काश्मीर प्रश्न कसा चिघळला हे जास्त महत्वाचे आहे. १९६५ च्या भारत पाकिस्थान लढाईच्या आधी, पाकिस्थानने आपले काही सैन्य काश्मिरी लोकांच्या वेशात पाकिस्थानात पाठवले. पाकिस्थानच्या धोरणकर्त्यांची धारणा अशी होती की, काश्मीर मधील जनमानस भारत विरोधात आहे, तेव्हा आपले वेष बदललेले सैन्य या लोकांना आपल्या बाजूने वळवतील आणि आपले सैन्य अगदी सोप्या पद्धतीने संपूर्ण काश्मीरवर कब्जा करतील. मात्र पाकिस्थांनचे मनसुबे धुळीला मिळाले, कारण काश्मिरी जनतेने या पाक सैन्याला एकतर पकडून भारतीय सैन्याच्या हवाली केले.
याच पद्धतीने १९७१ च्या युद्धात बहुसंख्य काश्मिरी जनता भारतीय सेनेच्या बाजूने होते. काश्मीर आणि मुस्लिम बहुल काश्मीरचा हा इतिहास असतांना १९९० साली असे काय घडले की काश्मिरी जनता भारत सरकारच्या विरोधात गेली की त्यांनी भारत सरकार विरोधात अघोषित युद्ध पुकारले? इतकेच नाही तर काश्मीर फक्त काश्मिरी मुस्लिमांचा असून काश्मिरी हिंदूंना काश्मीर सोडण्यास भाग पाडण्यात आले ?
काही लोकांचा असा दावा आहे की काश्मीर मधील प्रशासनावर काश्मिरी हिंदूंचा वरचष्मा होता आणि त्या पाई काश्मिरी मुस्लिम दुःखी होते आणि त्याचे पर्यावसन काश्मिरी हिंदूंच्या विरोधात मुस्लिम व्यक्त झाले. मात्र हे अर्धसत्य आहे. कारण जेव्हा काश्मीर मध्ये हिंदू राजाची सत्ता होती तेव्हा काहीशी अशी परिस्थिती नक्कीच होती. मात्र जेव्हा काश्मीर भारताचा हिस्सा झाले तेव्हा ही परिस्थिती झपाट्याने बदलली. मुख्य म्हणजे काश्मीरमध्ये लोकशाही स्थापन झाली. बहुसंख्य मुस्लिम असल्यामुळे तेथील कारभार मुस्लिम नेत्यांच्या हातात राहिला. त्यांनी काश्मिरी मुस्लिमांना योग्य प्रमाणात काश्मीरच्या प्रशासनात प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला. अर्थात तत्कालीन परिस्थितीत काश्मिरी हिंदू पण नाराज नव्हते, कारण ही परिस्थिती येणार याची मानसिकता त्यांनी बनविली होती, तर सोबतच काश्मिरी हिंदूंचे अवकाश अजुन मोठे झाले होते. हिंदूनी पहिले पासून योग्य शिक्षण आणि नाविन्याची साथ दिली होती.
मात्र ८० च्या दशकात काश्मीर मध्ये पाकिस्थानने नवीन खेळी खेळली, ती म्हणजे "इस्लामी कट्टरतेची" ! तत्कालीन काळात अफगाणिस्थानमध्ये बस्तान बसविलेल्या सोवियत रशियाला शह देण्यासाठी अमेरिका आणि पाकिस्थानची युती झाली होती. अमेरिकेने ओतलेले पैसे आणि पाकिस्थानच्या डोक्यात असलेली धार्मिक कट्टरता याच्या मदतीने एकीकडे अफगानमध्ये सोवियत रशियाला शह देत असतांनाच, तोच कित्ता पाकिस्थानने भारतात काश्मीर समस्येला स्वतःच्या बाजूने सोडविण्यासाठी वापरले. याचा दृश्य परिणाम १९८३ साली श्रीनगर येथे आयोजित भारत विरुद्ध वेस्टइंडिज क्रिकेटच्या समन्यादरम्यान दिसलेल्या भारत विरोधी उन्मादाने दिसला होता. मात्र राज्य सरकार आणि केंद्र सरकारनेही तिकडे कानाडोळाच केला.
अर्थात याचा पहिला प्रयोग पाकिस्थानने भारतात पंजाबमध्ये खलिस्थान आतंकवाद पसरवण्यास आधीच करून बघितला होता. त्याचा भारतीय सरकार आणि नागरिकांना बराच त्रास झाला होता. अगदी १९८४ साली भारतीय पंतप्रधानांची हत्याही झाली. तरी या सगळ्यावरून तत्कालीन भारत सरकारने मात्र काहीही बोध घेतला नाही. त्यातच काश्मीरचे भारतात विलनिकरण करतांना काश्मीरला दिलेला विशेष दर्जा, काश्मीर मध्ये आधीपासून असलेल्या काही विशेष कायदे रद्द न करता, त्याला भारतीय संसदेत चर्चेत न आणता, एका अधिसूचनेवर राष्ट्रपतींवर दबाव आणत मान्य करून घेतले. असा दर्जा आणि कायदे काश्मीर आणि भारतामध्ये दरी वाढवण्याचे काम करत होते. सोबतच खुद्द काश्मीर मधील इस्लाम बहुल अस्मितेचे राजकारण या राजकारणाची दाहकता वाढवत होते.
याचाच फायदा घेत पाकिस्थानने आपले धार्मिक कट्टरतावाद पसरवण्यास सुरवात केली. गंम्मत म्हणजे शिया बहुल आणि सुफी विचारांचे काश्मिरी मुस्लिम मात्र धार्मिक कट्टरतेकरता सुन्नी बहुल पाकिस्थानच्या मागे जायला लागले आणि काश्मीर मधील राज्य सरकार मात्र आपल्या राजकीय स्वार्थासाठी या सगळ्या परिस्थितीकडे कानाडोळा करत होते.
या सगळ्याकडे तत्कालीन परिस्थितीत भारतीय जनसंघ किंवा नंतरच्या भाजपाने केंद्र सरकार आणि भारतीय जनतेचे लक्ष वेधण्याचा प्रयास केलाच नाही असे नाही. "एक देश मे, दो प्रधान, दो निशाण, दो विधान नही चलेंगा" म्हणत काश्मीरला दिलेला विशेष दर्जा आणि विशेष कायद्याविरोधात आंदोलन केले. या आंदोलनात जनसंघाचे जेष्ठ्य नेते श्यामा प्रसाद मुखर्जी यांना काश्मीर सरकारने अटक केली आणि त्या अटकेतच त्यांचा मृत्यू झाला. तत्कालीन हिंदुत्ववादी संघटना विशेषतः संघाने या विरोधात बराच गदारोळ केला. मात्र तत्कालीन राज्य आणि केंद्रातील सत्ताधाऱ्यांना या सगळ्या गदारोळाने काहीही फरक पडला नाही. आपल्या राजकारणासाठी दोन्ही सत्ताधार्यांनी काश्मीरच्या अन्याय अस्मिता आणि कट्टरता याला खतपणीच दिले. ही परंपरा अगदी जवाहरलाल नेहरू, शेख अब्दुल्ला पासून सुरू होत, इंदिरा गांधी, राजीव गांधी, फारूक अब्दुल्ला, व्ही पी सिंग, मुफ्ती मोहम्मद सैद पासून पुढील पिढ्यांकडे सुपूर्द झाली. या राजकीय खेळातून राज्यात वाढलेला भ्रष्टाचार आणि प्रशासकीय अनागोंदी याचे खापर खूप सोप्या पद्धतीने भारत सरकार आणि भारतीय नागरिकांवर फोडल्या गेले. परिणामी पाकिस्थानी प्रपोगंडासाठी खूप सुपीक जमीन तयार झाली.
काश्मीरमध्ये हे सगळे सुरू असतांना, कट्टरतेची पार्श्वभूमी तयार होत असतांना मात्र काश्मिरी हिंदू नक्की काय करत होते. अत्यंत दुःखाने कबूल करावे लागेल की ते हिंदू पण खोट्या काश्मिरी अस्मितेच्या आहारी जात, देशातील हिंदूंच्या काहीशे विरोधातच होते. त्यांना पण काश्मीरला असलेला विशेष दर्जा आणि विशेष कायदे हवे होते, कारण आपण काश्मिरी आहोत त्या दर्जामुळे आपल्याला फायदाच होईल अश्या गैरसमजात ते वावरत होते. इतकेच नाही तर हिंदू मधील फुटीचा रोग तिथे पण होताच, पंडित, डोग्रा, शीख, पंजाबी, दलित सगळे वेगवेगळी चूल मांडून बसले होते, त्याचे समाजकारण आणि राजकारण एकमेकांना शह देणारेच होते. १९९० साली जेव्हा डोळे उघडले तो पर्यंत बराच उशीर झाला होता.
तर देशातील हिंदू संघटना आणि राजकीय पक्ष पंजाबकडे विशेष लक्ष ठेवून होते. कारण तेव्हा पंजाबमधील दहशतवाद अगदी टिपेला पोहचला होता. पंजाब मध्ये पण आतांकवाद्यांचे पहिले लक्ष सरकारी कर्मचारी, राजकीय नेते, सुरक्षा दल, सामान्य हिंदू, हिंदू संघटना आणि हिंदी भाषिक मान्यवर हेच होते. १९८४ ला इंदिरा गांधी यांच्या हत्ये नंतर पंजाबमध्ये शीख जनताच या खलिस्थान विरोधात एकत्रित झाले. त्याचा फायदा घेत सरकारने पुढे हा दहशतवाद आटोक्यात आणला. तरी आजही खलिस्थान भूत वेळोवेळी आपले डोके वर काढतेच.
पंजाब सोबत देशाचा सुदूर पूर्वेचा भाग पण असाच दहशतवादाने पेटला होता, मध्य - पूर्व भाग नक्षलवादाच्या आगीत जळत होता. या सगळ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तोंड देत होता, तेथे कार्यकर्ते जात होते, लोकांची मन वळवण्याचा प्रयत्न करत होते. कार्यकर्ते मारले जात होते. मग हेच काम संघाने काश्मीर भागात का केले नाही?
असे नाही की भाजपाने आणि संघाने प्रयत्न केले नाहीत. त्यातील काही प्रयत्न आपण वर बघितलेच. मात्र या सगळ्यात अडंगा घालत होते काश्मीरचे स्थानीय प्रशासन आणि आधार घेत होते काश्मीरला मिळालेल्या विशेष दर्जाचा. हिंदू बहुल जम्मू पर्यंत गेलेल्या कार्यकर्त्यांना मात्र काश्मीर खोरे आणि लडाख अनेक वर्षे दूरच होते. नंतर तेथील इस्लामी दहशतवादाची मुळे पक्की झाल्यावर तर अजूनच कठीण बनले.
"द कश्मीर फाईल्स" च्या निमित्याने दोन दावे केले जातात. पहिला दावा असा चित्रपटात दाखवले आहे तसे हल्ले काश्मिरी हिंदूंवर झालेच नाहीत वगैरे तारे तोडले जात आहेत. मात्र जेव्हा स्वतःवर अत्याचार झालेले आणि त्या पाई आपल्याच देशात निर्वासित झालेले काश्मिरी हिंदू समोर येतात, तेव्हा या दाव्याची हवा निघून जाते.
दुसरा दावा म्हणजे काश्मीर हिंसाचारात हिंदूंपेक्षा जास्त मुस्लिम मारले गेले. होय समजा १९८० ते आज पर्यंतची आकडेवारी बघितली तर या दाव्यात सत्यता आहे. मात्र हा दावा काहीसा पाकिस्थान सारखा आहे. भारतात आणि आजूबाजूच्या देशात धार्मिक कट्टरतावाद आणि इस्लामिक दहशतवाद परवणारा हा देश मात्र जगाला ओरडून सांगतो की आम्ही दहशतवादाचे सगळ्यात मोठे भुक्तभोगी आहोत. असाच काहीसा किस्सा काश्मीरी मुस्लिमांचा आहे. जेव्हा काश्मिरी हिंदूंवर अत्याचार होत होते तेव्हा एकाही काश्मिरी मुस्लिमांनी त्या विरोधात मोठी भूमिका घेतली नाही. इतकेच नाही तर शांत राहात या दहशतीला खतपाणीच घातले. इतकेच नाही तर बहुसंख्य मुस्लिमांनी तर दहशतवाद्यांना सक्रिय मदतच केली. अशी अनेक उदाहरणे आहेत. बाकी आता जे काश्मिरी मुस्लिम दहशतवादाचे बळी पडले त्याच्या आकडेवारीचा विचार केला तर हे बहुतांश राज्य प्रशासनाधील, सुरक्षा दला मधील आहेत. अर्थात देशाविरोधात पुकारलेले युद्ध सारखी परिस्थिती, विशेष दर्जा आणि कायदे, भ्रष्टाचारी आणि आत्मकेंद्रित राजकीय नेतृत्व या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे काश्मीर मधील अर्थव्यवस्था रसातळाला जाणे, कश्मीर ज्या पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे तो ठप्प होणे यातून सामान्य काश्मिरी विशेषतः मुस्लिम बहुल, इस्लामी दहशतवादाने धगधगत्या काश्मीर खोऱ्यात आपल्या उपजीविकेचे मुख्य साधन राज्य प्रशासन आणि सुरक्षा दलातील नोकरीच होती. ती केल्याने साहजिकच दहशतवादयांच्या कायम निशाण्यावर हे लोक राहिलेत आणि बळी पडले. मात्र बळी त्या एकाच मुस्लिम माणसाचा गेला. इस्लामी दहशतवाद्यांनी त्यांच्या संपूर्ण परिवार नाही मारला, ना त्यांच्या बायांवर अत्याचार केले. हा फरक बरेच काही सांगून जातो.
बाकी तत्कालीन काळात म्हणजे १९९० साली व्ही पी सिंग यांच्या नेतृत्वात असलेल्या जनता दलात आजकाल नावजल्या जात असलेले मुलायम सिंग, लालू प्रसाद यादव, नितीश कुमार सारखे दिग्गज होते. तर काँग्रेस सारखा पक्ष १९५ खासदार घेऊन लोकसभेतील सगळ्यात मोठा पक्ष होता, सक्षम विरोधी पक्ष होता. व्ही पी सिंग सरकारला फक्त भाजपानेच नाही तर कम्युनिस्ट पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानेही बाहेरून समर्थन दिले होते. दुसरा मोठा पक्ष जनता दल, खासदार संख्या १४२! तिसरा मोठा पक्ष होता भाजपा, खासदार संख्या ८९ ! चौथा मोठा पक्ष होता भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), खासदार संख्या ३४! आणि पाचवा मोठा पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष, खासदार संख्या १२! म्हणजे जे काम तेव्हा ३८३ संसद सदस्य असून तथाकथित पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष पक्ष नाही करू शकले, जे काम या दहशतवाद्यांसोबत सहानुभूती असणारे, त्यांच्या सोबत इफ्तार साजरे करणारे नाही करू शकले ते काम ८९ खासदार असणाऱ्या भाजपाने करायला हवे होते ही अपेक्षाच हास्यास्पद आहे.
बाकी भारतातील अनेक भागात धार्मिक दंगली आणि हिंसाचार झाला आहे. तो कश्मीर समस्येच्या आधीही आणि नंतरही झाला आहे. २००२ चे गुजरात दंगली आणि त्यात होरपळल्या गेलेले मुस्लिम हे तर तथाकथित उदारमतवाद्यांच्या आवडीचा विषय आहे. आता पण काश्मीर १९९० तुलना गुजरात २००२ सोबत करण्याची लहर अनेकांना येते. मात्र गुजरात मधील दंगली या गोध्रा येथे झालेल्या हिंदू हत्येच्या प्रतिक्रियेमध्ये उमटल्या होत्या. दुसरे म्हणजे अनेक आयोग आणि न्यायिक चौकश्या अगदी केंद्रीय तपास यंत्रणांकडून करून देखील या सगळ्या दंगलीत प्रशासनाचा सहभाग ही लोक उघड करू शकली नाहीत. अर्थात तसा सहभाग नव्हताच हा भाग वेगळा. तिसरा भाग म्हणजे या दंगलीतील दोषींवर अगदी ते तत्कालीन सत्ताधारी भाजपाचे नेते असले तरी त्यांना शिक्षा झाली आहे. मात्र त्या दंगली इतक्या गंभीर असत्या आणि तेथील मुस्लिमांवर तितके अत्याचार झाले असते तर अनेक गुजराती मुस्लिम यांनी गुजरात सोडून दुसऱ्या राज्यात आश्रय घेतला असता आणि आज त्या दंगली नंतर २० वर्षानंतर पण गुजरातमध्ये परत आपल्या घरी जायला घाबरले असते, जसे आज ३५ वर्षानंतर पण काश्मिरी हिंदू काश्मीर खोऱ्यात जायला घाबरतो तसा.
तेव्हा एका चित्रपटामुळे देशातील धार्मिक विद्वेश वाढत आहे असा ओरडा करण्यापेक्षा, काश्मिरी हिंदूंवर झालेल्या अत्याचाराबद्दल बोला, त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्यांना कडक शासन देत त्यांना न्याय द्या, काश्मिरी हिंदूंचे कश्मीरमध्ये पुनर्वसन होईल अशी परिस्थिती निर्माण करायचा प्रयत्न करा. सत्य पचवायची ताकद ठेवा. इतकाच फरक लक्षात ठेवा की इतकी होरपळ होऊनसुद्धा काश्मिरी पंडितांच्या मुलांनी शिक्षणाची कास धरली आणि देशाचे नाव जगात उंचावत आहेत आणि हेडमास्तरचा मुलगा असणारा काश्मिरी मुस्लिम मात्र हातात बंदूक धरत दहशतवादी बनत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा