"मुस्लिम उम्मा" की "मराठी मुस्लिम" काय महत्वाचे?



त्रिपुरा येथे कथित पणे होत असणाऱ्या मुस्लिम अत्याचाराविरोधात इकडे महाराष्ट्र राज्यात मोर्चे काढणाऱ्या आणि त्या मोर्चांना हिंसक वळण देणाऱ्या रजा अकादमी या संस्थे बद्दल आता काही मराठी मुस्लिम आवाज वाढवत आहे. राजा अकादमी विरोधी घेतली जाणारी ही भूमिका स्वागतहार्य आहे. 


मात्र या रजा अकादमी विरोधात मत व्यक्त करतांना मुख्यतः ही संस्था राज्यातील मराठी मुस्लिमांचा विचार करणारी नाही आणि ही संस्था उत्तर प्रदेशी मुस्लिम लोकांचे नेतृत्व करते हा मुख्य आक्षेप घेतला जात आहे. सोबतच उत्तर प्रदेशात भाजपा सरकार असल्यामुळे या दंगली मागे भाजपा आहे असा संशय या सगळ्या भूमिकेत दिसत आहे. इतर वेळेस राज्यातील कोणत्याही भागात अश्या दंगली झाल्यावर शांत बसणारे मराठी मुस्लिम एकाएकी रजा अकादमी विरोधात भूमिका घेत त्या संस्थेचे संबंध थेट भाजपा सोबत जोडायचा जो प्रयत्न सुरू आहे त्याला राजकीय वास येत आहे. 


विशेषतः शिवसेनेचे नेता संजय राऊत यांनी सगळ्यात पहिले रजा अकादमी आणि भाजपाचे साटेलोटे असल्याचा आरोप केला आणि या पद्धतीच्या भूमिका असलेले लेख समाज माध्यमांवर दिसायला लागले हा नक्कीच योगायोग नाही आणि मराठी मुस्लिमांची सहज आलेली प्रतिक्रिया नाही असे म्हणायला बराच वाव आहे.



११ ऑगस्ट २०१२ साली मुंबईतील ऐतिहासिक आझाद मैदान भागात म्यानमार मधील रोहिग्या मुस्लिमांवर होणाऱ्या कथित अत्याचाराविरोधात या रजा अकादमीने मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चाला पण असेच हिंसक वळण लागले होते. तेव्हा महाराष्ट्रात पहिल्यांदा रजा अकादमी प्रकाशझोतात आली.  तत्कालीन आघाडी सरकारने त्या घटनेमध्ये लिप्त असलेल्या एकाही आरोपीवर किंवा मोर्चा काढणाऱ्या कट्टर सुन्नी मुस्लिम विचारधारा असलेल्या या रजा अकादमीवर कोणतीही कायदेशीर कारवाई केली नव्हती. 


या दंगलीत आझाद मैदानातील स्वतंत्रता सेनानी स्मारकाची नासधूस तर केल्या गेलीच होतीच, मात्र आपल्या कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस कर्मचारी आया बहिणींवर पण हात टाकल्या गेला होता. वृत्तपत्र वाहिन्यांच्या गाड्या फोडण्यात आल्या होत्या. मात्र इतके सारे होऊनही तत्कालीन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने या रजा अकादमी विरोधात अजिबात कायदेशीर कारवाई केली नाही. या दंगलीला वर्ष झाल्यानंतर आता राष्ट्रवादी - काँग्रेस महाआघाडी करत सत्तेत बसलेल्या शिवसेनेने मात्र तेव्हा भाजपा सोबत रजा अकादमी आणि तत्कालीन सरकार विरोधात निषेध मोर्चा काढला होता. तेव्हा संजय राऊत यांना रजा अकादमी आणि भाजपाचे असलेले संबंध माहीत नव्हते का? तेव्हा या दंगली विरोधात समाज मध्यम, वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांवर गदारोळ सुरू असतांना आज जागे झालेले हे कथित मराठी मुस्लिम कोणत्या कुंभकर्णी झोपेत होते? 



बरे, आझाद मैदान दंगल हीच एक रजा अकादमीची पुण्याई नाही. या अगोदर पण २००६ साली भिवंडी येथे झालेली दंगल आणि त्यात मारल्या गेलेले दोन पोलीस या घटनेचा ठपका पण रजा अकादमीवर आहे. आपल्याला आठवत असेल तर याच भिवंडी दंगलीच्या विरोधात तत्कालीन काळात शिवसेनेने मोठी भूमिका घेतली होती. त्या भूमिकेचा राजकीय फायदा पण शिवसेनेला मिळाला होता. मात्र तेव्हा पण आज बाहेर येत असलेला मराठी मुस्लिम आणि उत्तर प्रादेशी मुस्लिम हा मुद्दा समोर आला नव्हता असे कसे? 


बाकी करून सवरून नामानिराळे राहायचे हा रजा अकादमीची कार्यपद्धती आहे. २००६ ची भिवंडी दंगल असो, की २०११ ची आझाद मैदान दंगल किंवा परवा राज्यातील अनेक शहरात घातलेला धुडगूस असो, रजा अकादमीची भूमिका नेहमीच हात झटकण्याची राहिली. आंदोलनातील दंगलखोर आमचे नाहीत म्हणत स्वतः नामानिराळे राहायचे आणि दंगलीचा आरोप फेटाळून लावायचे. 



मुंबई पोलिसांच्याच आझाद मैदान दंगलीच्या अहवालानुसार २०११ मध्ये पण रजा अकादमीने मुस्लिम अत्याचार विरोधी आंदोलनासाठी परवानगी मागितली होती. ही परवानगी मागतांना या आंदोलनात जवळपास ५०० ते ५५० चा जमाव जमेल असा अंदाज देण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात या पेक्षा कितीतरी अधिक जमाव आंदोलनात जमला आणि त्या जमावाने प्रथम हल्ला पोलिसांवरच केला. 


आता या रजा अकादमीचा असा इतिहास माहीत असतांना आणि राज्यातील विविध भागात रजा अकादमी असे आंदोलन करणार आहे हे माहीत असतांना पण राज्य गृहखाते झोपले होते काय? यातील अजून वाईट गोष्ट ही की, मालेगाव आणि अमरावती शहरात तर कोणतीही प्रशासकीय परवानगी न घेता हे आंदोलन आणि मोर्चा काढण्यात आला. 



बरे हे आंदोलन किंवा मोर्चाचे नियोजन एका दिवसात तर नक्कीच झालेले नाही. राज्यातील जवळपास सहा-सात शहरात एकदम जमाव नक्कीच जमला नाही. या अगोदर काही दिवस असे आंदोलन करायचे म्हणून प्रचार झाला असणारच तेव्हा त्या त्या शहरातील, विशेषतः अमरावती आणि मालेगाव शहरातील जिथे असल्या आंदोलनाची परवानगीच घेतल्या गेली नव्हती, तेथील गुप्तवार्ता खाते काय करत होते? की या विभागाने आपली कामगिरी योग्य प्रकारे केली, मात्र वरून पोलिसांचे हात बांधल्या गेले? 


बाकी रजा अकादमी या संस्थेचे साटेलोटे नक्की कोणासोबत आहे हे आपण वेगळे सांगायला नको. आज मराठी मुस्लिम म्हणत या दंगलीची जवाबदारी भाजपावर टाकायचा साळसूद पणा करणाऱ्या मराठी मुस्लिमांनी एकाच प्रश्नाचे उत्तर द्यायचे तो प्रश्न म्हणजे रजा अकादमी उत्तर प्रदेशातील मुस्लिमांची संघटना आहे आणि त्याला राज्यातील मराठी मुस्लिम आपली मानत नाही तर चिनी कोविड प्रकोपत येणाऱ्या मुस्लिम सणांना कसे साजरे करायचे या विषयी सल्लामसलत करायला राज्य सरकार रजा अकादमी सोबत का चर्चा करायचे? मराठी मुस्लिमांची अशी कोणती संस्था किंवा राजकीय पक्ष राज्यात आहे जी, मराठी मुस्लिमांची म्हणून बाजू घेते किंवा मराठी मुस्लिमांचा विचार करते म्हणून सांगते ? राज्यात नाव कमावून असलेल्या तबलिकी जमात, जमात ए इस्लामी हिंद, रजा अकादमी, ऑल इंडिया उलेमा बोर्ड, ऑल इंडिया सुन्नी जमियतुल उलेमा, तहफ्फुज-नमूस-ए-रिसासत, मुस्लिम स्टुडंट ऑर्गनाइजेशन ऑफ इंडिया किंवा राजकीय पक्ष AIMIM हे सगळे राज्याबाहेरील तर आहेत. अश्या वेळेस जगातील सगळे मुस्लिम एक आहेत असे सांगितले जाते, जागतिक "मुस्लिम उम्मा" ची भालमण याच लोकांकडून केली जाते आणि आज अचानक "मराठी मुस्लिम" प्रेम समोर कसे आले? 


बाकी मोहम्मद - दि मसेंजर ऑफ गॉड या चित्रपटावर बंदी आणा म्हणून रजा अकादमीवाले सरळ राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतात, रमजान महिन्यात मशिदीत प्रवेश द्यावा म्हणून रजा अकादमी मुख्यमंत्र्यांना थेट भेटून पुढाकार घेतात, इतकेच नाही तर भारतात नसलेला "ईश निंदा कायदा" म्हणजे "मोहम्मद पैगंबर बिल" याचे प्रारूप तयार करून याच सरकारला सुपूर्द केले, इतकेच नाही तर आम्ही सरकारवर हे बिल लागू होण्यासाठी योग्य दबाव टाकू असेही सांगितले, हे सगळे चाळे या सरकारने चालवून घेतले तेव्हा आज जागा झालेला मराठी मुस्लिम झोपला होता का? भाजपा आणि रजा अकादमी यांचे संजय राऊत सांगतात तसा संबंध असेल तर हे सरकार हे संबंध जाहीर करून रजा अकादमी आणि भाजपा दोघांवर योग्य कायदेशीर कारवाई करण्याची हिंमत दाखवणार का? आणि आता "मराठी मुस्लिम" असा बुरखा ओढून केलेली पापे झाकल्या जाणार आहे का?

टिप्पण्या