तदितर खग भेणे वेगळाले पळाले
उपवन-जल-केली जे कराया मिळाले
स्वजन गवसला जो त्याजपाशी नसे तो
कठिण समय येता कोण कामास येतो?
समर्थ रामदासस्वामी यांनी सांगितलेली उक्तीचा प्रत्यय युक्रेन आज घेत आहे. करणार, नाही करणार म्हणता म्हणता रशियाने युक्रेन विरोधात सैन्य कारवाई शेवटी आज सुरू केलीच आणि ज्या नाटो आणि अमेरिकेच्या भरवश्यावर युक्रेनचे नेते आस लावून बसले होते त्यांचा भ्रमनिरास सध्या तरी झाला आहे.
दोन दिवसांपूर्वी रशियन राष्ट्राध्यक्ष ब्लादनिर पुतीन यांनी राष्ट्राला संबोधित करतांना स्पष्टपणे रशिया युक्रेन यांच्यात असलेले ऐतिहासिक नाते, रशियाची युक्रेन कडून असलेली अपेक्षा आणि पश्चिमात्य राष्ट्र करत असलेल्या बदमाशीवर भाष्य केले होते.
९ व्या शतकात किवीयन रुस म्हणून समोर आलेले हे राज्य १२ शतका पर्यंत तत्कालीन रशियन साम्राज्य आणि ऑस्ट्रिया - हंगेरी साम्राज्यात विभागल्या गेले होते. १९२२ मध्ये अंतर्गत गृहयुद्धानंतर युक्रेन सोवियत संघाचा संस्थापक सदस्य झाला तर १९४५ साली संयुक्त सोवियत संघाचा म्हणजेच यु एस एस आर चा सह संस्थापक सदस्य झाला. १९९१ ला सोवियत संघ कोसळल्या नंतर युक्रेन स्वतंत्र देश म्हणून समोर आला.
साहजिकच सोवियत संघाच्या पतना नंतर समोर आलेल्या रशियन फडरेशनवर सोवियत संघ आणि त्या आधीच्या रशियन साम्राज्याचे ऐतिहासिक ओझे अंगावर घेणे भाग होते. सोवियत संघाच्या पतना नंतर रशियात वेगवेगळे फुटीर गट तयार झाले होते. त्यातच सोवियत संघाच्या पतना नंतर बनलेल्या रशियन फडरेशन कडे सोवियत संघाच्या काळात बनलेल्या सैन्य शक्तीची धुरा आली होती. रशियन फडरेशन सध्या आजारकदृश्य परिस्थिती आहे असे वाटत असले तरी योग्य हातात गेल्यावर तो मजबूत देश म्हणून समोर येईल यात कोणतीही शंका पाश्चिमात्य राष्ट्रांना नव्हती आणि म्हणूनच सोवियत संघावर काबू ठेवण्यासाठी निर्माण केलेली नाटो विसर्जित न करता त्याचा रोख रशियावर कायम ठेवत रशियाच्या बाजूने विस्तारित ठेवला.
ब्लादनिर पुतीन यांच्या हातात रशियन फेडरेशनची धुरा आल्यावर त्यांनी अतिशय निष्ठुरपणे रशियातील अंतर्गत फुटीरतेचे आवाज निपटवून काढले. इतकेच नाही तर पूर्व सोवियत संघाच्या प्रभावक्षेत्रात पुन्हा रशियन दबदबा वाढवण्याचा आक्रमक प्रयत्न सुरू केला. उझबेकिंस्थान, बेलारूस सारखे देश पटकन रशियन प्रभावाखाली आले, तर जॉर्जिया सारख्या देशांवर रशियाने सैन्य कारवाई करत नमवले.
या पार्श्र्वभूमीवर युक्रेनने नाटोचे सदस्यत्व घेणे आणि नाटोला थेट रशियन सीमेवर आणून उभे करणे हे पटण्यासारखे नव्हतेच. मात्र जी रशियाची मानसिकता होती तीच काहीशी मानसिकता नाटो सदस्यांची पण आहे. नाटो देशांनापण रशियन सीमेवर बस्तान बसवत सरळ सरळ रशिया विरुद्ध उघड संघर्ष करणे परवडणार नव्हतेच. मात्र आपण रशियन सीमेवर येऊ शकतो, आपण तयार आहोत हे दाखवत रशियावर दबाव बनवण्याचा मार्ग मात्र सापडला होता. पाश्चिमात्य राष्ट्रांच्या या सापळ्यात तत्कालीन काळात मोठा झालेला एक विनोदी अभिनेता अडकला ! व्होल्डोमेर झेलेन्स्की युक्रेनमध्ये तत्कालीन सरकारवर टीका करणाऱ्या एका विनोदी नाटकाचे मुख्य अभिनेता. तत्कालीन सरकारच्या भ्रष्टाचार आणि रशियाविरोधात घेतलेल्या कथित बोटचेपे धोरणाच्या विरोधात भाष्य असलेल्या या नाटकाला युक्रेनमध्ये अभूतपूर्व प्रसिद्धी मिळाली. व्होल्डोमेर झेलेन्स्की. यांची लोकप्रियता वाढली. इतकी की या लोकप्रियतेवर आरूढ होत, त्यांनी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढण्याचे ठरवले आणि पक्ष जन्माला आला "सर्व्हन्ट ऑफ पीपल" जनसेवक पक्ष !
पण नाटकात काम करणे आणि प्रत्यक्ष जीवनात राष्ट्रध्यक्ष होणे यातील फरक आता व्होल्डोमेर झेलेन्स्की यांच्या चांगलाच लक्षात आला असेल. २०१९ ला राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून व्होल्डोमेर झेलेन्स्की यांनी युक्रेनला नाटोचे सदस्यत्व प्राप्त व्हावे म्हणून बरेच प्रयत्न केले. मात्र एकीकडे रशिया या प्रयत्नांना तेव्हढाच मोठा विरोध करत होता, तर दुसरीकडे नाटोच्या सदस्य देशांनी पण युक्रेनला नाटोचे सदस्यत्व अजून दिले नाहीये.
मराठीत म्हण आहे ना, " बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी" तशीच ही गत ! आज या भांडणाचे निमित्त घेत रशियाने युक्रेनवर हल्ले सुरू केले आहेत. मात्र अजूनही कोणत्याही नाटो सदस्याने आपले सैन्य उघडपणे युक्रेनच्या मदतीला पाठवले नाही. अमेरिका पण फक्त रशियावर अजून कडक निर्बंध लावण्याचे आश्वासन देत आहे. एका बाजूने जरी हा पाश्चिमात्य देशांचा संयम दिसत असला, तरी तो तसा नाहीये. कारण याच पाश्चिमात्य देशांनी युक्रेनला रशिया विरोधात अवास्तव स्वप्न दाखवली आणि रशियाच्या विरोधात उभे केले, युक्रेनचा विरोधी अभिनेता उभा राहिला, आपली कुवत लक्षात न घेता आणि खलनायक ठरला रशिया !
फक्त रशिया आणि युक्रेन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला सामरिक आणि आर्थिक दृष्ट्या अजून मजबूत बनवावे लागेल हे वक्तव्य जास्त लक्षात घेण्यासारखे आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा