मध्यंतरी पेलस्टीन आणि इस्रायलमध्ये जोरदार हाणामारी झाली होती, कारण होते येरुशेलम नावाचे शहर ! येरुशेलम इस्रायलमधील पुरातन शहर, यहुदी जनतेचे पवित्र शहर आणि इस्रायलची अघोषित राजधानीच जणू. या शहराचे दोन भाग झाले आहेत. पूर्व भाग हा इस्लाम बहुल आहे. त्याच भागात यहुदी लोकांना वसवण्याचा प्रयत्न करत इस्रायल सरकार येरुशेलमची धार्मिक लोकसंख्या बदलवण्याचा कट करत असल्याचे आरोप व्हायला लागले. नेहमी प्रमाणे येरुशेलम मधील "अल अक्सा मशीद" या सगळ्या भांडणाचे मुख्य केंद्र राहिली आणि नंतर पेलस्टीन - हमासने यात उडी घेत मारामारी सुरु केली.
ही "अल अल अक्सा मशीद" नियमितपणे वादाचा मुद्दा बनत असते. इतिहास असा की आज ज्या ठिकाणी जगातील तमाम मुस्लिमांचे मक्का - मदिना नंतर तिसऱ्या क्रमांकाचे श्रद्धा स्थान आहे, तिथे अगोदर यहुदींचे पवित्र मंदिर होते.
इसवीसन ६४० मध्ये येरुशेलम इस्लामच्या ताब्यात आले. या नंतर एक बदल झाला तो म्हणजे इस्लामी खलिफा राशीदून यांनी यहुदी जनतेला येरुशेलममध्ये प्रवेशाची मुभा दिली आणि आपले धार्मिक कार्य करण्याचीही. अर्थात या औदर्याची पण काही कारणे होती. येरुशेलम जिंकल्यावर येथील जनता मोठ्या प्रमाणावर ख्रिश्चन धर्म मानणारी होती. आपले राज्य स्थिर करायला पहिले तिथे इस्लामचा प्रचार करणे आणि अनुयायी बनवणे आवश्यक होते. यहुदी धर्मापेक्षा इस्लामला मोठा लष्करी धोका खिश्चनांकडूनच होता. या परिस्थितीवर नियंत्रण ठेवायला मुस्लिम राज्यकर्त्यांनी यहुदी लोकांना काहीसे झुकते माप दिले. मात्र लवकरच तलवारीच्या जोरावर आणि बक्षीसाच्या आमिषाने येरुशेलम आणि इस्रायल परिसरात इस्लाम फोफावला. परिणामी या नंतर येरुशेलम मधील जिथे यहुदी धर्मियांचे पहिले पवित्र मंदिर बांधले गेले होते त्या दगडावर मुस्लिमांनी एक घुमट बनवला तो ओळखल्या जातो "डोम ऑफ रॉक" म्हणून ! हे त्यांनी केले इसवीसन ६९१ मध्ये. या नंतर इसवीसन ७०९ मध्ये अल अक्सा मशीद बांधल्या गेली बरोबर त्याच ठिकाणी जिथे यहुदी लोकांचे दुसरे पवित्र मंदिर बांधल्या गेले होते. इथूनच यहुदी आणि मुस्लिम यांच्या मध्ये कटुता यायला सुरुवात झाली. या नंतर आज पर्यंत यहुदी या अल अक्सा मशीदीच्या पश्चिमी भिंतीची पूजा करतात जी साधारण ईसविसनापूर्वी ३५२ मध्ये बांधलेल्या दुसऱ्या पवित्र मंदिराची भिंत आहे असे मानले जाते.
इस्रायलच्या जन्मानंतर अनेक कट्टर यहुदींना ही मशीद जमीनदोस्त करत त्या ठिकाणी पुन्हा पवित्र मंदिर बांधायचे आहे. सध्या यहुदी ज्या पद्धतीने मशिदीच्या आवाराच्या बाहेरून अल अक्सा मशीदीच्या पश्चिमी भिंतीची पूजा करतात ती त्यांना मान्य नाहीये. यहुदींना पण निदान मशिदीच्या आवारात जाऊन प्रार्थना करू द्यावी ही त्यांची जुनी मागणी.
मात्र अश्या प्रकारची कुठलीही मुभा द्यायला तेथील मुस्लिम तयार नाहीत. कारण एकूण इस्रायलचे आधुनिक चरित्र बघता अशी मुभा दिल्यास आणि इथे यहूदींची वर्दळ वाढल्यास, एक दिवस ही मशीद ते ताब्यात घेतील किंवा मशिदीच्या आवारात पुन्हा यहुदींच्या पवित्र मंदिराचे पुनर्जीवन करतील अशी भीती आहे. एकूण स्फोटक परिस्थिती बघता आणि असे काही बळजबरीने करण्याचा प्रयत्न केला असता मुस्लिम जगत तर आपल्या विरोधात असेलच, मात्र अकारण आपण बाकी जगाचा रागही ओढवून घेऊ याची कल्पना असल्यामुळे इस्रायल सरकार पण या कट्टर यहुदींना अल अक्सा मशीदीच्या आवारात जाण्यापासून रोखते.
मात्र आता या कट्टर यहुद्यानी नवीन मार्ग शोधून काढला आहे. काय आहे मार्ग? तर हे कट्टर यहुदी पूर्ण बेमालूम पणे मुस्लिम वेष परिधान करतात आणि आत जातात. या यहुदी कट्टरतावाद्यांच्या म्हणण्यानुसार आत जाऊन ते मुस्लिमांपेक्षा वेगळे काहीही करत नाहीये, ते तेथे प्रार्थना त्याच पद्धतीने करतात जसे मुस्लिम नियमितपणे करतात. फक्त मुस्लिम जी प्रार्थना म्हणतात ती न म्हणता यहुदी प्रार्थना म्हणतात, ती पण इतकी हळू की बाजूच्यालापण कळणार नाही. या करता यहुदींना बराच बदल स्वतः मध्ये घडवावा लागतोच, सोबतच या करता अरेबिक भाषा पण शिकावी लागते. मात्र या पद्धतीने मशिदीत प्रवेश करणे या यहुदींकरता धोकादायक असते. कारण चुकून त्यांची ओळख कोणत्याही कारणाने उघड झाली तर एक तर ते इस्रायली कायद्याच्या कचाट्यात सापडतील आणि त्यांची कारागृहात रवानगी होऊ शकते किंवा मुस्लिमांचा त्यांच्यावर हल्ला होऊन त्यांचा जीव पण जाऊ शकतो.
मात्र हा सगळा धोका पत्करून हे यहुदी या मशिदीत प्रवेश तर करतात, प्रार्थना करतात आणि या सगळ्याचा उद्देश, "एक दिवस ही मशीद नष्ट करून त्या ठिकाणी पुन्हा आपल्या मंदिराची पुनस्थापना करणे आहे. कारण इतक्या शतकांनी पुन्हा इस्रायल मध्ये येणाऱ्या यहुदी लोकांचे हेच मुख्य उद्दीष्ठ आहे." हे पण उघडपणे सांगतात.
खरे तर यहुदींना अल अक्सा मशीदीत जाता येते. मात्र आत जातांना त्यांना पोलीसांची परवानगी आणि पोलीस पाहऱ्यात तेथील फिरस्ती करावी लागते. त्या फिरस्तीतील मुख्य अट म्हणजे, कोणत्याही प्रकारे यहुदींना तेथे प्रार्थना करता येत नाही. अर्थात या दिलेल्या परवागीला पण तेथील मुस्लिम विरोध करत आहे. विशेष म्हणजे सरकार मुद्दाम मोठ्या प्रमाणावर याहूद्यांना अशी परवानगी देत, राजकारण करते असा आरोप होत आहे.
त्यातच अश्या खोट्या मुस्लिमांच्या वेशात यहुदी मशिदीत प्रवेश करत असल्याचे उघड झाल्यामुळे मुस्लिमांमधील रोष अधिकच वाढला आहे. या खोट्या मुस्लिमांच्या मशीद प्रवेशामागे पण इस्रायली सरकार आणि राजकारणी यांचा हात असल्याचा आरोप त्यांच्या कडून होत आहे. हे प्रकरण मुस्लिमांच्या आस्थेवर प्रहार करणारे तर आहेच, सोबत मुस्लिमांना भयभीत करणारे पण आहे असा आरोप आता होत आहे. आधीच इस्रायली पोलीस अत्याधुनिक हत्यारे घेऊन मशिदीत प्रवेश करत लोकांना भयभीत करतात हा ठपका ठेवल्या जात असतांनाच समोर येणाऱ्या या नवीन प्रकरणामुळे परिस्थिती अजून गंभीर बनली आहे.
एकीकडे इस्रायलचे राजनैतिक संबंध आज पर्यंत या देशाच्या आस्तित्वालाच आव्हान करणाऱ्या कट्टर इस्लामी देशनसोबत चांगले होत असतानाच, कट्टर यहुदींनी घेतलेली ही भूमिका मात्र या सगळ्यात अडसर ठरू शकते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा