घडलेल्या खऱ्या घटनेच्या तपशिल बदलून त्या कथेवर चित्रपट बनवायचा आणि तथाकथितपणे दलित अत्याचाराला वाचा फोडल्याचा दिखावा करायचा, त्यातून एका जातीवर काहीही कारण नसतांना आळ आणायचा असा एक ट्रेंड भारतीय चित्रपटसृष्टीत दिसून येतो. असे अनेक चित्रपट आहेत त्यातही नाव घेण्यासारखा एक चित्रपट म्हणजे "आर्टिकल 15" !
दिगदर्शक अनुभव सिन्हा यांनी २०१९ मध्ये आयुष्यमान खुराणा सारख्या तगड्या अभिनेत्याला घेत हा चित्रपट बनविला होता. हा चित्रपट आधारित होता उत्तर प्रदेश मधील २०१४ साली गाजलेल्या बदायु दलित बलात्कार प्रकरणावर ! हे तेच प्रकरण आहे ज्या प्रकरणावर बोलतांना उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते, नेताजी मुलायमसिंग यादव यांनी आपल्या एका निवडणुकीतील भाषणात "जवान लाडके है और जवानी के जोश मे गलतीया हो जाती है।" सारखे हीन मानसिकतेचे वक्तव्य केले होते. या प्रकरणानंतर समाजवादी पक्ष आणि एकूणच यादव कुलउत्पन्न नेत्यांची बरीच छि थु झाली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी यादव होता. अर्थात मुलायमसिंग यादव यांनी भाषणात वापरलेली भाषा अशी का याचे उत्तर आपल्याला मिळते. मात्र या सत्य घटनेवर आधारित आर्टिकल 15 हा चित्रपट बनवतांना अनुभव सिन्हा यांनी या प्रकरणातील आरोपीचे सत्य लपवत आपल्या तथाकथित अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पूर्ण वापर करत आरोपी ब्राम्हण जातीचा दाखविला होता, कहाणी करता कदाचीत योग्य असेल मात्र, सत्याचा विचार करता हे पूर्णपणे असत्य दाखविल्या जात होते.
आता हे आठवण्याचे कारण काय ? तर ज्या झी स्टुडिओने या आर्टिकल 15 चित्रपटाची निर्मिती केली होती, त्याच झी स्टुडिओचा नवीन चित्रपट आला आहे "200 हल्ला हो" ! आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात, उपराजधानी नागपुरात घडलेल्या आणि राष्ट्रीय तसेच आंतराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या २००४ सालच्या अक्कु यादव प्रकरणावर आधारित हा चित्रपट आहे. नुसतेच आधारित आहे असे नाही, तर या चित्रपटात नागपूरचा तसा उल्लेख पण आहे. मात्र हैराण करणारी गोष्ट ही आहे की या चित्रपट लेखकाला, दिगदर्शकाला मात्र मेलेल्या गुंडाचे खरे नाव पण वापरता आले नाही. अर्थात या चित्रपटात गुंडाचे खरे नाव वापरल्यामुळे गुंड काही करेल भीती पेक्षा पण आपला राजकीय किंवा वैचारिक अजेंडा यांना समोर चालवता आला नसता हे प्रकर्षाने जाणवते.
या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये पण सतत दलित अत्याचार आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो वगैरे दाखवत बरीच वातावरण निर्मिती केल्या गेली होती. तर चित्रपटात गुंडाचे नाव अक्कु यादव न दाखवता "बल्ली चौधरी" दाखवले आहे. आता चौधरी नावावरून आपोआप यात जाती विवाद समोर येतो आणि साहजिकच संपूर्ण चित्रपट सुवर्ण विरुद्ध दलित संघर्षावर फिरतो. मात्र हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित म्हणून सांगत धडधडीत पणे सत्याचा विपर्यास करतो.
कसे ते आपल्याला सत्य घटना जाणून घेतल्या शिवाय कळणार नाही. १३ ऑगस्ट २००४ रोजी नागपूरच्या जिल्हा सत्र न्यायालयात, तेही न्यायाधीशां समोर जवळपास २०० महिलांनी अक्कु यादव उर्फ भरत कालीचरण या गुंडाला काठी, कोयते, कात्री, चाकू, विळी अश्या घरगुती कामाची अवजारे वापरून ठार मारले. या संपूर्ण घटनेमुळे शहरात, राज्यात, देशात जबरदस्त खळबळ माजली. या घटनेमुळे नागपूर पोलीस, प्रशासन, न्यायव्यवस्था या सगळ्यावर खूप मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले. गुंड आणि पोलीस यांच्या आपसातील मैत्रीपूर्ण संबंधा मुळे सर्वसामान्य माणूस नागवला जातो हे सत्य प्रकर्षाने समोर आले आणि नंतर या अक्कु यादव आणि पोलीस यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधातील अनेक सुरस कथा बाहेर यायला लागल्या, सोबतच अक्कु यादव या नराधमाच्या दहशतीच्या कथा देखील !
नागपूरच्या कस्तुरबा नगर या निम्न वर्गीय जनतेच्या, अठरा पगड भाषिक, जातीय समूह राहत असलेल्या वस्तीतील अक्कु यादव या स्थानीय गुंड ! या भागातील प्रत्येक बेकायदेशीर धंद्यातील भागीदार, सोबतच आपल्या गुंड शक्तीची त्या परिसरातील नागरिकांवर दहशत बसवणारा नराधम ! मरायच्या अगोदर जवळपास दहा वर्षे हा अक्कु या कस्तुरबा नगरात धुमाकूळ घालत होता. या सगळ्या काळात या अक्कु यादववर गुंडागर्दी, मारझोड, खंडणी आणि खुना सारखे जवळपास २५ गुन्हे दाखल होते. या शिवाय जवळपास ४० बलात्कार पण या गुंडाने केले होते. इतकेच नाही तर बलात्कारी स्त्रीचा खून केल्याचे आरोप पण त्याच्यावर होते. इतके गुन्हे करून पण हा गुंड मात्र न्यायालयातून किरकोळ शिक्षा अथवा जामीन मिळवण्यात नेहमी सफल व्हायचा. हे कसे? तर त्या भागातील पोलिसांच्या सहकार्याने ! पोलीस कधीच त्याच्या विरोधात पक्के प्रकरण बनवत नव्हते, अनेक प्रकरणात तर कोणी त्याच्या विरोधात तक्रार दाखल करत नाही म्हणून किंवा त्याच्या विरोधात जबानी देत नाही म्हणून त्याची सुटका झाली. इतक्या दहशतीत पण जनता त्याच्या विरोधात का बोलत नव्हती?
तर त्याचे आणि पोलिसांचे साटेलोटे सगळ्यांना माहीत होते, पोलीस त्याच्या विरोधात योग्य तक्रार लिहूनच घेत नव्हते असा आरोप नंतर झाला. सोबतच त्याने आपल्या विरोधात गेलेल्यांचे केलेले खून पण जनतेला तोंड बंद ठेवायला बाध्य करत होते. अक्कु यादवने त्याच परिसरात केलेल्या आशु भगत या महिलेवर तिच्या मुला बाळांसमोर बलात्कार आणि खून केल्यावर त्या विरोधात आवाज उठवणाऱ्या अविनाश तिवारी याचा पण निर्घृण खून या नराधमाने केला होता. हे दोन्ही गुन्हे त्याने सर्वसमक्ष केले होते.
मात्र तरी या यादवला न्यायालयाकडून नियमित जामीन उपलब्ध होत होता, तो कसा? हे काही गुपित नाहीये ! १३ ऑगस्ट २००४ रोजी पण अक्कु अश्याच एका गुन्हयाच्या न्यायालयीन सूनवाई साठी नागपूर जिल्हा न्यायालयाच्या सात क्रमांकाच्या न्यायालयात हजर होता. फक्त फरक इतकाच होता की या दिवशी न्यायालयाचा निकाल नक्की काय लागणार आणि अक्कु यादवला शिक्षा होणार का हे बघायला त्याच्या धहशतीला घाबरलेले आणि पोलीस, न्यायालयाकडून पिचलेले संतप्त असे कस्तुरबा नगर वासीपण हजर होते, निर्धार असा की न्यायालयाने न्याय केला नाही तर आपण न्याय खेचून आणायचा !
प्रकरण न्यायालयासमोर उभे राहिल्यावर नेहमी प्रमाणे कमकुवत सादरिकरणा मुळे न्यायालयाने अक्कुला जामीन दिला आणि या सामान्य नागरीकांचा संयम सुटला आणि मग न्यायालयातच महिलांनी प्रवेश करत २०० महिलांनी हा यादव नाव धारी नराधमास मारले. आता या प्रकरणाला दलित अत्याचार मानायचा का? हे सर्वस्वी तुम्ही ठरवायचे ! बाकी जनसामान्याच्या रेट्यामुळे या महिलांना सरकारने लवकरच सोडले, शहरात उसळलेला या प्रकरणा विरोधातील पोलीस, न्यायालय आणि प्रशासनाच्या विरोधातील जनक्षोभ थंड करायला उचललेले हे सरकारी पाऊल होते.
मात्र यातून सरकार, न्यायालय, प्रशासन आणि मुख्य म्हणजे सत्ताधारी काही शिकले का? तर अजिबात नाही ! या नंतर पण नागपूरकर जनतेने अक्कु यादवचा भाचा अमन यादव याला शहरातील कमाल चौकात २०१२ साली ठार मारले. इतके होऊन पण नागपूरच्या व्यवस्थेत बदल झाला नाही. २०१३ साली पश्चिम नागपुरातील, सरकारी कार्यालये असणाऱ्या सिव्हिल लाईन्स जवळील परिसरात असलेल्या वसंतराव नाईक झोपडपट्टीत दुसरा अक्कु यादव तयार झालाच. इकबाल असे या गुंडाचे नाव, खून, बलात्कार यासारखेच अपराध याच्या नावावर होते. पोलीस याच्या विरोधात योग्य कारवाई करत नाही म्हणून एक दिवस जनतेचा संयम सुटला, जनतेने त्याला दगडाने ठेचून ठार मारले, तेही भर रस्त्यात ! आपल्या भावाची झालेली हत्या बघून या इकबलचा लहान भाऊ "भुऱ्या" तेथून पळाला आणि थेट पोलीस ठाण्यात जाऊन लपला. जनता थेट पोलीस ठाण्यात धडकली. मात्र राग इतका अनावर होता की तेव्हा आणि नंतर पण या भुऱ्याला न्यायालयात घेऊन गेले तेव्हा पण जबरदस्त दगडफेक आणि दंगल न्यायालय परिसरातच केली.
अश्या सगळ्या प्रकरणात खरेच जातीय संगर्षं होता की भ्रष्टाचार आणि प्रशासन संबंध होता हे आता तुम्ही उमजून घ्यायचे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा