कन्हैय्या कुमार याने शेवटी काँग्रेस प्रवेश केला. साधारण डाव्या पक्षातून फुटून दुसऱ्या पक्षात प्रवेश करणारी प्रकरणे विरळी, माझ्या माहितीत नाहीच ! एकतर डाव्या पक्षातील कॅडर सिस्टममुळे वर्षानुवर्षे पक्षात काम केल्यावर त्याचा फायदा मिळायला सुरवात होते. जे या कामाला कंटाळतात ते आधी गळून जातात, मात्र तो पर्यंत आलेल्या अनुभवामुळे ते दुसऱ्या पक्षात जाण्यापेक्षा स्वतःची वेगळी चूल मांडतात किंवा सरळ जगाच्या राहटगडग्यात सामील होत गपगुमान जीवन कंठतात.
डाव्यांची पक्षशिस्त पण तशीच ! एकूणच व्यक्तिस्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे कितीही मोठे पुरस्कारकर्ते म्हणून डावे स्वतःची जाहिरात करत असले तरी, आपल्या पक्षातील कोणी तसे अभिव्यक्ती स्वातंत्र्य घेतल्यास त्याच्यावर पक्षशिस्तीची कारवाई होतेच. महाराष्ट्रातील डाव्या पक्षाचे राज्य सचिव आणि केंद्रीय समितीचे सदस्य, हाडाचे कार्यकर्ते असलेले नरसैय्या आडाम यांच्या प्रकरणात डाव्या पक्षाची पक्षशिस्त आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य कसे आहे हे लक्षात येईल.
सोलापूर येथील बिडी कामगारांच्या घरांच्या प्रश्नाबाबत केंद्र आणि राज्य सरकार सोबत अडाम यांनी प्रदीर्घ लढा दिला. तत्कालीन देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मागणीकडे सकारात्मक लक्ष देत पंतप्रधान आवास योजने अंतर्गत अडाम यांच्या मागणीची पूर्तता केली. याच संबंधी झालेल्या सोलापूर येथील कार्यक्रमात नरसैय्या अडाम यांनी व्यसपीठावर बसलेल्या पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्या कामाची तारीफ केली. ही अडाम यांनी केलेली पंतप्रधानांची तारीफ विशेषतः उजव्या विचारधारेच्या आणि डावे पक्ष ज्या नरेंद्र मोदी यांचा व्यक्तिद्वेष करते अश्या माणसाची तारीफ अडाम यांना भोवली. डाव्या पक्षाने तडकाफडकी अडाम यांचे केंद्रीय समितीतून तीन महिन्यासाठी निलंबन केले. काही काळ त्यांना पक्ष कार्यातून दूर ठेवले. मात्र हे सगळे होऊन पण अडाम यांनी पक्षाविरुद्ध एक शब्द पण काढला नाही किंवा दुसऱ्या पक्षात गेले नाही.
या वरून आपल्याला डाव्या पक्षांची कार्यपद्धती लक्षात यावी आणि या पार्श्वभूमीवर कन्हैय्या कुमार याचा दाव्यापक्षातील उदय आणि अस्त लक्षात घ्यावा लागेल.
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय हा डाव्या पक्षाचा आणि विचारांचा देशातील मोठा अड्डा मानला जातो. अनेक डावे नेते याच विद्यापीठातून समोर आले आहेत. या विद्यापीठात नवीन भरती झालेल्या विद्यार्थ्याला पहिल्याच दिवशी आपली विचारधारा इथे काय ठेवायची याचा निर्णय घ्यावा लागतो. सहाजिकच डाव्या विचारांचे विद्यापीठ असल्यामुळे डाव्या विद्यार्थी संघटनेत प्रवेश करून अधिकच्या सोयी सवलती पण मिळवता येतात. काही चाणाक्ष विद्यार्थी आपली खरी विचारधारा लपवत किंवा विचारधारेला महत्व न देता सोयी सवलती कडे बघत डाव्या विद्यार्थी संघटनेच्या मागे उभे राहत असतील.
अश्यातच आपल्या भाषणाने मोहित करणाऱ्या कन्हैय्या कुमारवर या विद्यापीठात लक्ष गेले नसते तर नवल. यथावकाश त्याला तेथील निवडणुकीत उभे केले गेले आणि जिंकून पण आणल्या गेले. हा काळ नेमका कन्हैय्या कुमार याच्या पथ्यावर पडला. याच काळात देशाच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. नरेंद्र मोदी नावाचे उजवे वादळ गुजरात वरून घोंगावत दिल्लीत येऊन स्थिरावले आणि आजपर्यंत उभे केलेले राजकारणाचे इमले, विचारांची शेती उध्वस्त करून गेले. अनेक राजकारणी, राजकीय पक्ष या वादळात उडून गेले, अनेकांना भविष्याची चिंता सतवायला लागली. ज्या माणसाची आज पर्यंत येथेच्छ निंदा नालस्ती केली, बदनामी केली, ज्याला राजकीय अस्पृश्य बनवले तोच माणूस आज पंतप्रधानांच्या खुर्चीत अलगत बसला हे काँग्रेसी आणि डाव्या पक्षांसोबत इतर बांडगुळ पक्षांना काही सहन होत नव्हते. उजवे भक्त नरेंद्र मोदी यांना अवतार पुरुष समजत होते, तर विरोधकांना पण नरेंद्र मोदी यांना टक्कर देणारा एखाद्या अवतार पुरुषाची गरज होती. विरोधकांचा हा शोध संपला तो जवाहरलाल नेहरू विद्यापीठात ! ९ फेब्रुवारी २०१६ रोजी जे एन यु मध्ये झालेल्या डाव्या विद्यार्थी संघटनेच्या एका कार्यक्रमात देशविरोधी घोषणा दिल्या गेल्या आणि त्या नंतर उठलेल्या वादळात तीन नावे प्रकर्षाने समोर आली, त्यातील पहिले नाव कन्हैय्या कुमार याचे होते, नंतर शेहला रशीद आणि उमर खालिद ! सरकारने या तिघांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आणि काँग्रेस सकट सगळे पक्ष जे एन यु कडे धावायला लागले. दिलेल्या देशविरोधी घोषणा या अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याचा दावा व्हायला लागला. कन्हैया कुमार एकाएकी प्रसिद्धी झोतात आला. यथावकाश पहिले कारागृह नंतर जामीन असे करत हा पुन्हा जे एन यु मध्ये परतला. त्याचे कारागृहातून बाहेर येणे हे अगदी कृष्ण जन्मा सारखे साजरे केले गेले. त्याच्या स्वागताला समस्त नेतेगण हजर होते. याने पण झोकात भाषण दिले आणि दफली हातात घेऊन "हमे चाहीये आझादी" ची घोषणा दिली. भारतातील तमाम वृत्त वाहिन्यांनी हा सगळा माहोल थेट प्रक्षेपण करत घराघरात पोहचवला. इथेच याच क्षणी उजव्या वादळात वाताहत झालेल्या नेत्यांना आणि पक्षांना त्यांचा नवा तारणहार, सिद्ध पुरुष मिळाला.
मग वेगवेगळ्या राज्यात या देवतेच्या मिरवणूका निघायला लागल्या. जसा एखाद्या गावातील एक छोटे मंदिर एका एकी नवसाला पावणारे म्हणून गाजते आणि बघता बघता त्यांचे संस्थान होते तशीच अवस्था या गरीब, स्कॉलशिपवर शिकणाऱ्या कन्हैय्या कुमारची झाली. पाई आणि सायकलवर फिरणारा हा इसम आता विमानातून फिरायला लागला. या अवतार पुरुषाने आपल्याकडे यावे आणि सरकार विरोधात जनतेत जनजागृती करावी म्हणून सगळे या देवाला साकडे घालायला लागले. राज्यात राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांनी तर कन्हैय्या कुमारला संपूर्ण राज्य खांद्यावर बसवून फिरवले.
यथावकाश हळू हळू या कन्हैया कुमारचा करिश्मा कमी होऊ लागला आणि त्याच्या आजूबाजूला आलेले मोठी मोठी नावे बाजूला व्हायला लागली. राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, शरद पवार, अखिलेश यादव, तेजप्रताप यादव हे हळू हळू दूर झाले. तसेही राजकारणात आपल्या पेक्षा मोठ्या होणाऱ्याचे पाय खेचत असतात, तेव्हा अश्यांना किती काळ डोक्यावर बसवायचे याचा विचार करायला हवा होता, जो या सगळ्यांनी केला. असो, मात्र आता विद्यार्थी नेत्यापासून नेता बनायचे वेध कन्हैय्या कुमारला लागले. अर्थात डावे पक्ष त्याच्या मागे उभे राहिले आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीकरता कन्हैय्या कुमारला डाव्या पक्षाने तिकीट दिले, ते पण बिहार मधील डाव्यांकरता सर्वात सुरक्षित जागा, डाव्यांचा गड म्हणून प्रसिद्ध असलेल्या बेगूसराय येथून.
कन्हैय्या कुमार याने आज पर्यंत इतरांकरता डफली वाजवत जादू दाखवली होती, आता त्याला तीच जादू स्वतः करता, आपल्या पक्षा करता करायची होती. त्याच्या मदतीकरता त्याचे समस्त मित्र बेगुसरायला एकत्र आले. निवडणूक प्रचारकरता पैसे जमवण्यासाठी जनतेसमोर झोळी पसारवल्या गेली. मत मागण्यासाठी बॉलिवूडच्या नट्या आल्या, शेहला रशीद डोक्यावर ओढणी घेत तेथील मुस्लिम बांधवांना आपलेसे करायचा प्रयत्न करायला लागली. मात्र इतके सगळे करून पण नरेंद्र मोदी नावाचा राहू काही यांच्या कुंडलीमधून दूर गेला नाही.
पुन्हा उजवे वादळ आले आणि पुन्हा विरोधकांच्या नशिबी वाताहात आली. परंपरागत डाव्या पक्षाची जागा असलेली बेगुसराय पण कन्हैया कुमार जिंकू शकला नाही. "जो भगवान अपनी खुद् की हिफाजत नही कर सकता, वह हमारी रक्षा कैसे कर सकता है?" हा प्रश्न तमाम सगळ्या पक्षांच्या, जनतेच्या मनात कन्हैय्या कुमार बाबत उभा राहिला. कन्हैय्या कुमारचे वलय पार लयाला गेले. साहेब अंतर्धान पावले. मधल्या काळात एखादा ट्विट करून सरकार विरोधात एल्गार वगैरे करायचा प्रयत्न केला गेला तरी त्यात पूर्वीची मजा नव्हती. त्याचे जिवाभावाचे मित्र पण डाव्या पक्षातून बाहेर पडले. शेहला रशीद हिने नवीन पक्ष स्थापन केला. नंतर तिच्या वडिलांनीच तिच्या विरोधात आवाज उठवला आणि ती बिचारी घरगुती भांडणात अडकून बसली. तर उमर खालिद सी ए ए विरोधातील दिल्ली दंगलीतील आरोपी ठरत कारागृहात गेला. कन्हैय्या कुमारच्या नशिबी "बिछडे सभी....बारी..बारी" हेच म्हणने राहिले.
काही महिन्यांपूर्वी कन्हैय्या कुमार आणि त्याच्या पक्षात पण फार चांगले संबंध राहिले नसल्याच्या बातम्या येत होत्याच. महाविद्यालयात कायदे-नियम मोडणे आणि हुल्लडबाजी करणे यावरून प्रसिद्धी मिळालेल्या कन्हैय्या कुमारला मात्र पक्षात अंतर्गत कायदे आणि नियमाचा त्रास व्हायला लागला. पक्षशिस्त मोडल्याचा ठपका ठेवला जायला लागला. त्यातच बाहेर कितीही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची भलामण केली तरी पक्षा अंतर्गत मात्र अभिव्यक्ती स्वातंत्र्य अंधश्रद्धा आहे याचा कदाचित साक्षात्कार पण त्याला झाला असेल. बेगूसराय येथील जिल्हा परिषद कार्यालय आणि पटना येथील पाटबंधारे कार्यालयात हुल्लडबाजी करत पक्षाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आणि कारवाही केल्या गेली. तेव्हाच कन्हैय्या कुमार पुन्हा डफली हातात घेत "हमे चाहीये आझादी" च्या घोषणा देईल हे निश्चित होते. मात्र त्याच्या म्हणण्यानुसार कदाचित "हमे पार्टी से आझादी नही, तो पार्टी मे आझादी चाहीये" सारख्या प्रयत्नात काही काळ गेला असेल. मात्र त्याच्या पक्षाने त्याला एकदाची "आझादी" दिलीच आणि वातानुकूलित यंत्र पण ! (कोण आहे रे तो, काढून नेले म्हणणारा....आहेर आहे तो..!)
असो मात्र ही तुटलेली वीट आता काँग्रेसच्या भग्न वाड्याला कुठे लावणार हे बघणे मनोरंजक ठरेल. भारताच्या पहिल्या फोल गेलेल्या आशेकडे भारतातील दुसरी फोल गेलेली आशा असेच राहुल गांधी आणि कन्हैया कुमारच्या फोटोकडे बघून म्हणावे लागेल. बाकी दुःख एकच आहे की, आता कन्हैय्या कुमार पुन्हा हातात डफली घेत "हमे चाहीये आझादी" ही घोषणा देतांना बघता येणार नाही. समंतवादी, परिवारवादी पक्षाकडे आश्रयाला जात आता कन्हैय्या कुमार याला "समंतवाद से आझादी, परिवारवाद से आझादी" म्हणता येणार नाही. राहुल गांधी स्वतःला काश्मिरी ब्राम्हण मोठ्या अभिमानाने म्हणवून घेतात, जानवे घालून स्वतःचे भारद्वाज गोत्र सांगत मंदिराच्या वाऱ्या करतात त्या मुळे आता "मनुवाद से आझादी" पण कन्हैय्याला म्हणता येणार नाही. त्या मुळे उरलेल्या घोषणेतील मजाच निघून जाईल. बाकी काँग्रेस मध्ये प्रवेश घेतल्यावर भल्या भल्या लोकांचा विदूषक झालेला बघितला आहे, मात्र आजकाल विदूषकच कंग्रेसमध्ये प्रवेश घेतात आणि खऱ्या काँग्रेसी नेत्यांना त्रास होतो हे पंजाबच्या उदाहरणावरून लक्षात येत आहे. तेव्हा आता हा कन्हैया कुमार नक्की कोणाच्या राशीला येणार हे बघणे अजून मनोरंजन करणारे राहील. बिहार मधील काँग्रेस आता काय गुण उधळेल हे बघायचे.



सुंदर विवेचन
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवा