सध्या एका ब्रिटिश संसद सदस्यामुळे भारत सरकारच्या कपाळावर धर्मबिंदू जमा झालेत. ब्रिटिश गुप्तचर संस्था एम आय 5 ने चिनी मूळ असलेल्या आणि २०१९ मध्ये तेव्हाच्या ब्रिटिश पंतप्रधान थेरेसा मे यांच्या लाडक्या वकिलीन बाई "क्रिस्टीन ली" हिच्या विरोधात काढलेल्या नोटीसीमुळे. तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान थेरेसा मे यांना क्रिस्टीन ली ने इतके प्रभावित केले होते की त्या या स्टीम लीची प्रशंसा करतांना थकत नव्हत्या. इतकेच नाही तर तिला "पॉईंट ऑफ लाईट अवार्ड" पण दिल्या गेला होता. जे लोक समाजात सकारात्मक बदल घडवून आणतात अश्या समाजसेवकांना ब्रिटन मध्ये पंतप्रधान "पॉईंट ऑफ लाईट" हा पुरस्कार दिला जातो. समाजसेवकांकरता हा एक प्रतिष्ठित पुरस्कार आहे.
कोण आहे ही क्रिस्टीन ली? तर ही बाई १९७४ साली हॉंगकॉंग वरून ब्रिटन मधील आयलंड येथे आपल्या आई वडिलांसोबत आली आणि स्थायिक झाली. येथेच तिने कायदे विषयक पदवी घेतली. सध्या लंडन मधील चिनी वकीलातीची मुख्य कायदे विषयक सल्लागार म्हणून काम बघत आहे. ब्रिटनच्या अनेक माजी पंतप्रधानांसोबत तिचे छायाचित्रे बाहेर येत आहेत. माजी पंतप्रधान थेरेसा मे सोबत तिचे विशेष साख्य होते हे वर सांगितले आहेच. तिने ब्रिटनमध्ये एक एन जी ओ स्थापन केला होता, ज्याचे नाव ब्रिटिश-चायनिज प्रोजेक्ट्स ! म्हणजेच बी सी पी ! या संघटनेचे काम आहे ब्रिटिश आणि चिनी नागरिकांमधील परस्पर सहयोग वाढवणे.
पण आता २०२२ मध्ये ब्रिटिश गुप्तचर संस्था एम आय 5 ने या क्रिस्टीन ली विरोधात एक इशारा जाहीर केला आहे. त्यात म्हंटल्या प्रमाणे या क्रिस्टीन ली चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या इशार्यावर ब्रिटिश नीती निर्धारण करणाऱ्या संसद सदस्यांना प्रभावित करत आहे. यामुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे चीनचा फायदा होत आहे. एम आय 5 ने या इशाऱ्यात दावा केला आहे की ख्रिस्तीना ली ही चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या "युनायटेड फ्रंट वर्क डिपार्टमेंट" म्हणजेच यु. एफ. डब्लू. डी. शी संबंधित आहे. आता तुम्हला प्रश्न पडला असेल की हे "युनायटेड फ्रंट वर्क डिपार्टमेंट" नक्की काय आहे? ही एक चिनी संस्था आहे. मात्र या संस्थेचे काम आणि ही अस्तित्वात कशी आली हे समजून घ्यायला आपल्याला चीन आणि चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या इतिहासात जावे लागेल.
१ जुलै १९२१ साली चीन मध्ये कम्युनिस्ट पक्ष म्हणजेच "सी सी पी" ची स्थापना झाली, याची प्रेरणा अर्थातच रशियाच्या कम्युनिस्ट पक्ष आणि तिथे झालेली बोल्शेविक क्रांती होती. मात्र चिनी कम्युनिस्ट पक्षाची वाटचाल खडतर होती. कारण चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापनेच्या दोन वर्षे आधीच सन यात शेंग यांनी को मिटांग पक्ष म्हणजेच "के एम टी" स्थापन केली होती. सन यात शेंग तत्कालीन चीन मधील राजेशाही विरोधातील लढ्यातील अग्रगण्य व्यक्तिमत्व होते आणि चीन मध्ये चांगलेच लोकप्रिय पण होत होते. तत्कालीन काळात सी सी पी ने या के एम टी पक्षाशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवले. जवळपास १९२६ पर्यंत हे संबंध अतिशय मैत्रीपूर्ण होते. मात्र १९२६ साली के एम टी चे संस्थापक सन यात शेंग यांचा मृत्यू झाला आणि पक्षाच्या प्रमुखपदाची धुरा चियांग काई शेक यांच्या अंगावर आली. चियांग काई शेक यांनी राजेशाही विरोधातील लढा अधिक तीव्र केला, सोबतच चीनला एकत्रित करण्याचा संकल्पपण केला. याचाच भाग म्हणून आपल्या मिलीशीय सैन्याने क्षेत्रीय सरदारांना हरवण्यासाठी युद्धाचा बिगुल फुंकला, यालाच म्हणतात "नोर्दन एक्सपीडिशन" ! मात्र सी सी पी ने याचा विरोध केला, परिणामी चियांग काई शेक यांनी सी सी पी सोबत आपले मित्रत्वाचे संबंध संपवले. इतकेच नाही तर त्यांनी चीन मधून सी सी पी ला संपवण्याच्या दृष्टीने पावले उचलायला सुरवात केली.
याचाच भाग म्हणून १२ एप्रिल १९२७ साली शांघाई येथे रक्तरंजित संघर्ष झाला. के एम टी ने या दिवशी सी सी पी संबंधित सुमारे पाच हजार लोकांना कंठस्नान घातले. या घटनेनंतर सी सी पी चीन मधून जवळपास संपल्यात जमा होती, मात्र तसे झाले नाही.
सी सी पी ने स्थापने नंतर मिळालेल्या काळात चीन मधील शिक्षक, गणमान्य लेखक, बुद्धिजीवी, अभिनेते, विद्यार्थी, उद्योजक-व्यापारी, यांच्या मध्ये आपल्यासाठी जागा तयार केली होती. यातील बहुसंख्य सी सी पी चे प्रत्यक्ष कायकर्ते नव्हते किंवा त्या पक्षाशी कोणत्याही प्रकारे जुळलेले नव्हते. मात्र तरीही हे सगळे मोठ्या प्रमाणावर सी सी पी पक्षाची तळी उचलत होते. तत्कालीन परिस्थितीत चीनला एकत्रित ठेवण्यासाठी, देशात लोकशाहीची स्थापना करण्यासाठी आणि देशाला वैभवकडे नेण्यासाठी सी सी पी शिवाय पर्याय नाही हे वेगवेगळ्या पद्धतीने देशवासीयांच्या मनावर बिंबवत होते. परिणामी इतका नरसंहार करूनही सी सी पी संपली नाही. तिला चीनमध्ये मिळणारे समर्थन वाढत गेले आणि के एम टीची चीन मधील वाटचाल आपोआप मंदावली. हा सगळा सी सी पीचा प्रपोगंडा एका योजनाबद्ध पद्धतीने चालवल्या जात होता. ज्याला कमालीचे यश मिळाले. याच सगळ्या प्रपोगंडा सिस्टीमला नंतर संस्थेच्या रुपात अस्तित्वात आणले गेले. हीच संस्था म्हणजे "युनायटेड फ्रंट वर्क डिपार्टमेंट" म्हणजेच यु एफ डब्लू डी !
१९३९ साली सी सी पी ने चियांग काई शेक यांच्या सैन्याला हरवले आणि लवकरच चीनवर आपला अधिकार घट्ट करायच्या मागे लागले. तेव्हा या युनायटेड फ्रंट वर्क डिपार्टमेंटच्या कामाचे स्वरूप पण बदलण्यात आले. आता सी सी पीला चीन अंतर्गत अश्या संस्थेची गरज नव्हती, तेव्हा आता या संस्थेचे कार्यक्षेत्र चीनच्या बाहेर राहील असे ठरवण्यात आले. या संस्थेचे काम आहे चीनच्या बाहेर वेगळ्या देशात चीन विरोधी काम करणाऱ्यांचा बिमोड करणे आणि हे करण्यासाठी त्याच देशातील शक्तींचा वापर करणे.
नाही ना लक्षात आले? थोडक्यात सांगायचे तर एखाद्या देशात चीनच्या हिताला तडा जाईल अशी नीती किंवा कायदा मांडण्यात येणार असेल तर त्या विरोधात त्याच देशातील बुद्धिजीवी, व्यापारी, विद्यार्थी, लेखक यांना त्या नीती किंवा कायद्याच्या विरोधात आवाज उठवायला लावायचा आणि त्या नीतीला किंवा कायद्याला आमलात आणण्यापासून रोखायचे. इतकेच नाही तर एखाद्या देशातील नेता चीन विरोधी वक्तव्य करत असेल किंवा चीनच्या हिताला बाधा आणण्याचा प्रयत्न करत असेल तर या नेत्याच्या विरोधात अश्याच बुद्धिजीवी, पत्रकार, संपादक, नेते, लेखक आणि विद्यार्थी यांच्या तर्फे बदनामी मोहीम इतक्या प्रभावीपणे राबवायची की तो नेता राजकारणातून बाहेर फेकला जाईल. सोबतच प्रत्येक देशातील अश्या लोकांना एकत्र करायचे ज्यांचा चीन बद्दल ज्यांचा दृष्टिकोन उदार आहे किंवा ज्यांना चीन विषयी सी सी पी विषयी ममतत्व आहे. अश्या लोकांना आर्थिक किंवा दुसऱ्या पद्धतीने मदत करायची. त्यांना त्या त्या देशात अधिक महत्व मिळेल याची तजवीज करायची. ही सगळी कामे हीच युनायटेड फ्रंट वर्क डिपार्टमेंट या संस्थेच्या देखरेखीत होतात. या संस्थेला सरळ सी सी पी हायकमांड कडून आदेश येतात. एका अर्थी युनायटेड फ्रंट वर्क डिपार्टमेंट हे चीनचे असे जादुई शस्त्र आहे की, जे चीनला कोणत्याही आंतराष्ट्रीय संकटातून अलगत बाहेर काढू शकते. हे सगळे करतांना कुठेही चीन सरकारचे नाव पुढे येत नाही हे विशेष ! आता ब्रिटनच्या एम आय 5 ने जिच्या विरोधात इशारा दिला ती क्रिस्टीन ली याच युनायटेड फ्रंट वर्क डिपार्टमेंटच्या अधीन काम करत असल्याचा संशय आहे.
आता इथे भारत सरकारला घाम फुटायचे कारण काय? एक तर सध्या भारताचा चीन सोबत संघर्ष सुरू आहे. दोन्ही देश सीमेवर एकमेकांसमोर उभे राहिले आहेत. याच काळात भारत सरकार चीन विरोधात सैन्याला प्रभावीपणे हालचाल करता यावी म्हणून चीन सीमेवर मोठ्या प्रमाणात रस्ते आणि इतर विकासाची कामे करीत आहे. त्याला पर्यावरणाच्या नावाखाली विरोध करणारे एकाएकी वाढले आहेत. इतकेच नाही तर भारतातील वाढत जाणाऱ्या उत्पादन उद्योग क्षेत्रात संप वगैरे घडवत खीळ घालण्याचा उद्योगात पण चिनी हात दिसत आहेत. तेव्हा सजग झालेल्या भारत सरकार समोर एका ब्रिटिश संसद सदस्याचे नाव आल्यावर कपाळावर आठ्या येणे साहजिक होते. हे संसद सदस्य आहे बॅरी गार्डनर !
या क्रिस्टीन लीच्या लॉ फर्मने बॅरी गार्डनर यांना जवळपास ६ कोटी रुपयांचे डोनेशन दिले आहे. इतकेच नाही तर क्रिस्टीन ली हिच्या एका पोराला गार्डनर यांनी आपल्याकडे नोकरी पण दिली होती. क्रिस्टीन लीची संघनटना बी सी पी करता पण या गार्डनर महाशयांनी काम केले आहे. हे गार्डनर महाशय ज्या भागातून निवडणूक जिंकून येतात तो भाग भारतीय बहुल आहे. त्यांनी ब्रिटिश आणि भारतीय वंशाच्या नागरिकांमध्ये समन्वय साधण्याचे काम केल्याचे बोलले जाते. त्यांना भारतीयांचे मित्र म्हणूनपण ओळखल्या जाते. याच कारणाने भारत सरकारने त्यांचा जानेवारी २०२० साली पद्मश्री देत सन्मान केला होता. आता लक्ष याकडे आहे की गार्डनर महाशयांनी ब्रिटिश सरकारच्या भारत नितीवर काही प्रतिकूल प्रभाव तर टाकला नाही. मात्र स्वतः गार्डनर यांनी आपल्यावरील सगळे आरोप फेटाळून लावले आहेत.
सध्या ब्रिटनच्या राजकीय जगतात एम आय 5 च्या इशाऱ्यामुळे बरीच खळबळ माजली आहे. ब्रिटनच्या गृहमंत्री प्रीती पटेल यांच्या वक्तव्यानुसार या संबंधी अधिक तपास सुरू आहे आणि येत्या दिवसात अनेक आश्चर्यकारक माहिती बाहेर येत सरकारला आणि सामान्य नागरिकांना अधिक धक्के बसू शकतील.
आता या सगळ्या गदरोळावर चीनची प्रतिक्रिया काय आहे? तर चीनने आपल्यावरील सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. चीनला कोणत्याही प्रकारे दुसऱ्या देशात हस्तक्षेप करण्याची गरज नाही असे चीनचे म्हणणे आहे. उलट ब्रिटन मधील चिनी दूतावसाने आरोप केला आहे की ब्रिटन चिनी वंशीय लोकांचे चारित्र्य हनन करत आहे.
मात्र तुम्ही आता इतके सारे वाचल्यावर विचार करा की, चीन बद्दल भारतात कोण चांगले बोलतो किंवा चीनच्या सरकारी प्रपोगंडयाला भारतात प्रसिद्धी देत आपल्या सरकारला कोण खोटे पडायची पराकाष्ठा करतो. हे सगळे चीनच्या "युनायटेड फ्रंट वर्क डिपार्टमेंट" चे पगारी नौकरी तर करत नाहीये ना!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा