धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर



तुम्हाला उत्तर प्रदेशातील डासना येथील ते देवीचे मंदिर लक्षात आहे का? होय, तेच मंदिर जिथे मुस्लिम मुलगा पाणी प्यायला गेला म्हणून मारझोड झाली अश्या स्वरूपाचे चलचित्र समोर आले होते, या चलचित्रामुळे संपूर्ण देशात धुराळा उडाला होता. मग त्या नंतर बरेच आरोप प्रत्यारोप झालेत, मग दुसरे चलचित्र समोर आले की तोच मुलगा मंदिरातील देवांचा अपमान करत आहे, सोबतच हे पण समोर आले की, डासना येथे मुस्लिम लोकसंख्या जशी जशी वाढत आहे त्या अनुपातमध्ये हिंदू धर्मीय लोकांना त्रास देण्याचे प्रमाण, मंदिराला अपवित्र करण्याचे प्रमाण पण वाढत आहे. आता मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर किमान २०० मीटर अंतरावर दोन पाण्याचे स्रोत असतांना तो मुस्लिम मुलगा केवळ पाणी पिण्यासाठी मंदिरात का गेला? असला प्रश्न विचारल्यावर मात्र अनपेक्षितपणे हा सगळा धुरळा बसला. नंतर मंदिराचे महंत नरसिंहानंद सरस्वती समोर आले. त्या नंतर डासना या मुस्लिम बहुल गावातील एकापेक्षा एक हिंदूंसाठी भयानक कथा समोर यायला लागल्या. त्या नंतर या महंत महाराजांची जीभ पण काही प्रमाणात घसरली आणि अनेक हिंदू त्यांच्या विरोधात पण बोलायला लागले.


आज हे सगळे आठवण्याचे नक्की कारण काय? तर अनेक आहेत, सोबतच देशाची धार्मिक गुंतागुंत आणि आपल्या राजकारण्यांचे त्या विषयी आकलन किती तकलादू आहे हे समजून घ्यायचे काम आता आपल्याला करावे लागणार आहे. तर प्रथम डासनाच्या प्रकरणाची आठवण कशी? तर सध्या देशात धर्मातरणाचा एक मुद्दा खूप मोठ्या प्रमाणात गाजत आहे. मुद्दा समोर आला उत्तर प्रदेश मधून ! या प्रदेशातील गरजू लोकांना पैशाची, नोकरीची लालूच दाखवत त्याना हिंदू धर्मातून मुस्लिम धर्मात सामावून घेण्याचा आणि मुख्य म्हणजे राज्यातील मूक बधिर विद्यार्थ्यांचा ब्रेन वॉश करत त्यांच्या पालकांच्या नकळत त्या मुलांचे धर्मातरणा केल्या गेल्याचा आरोप होत आहे. या आरोपाखाली जमिया नगर, दिल्ली येथील इस्लामिक दावा सेन्टर या संस्थेच्या माध्यमातून हे धर्मातरणाचे काम करणाऱ्या मौलाना उमर गौतम ! या संस्थेच्या नावातच आमंत्रण आहे, इस्लामिक दावा सेन्टर म्हणजे इस्लाममध्ये येण्याची दावत म्हणजेच आमंत्रण देणे. स्वतः उमर गौतमपण धर्मातरीत आहे, पूर्वाश्रमीचा श्याम प्रतापसिंग गौतम ! सोबत अजून एक आहे मुफ्ती जहागीर कासमी. या प्रकरणात जवळपास एक हजार हिंदूंचे धर्मातरणा या पद्धतीने केल्याचा आरोप आहे. सोबतच या सगळ्या प्रकारासाठी जगातील मुस्लिम देशातून मोठ्या प्रमाणावर पैसे येत असल्याचा आरोप पण आहे.



आता तुम्हाला प्रश्न पडेल की डासना येथील ते देवीचे मंदिर आणि या प्रकरणाचा संबंध काय? ३ जून २०२१ या दिवशी या मंदिरातून उत्तर प्रदेश पोलिसांनी दोघांना अटक केली. या दोघांनी डासना मंदिरात प्रवेश करतांना आपले नाव नोंदवले विपुल विजयवर्गीय आणि काशी गुप्ता ! मात्र लवकरच लक्षात आले की या दोघांनी धर्मपरिवर्तन केले आहे आणि विपुल बनला आहे रमजान आणि काशी बनला आहे कासिफ ! या लोकांनी आपली खरी ओळख लपवत पूर्वाश्रमीच्या नावाच्या मदतीने मंदिरात प्रवेश केला. आपले खरे रूप समोर आल्यावर या दोघांनी सांगितले की महंत नरसिंहानंद सरस्वती यांच्या मनात असलेल्या इस्लामबाबतच्या चुकीच्या कल्पना खोदून काढण्यासाठी, त्यांच्या सोबत चर्चा करायला आम्ही आलो होतो. मात्र महंत नरसिंहानंद सरस्वती यांनी हे दोघे आपली ओळख लपवून आपल्याला मारायला आले होते असा आरोप केला. लक्षात घ्या की मंदिरातील मारहाण प्रकरणानंतर महंत नरसिंहानंद सरस्वती यांनी इस्लामबाबत आणि पैगंबर मोहम्मद यांच्या बाबत केलेल्या वक्तव्यांमुळें भारतातील मुस्लिम जनमत महंत यांच्या विरोधात गेले होते. पैगंबरांचा अपमान केल्याचा ठपका ठेवत त्यांचे डोके कलम करणाऱ्यास बक्षीस पण जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे मंदिरात ओळख लपवून प्रवेश करणाऱ्यांवर केलेला आरोप अगदीच असत्य नव्हता.

रमजान आणि काशीदला मुजफ्फरपूर पोलिसांनी अटक केल्यानंतर उत्तर प्रदेश ए टी एस चा या प्रकरणात प्रवेश झाला. या दोघांच्या चौकशीत उत्तर प्रदेश ए टी एसला सुगावा लागला या धर्मातरणा करणाऱ्या टोळीचा आणि मग अटक केल्या गेली उमर गौतम आणि मुफ्ती काजी जहागीर कासमी यांना. या सगळ्या प्रकरणाचा धुरळा उडतो आहे. मुस्लिम जगत आणि भारतातील तथाकथित बुद्धिवाद्यांकडून सांगितल्या जात आहे की आमच्या धर्माचा प्रसार करण्याचा आम्हाला संविधानिक अधिकार आहे, सोबतच देशातील जनतेलापण आपले धर्म बदलण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे त्या मुळे उमर गौतम करत असलेला धर्म प्रचार आणि या प्रचारातून प्रेरणा घेत काही लोकांनी केलेले धर्मातरणा हा प्रकार कोणत्याही पद्धतीने अपराध होऊ शकत नाही.



होय, अर्थातच धर्मप्रचार आणि प्रसार करण्याचा कायदेशीर हक्क आहेच, सोबतच जनतेला धर्म बदलण्याचापण अधिकार आहे मात्र कोणत्या पद्धतीने? अल्पवयीन मुले, त्यातही जे अपंग आहेत अश्या मुलांना आपल्या पालकांच्या अपरोक्ष करणे ही मुभा भारतीय संविधान आणि कायदा नक्कीच देत नाही. उत्तर प्रदेशातील शहाजहापूर येथे राहणारी रेणू गंगावर या तरुणाने काही काळापूर्वी धर्मातरण याच इस्लामिक दावा सेन्टर मार्फत केले, नाव झाले आयशा अल्वी ! या रेणूला आमिष दाखवण्यात आले की तू धर्म बदलला तर तुला दुबई विमानतळावर चांगल्या पगाराचे काम देण्यात येईल. रेणू या आमिषाला भुलली आणि बनली आयशा ! मात्र तिला कोणतीही नोकरी मिळाली नाही. हे प्रकरण बाहेर आले तेव्हा रेणूची कहाणी पण समोर आली. मात्र आता आयशा आपणच सांगितलेल्या कहाणीला खोटे ठरवत आहे आणि आपण आपल्या मर्जीने धर्मातरण केल्याचे सांगत आहे. अर्थात रेणूच्या या बदलल्या दाव्यामागे नक्कीच कोणतातरी दबाव काम करत असणार यात काही शंका नाही.

तुम्हाला उत्तर प्रदेशातील कैराना प्रकरण आठवत आहे का? याच मुजफ्फरपूर जिल्ह्यातील कैराना गावातील हिंदूंना मुस्लिम बहुल जनता पलायन करायला बाध्य करत आहे असा आरोप झाला होता. या गावातील अनेक हिंदू लोकांच्या घरावर "घर विकणे आहे" या प्रकारची सूचना लिहलेली छायाचित्रे वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रात बरीच गाजली होती. तत्कालीन काळात डाव्या विचारांच्या पत्रकारांनी, संस्थांनी लगेच असे काही होत नसल्याचा आणि आरोप खोटे असल्याचा कांगावा केला होता. प्रत्यक्ष जागेवर जात असे काही नसल्याचे रिपोर्ट यायला लागले होते. त्यात दावा असा केल्या गेला की, हिंदू आपल्या उज्वल भविष्यासाठी स्वतःहून गाव सोडत आहेत आणि त्यामुळे ते आपले गावातील घर विकून टाकत आहेत. मात्र असे वृत्तांकन करत असतांना कोणीही हा प्रश्न विचारला नाही की उज्वल भविष्याची आस फक्त या गावातील हिंदूंनाच का आहे? आणि भारतीय मानसिकतेत दुसऱ्या शहरात राहायला गेल्यावरपण गावातील आपली नाळ तुटू न देण्याची परंपरा आहे. त्यामुळे आपल्या गावातील घर एकवेळ रिकामे ठेवत त्याचे खंडहर बनवतील मात्र विकणार नाहीत, वर्षा दोन वर्षातून एक चक्कर तरी आपल्या घरात मारतील, मग एकाएकी सगळे हिंदूच असे घर विकायच्या मागे का लागले? हे प्रश्न मात्र कोणीही विचारायची तसदी घेतली नाही. आता पण या धर्मांतराच्या मुद्यावर असे काही ज्यांनी आपल्या मर्जीने धर्मांतर केले अश्यांच्या मुलाखती प्रसिद्ध करत या प्रकरणात काही राम नसल्याचा देखावा उभा केला जात आहे.

विशेष म्हणजे संपूर्ण देशात धर्मांतर करणे हा आमचा कायदेशीर आणि धार्मिक हक्क असल्याचा आवाज मोठा केल्या जात आहे. देशातील जमात ए इस्लामी सारख्या संस्था अगोदर पासूनच धर्मांतर करण्यासाठी आघाडीवर आहे. त्या करता मग हिंदू धर्माची / देवांची निंदा नालस्ती करण्यास पण कचरत नाही. अनिष्ट रूढी परंपरा जगातील प्रत्येक धर्मात आहेत, मात्र स्वतःच्या धर्माची जाहिरात करतांना मात्र आपल्या अनिष्ट पंरपरा लपवून ठेवत हिंदू धर्माच्या नावाने ओरड करणे हे गरजेचे असते याच तत्वावर हे काम करते. त्यातून मग "एक दिवस मशिदीत" आणि "अंधारातून प्रकाशाकडे" असले सप्ताह आपल्या राज्यात देशात साजरे करत हिंदूंची दिशाभूल केल्या जाते. मूक बधिर अल्पवयीन विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या अपरोक्ष इस्लामची दीक्षा देण्यात कोणती नैतिकता आहे हे मात्र कोणीही सांगणार नाही. आज या प्रकरणात बेकायदेशीर काहीही नाही सांगणारे आणि असे सांगणाऱ्या लोकांची कड घेणारे चाय बिस्कुट संपादक-पत्रकारांनीच एकेकाळी हिंदू संघटनांच्या "घर वापसी" या शुद्धीकरण करून घेत हिंदू धर्मात प्रवेश करवून घेण्याच्या कार्यक्रमाचा जोरदार विरोध केला होता. असे कार्यक्रम घेणाऱ्या हिंदुत्ववादी लोकांवर वेगवेगळ्या प्रकरणात कायदेशीर ससेमिरा लावण्यात आला होता. आजही हिंदुत्ववादी संघटनांना खुलेआम हिंदू धर्मात प्रवेश करा असे आवाहन करता येत नाही असे का ? याचा विचार तुम्हा आम्हाला नक्कीच करावा लागेल.

नाहीतर देश स्वतंत्र होतांना पाकिस्थानच्या रुपात धार्मिक आधारावर तुटला, आपण त्याकडे हताश नजरेने बघत बसलो. काश्मीर मधून हिंदूंना परागंदा केल्या गेले आपण तिकडे पण तितक्याच हताशपणे बघत बसलो. लव्ह जिहाद सारख्या प्रकरणातून अजून आपण काही शिकत आहोत ते दिसत नाही, उलट प्रेमा सारख्या उदात्त भावनात आपण धार्मिकता बघत आहोत असा आरोप सहन करावा लागतो आहे. आता या धर्मांतराच्या प्रकरणात पण तेच होणार. मूळ मुद्याला बगल देत संवैधानिक हक्क, कायदेशीर संकल्पना या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या आहेत. पुन्हा अल्पसंख्यकांवर अन्याय हा भावनिक मुद्दा आहेच. सोबतच आगामी उत्तर प्रदेश राज्याच्या निवडणुकात मतांची बेगमी म्हणून भाजपा हे प्रकरण उगाच ताणत आहे असा विचार पण मांडल्या जात आहे. तेव्हा वेळीच जागे व्हा, काश्मीर ते कैराना व्हाया लव्ह जिहाद जसे हळूहळू थंड बसत्यात गेले तसे या प्रकरणाचे होऊ देऊ नका.

काय आहे डी एन ए जरी एकच असला तरी धार्मिक शिकवणीत बराच फरक आहे हे लक्षात घ्या. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगितलेले "धर्मांतर हेच राष्ट्रांतर" हे चांगले लक्षात ठेवा.

टिप्पण्या