पश्चिम बंगाल मधील निवडणुका आणि त्यामध्ये झालेला भाजपाचा कथित पराभव यामुळे गेल्या काही काळापासून भाजपा विरोधी गटाच्या आनंदाला उधाण आले आहे. परिणामी आधीच महत्वाकांक्षी आणि आक्रमक असणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी अजून अधिक आक्रमक रित्या राष्ट्रीय राजकारणात आपला नवीन डाव सुरू करत आहेत.
त्यांनी दोन पद्धतीने हा खेळ खेळायला सुरवात केली आहे. त्यातील, सहज केला जाणारा, पहिला आणि महत्वाचा भाग म्हणजे भाजपा विरोधी पक्षाच्या नेत्यांना आपल्या बाजूने वळवणे, या करता विविध नेत्यांसोबत भेटणे आणि चर्चा करणे. दुसरे म्हणजे भारतातील इतर राज्यात होणाऱ्या निवडणुकीत होता होईल तिथे तृणमूल काँग्रेसचे उमेदवार उभे करत आपल्या पक्षाचे अस्तित्व देशभरात दाखवणे. याचाच भाग म्हणून या वेळेस पश्चिम बंगाल व्यतिरिक्त तृणमूल काँग्रेस पूर्ण ताकदीने त्रिपुरातील स्थानीय संस्थांच्या निवडणुकीत उतरली होती. सोबतच पश्चिम बंगाल पासून दूर असलेल्या गोवा सारख्या छोट्या राज्यातील विधानसभेच्या निवडणुकापण लढवणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे आणि त्या दृष्टीने पावले पण टाकल्या जात आहे. ज्या ममता बनर्जीने आपली कारकीर्द टाटा सारख्या कारखानदाराला पश्चिम बंगालच्या बाहेर काढून चमकवली, त्याच ममता बॅनर्जी मुंबई भेटीत भाजपा मित्र असल्याचा आरोप झेलणाऱ्या गौतम अडाणी सोबत भेटतात, त्यांना पश्चिम बंगालमध्ये गुंतवणूक करण्याचे साकडे घालतात आणि मुख्य म्हणजे तसे छायाचित्र आणि बातमी देशाच्या मोठ्या वृत्तपत्रात छापुन पण आणतात. हे ममता बॅनर्जी यांना लवकर राष्ट्रीय नेते व्हायचे आहे हेच दर्शवते.
हा सगळा खटाटोप एकूणच भाजपाच्या केंद्रातील सत्तेला आणि विशेषतः मोदी - शहा जोडगोळीला शह द्यायला म्हणून आहे. तसे तर २०१४ पासूनच नरेंद्र मोदी यांना पर्याय शोधायचा प्रयत्न केला जात आहे. या करता विरोधक इतके घायकुतीला आले आहे की, वेगवेगळ्या कारणाने नरेंद्र मोदी यांच्या विरोधात उभ्या राहणाऱ्या कोणत्याही दगडाला हे देव म्हणून पूजयला तयार आहेत. याचे महत्वाचे कारण म्हणजे मोदी आणि भाजपच्या राजकारणाला शह देण्यात काँग्रेस आणि सोनिया-राहुल-प्रियांका या काँग्रेसच्या नेतृत्वाला आलेले अपयश हेच आहे.
तसेही देशाच्या केंद्रीय राजकारणात "तिसऱ्या आघाडी" चे प्रयत्न आजचे नाहीत आणि हेच तिसऱ्या आघाडीचे स्वप्न विरोधकांची एकजूट करू शकत नाही. सध्यातरी काँग्रेस विरोधकांसाठी "सांगताही येत नाही आणि दाखवता पण येत नाही" असे अवघड जागेचे दुखणे झाले आहे. कारण सरळ आहे भाजपा आणि मोदी विरोधकांमध्ये भाजपाच्या तोडीसतोड राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेसच आहे. इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी कितीही आदळआपट केली तरी कोणताही पक्ष राष्ट्रीय ठरेल असे नाही आणि निवडणुकीच्या जागा वाटपात नेमके याच सत्याचा परिचय काँग्रेस इतर पक्षांना करून देते. मात्र कॉंग्रेच्या नेतृत्वाच्या मर्यादा आता पुरेशा स्पष्ट होत आहेत. खुद्द काँग्रेसमधून नेतृत्वा विरोधात सूर उमटायला लागले आहे. सध्या तरी काँग्रेस अंतर्गत त्याला जास्त महत्व दिले गेले नसले तरी, दखल घेतली गेली आहे. या सगळ्याचा असर काँग्रेसच्या राष्ट्रीय राजकारणावर पडला आहे.
नेमकी हीच पोकळी भरण्याची तयारी ममता बॅनर्जी सध्या आपले राजकीय सल्लागार प्रशांत किशोर आणि नुकतीच जिंकलेल्या पश्चिम बंगाल निवडणुकीचे पुण्य सोबत घेऊन करायचा प्रयत्न करत आहे. ममता बॅनर्जी आणि प्रशांत किशोर यांना विरोधकांची एकजुट करायची आहे आणि त्या करता हा महाराष्ट्र दौरा होता असे वाटत असेल तर ती खूप मोठी चूक ठरणार. पश्चिम बंगाल मध्ये एकट्याच्या बळावर मिळवलेल्या विजयाला आता राष्ट्रीय स्तरावर चमकवत आपल्या पक्षाची कक्षा वाढवणे हाच सध्या तरी त्यांचा पहिला उद्देश आहे. गोव्यात कॉंग्रेसचा नेता फोडत, तेथील निवडणुकीत स्वतःचे अस्तित्व दाखवणार आहे. त्रिपुरा मध्ये झालेल्या स्थानीय संस्थांच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने भाग घेत एक उमेदवार निवडून आणत आपल्या पक्षाचा झेंडा एका राज्यात वाढवला आहे.
ममता बॅनर्जींच्या या प्रयत्नांमुळे त्याचे राजकारण भाजपा विरोधी नसून विरोधकांच्या एकी विरोधात असल्याची आवळी आता उठवण्यात येईल, ममता बॅनर्जी भाजपची बी टीम असल्याचे पण सांगण्यात येईल. मात्र, पश्चिम बंगालमध्ये जो काही खेळ झाला आहे, त्या कडे बघता जनतेच्या मनात असे काही भरवत ममता विरोध करणे विरोधकांना पण कठीण होणार आहे. हीच खरी गोची आहे.
ममता बॅनर्जी यांचा आक्रमकपणा विरोधकांना पण भारी पडणार आहे. अनेकांची भविष्याची स्वप्ने सध्यातरी धुळीला मिळणार आहे. त्याचमुळे ममता बॅनर्जी यांच्या राज्यातील दौऱ्याच्या अगोदर तयार करण्यात आलेले भाजपा विरोधी वातावरण हा दौरा संपल्यावर काँग्रेस विरोधी झाले. इतरांना गुगली टाकणाऱ्यांना ममता बॅनर्जी यांनी गुगली टाकली असा याचा अर्थ होऊ शकतो.
बाकी प्रशांत किशोर यांच्या सोबत बसून कागदावर बनवलेल्या रणनीती नुसार ममता बॅनर्जी यांनी आक्रमकपणे राष्ट्रीय राजकारणात मार्गक्रमण सुरू केले असले तरी, याच्या काही मर्यादा आहेतच. सध्या तरी तयार राजकारणाची फळी सोडून कोणी ममता बॅनर्जी सोबत येईल ही आशा फोल आहे. मात्र पुढील काही इतर राज्यातील निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा सहभाग आणि त्यांना मिळणारे यश यावर बरेच काही अवलंबून राहील. तरी ममता बॅनर्जी यांच्या वाटेवर काटे सत्ताधारी लोकांकडून नाही तर विरोधकांमधील त्याच्या संभाव्य मित्रांकडूनच अधिक टाकले जातील. मात्र त्यावर मात करत ममता बॅनर्जी पुढे आल्या तर विरोधकांमधील अनेकांची स्वप्ने धुळीला मिळतील हे मात्र नक्की !
एकूण काय? तर ममता बॅनर्जी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यामूळे विरोधकांच्या एकजुटीला धक्का लागला आहे, भाजपाला नाही. हे जरी खरे असले तरी देशाच्या राजकारणात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा, बंगाली वारे कितपत भरून काढतात आणि यामुळे तयार होणाऱ्या वादळाचे परिणाम नक्की कोणाला भोगावे लागतात, की किनारपट्टीला धडक देण्याआधीच वादळ शांत होते किंवा करविल्या जाते हे पाहणे मनोरंजक ठरेल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा