"गलवान" : चीनला लागलेली आग !

 


ऑलिंपीक मोहत्सवाचा उपयोग आपल्या राजकीय फायद्यासाठी करणे हे नवीन नाहीये. मात्र चीनने तो उपयोग एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला आहे. चीन मध्ये २००८ साली मुख्य ऑलिंपीक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. तत्कालीन काळात चीन आक्रमकपणे चिनी शासन, चिनी व्यवस्थेची प्रपोगंडा करत होता. नेमके त्याच वेळी चीनच्या अंकित असलेल्या तिब्बेटमध्ये वेगळेच नाट्य सुरू होते. या आयोजनाचे जागतिक महत्व लक्षात घेता, तिब्बेत समस्येकडे जगाचे लक्ष वेधण्यासाठी तिब्बेती साधूंनी शांतीपूर्ण आंदोलन सुरू केले. मात्र चीन राज्यकर्त्यांना मात्र ते आंदोलन आवडले नाही. त्यांनी बाळाचा वापर करत हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला.  तिब्बेती साधूंना चिनी पोलिसांकडून झालेल्या मारहाणीनंतर मात्र तिब्बेत मधील परिस्थिती चिघळली आणि तिब्बेती नागरिक - चिनी पोलीस, चिनी नागरिक यांच्यात दंगल उसळली. चिनी पोलिसांनी अत्यंत निर्दयपणे ही दंगल आटोक्यात आणली, गोळीबार केला आणि जवळपास १५० ते २०० (अधिकृत आकडा १००) तिब्बेती नागरिक आणि साधूंना ठार केले. 


या विरोधात जगभरात रोष निर्माण झाला होता. भारतातील विस्थापित तिब्बेती नागरिक, सरकार सोबत जगभरात असलेल्या तिब्बेती लोकांनी आणि तिब्बेतीबद्दल सहानुभूती असलेल्यांनी त्या ऑलिंपीकवर बहिष्कार टाकावा असे आवाहन जागतिक ताकद असलेल्या देशांना करण्यात आले होते. मात्र तत्कालीन जागतिक राजकारणात हे आवाहन कोणीही फारसे गांभीर्याने घेतले नाही. तत्कालीन अमेरिकन राष्ट्रपती जॉर्ज डब्ल्यू बुश या सोहळ्याच्या उदघाटनाला उपस्थित होते. तत्कालीन चीन आणि तिब्बेत वादात भारताचे महत्व म्हणजे तिब्बेतचे सर्वोच्च धार्मिक नेते दलाई लामा भारतात आश्रयाला आहे. 


मात्र आता त्याच ऑलिंपीकचा दुसरा भाग म्हणजे शीत ऑलिंपीक खेळाचे आयोजन पुन्हा चीन मध्ये करण्यात आले आहे. मात्र २००८ पासून २०२२ पर्यंत या पुला खालून बरेच पाणी वाहून गेले आहे. जागतिक राजकारण बदलले आहे. २००८ च्या अत्यंत नेत्रदीपक अश्या ऑलिंपीक आयोजना नंतर सातत्याने आपली आर्थिक आणि सामरिक शक्ती वाढवली. ती ताकद नुसती वाढवलीच नाही तर तिचा उपयोग करत देशांतर्गत विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी तर केलाच, पण सोबतच आपल्या आजूबाजूच्या देशांवर वचक ठेवण्यासाठी, आपल्या विस्तारवादी प्रवृत्तीसाठी केला. इतकेच नाही तर आजपर्यंत जागतिक ताकद असलेल्या अमेरिकेवर कुरघोडी करण्यासाठी पण केला. याचे पडसाद जागतिक राजकारणात पडत आहेत. सोबतच चीन मधून सुरू झालेला चिनी कोरोना विषाणूत चीनने केलेल राजकारण आणि लपवाछपवी याचा पण असर या वेळी दिसत आहे. त्याचीच परिणीती म्हणजे अमेरिका, ब्रिटन, फ्रांस, जपान सारख्या देशांनी या शीत ऑलिंपीक खेळ मोहत्सवाच्या आयोजनावर राजनैतिक बहिष्कार टाकला आहे. हा बहिष्कार टाकतांना चीन मधील उइघर मुस्लिमांवर होणारा अत्याचार हे दृश्य कारण देण्यात आले. 


२००८ साल असो की २०२२ भारत सरकार मात्र या बहिष्कार राजकारणापासून दूरच होते. चीन आणि भारताचे संबंध सीमा विवादात अडकलेले आहे. त्यातही चीनची विस्तारवादी भूमिका नेहमी भारताच्या अंगावर आली आहे. तरी भारताने चीन सोबत सातत्याने सामंजस्याची भूमिका घेण्याचे धोरण अवलंबले. मात्र जून २०२० मध्ये चीनने केलेल्या गलवान खोऱ्यातील कुरापती आणि त्यात आपल्या सैनिकांना आलेल्या वीरमरणानंतर भारत आणि चीनचे संबंध अधिक ताणल्या गेलेत. जवळपास रोज आरोप - प्रत्यारोप होऊनसुद्धा भारताने या शीत ऑलिंपीक महोत्सवावर कोणत्याही पद्धतीने बहिष्कार घालण्याची भाषा वापरत या आयोजनाला गालबोट लावायचा प्रयत्न केला नव्हता. 


मात्र गलवान येथे झालेल्या हिंसक मारामारीत चीनने आपल्याला झालेले नुकसान जाहीर केले नसले तरी, चीनला त्या मारामारीत चांगलाच तडाखा बसला होता. त्या नंतर चीनला गलवान सोबतच, हॉट स्प्रिंग, पेंगांग लेक या भागात आपले सैन्य मागे न्यावे लागले होते. हा चीनला लागलेला मोठा धक्का होता आणि आहे. त्यातच भारत सरकारने आक्रमक राजकारण करत चीन विरोधात नाराजी असलेल्या देशात हातपाय पसरायला सुरवात केली. भारताची ही भूमिका खुद्द चीन आणि भारतातील चिनी हितचिंतकांना पचनी पडत नाहीये. 


मात्र चीनने गलवान मध्ये झालेले नुकसान जाहीररीत्या मान्य केले नसले तरी मनाला फार लावून घेतले आहे. म्हणूनच जागतिक मोठ्या राष्ट्रांनी या ऑलिंपीक मोहत्सवावर बहिष्कार टाकला असून सुद्धा भारताची खोडी काढलीच आणि या मोहत्सवाला स्वतःच्या हाताने अपशकुन घडवून आणला ! या मोहत्सवाची ज्योत चिनी सैनिकांच्या हातात दिली, हा सैनिक याच गलवान मध्ये झालेल्या भारत चीन मारामारीत गंभीर जखमी झाला होता. बरे याला जागतिक स्तरावर विशेष प्रसिद्धी मिळेल याचीही व्यवस्था चिनी यंत्रणेकडून करण्यात आली. हा भारताचा अपमान होता. भारताने पण या घटनेची योग्य दखल घेतली आणि आपला पण राजनैतिक बहिष्कार ऑलिंपीक मोहत्सवार जाहीर केला आहे. आता चीन मध्ये पाकिस्थानी पंतप्रधानांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल. म्हणजे पुन्हा पाकिस्थानचे जागतिक महत्व वाढले असे जाहीर करायला भारतातील विरोधक मोकळे !


मात्र एकीकडे रशिया आणि अमेरिकेमधील युक्रेन प्रकरणावरून तणाव वाढत असतांना, चीनचे हे वागणे आपल्याला अधिक सतर्क होण्याचे संकेत देत आहेत हे निश्चित ! ही सतर्कता चीन आणि पाकिस्थान सोबतच भारतातील चीन समर्थकांसोबत पण बाळगायला हवी.

टिप्पण्या