एकदाचे ऑलिम्पिक संपले. टोकियो ऑलिम्पिक २०२१ मध्ये देशाला एक सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्य पदक मिळाली. एकूण पदतालिकेत आपला देश तब्बल पंचेचाळव्या क्रमांकावर आला. तरीही आजवर झालेल्या ऑलिम्पिकमधील हे भारताचे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन आहे.
१९०० मध्ये भारताला ऑलिम्पिक मधील पहिले पदक मिळाले. हे रौप्य पदक ट्रॅक अँड फिल्ड मध्ये मिळाले होते. मात्र हे पदक मिळणारा जन्माने भारतीय, तर वंशाने ब्रिटिश होता. नॉर्मन प्रिटचार्ड याने १९०० मधील पॅरिस ऑलिम्पिक मध्ये २०० मीटर धावण्याच्या आणि २०० मीटर अडधळ्याच्या शर्यतीत ही सुवर्ण जिंकली होती. या नंतर "ट्रॅक अँड फिल्ड" प्रकारच्या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकायला आपल्याला थेट २०२१ च्या टोकियो ऑलम्पिक पर्यंत वाट पहावी लागली. बाकी भारतीयांनी पहिले सुवर्ण मिळवले १९२८ साली झालेल्या अस्टरडॅम ऑलिम्पिक मध्ये हे वयक्तिक नाही तर हॉकी मध्ये मिळवलेले सांघिक सुवर्ण पदक होते. या नंतर मात्र १९३२ लॉस एंजिल्स, १९३६ बर्लिन, १९४८ लंडन, १९५२ हेलसिंगी, १९५६ मेलबोर्न, १९६४ टोकियो आणि १९८० मॉस्को या सगळ्या ऑलम्पिक स्पर्धांमध्ये भारताला हॉकी मध्ये सांघिक सुवर्ण पदक मिळाले. साधारण १९६० पर्यंत आपण हॉकी मधील विश्व शक्ती होतो. मात्र या नंतर हॉकी मध्ये पण आपली काहीशी घसरण सुरू झाली. १९६० च्या रोम ऑलिम्पिक मध्ये आपल्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. तर १९६८ च्या मेक्सिको सिटी आणि १९७२ च्या म्युनिच ऑलिम्पिक मध्ये भारतीय हॉकी संघाला कांस्य पदकावरच समाधान मानावे लागले. या नंतर १९८० साली मॉस्को मध्ये जरी हॉकीत सुवर्ण पदक मिळाले असले तरी या नंतर मात्र भारतीय हॉकी पदक तालिकेतून बाहेरच राहिली. याला कारण जसे हॉकीतील बदललेले नियम होते तसेच देशांतर्गत हॉकी बद्दल असलेली उदासीनता आणि हॉकी फडरेशन मधील अनागोंदी कारभार पण कारणीभूत होता.
देशाला मिळालेले पहिले वयक्तिक सुवर्ण पदक २००८ मध्ये नेमबाजीत बीजिंग ऑलिम्पिक येथे अभिनव बिंद्रा यांनी मिळवले.
१९५२ मधील हेलसिंगी ऑलिम्पिकमध्ये खाशाबा जाधव यांना कुस्ती मध्ये मिळालेले कांस्य पदक हे कोणा भारतीयाला वयक्तिक कामगिरीत मिळालेले पहिले पदक आहे. या नंतर असे वयक्तिक पदक मिळवायला आपल्याला १९९६ पर्यंत वाट पाहावी लागली. या वर्षी अटलांटा ऑलिम्पिक मध्ये लियांडर पेस यांनी टेनिस मध्ये भारताला कांस्य पदक मिळवून दिले. या नंतर २००० साली सिडनी ऑलिम्पिकमध्ये कमाम मलेश्वरी यांनी वेटलिफ्टिंग मध्ये कांस्य पदक मिळवले. तर २००४ मधील अथेन्स ऑलिम्पिक मध्ये राज्यवर्धन राठोड यांनी नेमबाजीत रौप्य पदकाची कमाई केली होती.
देशकरता सगळ्यात जास्त पदकांची कमाई करणारे पहिले ऑलिम्पिक म्हणजे २००८ सालचे बीजिंग ऑलिम्पिक ! या ऑलिम्पिक मध्ये देशाला १ सुवर्ण पदक (अभिनव बिंद्रा - शूटिंग), १ रौप्य पदक (सुशील कुमार - कुस्ती) आणि २ कांस्य पदक (वीरेंद्र सिंग - बॉक्सिंग आणि सुशील कुमार - कुस्ती) मध्ये मिळाले. मात्र २०१२ च्या लंडन ऑलिम्पिक मध्ये आपल्याला सुवर्ण पदक जरी मिळाले नसले तरी २ रौप्य पदक ( विजय कुमार - शूटिंग आणि सुशील कुमार- कुस्ती) आणि तब्बल ५ कांस्य पदक (गगन नारंग - शूटिंग, सायना नेहवाल - ब्याटमिंटन, योगेश्वर दत्त - कुस्ती आणि एम. सी. मेरी कोम - बॉक्सिंग) मिळाली. मात्र या घोडदौडीला पुन्हा लगाम लागला तो २०१६ च्या रिओ ऑलिम्पिक मध्ये या वेळी आपल्याला फक्त एका रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते आणि ते मिळाले होते पुसरला सिंधू हिला ब्याटमिंटन मध्ये. सोबत एक कांस्य साक्षी मलिक - कुस्ती करता.
एकूणच भारताची ऑलिम्पिक मधील कामगिरी भारताचा आकार आणि भारताची लोकसंख्या या हिशोबाने आजपर्यंत कमीच राहिली. दर ऑलिम्पिकच्या आधी देशाला किती पदके मिळू शकतात यावर तर ऑलिम्पिक नंतर इतकी कमी पदके का मिळाली यावर आपण वाद विवाद करतो. साधारण गेल्या काही वर्षात तर या वादा सोबतच पदक मिळणाऱ्या खेळाडूंच्या जातीवरून आणि धर्मावरून हिणकस शेरेबाजी, वाद विवाद तर होतातच पण या वरूनच त्यांचे कौतुक करायचे की नाही हे ठरवले जाते. पुन्हा यात क्षेत्रवाद आणि पक्षीय वाद पण समोर येतातच. मात्र या सगळ्यात आपण कशात कमी पडतो यावरील चर्चा मात्र बाजूला पडते.
मुळातच ऑलिम्पिक मधील "ट्रॅक अँड फिल्ड" मधील अनेक स्पर्धेत आपल्याला अजून बरीच मजल गाठायची आहे. असे नाही की भारतात रनिंग, उडी आणि इतर तत्सम खेळात खेळाडू नाहीत आणि त्यांना त्यात यश मिळत नाही, मात्र ऑलिम्पिक मध्ये मात्र अपेक्षित यश मिळत नाही हे मात्र खरे आहे. भारताला आशियन गेम, कॉमनवेल्थ गेम किंवा इतर स्पर्धांमध्ये व्यवस्थित पदके मिळाली आहेत. म्हणजे आपण मर्यादीत स्वरूपाच्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करतो मात्र ऑलिम्पिक मध्ये मात्र आपल्याला मर्यादित यश मिळते. असे का होते?
या करता बरीच कारणे आहेत. लोकशाहीमध्ये सरकारवर दोष टाकणे हा खूप सोपा उपाय असतो. सरकारी बाजूने होणारे दुर्लक्ष, सरकारी कारभारात होणारी बाबूगिरी, देशात सगळीकडे असणारा भ्रष्टाचाराच्या भस्मासुराने इथेही दाखवलेले आपले अस्तित्व, अपुऱ्या सुविधा, अपुरे मानधन अश्या अनेक अडथळ्यांवर मात करत या खेळाडूंनी ही पदके मिळवली आहेत. पदके मिळवण्यात जसा टेक्निकल प्रशिक्षणाचा अभाव हे जसे कारण आहे, तसेच काही स्पर्धांमध्ये आपली नैसर्गिक शरीरयष्टी हे पण मोठे कारण आहे. याचमुळे आपण मर्यादित स्वरूपाच्या स्पर्धांमध्ये जरी ट्रॅक अँड फिल्ड प्रकारात पदकांची लयलूट करत असलो तरी ऑलिम्पिक सारख्या स्पर्धेत आपण मागे राहतो. त्याच मुळे इतर देश ट्रॅक अँड फिल्ड या मुख्य ऑलिम्पिक स्पर्धा प्रकारात जेव्हा पदकांची लयलूट करत असतात तेव्हा आपण त्यात नसतो. नैसर्गिक रित्या आफ्रिकन वंशाची लोक या प्रकारात आपला दबदबा कायम ठेवून आहेत. त्या नंतर संपन्न देश ज्यांनी या करता बरीच वैद्यकीय सुविधा आणि भरपूर पैसा ओतत तयारी केली आहे अशांचा क्रमांक लागतो. चीन सुद्धा भरपूर पैसा आणि वेगवेगळे प्रयोग करत खेळाडूंचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य सतत वाढवत आहे. त्याचे फळ आपल्याला त्या त्या देशांना मिळणाऱ्या पदकांच्या संख्येच्या रूपाने बघायला मिळत आहे.
भारताच्या दृष्टीने विचार केला तर आजवर मिळालेली पदके कोणत्या स्पर्धेत मिळाली याचा विचार केला तर, आपण बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग, कुस्ती आणि शूटिंग मध्ये सगळ्यात जास्त पदके मिळवली आहेत. यातील बॉक्सिंग, वेतलिफ्टिंग आणि कुस्ती मध्ये खेळाडूंच्या वजनानुसार गट केले असतात. त्या मुळे जवळपास सगळे खेळाडू काही बाबतीत एका लेव्हलवर असतात. आता फक्त खेळाडूंचे वयक्तिक कौशल्य आणि प्रबळ मानसिकता यावर सगळी मदार असते. तिथे भारतीय खेळाडू बाजी मारून जातात. हा फरक खेळावर चर्चा करतांना नक्कीच लक्षात घ्यायला हवा.
मात्र तरीही काही खेळ असे आहेत ज्यात आपल्या खेळाडूंना प्राविण्य प्राप्त करता येणे शक्य आहे मात्र तिथे कदाचित खेळ फेडरेशन आणि सरकारचे प्रयत्न कमी पडत आहेत. नौका नयन आणि तिरंदाजी यात आपल्याला बरेच काही करता येईल मात्र इथे आपल्याला सूर गवसला नाहीये. हे दोन्ही खेळ पारंपरिक रित्या देशात खेळले जात आहेत.
देशात जागतिकीकरण सुरू झाल्यानंतर आता काही खेळा साठी काही खाजगी प्रयत्न पण सुरू झाले आहेत. ज्या मुळे काही खेळात आपली गुणात्मकता वाढली आहे. यात उदाहरणच द्यायचे झाले तर बॅडमिंटन खेळाचे घ्यावे लागेल. खाजगी अकादमीच्या माध्यमातून आपल्याला सायना नेहवाल आणि पी व्ही सिंधू सारखे हिरे प्राप्त झालेत. सरकारी - खाजगी पार्टनरशिपच्या माध्यमातून सुरू झालेल्या प्रयत्नांचे फळ २०२१ च्या टोकियो ऑलिम्पिक मध्ये दिसत आहेत. या वेळी जे एस डब्लू (जिंदाल स्टील) ने अनेक खेळाडूंना मदतीचा आणि प्रशिक्षणाचा हात दिला. इतकेच नाही तर सरकारने पण गेल्या काही वर्षात या बाबतीत सकारात्मक पावले उचलली माहीत. खेळाचे बजेट कुठेही कमी केलेले नाही. मात्र अनावश्यक खर्चाला कात्री जरूर लावली आहे. वेगवेगळ्या खेळ फडरेशन ज्या राजकारणी लोकांच्या कुरण झाल्या होत्या आणि सरकारी बाबूशाहीचा नमुना त्याला वेसण घालण्याचा प्रामाणिक प्रयत्न पण झाला आहे, जे करण्याची हिंमत गेल्या काही सरकारांनी केली नव्हती. सोबतच गेल्या काही वर्षात देशाला हर्षवर्धन राठोड आणि रिजजू सारखे खेलमंत्री लाभले, ज्यांना स्वतःला ऑलिम्पिक मध्ये खेळण्याचा अनुभव आणि खेळविषयी, खेळाडूंविषयी आस्था होती आणि आहे. हा बदल खूप मोठा होता. त्यातूनच देशात "टार्गेट ऑलिम्पिक पोडीयम स्कीम" म्हणजेच "टॉप्स" चे नियोजन झाले आहे. या योजने द्वारे अगदी प्राथमिक अवस्थेपासून खेळाडू बालक शोधणे, त्यांना योग्य प्रशिक्षण देणे, योग्य सोई सुविधा पुरवणे, वेगवेगळ्या जागतिक स्पर्धेत त्यांचा कस लागू देणे आणि या सगळ्यातून त्यांना ऑलिम्पिक करता तयार करणे ही प्राथमिकता आहे. बरे हे नियोजन फक्त २०२० (झाले २०२१ मध्ये) टोकियो ऑलिम्पिक करता नाही तर भविष्यातील २०२४, २०२८ आणि २०३२ च्या ऑलिम्पिकची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे.
या सगळ्याचे सकारात्मक परिणाम आपल्याला टोकियो मध्ये भालाफेक मधील नीरज चोप्रा याला मिळालेल्या सुवर्ण पदकाच्या रुपाने दिसत आहे. २००८ मध्ये अभिनव बिंद्रा याला मिळालेले सुवर्ण पदक आणि आता नीरज चोप्रा याला मिळालेले सुवर्ण पदक यातील महत्वाचा फरक म्हणजे अभिनव बिंद्रा याला जेव्हा आवश्यक सुविधा सरकार पुरवू शकले नाही तेव्हा त्याच्या कुटूंबाने त्या सुविधा घरात उभारल्या. कारण बिंद्रा कुटुंबीय संपन्न होते. मात्र गरिबीतून वर येणाऱ्या खेळाडूंचे काय? तर आता त्यांच्या करता सरकार आणि देशातील खाजगी उद्योग उभे राहतील याचीच उदाहरण म्हणजे नीरज चोप्रा आहे.
बाकी पंतप्रधान जिंकलेल्या आणि काही हरलेल्या खेळाडूंसोबत बोलले आणि तेही सार्वजनिकरित्या प्रसारित केले गेले याचा अनेकांना राग आलेला दिसत आहे. मात्र प्रत्येकाची लोकांसोबत जुळण्याची वेगवेगळी पद्धत असते. नरेंद्र मोदी यांची हीच पद्धत आहे आणि ही या पूर्वी अनेकदा दिसली आहे, त्याचे सकारात्मक परिणाम पण दिसले आहेत. बाकी आताचे सरकार कसे काम करत आहे आणि पंतप्रधान कसे स्वतः जातीने संवाद साधत आहे या करता अंजु जॉर्ज यांनी केलेले वक्तव्य अधिक सूचक आहे.
आता बदल आवश्यक आहे तो आपल्या मानसिकतेत ! क्रिकेट हा एकमेव खेळ नाही आणि खेळ खेळल्याने मूल वाया जात नाही हे समजून घेणे आवश्यक आहे. भरतीयांकरता टायकांडो, ज्यूडो, बॉक्सिंग, कुस्ती, तिरंदाजी, नेमबाजी, बॅडमिंटन, टेबल टेनिस, गोल्फ सारखे अनेक खेळ आहेत ज्यात प्राविण्य प्राप्त होऊ शकतेच आणि ऑलिम्पिक मध्ये पदक पण प्राप्त होऊ शकते. आवश्यकता आहे आपल्या पाल्याला आपल्याकडून योग्य मानसिक पाठींबा मिळण्याची.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा