काश्मीरमध्ये स्वातंत्र्याच्या नावाखाली कट्टर इस्लामी दहशतवाद जसा जसा वाढायला लागला तसे तसे जवळपास ८० च्या दशकापासूनच काश्मीर खोऱ्यातील हिंदू म्हणजेच काश्मिरी पंडितांचे पलायन सुरू झाले. मात्र १९८९ पर्यंत या कट्टरतेने उग्ररुप धारण केले. गावागावात "रलीव-सलीव-गलीव" म्हणजे धर्म बदला आणि आमच्या सोबत रहा (रलीव) - पळून जा (सलीव) - नाहीतर मरणाला सामोरे जा (गलीव) या पद्धतीची भित्तिचित्रे आणि मशिदीतून घोषणा होण्यास सुरुवात झाली होती. दहशतवादी वेचून वेचून काश्मिरी पंडितांना मारायला लागले. आपण फक्त पोकळ घोषणा देत नाही याचा प्रत्यय द्यायला लागले. जागोजागी काश्मिरी मुस्लिम एकत्र येत "काश्मीर मे क्या आयेगा निजाम ए मुस्तफा" म्हणजेच शरिया लागू करण्याच्या घोषणा व्हायला लागल्या. मात्र १९ जानेवारी १९९० हा दिवस काश्मिरी पंडितांसाठी अत्यंत घातक ठरला. या दिवशी काश्मीर खोऱ्यातील वातावरण एकदम बदलले. संपूर्ण काश्मीर खोऱ्यातील तमाम मुस्लिम रस्त्यावर उतरले चाकू, तलवार पासून ए के ४७ पर्यंतचे सगळे हत्यार त्यांच्या हातात होते आणि घोषणा होती, "असि गच्छी पाकिस्थान बटव, रोअस त बटनेव सान" म्हणजे "इथे जे काही बनेल, पण आम्हाला पाकिस्थान पाहिजे, ते पण हिंदूंच्या शिवाय, मात्र त्यांच्या बायका मुलींसोबत" ! या एका दिवशी काश्मीर खोऱ्यातून जवळपास ६० हजार हिंदू नसत्या वस्त्रानिशी बाहेर पळाले. या दिवसापर्यंत किती हिंदू मारले गेले, किती हिंदू आया बहिणींवर बलात्कार झाले याची मोजदाद फक्त सरकारने केली. अनेक कथा बाहेर आल्या, तर काही दाबल्या गेल्या. हे सगळे वातावरण एका दिवसात तयार झाले नव्हते. काश्मिरी मुस्लिमांमध्ये कट्टरतेचे हे विष हळूहळू भिनवण्यात आले. तत्कालीन राज्य सरकार आणि केंद्र सरकारने या विरोधात काहीही केले नाही.
८० च्या दशकापासून घेतले तर जवळपास ४० वर्षे आणि ९० पासून पकडले तरी जवळपास ३० वर्षे काश्मिरी हिंदू आपल्याच देशात निर्वासित म्हणून जगत आहेत. आपले घर, जमीन, नोकरी, धंदा काश्मीर खोऱ्यात टाकून फक्त आपला जीव आणि आपल्या आया बहिणींची इज्जत वाचवण्यासाठी त्यांना आपल्याच देशात परंगदा व्हावे लागले. खुद्द काश्मीर मधील नेत्यांना या काश्मिरी हिंदूंसोबत काही देणेघेणे नव्हते आणि आजही नाही ! तोंडदेखल्या जरी हे काश्मिरी मुस्लिम नेते तत्कालीन हिंदू हत्याकांड आणि पलायना विरोधात दुःख व्यक्त करत असले तरी हे सगळे काश्मीर खोऱ्यात घडत असतांना त्यांनी काहीही केले नाही. आज कोणत्याही काश्मिरी मुस्लिम नागरिकांना विचारा की या काश्मिरी पंडितांसोबत तेव्हा नक्की काय झाले होते? आणि का झाले? कोणी केले? तो या सगळ्या घटनेचे खापर तत्कालीन राज्यपाल जगमोहन आणि तत्कालीन केंद्र सरकारवर फोडतो, काही प्रमाणात पाकिस्थान वर पण फोडतो, आडून मान्य करतो की "हमारे नौजवान भटके थे।" मात्र स्वतः कोणतीच जवाबदारी घेत नाही. खरे तर काश्मिरी हिंदूंचा अनुभव असा की, एक तास आधी पर्यंत मित्र म्हणून आपल्यासोबत बसून जेवण करणारा काश्मिरी मुस्लिम एका तासानंतर मुस्लिम जमावा सोबत येऊन तुमचे घर जाळतो, तुमची बहीण जिला तो पण बहीण मानत असतो, तिच्या इज्जतीवर हात घालतो, तुमचे आई वडील ज्यांना तो आपल्या आई वडिलांप्रमाणे आहे म्हणून सांगत असतो त्यांना गोळ्या झाडतो आणि तुम्हाला एक तर ठार मारतो किंवा त्याच जुन्या मैत्रीची बुज ठेवत पलायनाचा मार्ग देत आपण किती महान आहे हे मनावर बिंबवतो.
इतके महाभारत होऊन सुद्धा तेव्हा पासून आज पर्यंत काश्मिरी हिंदूंना कोणीही न्याय द्यायचा प्रयत्न केला नाही. ना काश्मिरी नेत्यांनी, ना भारत सरकारने, आणि अतिशय दुर्दैवाने ना स्वतःला हिंदूंचे सर्वेसर्वा म्हणतात अश्या स्वघोषित हिंदुहृद्यसम्राटांनी !
मात्र २०१९ नंतर नरेंद्र मोदी सरकार आल्यावर या सगळ्या ऐतिहासिक चुकांचे परिमार्जन होईल अशी आशा तयार झाली. काश्मिरी पंडितांचे काश्मीर खोऱ्यात पुनर्वसन करण्याचा मुद्दा सरकारने हाती घेतला. त्या दृष्टीने पावले टाकायला सुरवात झाली. नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात काश्मिरी जनतेला देशापासून वेगळे करणारे कलम ३७० या सरकारने हटवले. काश्मीर राज्याचे दोन भाग करत लडाख आणि जम्मू काश्मीर असे दोन केंद्रशासित प्रदेश केले. सोबतच देशातील कोणताही व्यक्ती काश्मीर मध्ये जमीन विकत घेऊ शकेल अशी तजवीज केली. काश्मिरी पंडितांचे काश्मीरमध्ये पुनर्वसन करण्याचा प्रयत्नांना वेग दिला. गेले काही दिवस त्याचे योग्य परिणाम पण दिसत होते. गेले काही दिवस काश्मीर बरेच शांत दिसत होते. दहशतवाद्यांच्या कारवाया थंडावल्या होत्या. सुरक्षा दल दहशतवाद्यांना वेचून वेचून ठार मारत होते. पाकिस्थानातून दहशतवाद्यांची रसद कमी झाली होती. लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद, जम्मू काश्मीर लिब्रेशन फ्रंट सारखी नावे इतिहास जमा झालीत असे वाटायला लागले.
पण थांबा अजून दिल्ली खूप दूर आहे. काश्मिरी जनतेवर फक्त आपल्या संस्कृतीला वाचवायला देशापासून वेगळे अस्तित्व दाखवायचा मुद्दा असता तर कलम ३७० आणि कलम ९५ अ ने हा मुद्दा कधीच मिटला असता आणि पाकिस्थान मधील काश्मीर सकट संपूर्ण काश्मीर आनंदाने सर्वधर्मसमभाववाल्या, सतत प्रगती करणाऱ्या भारतासोबत आनंदाने एकत्र येऊन राहिला असता. मात्र इथे मुद्दा आहे तो धार्मिक ! कितीही वाईट परिस्थिती आली तरी इस्लाम हा एकमेव धर्म आहे आणि काश्मीर इस्लामी असल्यामुळे त्याने काफिर भारताच्या अधीन राहता कामा नये हा मुख्य मुद्दा आहे. पाकिस्थान कसाही असला तरी इस्लामी राष्ट्र आहे आणि त्याच मुळे सध्यातरी तेच राष्ट्र भारतापेक्षा आम्हला जवळचे आहे हा तो विचार ! १९४७ साली हाच विचार मनात ठेवत पूर्व बंगाल भारतापासून वेगळा काढत पूर्व पाकिस्थान बनला. नंतर भलेही पाकिस्थानच्या जाचाला कंटाळून भारताचीच मदत घेत बंगला देश तयार झाला असेल. मात्र अजूनही आम्ही इस्लामी आहोत हाच विचार मुख्य आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे. त्या मुळेच शीर्षक दिले काश्मीर अजून तुमचे नाहीच !
अफगाण मधून अमेरिकेने काढलेला पळ आणि त्यानंतर तिथे आलेले कट्टर इस्लामिक तालिबान सरकार, त्याला भारताचे शत्रू पाकिस्थान आणि चीन करत आलेली मदत याचा जगावर काय परिणाम होणार? चीन आणि पाकिस्थानवर जग निर्बंध लावणार का? तालिबानला जगातील किती राष्ट्र मान्यता देणार? तालिबान सुधारला का? की तालिबान अजून आपल्या जुन्या मानसिकतेत आहे? आणि महत्वाचे म्हणजे आपल्या देशाने तालिबान सोबत राजकीय संबंध जोडायचे काय? अश्या सगळ्या विषयावर आपण व्यक्त होत आहोत, लक्ष ठेऊन आहोत. भारताने तालिबान सोबत राजकीय संबंध तयार करावे असा विचार करणारा एक मोठा समूह आपल्या देशात कार्यरत आहे. तर तालिबान अफगाणमध्ये सत्तेत आल्यावर तेथे पुन्हा कट्टर इस्लामी शरिया कायदा पुनर्जीवित झाला आणि अमेरिकेसारख्या महाशक्तीला धूळ चाटावी लागली याचा आनंद मानणारा खूप मोठा वर्ग देशात समाज माध्यमांवरून समोर आला. हा आपल्यासाठी, आपल्या सरकारसाठी खरच गंभीतेने घ्यायचा विचार आहे.
तालिबान अफगाणमध्ये सत्तेत आल्याने जगावर काय परिणाम होतील याचा सध्या आपण विचार न केलेला बरा. मात्र आपल्या देशावर नक्की काय परिणाम होत आहे हे लक्षात घेणे आवश्यक राहील. अफगाणमध्ये अमेरिका हरला याचा कट्टर इस्लामिक मानसिकतेवर चांगलाच असर झाला आहे. विशेषतः काश्मीर सारख्या धार्मिक फुटीरता चळवळीवर ! काश्मीर मध्ये पुन्हा दहशतवाद डोके वर काढत आहे. दुर्दैवाने पुन्हा ८० च्या दशकात वापरलेली पद्धत वापरात येत आहे. काश्मीर मध्ये दहशतवाद वाढला आणि अनेक काश्मिरी पंडितांनी पलायन केले असले तरी काही बोटावर मोजण्याइतके काश्मिरी पंडित अजूनही काश्मीर खोऱ्यात आपली मूळ घट्ट रुजवून होते. विशेषतः काही उद्योजक आणि व्यवसायिक ज्यांची तेव्हा काश्मिरी मुस्लिमांना गरज होती, कदाचित त्यांना "हिंदू मुस्लिम भाईचाऱ्याचे" प्रतीक म्हणून समोर आणता येईल म्हणून राहू दिले होते. तसेच आपले उत्तर भारतीय (उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड) मजूर, पाणीपुरीवाले जे संपूर्ण भारतात कुठेही गेले तरी काम करतांना दिसतात असे अनेक जण गेल्या काही वर्षात काश्मीरच्या बदलत्या परिस्थिती कडे बघत तिथे रोजगारासाठी गेले होते. आता मात्र त्यांच्यावर संक्रांत आली आहे. गेल्या काही दिवसात पुन्हा या सगळ्यांना धमक्या यायला लागल्या आहेत. पाकिस्थान मधून रसद पुन्हा एकदा आधुनिक तंत्रज्ञान वापरून सुरळीत करायचा प्रयत्न होत आहे. पुन्हा एकदा पाकिस्थान कडून दहशतवादी घुसखोरी वाढत आहे. जेव्हा इस्लाम अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला नमवू शकतो, तर काफिर हिंदुस्थान काय चीज आहे असले प्रश्न काश्मिरी तरुणांना विचारला जात आहे.
आणि आपण शेतकरी आंदोलनातील लखीमपूर खिरी हिंसा खरी की खोटी, बॉलिवूड सुपरस्टारचा ड्रग घेणारा मुलगा चांगला की वाईट, जातीय राजकारण आणि महत्वाचे म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी पूर्वज एक, DNA एक सारख्या विषयावर बोलत असतांना काश्मिरात जवळपास पाच दहशतवादी हत्या झाल्या. फक्त ५ ऑक्टोंबरला एकाच दिवशी तीन दहशतवादी हल्ले झालेत, तेही फक्त १५ मिनिटांत वेगवेगळ्या ठिकाणी. यात महत्वाची हत्या झाली ती श्रीनगर मधील मोठे औषध व्यवसायिक माखनलाल बिंदु या ७५ वर्षीय काश्मिरी पंडित यांची. ८०-९० च्या दहशतवादी सावटानंतर पण ज्यांनी काश्मीर सोडले नाही आणि आपला कामधंदा सुरू ठेवला त्यांच्या पैकी हे एक ! काश्मीर मधील सगळ्यात मोठे औषधांचे दुकान यांचे. यानंतर ज्या दोघांना दहशतवाद्यांनी मारले ते उत्तर भारतीय एक पाणीपुरीचा ठेला लावणारा आणि दुसरा मजूर ! या सगळ्या हत्यांवर काश्मिरी मुस्लिम नेते फक्त "माणुसकीला काळिमा, माणुसकीची हत्या" असे जुनेच वक्तव्य देत आहेत, ही तीच वक्तव्य आहेत जी मुख्यमंत्री म्हणून फारूक अब्दुल्ला यांनी ९० च्या दशकात दिली होती, आज गुपकर गँगचे सदस्य म्हणून देत आहेत. तेव्हपण कश्मीर मधील परिस्थितीचा ठिकरा केंद्र सरकारवर फोडला होता आणि आजही फोडत आहेत. मात्र काश्मिरी नेता म्हणून यांची जवाबदारी काय? आणि जनता यांचे ऐकत नसेल तर हे काश्मीर मधील प्रभावशाली नेते कसे? हे कोणीच विचारत नाही.
मात्र ५ ऑक्टोंबरचा हल्ला हा एकमेव हल्ला नाही. गेल्या काही दिवसात विशेषतः कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीर पोलीसचे जवान आणि भाजपा कार्यकर्ते यांच्यावरील हल्ल्यात वाढ झाली होती. या सगळ्या वाढत्या हल्ल्याची बातमी देशातील मुख्य वर्तपत्रात फार मोठी झाली नाही. यात जसे भारतीय वृत्तपत्रांचे औदासिन्य कारणीभूत आहे, तसेच काही प्रमाणात काश्मीर मधील स्थिती सुधारत असल्याचे दाखवण्याचा केंद्र सरकारवरील दबाव पण कारणीभूत आहे हे नाकारण्याचे कारण नाही. जानेवारीत सतपाल निश्चल नावाचे सोने व्यवसाईकाची हत्या झाली. फेब्रुवारीमध्ये काश्मीर मधील प्रसिद्ध कृष्णा ढाबाचे आकाश मेहरा यांची हत्या केल्या गेली आणि आता माखनलाल बिंद्रु, सोबत पाणीपुरीचा ठेला चालवणारे वीरेंद्र पासवान या बिहारी प्रवासी मजुराची हत्या करण्यात आली.
नव्वदीतील घटनांमुळे काश्मिरी मुस्लिम आणि इस्लामी आतांकवादाला देशात आणि जगात कुप्रसिद्धी मिळाली. त्या नंतर झालेल्या काही जागतिक घटनांनी दहशतवाद्यांना आपली काश्मीर मधील कार्यपद्धती बदलावी लागली होती. काश्मिरी हिंसाचार जरी इस्लामी आतंकवाद असला तरी त्याला काश्मिरी स्वातंत्र्याच्या लढ्याचा मुलामा देणे आणि आमची लढाई भारत सरकार विरोधात आहे हे दाखवणे आवश्यक होते. त्या नुसार आपली कार्यपद्धती बदलत दहशतवादी हल्ले हे सामान्य लोकांवर करणे अत्यंत कमी झाले होते. हे दहशतवादी हल्ले विशेषतः भारतीय सेना, सेना आस्थापना, केंद्रीय निमलष्करी दलावर जास्त व्हायला लागले होते आणि या हल्ल्याची उदाहरणे देत हा दहशतवाद नाही भारताविरुद्ध सुरू असलेला काश्मिरी लोकांचा स्वातंत्र्य संग्राम आहे असे वक्तव्य इस्लामी फुटीरतावादी आणि त्यांना साथ देणारे भारतातील तथाकथित उदारमतवादी बनलेले शहरी नक्षली करत होते.
मात्र तालिबानच्या उदयानंतर आता नवीन धार्मिक युद्ध सुरू झाले आहे आणि दहशतवादी कार्यपद्धतीपण ! आता पुन्हा वेचून वेचून हिंदूंना मारण्यात येत आहे. आता एक नवीन दहशतवादी संघटन या सगळ्या घटनांमुळे समोर येत आहे ते आहे दि रजिस्ट्रन्स फ्रंट म्हणजे TRF ही नवीन दहशतवादी संघटना आणि इस्लामिक स्टेट विलायत ए हिंद या दोन संघटना सक्रिय झाल्या आहेत. फक्त याच वर्षी म्हणजे जानेवारी २१ पासून आता पर्यंत जवळपास २६ सामान्य नागरिकांची हत्या या दोन संघटनांनी मिळून केली. या नागरिकांमध्ये गैरमुस्लिम व्यवसायिक, प्रवासी गैरमुस्लिम मजूर, तसेच स्थानिक मुस्लिम जे भाजपा कार्यकर्ते किंवा भारत धार्जिणे आहेत.
एकीकडे श्रीनगरच्या लाल चौकात कृष्णजन्माष्टमीची मिरवणूक निघते आहे, १५ ऑगस्ट, २६ जानेवारीला या चौकात तिरंगा डोलाने फडकतो आहे आणि दुसरीकडे दहशतवाद पुन्हा अधिक काळ्या चेहऱ्याने आपले डोके वर काढत आहे. हा विरोधाभास असतांना निर्वासित झालेल्या काश्मिरी हिंदूंना पुन्हा काश्मीरमध्ये आणणे कसे शक्य होणार याचे उत्तर केंद्र सरकारला नक्कीच द्यावे लागणार, ते उत्तर मागणे आपले कर्तव्य आहे आणि केंद्राने ते उत्तर देणे हे केंद्राचे कर्तव्य आहे. मात्र काश्मीर मधील दहशतवाद हा धार्मिक नसून केवळ काश्मिरी तरुणांच्या आकांक्षा पूर्ण होत नसल्याने झालेला विद्रोह आहे हे म्हणणाऱ्यांच्या तोंडात चपराक मारणे हे पण आपले कर्तव्य आहे हे लक्षात घेणे तितकेच आवश्यक आहे.
तेव्हा जागे व्हा हिंदू म्हणून एक व्हा....आणि आता पुन्हा देशाचा तुकडा पडणार नाही या साठी सजग रहा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा