"जात नाही ती जात"



(ही "अजात" डॉक्युमेंटरी मी खूप आधी बघितली होती. त्या संदर्भावरून शोधाशोध करतांना फक्त एक लेख हातात आला. खूप अगोदर या प्रश्नावर दैनिक तरुण भारत, नागपूर आणि लोकमत, नागपूर या दैनिकात काही बातम्या आणि लेख वाचल्याचे स्मरते. कुणाला अजून माहिती असेल तर आवश्य द्यावी ही विनंती.) 

देशात विशेषतः हिंदू धर्मात "जात" हा खूप मोठा विषय आहे. एकेकाळी जातीय व्यवस्थेतून ऐतिहासिक काळात अनेक मानव समूहावर अत्याचार झालेत, अन्याय झालेत. कालांतराने आधुनिक युगात या जातीय अन्याया विरोधात देशातील अनेक समाजसुधारकांनी आवाज बुलंद केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, न्यायमूर्ती रानडे, स्वातंत्र्यवीर सावरकर अश्या अनेक प्रभूतींनी कधी आक्रमकपणे क्रांतीच्या मार्गाने, तर कधी नेमस्तपणे प्रबोधनाच्या मार्गाने, तर काहींनी थेट कायद्याच्या कक्षेत आणून या जातीय अन्यायाविरोधात काम केले. 


तरी या जातीय प्रश्नातून भारतीय मानसिकतेची सुटका झालेली नाही हे वास्तव आहे. भारतीय या करता की अगदी भारता बाहेरून येऊन देशात हातपाय पसरणाऱ्या इस्लाम आणि ख्रिस्ती धर्मात पण या जात व्यवस्थेने चांगलेच हातपाय पसरले आहेत. जात फक्त हिंदू धर्मात होती आणि आहे का? तर नाही, आशिया खंडातील अनेक सभ्यतेत एकेकाळी जातीय व्यवस्था चांगलीच पक्की होती असे पुरावे आहेत. चीन पासून जपान पर्यंत सगळीकडे जातीय व्यवस्था आधुनिक युगात पण होती. ती भारतातून तिकडे गेली, की तिकडून भारतात आली हे मात्र कोडे आहे. अगदी बौद्ध धर्माला आपलेसे केल्यानंतर पण जपान मध्ये जातीय व्यवस्था बरीच पक्की होती असे इतिहास सांगतो. 


आपल्या देशात तर जातीय व्यवस्था वरवर जरी नष्ट झालेली दिसत असली तरी ती जनमानसात खोलवर रुजलेली आहे. प्रथा, परंपरा या पासून सुरू होणारी ही व्यवस्था थेट आहारा पर्यंत आपल्याला दुसऱ्याच्या जातीची आठवण करून देईल इतकी रुजलेली आहे. त्यातच आता या जातीय व्यवस्थेवरून राजकारण पण चांगलेच फोफावले आहे. त्यातून जातीय व्यवस्था नष्ट करण्याचे प्रयत्न होत आहेत की अजून घट्ट करण्याचे हे काही लक्षात येत नाही. 


मात्र मग हिंदूंमधील जातीय व्यवस्था नष्ट करण्यासाठी अनेक मानवतावादी सामान्य जनता आपले डोके चालवतात. त्याचा हेतू जरी प्रामाणिक असला तरी, कल्पना मात्र अनाकलनीय असतात. एकाने असे सुचवले की पूर्ण नाव न लिहिता फक्त गावचे नाव, आई - वडिलांचे नाव आणि आपले नाव लिहले तर आडनावावरून जात ओळखणे बंद होईल आणि जातीयता पण आटोक्यात येईल. मात्र जिथे खाण्या - पिण्याच्या सवयी वरून, पेहरावा वरून, भाषेवरून आणि विशेष म्हणजे अगदी नाव काय ठेवले आहे त्याच्या वरून समोरच्याची जात ओळखल्या जाते तेव्हा अश्या कल्पना किती काम करतील. मात्र अश्या कल्पना वेळोवेळी भारतीयांच्या डोक्यात येतात आणि त्यातील काहींची अमलबजावणी पण होते. मात्र त्यातून जात नष्ट होण्याऐवजी नवीन प्रश्न निर्माण होतात. 


साधारण १९२० - ३० साली तत्कालीन मध्य प्रांतात विशेषतः विदर्भातील अमरावती येथील मंगरूळ (दस्तागिर) येथे ! विदर्भातच्या मातीचा गुण म्हणा की, विदर्भातील सामाजिक वीण म्हणा त्यातून विदर्भात जे काही संत महात्मे म्हणून समोर आले त्यांनी नेहमीच देशातील कुप्रथा आणि राष्ट्रीय महत्वाच्या गोष्टींना प्राधान्य दिले. त्यातूनच संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समोर आले आणि आपल्याला माहीत झाले. मात्र सोबतच लहान मोठे अनेक असेच सामाजिक संत विदर्भात झाले काही आठवणीत आहे काही विस्मृतीत गेले. 


तर या १९२० - ३० मध्ये असेच संत होते गणपती महाराज ! श्री गणपती भाभूतकर ! महात्मा गांधी यांच्या प्रेरणेने आणि इतर तत्कालीन सामाजिक नेत्याच्या प्रभावाने यांनी अहिंसा, दारूबंदी आणि विधवा विवाह या सामाजिक सुधारणांचा प्रसार सुरू केला, लिंग समानता आणण्यासाठी पण बरेच प्रबोधन केले. पण सोबतच समाजात असलेल्या जातीय व्यवस्थेविरोधात पण बराच आवाज उठवला. मात्र जातीय व्यवस्थेविरोधात फक्त आवाज उठवून हे थांबले नाहीत तर १९३० दरम्यान स्वतः गणपती महाराजांनी आपली जात त्यागली, इतकेच नाही तर आपल्या अनुयांना पण आपले अनुकरण करायला लावले. तत्कालीन मध्य प्रांतात, वर्तमान मध्य प्रदेश, छत्तीसगड येत असल्यामुळे या भागातील अनेक जण गणपती महाराजांचे अनुयायी होते. अनेक जातींच्या या समूहाने आपली जात त्यागली आणि स्वतःला अजात म्हणायला सुरवात केली. या अजात आंदोलनात ब्रम्हणापासून दलित जातीपर्यंत अनेकांनी आपल्या जातीची आहुती दिली, आपसात लग्ने केली, सामाजिक व्यवहार केले. पण लवकरच या आंदोलनाची व्याप्ती कमी झाली, १९४४ साली गणपती महाराजनाच्या मृत्यू नंतर हे आंदोलन संपूर्णपणे थंड झाले. याची कारणे मुख्यतः सामाजिक मानसिकतेत होती. जातीच्या परिघाबाहेर गेलेल्या, मग तो उच्च जातीचा असो वा निम्न जातीचा त्याला समाजाने, नातेवाईकांनी वाळीत टाकले. सोबतच जात प्रमाणपत्रावर जातीच्या रकान्यात जाती ऐवजी "अजात" असे टाकल्यामुळे या आंदोलनाचा मूळ उद्देशच हरवला. कारण "अजात" हीच नवीन जात म्हणून ओळखल्या गेली. स्वातंत्र्या नंतर जातीय तिढा सोडवण्याच्या दृष्टीने म्हणा किंवा सामाजिक न्यायाच्या कल्पनेने म्हणा संविधानात जातीय आरक्षण दिल्या गेले. त्यातून मग या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी अनेकांनी आपल्या प्रमाणपत्रावर लिहलेल्या "अजात" या शब्दाच्या ऐवजी पुन्हा आपले जातीय लेबल स्वतःला चिटकवले आणि सोबत आपल्या जातीय परिघात पुन्हा प्रवेश मिळवला. 


मात्र या आंदोलनाला दुसरा मोठा फटका जातीय व्यवस्था संपवण्याची भाषा करणाऱ्या सरकारने दिला. आता स्वतंत्र भारताच्या व्यवस्थेत जातीच्या रकण्याला जास्त महत्व आले. त्यातून मग "अजात" असे लिहलेल्या समूहाची अनेक ठिकाणी अडवणूक व्हायला लागली. अगदी शाळा - महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा तर जातीच्या रकान्यात लिहलेले "अजात" त्यांचा मार्ग अडवू लागले. तरी १९६० च्या दशका पर्यंत या आंदोलना विषयी काही तरी माहिती लोकांना होती, म्हणून कमी अधिक करत निभावल्या जायचे. मात्र १९७० नंतर मात्र कोणालाही या आंदोलनाविषयी किंवा या आंदोलनाचे प्रणेते गणपती महाराज यांच्या विषयी माहिती नसल्याने अडवणूक अजून वाढत गेली. त्यातच या नंतरच्या काळात जातीय अस्मिता आणि संघटना अजून टोकदार व्हायला लागल्या आणि "अजात" पेक्षा "जात" जास्त महत्वाची ठरली. 


नागपूरचे पत्रकार अतुल पांडे आणि जयदीप हर्डीकर यांनी काही वर्षांपूर्वी या "अजात आंदोलनावर" वर वृत्तपत्रात लेख लिहले. त्यातून तेव्हा हा प्रश्न आणि या समूहाला होणाऱ्या मनस्तापावर आवाज उठवण्यात आला. तत्कालीन राज्य सरकारने पण तेव्हा या समूहा करता आम्ही प्रयत्न करू असे आश्वसन देत एक समिती गठीत केली. मात्र लवकरच या सगळा उपद्व्याप पण थंड झाला. एकेकाळी ६०,००० सदस्य असलेला "अजात" समुदाय आता फक्त २००० सदस्यांवर आला आहे. गंमत म्हणजे यांच्या "अजातीय मानव संस्थान" या संस्थेत मात्र फक्त १०२ लोकांचीच नोंदणी झाली आहे. या अजात समूहाच्या तरुण पिढी समोर आताच्या काळात आपल्या सामाजिक ओळखीची वेगळीच समस्या उभी आहे आणि त्यातूनच मग शिक्षण, रोजगार या बाबतीत एक वेगळा संघर्ष त्यांच्या वाट्याला आला आहे. 


आता सांगा ज्यांनी जात सोडली, त्याचीच एक वेगळी जात जिथे तयार केल्या गेली अश्या मानसिकतेतून जाती निर्मूलन शक्य आहे काय?

टिप्पण्या