आमचा तो बाब्या, दुसऱ्याच कार्ट




किरण माने नावाच्या जातीय द्वेष करणाऱ्या आणि आपल्या विचारधारेच्या विरोधी असलेल्या लोकांना, नेत्यांना (मग त्यात देशाचे पंतप्रधान असो, की राष्ट्रपती) अत्यंत असभ्य शब्द वापरत आपली कथित अभिव्यक्ती दाखवणाऱ्या कथित अभिनेत्याला एका मराठी वाहिनीने आपल्या एका कार्यक्रमातून काढून टाकले. या वरून आता बराच गदारोळ सुरू आहे. विशेषतः राज्यात सतत जातीय गरळ ओकत आपली राजकीय गणित मांडणारे तथाकथित पुरोगामी या किरण माने यांच्या मागे पहाडा सारखे उभे असल्याचा देखावा करत आपली पोळी शेकत आहेत. यांचा आरोप असा की, समाज माध्यमांवर आपली राजकीय मते मांडली आणि केंद्र सरकारवर टीका केली म्हणून किरण माने यांना मालिकेतून काढण्यात आले आहे. 


मात्र आता प्रकरणावरून बरेच वाद सुरू आहेत. पुन्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीचे रडगाणे सुरू झाले आहे. अर्थात हे काही नवीन नाही. साधारण २०१४ पासून भारतातील अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आल्याचा साक्षात्कार काही लोकांना प्रकर्षाने होत आहे, त्यात अजून एका प्रकरणाची भर !


मात्र अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा झेंडा फडकवणार्याचे हे स्वातंत्र्य किती मतलबी असते त्याची झलक वेळोवेळी पाहायला मिळते. मग जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्या सोबत काम करणार नाही असले ट्विट टाकणाऱ्या कोण्या "धूमकेतू" निर्माता - दिगदर्शकाला एकाएकी प्रसिद्धी देण्यात येते. तेव्हा मात्र विक्रम गोखले यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे तेही सभ्य शब्दात व्यक्त केलेल्या अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य मात्र या लोकांना मान्य नसते. 



याच विक्रम गोखले यांनी जेव्हा २०१९ च्या निवडणुकीच्या वेळेस "भारतातील लोकशाही धोक्यात आहे." असे बोलणाऱ्यांना थोबाडून काढावे. असे वक्तव्य केले होते तेव्हा पण असाच गदारोळ तथाकथित अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गोडवे गणार्यांनी, "ही झुंडशाहीची भाषा आहे." म्हणत आकाश पाताळ एक केले होते. 


मात्र प्रसिद्ध नाटककार तेंडुलकरांनी एका भाषणात जेव्हा, "माझ्या कडे पिस्तुल असते तर मी नरेंद्र मोदींवर गोळ्या चालवल्या असत्या." सारखी भाषा वापरली होती त्याचे कौतुक निर्भीड वक्तव्य म्हणत करत त्यांना डोक्यावर बसवण्यात आले होते. निखिल वागळे सारखा एक पत्रकार जेव्हा नरेंद्र मोदी यांचा खून करावासा वाटतो म्हणतो, तेव्हा त्यात झुंडशाही आणि वैचारिक खुनशीपणा न वाटता निर्भीडता यांना दिसून येते, हे कसे? 


राज्यातील असेच एक प्रसिद्ध अभिनेते योगेश सोमण यांनी समाज माध्यमाद्वारे भारताचा राजपरिवार असलेल्या नेहरू - गांधी कुटुंबियांवर टीका केली म्हणून मुंबई विद्यापीठातील "अकादमी ऑफ थेटिअर आर्ट्स" च्या संचालक पदाची त्याची जवाबदारी काढून घ्यावी असा दबाव बनवण्यात आला, त्यांना जबरदस्तीने सुट्टीवर पाठवण्यात आले होते. 



आता यात योगेश सोमण असो किंवा विक्रम गोखले यांची वक्तव्ये पूर्णतः राजकीय आणि सभ्य भाषेत मांडली होती, कोणत्याही पद्धतीने त्यात जातीय दर्प नव्हता. यातही योगेश सोमण यांनी समाज माध्यमांवर मत मांडली असली तरी विक्रम गोखले यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देतांना आपली वयक्तिक वैचारिक भूमिका सांगितली होती. तरीही त्यावर गदारोळ करत त्यांना काम मिळणार नाही आणि ते करत असलेल्या कामावरून त्यांना दूर करण्याचे काम केल्या गेले. या सगळ्या मागे तीच लोक होती, जी आज किरण माने यांच्या मागे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पुरस्कारकर्ते म्हणून उभे आहेत, हेच मुळी हास्यास्पद आहे. 


बाकी किरण माने यांची कथित वैचारिक खोली फक्त जातीय टिपण्या देतांना अत्यंत गलिच्छ शब्दात बहरून येते. देशाच्या संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल कशी भाषा वापरायची याची अक्कल ज्याला नाहीये, त्याच्या अभिनयाचा दर्जा रिकाम्या नाट्यगृहात नाटक करायच्या लायकीचाच असेल. (मी मालिका बघत नाही, त्या मुळे याचे काम मी बघितले नाही) 


बाकी शरद पवार यांना "साधा राज्यसभेचा सदस्य" म्हंटल्यावर नाकाला मिरच्या लागलेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी कोणाला कशी धमकी देत "अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी" केली होती याची उदाहरणे समोर आहेत. बाकी किरण माने यांचे गेलेले काम खरेच त्यांच्या "वैचारिक कामगिरी" मुळे गेले की, "सुमार अभिनयामुळे" हा संशोधनाचा विषय आहे. मात्र त्यांची वैचारिक बांधिलकी बघता त्यांनी सहकलाकारांसोबत अत्यंत विषारी जातीय चष्म्यातून आलेल्या वैचारिक प्रवृत्तीने केलेल्या वागणुकीतून हे काम गेल्याचा संभव जास्त. तेव्हा ही "अभिव्यक्ती स्वातंत्र्याची" टिमकी न वाजवलेली बरी !

टिप्पण्या