धर्मनिरपेक्ष चित्रपट: एक फसवणुक

 


"द काश्मीर फाईल्स" चित्रपट प्रदर्शित झाला आणि देशात राजकीय वादळ उठले. कारणच तसे होते. आजपर्यंत काश्मीर समस्येवरती जितके चित्रपट आलेत त्यात साधारण काश्मिरी मुस्लिमांची होरपळ आणि त्याचे काश्मीर, तसेच तथाकथित काश्मिरीयत बद्दलचे भाव दाखवण्यात येऊन, त्याच्या कथित लढ्याचे आडून आडून उदात्तिकरच केल्या गेले होते. 


मात्र "द कश्मीर फाईल्स" चित्रपटात काश्मिरी हिंदूंवर केलेले धार्मिक अत्याचार आणि त्या मुळे त्यांना आपल्याच देशात करावे लागलेले विस्थापन मोठ्या भेदक पद्धतीने मांडल्या गेले. आजपर्यंत जोपासलेला "शांतीच्या धर्माचा बुरखा" या चित्रपटामुळे टराटरा फाटला. या चित्रपटाला देशातील नागरिकांनी विशेषतः हिंदू नागरिकांनी "न भूतो न भविष्यती" असा प्रतिसाद दिला. या प्रतिसदकडे बघता आता आजपर्यंत गाडली गेलेली अनेक भूत अशी जिवंत होईल या भीतीने शांततेच्या धर्माचा बुरखा घातलेले इस्लामवादी आणि त्यांचे पाठीराखे उदारमतवादी बुरखा घातलेले डावे वामपंथी मुळातून हादरले. मग या चित्रपटाला बदनाम करायचा डाव सुरू झाला. 


या सगळ्या चित्रपट विरोधात असलेल्या डाव्यांनी आणि इस्लामवाद्यांनी पहिला आक्षेप घेतला की, चित्रपटात जसे दाखवले आहे तसे कधी घडलेच नाही. चित्रपटात अतिशयोक्ती दाखवण्यात आली आहे. पण जेव्हा या नरकयातना भोगलेले काश्मिरी हिंदू समोर आले तेव्हा मात्र यांनी सूर बदलला, हा चित्रपट विशिष्ट लोकांवर अत्याचार झाल्याचा प्रपोगंडा करत राजकीय फायदा घेण्यासाठी बनविला आहे असा नवीन मुद्दा काढला. सोबतच देशात धार्मिक दृहीकरण व्हायला नको म्हणून घडलेल्या घटना सौम्यपणे चित्रित करायला हव्या होत्या अशी पुष्टी पण जोडल्या गेली. 


आता पर्यंत भारतीय चित्रपटसृष्टी साधारण डाव्या विचारधारेच्या प्रेमात असलेल्या लोकांच्या हातात होती. त्यामुळे मूळ ऐतिहासिक घटना तोडमरोड करून दाखवणे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि "सिनेमॅटिक लिबर्टी" सारख्या गोंडस शब्दांच्या मागे लपत घडलेल्या घटना आपल्याला मानेल असे लॉजिक लावत दाखवत. 


आता तुम्हाला एक घटना सांगतो. तुम्हाला "राधाबाई चाळ प्रकरण" माहीत आहे का? नाहीच माहीत असणार, कारण मुंबई येथे विवादित बाबरी ढाचा पडल्यानंतर झालेल्या १९९२ - ९३ दंगलीबद्दल बोलतांना हे प्रकरण बाहेर काढल्याच जात नाही. असे म्हणतात की मुंबईच्या दंगलीत अगोदर हिंदूंवर हल्ले जास्त प्रमाणात होत होते. मात्र राधाबाई चाळ प्रकरणानंतर हिंदू अधिक आक्रमक झाले. विशेषतः शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची हिंदू रक्षकांची प्रतिमा याच प्रकरणानंतर तयार झाली. या घटनेनंतर ठाकरेंनी उघडपणे शिव सैनिकांना उघडपणे हिंदू संपत्ती आणि जीवाचे रक्षण करण्याचे आवाहन केले. परिणामी हिंदू प्रतिकार अधिक कडवा झाला, आक्रमक झाला. परिणामी मुंबई दंगल शमली. 


काय होते राधाबाई चाळ प्रकरण ! तर मुंबईचे उपनगर असलेल्या जोगेश्वरी येथे असलेल्या राधाबाई चाळ नावाच्या इमारतीत रात्रीच्या अंधारात काही जिहादी घुसले त्यांनी हळूच सगळ्या खोल्यांना बाहेरून कड्या लावल्या. कारण संपूर्ण चाळीत हिंदू रहात होते. आता ज्यांना मुंबईतील चाळ पद्धतीच्या इमारतीची कल्पना असेल त्यांना लक्षात येईल की या पद्धतीच्या इमारतीला कुठेही बालकनी वगैरे नसते. मुख्य दवाज्यांना कड्या लागल्यामुळे सगळी माणसे घरात अडकली. नक्की काय होत आहे हे चाळीत राहणाऱ्यांना माहीत व्हायच्या आधीच त्या चाळीवर पेट्रोल, डिझेल आणि घसलेटचा वर्षाव झाला आणि आग लावण्यात आली. या जळीत कांडात नक्की किती मृत्यू झाले? किती मुले, वृद्ध, महिला जळाल्या याचा आकडाच उपलब्ध नाही. मात्र त्या नंतर आक्रमक झालेल्या हिंदूंनी किती लोकांना मारले त्याचे आकडे मात्र अगदी तयार आहेत, ही मुंबईची अवस्था, मग सुदूर काश्मीर मध्ये जेव्हा हिंदूंवर अत्याचार व्हायला लागले त्याची खरी आकडेवारी कोण ठेवणार? हा साधा प्रश्न ! 



असो, मात्र हे आहे राधाबाई चाळ नावाचे मुंबई दंगलीमधील प्रकरण जे विसरल्या गेले. मग आली तारीख ११ जून २००४ म्हणजे मुंबईतील दंगली नंतर जवळपास ११ वर्षांनी ! या दिवशी एक चित्रपट प्रदर्शित झाला. अमिताभ बच्चन, फरदिन खान, करीना कपूर, ओम पुरी, अमरीश पुरी सारखी तगडे कलाकार असलेला हा चित्रपट ! गोविंद निलहानी यांनी दिगदर्शीत केलेला !

काय होती चित्रपटाची कथा? तर या चित्रपटात राधाबाई चाळ प्रकरणाची पूनरुक्ती होती. फरक इतकाच होता की राधाबाई चाळ प्रकरणात, त्या अग्निकांडात जिहादींनी आग लावली आणि हिंदू होरपळले होते, तर चित्रपटातील चाळीत नेमके उलट दाखवण्यात आले. त्या काळात हिंदू आजच्या सारखा एकवटलेला नव्हता. त्यामुळे या चित्रपटावर इतका गदारोळ झाला नाही. काहींनी या कथानकावर प्रश्न नक्कीच विचारले, मात्र त्या करता पुन्हा, "हा चित्रपटाचे कथानक काल्पनिक आहे, कोणत्याही पद्धतीने सत्य परिस्थितीशी मिळताजुळता असेल तर तो योगायोग समजावा." ही चित्रपट सुरू होण्याआधी दाखवली जाणारी पाटी कामात आली. या सगळ्या कथानकात शेवटी हे अग्नीकांड "हिंदू - मुस्लिम" नेत्यांनी आपली राजकीय पोळी शेकण्याच्या निमित्याने एकत्रच केल्याचे दाखवण्यात आले. पुन्हा त्यात "फरदिन आणि करीना" हे मुस्लिम जोडपे कसे या सगळ्या करस्थानाचा पर्दाफाश करतात आणि जनतेला न्याय मिळवून देत. मुस्लिम भारतीय संविधान आणि हिंदूंच्या न्याय बाजूची कशी बुज राखतो हे दाखवायला पण विसरले नाहीत. तद्दन पारंपरिक धर्मनिरपेक्ष कथानक, ज्यात हिंदूंकडून दंगल सुरू होते आणि हिंदू - मुस्लिम नेते त्या दंगलीचा उपयोग आपली राजकीय पोळी शेकण्यासाठी करतात. पुन्हा त्यात मुस्लिम मुले कसे नकळत या नेत्यांच्या कारस्थानाला बळी पडतात किंवा "व्यवस्था" कशी तो मुस्लिम आहे म्हणून त्याला वेगळे वागवते वगैरे छोट्या छोट्या प्रसंगातून दाखवले आहे. 


आजही तुम्हाला हा चित्रपट ऑनलाइन उपलब्ध आहे. मात्र मुंबई दंगलीच्या "राधाबाई चाळ प्रकरणा" बद्दल मात्र कोणतीही बातमी उपलब्ध नाही ही खरे दुःख ! 



असाच अजून एक चित्रपट होता "फिजा" ! हृतिक रोशन, करिष्मा कपूर, जया बच्चन असे मोठे कलाकार असलेला, दिगदर्शक खालील मोहम्मद ! यालाही पार्श्वभूमी मुंबई दंगलीची ! दंगलीचा परिणाम म्हणून दहशतवादी बनणारा मुस्लिम मुलगा आणि त्याला पुन्हा माणसात आणण्यासाठी झटणारी त्याची बहीण ! आपल्या भावाचा योग्य मान राखण्यासाठी त्याला "व्यवस्थेने" त्रास द्यायला नको म्हणून आपल्या भावावर गोळी चालवत त्याला मारणारी उदात्त विचारांची बहीण ! 


या दोन्ही चित्रपटात न दिसणारा मोठा खलनायक कोण ? तर बहुसंख्यांक आणि बहुसंख्याकाच्या माध्यमातून चालणारी "व्यवस्था" ! आणि "नायक" कोण? तर या "व्यवस्थे" विरोधात आवाज उठवणारे, बंदूक हातात घेणारे, वेळप्रसंगी दहशतवाद करणारे मुस्लिम मुले ! कारण आतंकवादी "जिहादी" नाही तर व्यवस्थेचे बळी हे दाखवणे आवश्यक ! तर खरे भारतीय कोण? तर या तरुणांना न्याय मिळवून द्यायला झटणारे हिंदू ! (म्हणजे उदारमतवादी हिंदू, "म्हणजे कोण?" हे लक्षात आलेच असेल. 


तर अश्या धर्मनिरपेक्ष, संविधानप्रेमी चित्रपट बनवणाऱ्या लोकांचा बुरखा या "द कश्मीर फाईल्स" मुळे फाटला, आता या सगळ्याचा तळतळाट होत आहे. भारतातील सत्य परिस्थिती उघडी नगडी होऊन बाहेर आली आहे. स्वतःला इतके उघडे बघायची सवय नव्हती यांना. वरील दोन्ही चित्रपट मुंबई दंगलीच्या पार्श्वभूमीवर होते. दोन्ही चित्रपटात नायक कधी कळत- नकळत तर कधी समजून उमजून दहशतवादाचा मार्ग पत्करतात आणि त्याचे उदात्तीकरण इतर करतात. परिस्थिती, त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचे कारणे देतात. मात्र या मुंबई दंगलीत हिंदू तरुण होरपळलेच नाहीत का? समजा या दंगली राजकारणाने प्रेरित असतात आणि हिंदू-मुस्लिम समाजाचे नेते आपले राजकारण साधायला त्याला खतपाणी घालतात, तर हिंदूंनी पण हातात शस्त्र उचलले तर वाईट काय? मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही. मात्र मुस्लिम तरुण मोठ्या प्रमाणावर विविध दहशतवादी संघटनांशी जोडल्या गेला याचे कारण फक्त अन्याय आहे की "धार्मिक पगडा" याचा विचार पण कोणी करत नाही, या वर बोलत नाही, या विषयावर चित्रपट काढणे तर दूरच. पुन्हा निर्लज्ज पणे देश सोडून "धर्मयुद्ध" करायला देशाबाहेरील जिहादी दहशतवादी संघटनेत भरती झालेल्या मुलांना पुन्हा भारतात वापस आणा म्हणून मागणी पण करतात. 



आता या चित्रपटाच्या यशाने गांगरलेल्या, चिडलेल्या, घाबरलेल्या लोकांनी काश्मीर नंतर आता हिम्मत असेल तर २००२ साली झालेल्या गुजरात दंगलीवर "गुजरात फाईल्स" चित्रपट काढा अशी मागणी केली आहे. बिलकुल जरूर काढावा मात्र तो काढतांना २७ फेब्रुवारी २००२ ला झालेले गोध्रा रेल्वे जळीत प्रकरणा पासून सुरू करा, मग त्या मुळे उसळलेली दंगल, त्यात शिक्षा झालेले हिंदू आणि या सगळ्याचा बदला म्हणून सप्टेंबर २००२ ला झालेला अक्षरधाम दहशतवादी हल्ला आणि २००८ साली केलेला अहमदाबाद सिरीयल बॉम्ब ब्लास्ट नक्की दाखवा. 



टिप्पण्या