपास ९२ हजार सैनिकांनी आत्मसमर्पण केले. नंतरच्या वाटाघाटीत आपण पाकिस्थाच्या सगळ्या सैनिकांची सुटका केली, त्यांना मायदेशी पाठवले. मात्र दुर्दैवाने तत्कालीन सरकारने आपल्या पकीस्थानी कैदेतील सैनिकांना सोडवण्यात उदासीनता दाखविली. उलट असे कोणी सैनिक पाक कैदेत आहेत हेच नाकारले, पाकिस्थान तर मान्य करणार नव्हताच. मात्र त्यातील काही सैनिकांनी मर्दुमकी दाखवत पाकिस्थान सेनेच्या नाकावर टिचून पळ काढला आणि देशात वापस आले. या प्रकरणावरून बराच गदारोळ झाला, भारत सरकार आणि पाक सेना दोघांची नाचक्की झाली. याच घटनेवर हा चित्रपट तयार होणार होता. मात्र या चित्रपटाच्या निर्मितीत बरेच अडथळे आलेत. हा "१९७१" नावाचा चित्रपट २००७ ला प्रदर्शित करण्यात आला. मनोज वाजपेयी, रवी किशन सारखे कलाकार असलेला हा चित्रपट अनेक संकटावर मात करत प्रदर्शित झाला, मात्र चालला नाही. कारण याच कथेवर दुसरा चित्रपट २००४ सालीच प्रदर्शित झाला होता. अमिताभ बच्चन, संजय दत्त, अक्षय खन्ना सारखी तगडी अभिनेत्याचा संच घेऊन, नाव "दिवार" ! मग सारखीच कथा असतांना २००७ साली कोण बघणार? मात्र "१९७१" आज यु ट्यूबवर उपलब्द आहे. जवळपास खरी कथा या चित्रपटाची जमेची बाजू आहे. "दिवार" आणि "१९७१" दोन्ही चित्रपट बघितल्यावर फरक नक्कीच कळेल. 



अगदी शहीद भगतसिंग यांच्या वरतीपण असेच दोन चित्रपट साधारण एकाचवेळी प्रदर्शित झाले होते. एक होता अजय देवगण अभिनित "द लेजंड ऑफ भगतसिंग" , तर दुसरा होता बॉबी देवल अभिनित "शहीद" ! दोन्ही चित्रपट एकाचवेळी जून २००२ साली प्रदर्शित झाले. 



आज मात्र हे दुष्टचक्र तोडल्या गेले आहे. साधारण २०१४ नंतर बाहुबली, बाहुबली २, उरी सारखे चित्रपट तयार झाले, त्यांनी उत्तम धंदा केला. राष्ट्रवाद आणि हिंदू संस्कृती या चित्रपटात व्यवस्थित दाखविली गेली. या सगळ्यावर कळस "द कश्मीर फाईल्स" आणि "आर आर आर" चढवत आहेत. ही जमेची बाजू.

टिप्पण्या