"५५, कॅलझाडा, ला हवाना, क्युबा" हा पत्ता आहे अमेरिकेच्या क्युबातील वकीलातीचा ! क्युबात झालेल्या राजकीय उलथापालथीत सक्रिय सहभाग असलेली इमारत. १९५३ साली ही इमारत बांधून पूर्ण झाली आणि अमेरिकन वकिलातीचे कामकाज येथून सुरू झाले. त्या काळात क्युबात सत्ता होती फुलग्येनो बतीस्ता या हुकूमशहाची. तत्कालीन काळात सोवियत रशिया आणि अमेरिकेत शीतयुद्ध सुरू होते. जग भांडवलशाही आणि साम्यवादी शक्तींमध्ये विभागल्या जात होते. दक्षिण अमेरिका पण या राजकारणाच्या बाहेर नव्हता. अमेरिकेला आपल्या प्रभावक्षेत्रात साम्यवादी राजवट मंजूर होणे शक्यच नव्हते. त्या करता अमेरिका कोणत्याही थराला जायला तयार होती. त्या तर दक्षिण अमेरिका खंडातील अनेक देशात साम्यवादी आंदोलने जोरात सुरू होते. आंदोलने सुरू असलेल्या अनेक देशात हुकूमशाही राजवटी होत्या, जुलुमी होत्या. मात्र फक्त येणारा साम्यवाद रोखण्यासाठी अमेरिकन सरकार या हुकूमशाही जुलमाकडे कानाडोळा करत, या राजवटींना आवश्यक मदत पुरवत होती.

त्याच प्रमाणे क्युबातील बतीस्ता देखील अमेरिकेच्या पाठींब्यावर आपली सत्ता कायम ठेवून होता. मात्र १९५३ साली फिडेल कॅस्ट्रो आणि चे गव्हेरा यांनी क्युबात साम्यवादी क्रांतीची सुरवात केली. अमेरिका पूर्ण शक्तीनिशी बतीस्ताला मदत करत होती. मात्र हुकूमशाहीला कंटाळलेली जनता मात्र फिडेलच्या मागे उभी राहिली आणि १९५९ पर्यंत बतीस्ताला आपली खुर्ची सोडून पळ काढावा लागला. १९६५ पासून फिडेल केस्ट्रोने क्युबावर पूर्ण अधिकार स्थापन करत, तिथे साम्यवादी राजवट रुजवली. या सगळ्या स्थित्यंतरात प्रत्यक्ष साक्षीदार आणि सक्रिय सहभाग या अमेरिकन वकिलातीचा राहिला. साम्यवादी सत्ता स्थापन झाल्यावर तर या इमारतीचे आणि त्यातून चालणाऱ्या कामाचे महत्व अधिकच वाढले. त्यातच आता फिडेल केस्ट्रोच्या मागे सोवियत रशियापण भक्कमपणे उभा राहिला. याच क्युबामध्ये सोवियत रशिया उभारत असलेल्या आण्विक मिसाईल मुळे काही काळ जगाला आण्विक युद्धाच्या भीतीत व्यतीत करावा लागला. क्युबातील फिडेलची सत्ता उलथवण्याचे अनेक कारस्थाने याच इमारतीत शिजली आणि ही कारस्थाने फोल गेल्याची दुःख पण या इमारतीने सहन केली. या सगळ्या राजकीय गदारोळात या इमारतीने अमेरिकन हेरांचे क्युबातील कारनामेपण बघितले, तर क्यूबन हेरांनी दिलेला प्रतिशहपण बघितला. कधी कधी क्यूबन हेर या इमारतीत हेरगिरी करत आणि कोणताही पुरावा न सोडता गायब होत, तर कधी मुद्दाम पुरावे मागे सोडत, आम्ही पण तुमच्या मागावर आहोत याची जाणीव अमेरिकेला आणि या इमारतीला करून देत.
अमेरिकेच्या प्रत्येक राष्ट्रध्यक्षाचा क्युबाविषयीच्या दृष्टिकोनाचा असर या इमारतीत काम करणाऱ्या माणसांवर आणि या इमारतीवर दिसे. बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यावर त्यांनी क्युबाबाबत नारमाईचे धोरण ठेवले आणि या इमारतीच्या आतील तणाव काहीसा निवळला. फेडेल केस्ट्रोनेपण ओबामांच्या कृतीला सकारात्मक प्रतिसाद दिला. अर्थात सोवियत रशियाच्या पतनानंतर क्युबाच्या मागे भक्कमपणे उभे राहिल असे कोणी नव्हते. रशिया अजूनही मित्र असला तरी आता सोवियत संघवाली स्थिती आता राहिली नाही हे फिडेल केस्ट्रोपण मनोमन जाणून होते. बराक ओबामांच्या कृतीने क्युबावरील काही आर्थिक निर्बंध शिथिल झाले तर याचा फायदा क्युबालाच जास्त होईल हे ते जाणून होते. मात्र २०१६ मध्ये फिडेल केस्ट्रो यांचा मृत्यू झाला आणि त्याचे भाऊ राउल केस्ट्रो यांनी क्युबाचे राष्ट्राध्यक्षपद हातात घेतले. मात्र या नंतर अमेरिकेसोबत संबंध सुधारण्यासाठी पुढील चर्चा होण्याआधीच अमेरिकेत सत्ताबदल झाला बराक ओबामा जात त्यांच्या जागी डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आले. अमेरिकेला जागतिक राजकारणात पुन्हा जुन्या काळातील वैभव देत एकमेव महासत्ता म्हणून समोर आणायच्या ध्येयाने पछाडलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी बराक ओबामांनी क्युबाविषयी घेतलेले धोरण पुन्हा बदलले. पुन्हा अमेरिका आणि क्युबातील राजकारणात तणाव निर्माण झाला. हा तणाव निर्माण झाला असला तरी क्युबाच्या नवीन राष्ट्रपतींनी मात्र यात थोडी सबुरी दाखवली. राउल केस्ट्रो यांनी आपण अमेरिकेसोबत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करायला कटिबद्ध आहोत याची ग्वाही दिली. अर्थात आता असलेली क्युबाची आर्थिक कोंडी आणि क्युबाच्या मागे नसलेला सोवियत संघाचा भक्कम आधार ही कारणे क्युबातील सत्ताधाऱ्यांच्या समंजसपणा मागे होताच.

मात्र या सगळ्या विश्वस - अविश्वासाच्या वातावरणात क्युबाच्या अमेरिकन वकीलातीत वेगळ्याच घटना घडायला लागल्या. क्युबाच्या या अमेरिकन वकीलातीतील सहाव्या मजल्यावर अमेरिकन गुप्तचर खाते म्हणजे सी आय ए चे मुख्य कार्यालय आहे. अर्थात प्रत्येक देशाच्या वकीलातीत कमी जास्त प्रमातात त्या त्या देशाचे गुप्तचर खाते कमी जास्त प्रमाणात काम करत असतेच. मात्र क्युबा मध्ये मात्र सी आय ए ची उपस्थिती जरा जास्त महत्वाची आहे आणि त्याचे काम पण ! ३० डिसेंबर २०१६ ला या वकीलातीत काम करणारा एक सी आय ए चा अधिकारी वकीलातीच्या आरोग्य विभागात एक विचित्र तक्रार घेऊन आला. त्याच्या म्हणण्यानुसार रात्री तो घरी झोपला असतांना एका विचित्र आवाजामुळे त्याला जाग आली. तेव्हा पासून त्याचे डोके सतत दुखत आहे आणि चक्कर येत आहे. या तक्रारी नंतर त्याची शारीरिक चाचणी घेतल्या गेली. डोक्यावर किंवा शरीरावर अजून कुठे मार पडल्याच्या खुणा आहेत का ते बघितल्या गेले. मात्र त्याच्या शरीरावर तशी काही चिन्हे दिसली नाहीत. ही पहिलीच घटना असल्यामुळे तत्कालीन काळात त्या अधिकाऱ्याला निरीक्षणाखाली ठेवल्या गेले, बाकी काही हालचाल झाली नाही.

पण जानेवारी २०१७ मध्ये अजून एक सी आय ए अधिकारी एकदम तशीच तक्रार घेऊन समोर आला. त्याला पण आपल्या डोक्यावर बॉम्ब फुटल्यासारखा आवाज आल्याने जाग आली आणि तेव्हा पासून त्याच्या डोके विचित्र पद्धतीने दुखायला लागले होते, चक्कर येत होती. या नंतर मात्र या विषयाकडे गांभीर्याने बघायला सुरवात केल्या गेली. या प्रकरणानंतर त्यांच्यात होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक बदलांकडे गांभीर्याने बघितल्यावर लक्षात आले की यांना जबरदस्त विस्मरणाचा त्रास होत आहे. पाच मिनिटं पहिले ऐकलेली गोष्ट पण त्यांच्या लक्षात राहात नाहीये. तसेच त्याच्या शारीरिक प्रतिक्रिया मंदावल्या आहेत. ते आपल्यावरील हल्ल्याला देखील प्रशिक्षण मिळालेल्या पद्धतीने रोखण्यात असक्षम झाले आहेत. तेव्हा आता हा मामला गंभीर आहे असे वाटायला लागले. सोबतच या नंतर अश्या तक्रारी घेऊन येणाऱ्या सी आय ए अधिकारी वाढायला लागले. बरे फक्त सी आय ए अधिकारीच नाही तर या वकीलातीत काम करत असलेले नागरी अधिकारीपण अश्या तक्रारी घेऊन यायला लागले. एक वेळ अशी आली की जवळपास ५५ अमेरिकन कर्मचार्यांपैकी तब्बल २४ ते २५ जण या प्रकारच्या विकाराने प्रभावित झाले होते. सी आय ए ने या प्रकाराला नाव दिले "हवाना सिंड्रोम" !

सहाजिकच या सगळ्या प्रकरणाची पहिली संशयाची सुई सहाजिकच क्युबाच्या गुप्तचर संस्थेकडे वळली. पण यात लक्षात घेण्यासारखे हे होते की आज पर्यंत क्युबा आणि अमेरिकन संबंधात कितीही तणाव आला आणि क्यूबन गुप्तचरांनी कितीही शह प्रतिशह दिले असले तरी अनावश्यक शारीरिक हल्ले मात्र केले नव्हते. तेव्हा एकाएकी इतक्या मोठ्या प्रमाणावर अकारण शारीरिक हल्ले कसे करतील ? त्यातही राऊल केस्ट्रो यांना अमेरिकेसोबत आपले राजकीय संबंध सुधारत देशावरील आर्थिक निर्बंध कमी करायचे असतांना ! सोबतच हे शारीरिक हल्ले आहेत असे गृहीत धरले तरी कोणालाही साधी खरचटल्याची पण शारीरिक जखम नव्हती, मेंदूवर आघात झाला याचे अंतर्गत पुरावे होते, मात्र बाहेरून काहीही कळत नव्हते, असे कसे? हे प्रश्न सतत समोर येत होते. महत्वाचे म्हणजे यातील काही अधिकारी तर आता काम पण करू शकत नव्हते. त्यांच्या आज पर्यंत प्रशिक्षणावर घेतलेली मेहनत पूर्ण पणे फोल गेली होती. त्यांनी घरी असतांना रात्री आवाज ऐकला होता. म्हणून त्यांच्या घरी काही शस्त्र किंवा कोणती तांत्रिक गोष्ट सापडते का म्हणून शोधकार्य केले तरी तेथे काहीही हातात आले नाही. म्हणजे हल्ला नक्की कोणत्या शस्त्राने झाला हा पण मोठा प्रश्नच होता.

मग मात्र अमेरिकन अधिकारी हादरले. त्यांनी क्युबाच्या अधिकाऱ्यांना संपूर्ण माहिती दिली नसली तरी, हल्ले होत असल्याची आणि त्या मागे क्युबाची गुप्तचर संस्था असल्याची शंका व्यक्त केली. संशय असा की, फिडेल केस्ट्रो यांना मानणारा गट आता अमेरिके संदर्भात राउफ केस्ट्रो यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे नाराज होत, अमेरिकेविरोधात कट करत आहेत. मात्र क्यूबन सरकारने असे काही होत असल्याचे सपशेल नाकारले. सोबतच या हल्ल्याची तपशीलवार माहिती द्यावी, आपण सोबतच या सगळ्याचा तपास करू असा मदतीचा हात पण समोर केला. या वरून पण अमेरिकन संभ्रमात पडले. कारण सरळ होते, क्यूबन अर्थव्यवस्था गटांगळ्या खात असतांना आणि क्यूबन सरकार अमेरिके सोबत संबंध सुधारण्याच्या गोष्टी करत असतांना क्युबा असे हल्ले करण्याचे धाडस करेल याची शक्यता अनेक अमेरिकन अधिकाऱ्यांनी फेटाळून लावली. मात्र आपल्या कथित शत्रू सोबत या हल्ल्याचे सगळे तपशील वाटून घ्यायचे काय? हा पण प्रश्न समोर होताच. मग क्युबा आणि अमेरिका संबंध बिघडले तर नक्की कोणाचा फायदा होईल हा विचार समोर आला आणि दोन नाव सहजपणे समोर आली, रशिया आणि चीन !

मात्र आता पर्यंत अमेरिकी सरकारने गुप्त ठेवलेले हे हल्ले अमेरिकन वृत्तपत्रांपर्यंत पोहचले. मग अमेरिकन सरकारवर या बाबत दबाव वाढायला लागला. आपले लोक जेव्हा सरकार करता विदेशात काम करायला जातात तेव्हा त्यांच्या सुरक्षेची जवाबदारी सरकारची असते आणि सरकार या बाबतीत फोल ठरत आहे असा सूर निघायला लागला. मात्र सरकार नक्की काय सांगणार होते? हल्ला नक्की कोणात्या देशाकडून होत आहे याचे पक्के पुरावे सरकार जवळ नव्हते, कोणत्या शस्त्राने होत आहे याचा काही माग निघत नव्हता, हल्ल्याचे तंत्र विज्ञान काय आहे याची पुसटशी कल्पना पण सरकारला आणि अमेरिकन वैज्ञानिकांना येत नव्हती, फक्त त्यांच्या समोर होते काही रुग्ण ! आणि भले मोठे प्रश्नचिन्ह !
मात्र या नंतर असे लक्षात आले की फक्त क्युबाच्या अमेरिकन दूतावसात काम करणाऱ्या कर्मचऱयांवरच असा हल्ला झाला नसून, अमेरिकेचा मित्र देश कॅनडाच्या दूतावसात काम करणाऱ्या एका मोठ्या नागरी अधिकाऱ्याला पण अश्या हल्ल्याला सामोरे जावे लागले. या अधिकाऱ्याचे संपूर्ण कुटुंब या हल्ल्याला बळी पडले आहे. नंतर कॅनडाच्या अजून १२ अधिकाऱ्यांनी पण अश्याच स्वरूपाच्या तक्रारी केल्या. या नंतर मात्र अमेरिकन सरकारने या घटनेचा तपास सी आय ए कडून काढून घेत एफ बी आय च्या सुपूर्त केला.
या सगळ्या प्रकरणात संशयाची सुई चीन कडे पण वळली होतीच. मात्र पुराव्या अभावी असे स्पष्ट वक्तव्य काही अमेरिके कडून आले नाही. मात्र मार्च २०१८ मध्ये चीन मधील ग्वांझो शहरात असलेल्या अमेरिकेच्या वाणीज्यीक दूतावसात पण एका स्त्री कर्मचाऱ्याने तीच तक्रार केली जी तक्रार आज पर्यंत फक्त क्युबा मधून येत होती. तिला तत्काळ अमेरिकेत वापस बोलवण्यात आले आणि तिची संपूर्ण चाचणी करण्यात आली. मात्र पुन्हा तितकीच माहिती हातात आली जितकी पहिले आली होती. या नंतर अमेरिकन सरकारने चीन मधील सगळ्या दूतावसात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी केली असता अश्या ३०० कर्मचर्यापैकी जवळपास १५ जणांवर असा हल्ला झाल्याचे पुरावे समोर आले.
डिसेंबर २०१६ पासून आज पर्यंत जगातील वेगवेळ्या अमेरिकन दूतावसातील जवळपास २०० कर्मचाऱ्यांवर असे हल्ले झाले आहेत, विशेष म्हणजे या २०० मधील अर्ध्याहून जास्त कर्मचारी सी आय ए शी संबंधित आहे. रशिया, पोलंड, हंगेरी या देशांमध्ये पण अमेरिकन अश्या हल्ल्यांना सामोरे गेले आहेत. या "हवाना सिंड्रोमचा" सगळ्यात ताजा हल्ला हा ऑस्ट्रिया मधील आहे, जो जानेवारी २०२१ ला समोर आला.

अजूनही अमेरिका या हल्ल्याचे मूळ समजू शकली नाहीये. जवळपास साडे चार वर्षे झालेत. सर्वशक्तिमान आणि तंत्रज्ञात समोर असलेली अमेरिका या बाबतीत चाचपडतच आहे. आता या हल्ल्यांच्या शोधासाठी एका टास्कफोर्सची निर्मिती करण्यात आली आहे आणि त्याची कमान अश्या अधिकाऱ्याला देण्यात आली आहे ज्याने ओसामा बिन लादेनचा माग काढला होता. दुसरे महायुद्ध आणि त्या नंतर सोवियत रशियासोबत प्रदीर्घ चाललेल्या शीतयुद्धात पण अमेरिका अनेकवेळेला अश्या स्वरूपाच्या विचित्र हल्ल्यांना सामोरी गेली आहे आणि यशस्वीपणे ते हल्ले परतवले पण आहे. आजही अमेरिका मोठ्या प्रमाणावर सायबर हल्ले झेलते आणि परतवून लावते. मात्र या "हवाना सिंड्रोम" समोर सध्यातरी अमेरिका संपूर्णपणे हतबल दिसत आहे. या हल्ल्याचा तपास आता क्युबाच्या बाहेर निघत जागतिक स्तरावर पोहचला आहे. अमेरिकन नागरिक धास्तावलेले आहेत, सरकारला प्रश्न विचारत आहेत. मात्र सरकार जवळ सध्या तरी नागरिकांच्या कोणत्याही प्रश्नाचे योग्य उत्तर नाही, हीच खरी अमेरिकन सरकारची हतबलता आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा