अश्या निर्वासितांचे करायचे काय?



सगळ्या जगात शरणार्थी आणि घुसखोर यांच्यामुळे वेगवेगळ्या समस्या तयार होतात. त्यातही घुसखोरांवर जगातील प्रत्येक देश (भारत सोडून) वेळोवेळी कायदेशीर कारवाई करत त्यांना पुन्हा आपल्यादेशात पाठवायची व्यवस्था करत असतो. मात्र या कायदेशीर करवाईवरपण मानवतावादी संघटना आपला रोष प्रगट करत असतात. घुसखोर निदान बेकायदेशीर तरी असतात. मात्र ज्या समूहाला त्याच्या संकटकाळात शरणार्थी म्हणून आसरा दिला जातो, ज्यांना काही कायदेशीर अधिकार दिले जातात त्यांच्या मुळे पण आश्रय देणाऱ्या देशाला संकटाला सामोरे जावे लागते. वैचारिक छळ, धार्मिक छळ, वांशिक अत्याचार, राजकीय हिंसा, आर्थिक संकट अश्या अनेक कारणांनी हे शरणार्थी बनतात किंवा इतर देशात बेकायदेशीर घुसखोरी करतात. 


जगभरातील अनेक देशात या शरणार्थी आणि घुसखोरांचा विरोध केला जातो. यांचा विरोध करतांना मुख्य मुद्दा असतो की या लोकांमुळे देशात उपलब्ध साधन-समुग्रीवर ताण पडतो. या ताणामुळे देशाच्या साधन-समुग्रीवर ज्याचा पहिला हक्क आहे, अश्या देशवासीयांच्या सुख-सुविधांवर कात्री चालवली जाते. सोबतच या अवांच्छित लोकांमुळे देशातील मजूर, नोकरदार यांच्यावर पण संक्रांत येते. मुळातच आपले सर्वस्व सोडून आलेल्या या शरणार्थी आणि घुसखोरांना नवीन देशात आपले जीवन सुकर करण्यासाठी कामधंदा करणे अत्यावश्यक असते. मग ते आपल्या कौशल्याच्या शिक्षणाच्या भरवश्यावर नोकरी किंवा काम शोधतात आणि मूळ लोकांपेक्षा कमी मोबदला घेत काम करतात. प्रसंगी देशातील मूळ जनतेच्या हाताला काम मिळत नाही. 


पण हे एव्हड्यावर थांबत नाही. या शरणार्थी आणि घुसखोरांमुळे नुसते आर्थिक तणावच निर्माण होत नाही, तर धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक तणाव पण तयार होतात, त्यातून मग देशात गंभीर समस्या उभ्या राहतात. अगदी आपल्या देशात धार्मिक कट्टरतेतून होणाऱ्या छळाला कंटाळून देश सोडलेले हे आश्रित आणि घुसखोर मात्र आश्रयदात्या देशात आपला धार्मिक आणि सांस्कृतिक अजेंडा रेटायचा प्रयत्न त्याच कट्टरतेने करतात, ज्या कट्टरतेला कंटाळून त्यांनी स्वतःचा देश सोडला असतो. अनेक शरणार्थी आणि घुसखोर झटपट श्रीमंत होण्यासाठी बेकायदेशीर कामात गुंततात ! मग एका नवीन समस्येची भर पडते. अगदी अमेरिकेत पण शेजारच्या मेक्सिको मधून होणारी घुसखोरी किंवा क्युबातून येणारे निर्वासित एक डोकेदुखी आणि राजकीय भांडणाचे कारण आहे. तर काही महिन्यांपूर्वी मोरोक्को आणि स्पेनच्या राजकीय साठमारीत मोरोक्कोने निर्वासितांचा वापर करत स्पेन आणि युरोपियन युनियनला कसा घाम फोडला ते आपण बघितले. 



भारतात बांगलादेश, पाकिस्थान, अफगाणिस्थान येथून आलेले निर्वासित/शरणार्थी आणि घुसखोर, तसेच म्यानमार मधून आलेले निर्वासित आणि घुसखोर यांच्या धर्मावरून त्यांच्यावर कारवाई करायची की नाही या वरून मतमतांतरे होतात, राजकीय भांडणे होतात. मात्र या आश्रित आणि घुसखोरांमुळे देशाच्या काही भागात मोठे राजकीय, धार्मिक आणि सामाजिक प्रश्नपण उभे राहिले आहेत हे विसरता कामा नये. 


म्यानमार मधून आलेले रोहिग्या हे मुस्लिम शरणार्थी आणि घुसखोर फक्त हिंदू बहुल भारताचीच डोकेदुखी नाही तर इस्लामीदेश असलेल्या बांगलादेशाची पण डोकेदुखी आहे. अफगाण मधील मुस्लिम निर्वासितांमुळे इस्लामी पाकिस्थान बेजार झाला आहे. 


याच कारणामुळे काही देश स्वतःच्या देशात अश्या निर्वासित आणि घोसखोरांना अजिबात थारा देत नाही. उदाहरणार्थ सौदी अरेबिया ! या देशाच्या आजूबाजूच्या देशात कमालीची अस्थिरता आहे, मात्र त्या देशातील परंगदा होणारे नागरिक पार सुदूर युरोपात निर्वासित म्हणून पोहचले मात्र त्यांना सौदी अरेबियाने मदत मात्र केली नाही. अरब भागातील सीरिया देशातील गृह युद्धाने परंगदा झालेले नागरिक लेबनॉन, जॉर्डनसह अनेक पश्चिमी राष्ट्रांची डोकेदुखी झाली आहे. 



तर निर्वासितांचे राजकारण फक्त आपल्याच देशात होते असे नाही तर जगभरात होते. सध्या आर्थिक मंदीमध्ये तसेच वेगवेगळ्या आरोपात अडकलेल्या तुर्कस्थानची स्थिती पण निर्वासितांमुळे अशीच झाली आहे. मधल्या काळात जेव्हा अफगाणिस्थान मध्ये जेव्हा तालिबानने कब्जा केला तेव्हा तालिबानला घाबरून अनेक अफगाणी जगातील अनेक देशात आपला जीव वाचवायला पळत होते. त्या काळात तुर्कस्थानने आपल्या अफगाणला लागून असलेल्या सीमेवर भिंत उभी करत अफगाणी निर्वासितांना आपल्या देशात प्रवेश नाकारला होता. या वरून जगामध्ये तुर्कस्थानची काही प्रमाणात निर्भर्सनापण झाली होती. मात्र तुर्कस्थानचा हा निर्णय किती योग्य होता ते आता लक्षात येत आहे. 


सध्या तुर्कस्थानमध्ये या निर्वासितांमुळे वेगळेच नाट्य आकार घेत आहे. चिनी कोरोनामुळे झालेले लॉक डाऊन आणि त्या मागोमाग झालेला चिनी कोरोनामुळे झालेला खर्च, सोबत जगात आलेली मंदी, बसलेला पर्यटन उद्योग,  सप्लाय चेन तुटल्यामुळे आवश्यक सामानाचा झालेला तुटवडा, तसेच वाढलेली महागाई, यात भर म्हणून पुन्हा जुन्या इस्लामी खलिफाचे पुनर्निर्माण करण्याचे स्वप्न बघणारा आणि त्या पाई देशात कट्टरता वाढवणारा, आपल्या आजूबाजूच्या देशांना नाराज करणारा राष्ट्रपती, या राजकीय साठमारीतून येणारे आर्थिक निर्बंध आणि त्यातून सातत्याने घसरत असलेली राष्ट्रीय चलन लिराची किंमत ! या सगळ्यामुळे तुर्की जनता बेजार झाली आहे. नोकऱ्या मिळत नाहीये, मजुरी मिळत नाहीये, पगार कमी होत आहेत आणि खर्च वाढत आहेत. 



या सगळ्यात भर म्हणजे तुर्कस्थानमध्ये जवळपास पस्तीस लाख सीरियन निर्वासित म्हणून आले आहेत. अर्थात हा अधिकृत आकडा, अनधिकृत आकडा कितीतरी जास्त असण्याची शक्यता ! मात्र या निर्वासितांनी तुर्की सीमे जवळील गावातील धंदे मारले, अनधिकृत दुकाने उघडली आणि गावातील अधिकृत तुर्की नागरिकांच्या दुकांदारांवर संक्रांत आली. ज्या ज्या भागात निर्वासित शिबिरे आहेत त्या त्या भागात मूळ तुर्की नागरिकांना रोजगार मिळणे कठीण होऊन बसले आहे. काम मिळाले तरी मोबदला कमी मिळत आहे. कारण हे सीरियन निर्वासित अतिशय कमी मोबदल्यात काम करून देतात. काही भागात तर सीरियन निर्वासित दादागिरी करून काम मिळवत आहेत आणि तुर्की नागरिक काही करू शकत नाहीये. 


हा राग समाज माध्यमांवर पसरलेल्या चित्रफितीमुळे समोर आला आणि दोन्ही कडून समाज माध्यमांवर चित्रफीत युद्ध सुरू झाले, वाढले, इतके की सरकारला त्याची दखल घेत कारवाई करावी लागली. 


काही दिवसांपूर्वी एक सिरिययन निर्वासित बाई तुर्कीच्या बाजारात केळी खरेदी करत असतांना तिची काही स्थानीय तुर्की नागरिकांसोबत बोलचाली झाली. आता आपल्याला केळी खरेदी करण्यात काय मोठे? असे वाटेल ! मात्र तुर्कस्थानात केळी बाहेरून येतात, सध्या सुरू असलेल्या वेगवेगळ्या समस्येमुळे तुर्कस्थानमध्ये केळी महाग झाली आहेत. तर या भांडणात एक तुर्की नागरिक त्या निर्वासित बाईला म्हणतो, "तू निर्वासित असून केळी खरेदी करत आहे आणि खात आहे, आम्ही या देशाचे नागरिक असून आमची ऐपत नाही केळी खरेदी करण्याची." 


ही चित्रफीत वेगाने तुर्कीमध्ये पसरली आणि एकूणच सीरियन निर्वासितांविरोधातील रोष समाज माध्यमांवर प्रगट व्हायला लागला. मात्र या नंतर एक वेगळेच युद्ध सुरू झाले. तुर्की नागरिकांच्या या वाक्यावरून केळी एकाएकी प्रकाश झोतात आली. मग सीरियन निर्वासित पण समाज माध्यमांवरील आपल्या वेगवेगळ्या खात्यांवरून केळी खातांना, केळी फेकतांना वगैरे वेगवेगळे फोटो, चित्रफिती करून खिजवायला लागले. तुर्की मानसिकता आणि केळी याला घेत वेगवेगळे मिम्स फिरायला लागले. या मुळे तुर्की नागरिक बिथरले एक दोन ठिकाणी मग निर्वासित आणि तुर्की नागरिकांमध्ये हाणामारी झाली. त्यातच एका सीरियन निर्वासिताने केळयाला तुर्की राष्ट्रध्वजाच्या रुपात दाखवत त्याला खातांनाचे चित्र समाज माध्यमांवर पसरले आणि संपूर्ण तुर्की मध्ये संतापाची लाट पसरली. 


आता या विरोधात तुर्की सरकारने काही निर्वासितांना अटक केली आहे, तर काहींना देशातून हकलण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्या निर्वासितांना पाठवणार कुठे? कारण आंतराष्ट्रीय कायद्यानुसार ज्या देशातून छळामुळे निर्वासित परंगदा व्हावे लागले त्या देशात पाठवता येत नाही. एकूण सीरियन निर्वासितांचा अनुभव घेत जगातील किती देश आता या तुर्की बाहेर काढत असलेल्या निर्वासितांना सामावून घेईल हा प्रश्नच आहे. मात्र मुख्य प्रश्न तुर्की समोर वेगळाच आहे, तो म्हणजे या काही निर्वासितांवर कारवाई करून मूळ प्रश्न मिटणार आहे का? आणि उर्वरित काही लाख निर्वासितांवर नियंत्रण कसे ठेवायचे? त्यांना जगवायचे कसे? 

टिप्पण्या