चीनची बुलेट ट्रेन तिब्बेत पर्यंत



एकीकडे भारतातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प होणाऱ्या राजकारणापाई भरकटत आहे. भारत सरकारने देशात बुलेट ट्रेनचे जाळे निर्माण करण्याचे ठरविले असून त्या करता जगातील पहिली बुलेट ट्रेन चालवणाऱ्या जपान सोबत करार केला आहे. महाराष्ट्रातील मुंबई ते गुजरात मधील अहमदाबाद असा या बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पहिला मार्ग राहील असे घोषित करण्यात आले. आता या करता गुजरात सरकारने ९०% जमीन संपादित करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. मात्र या प्रकल्पाला महाराष्ट्रातील आघाडी सरकारच्या राजकारणाचा फटका बसत आहे. आघाडी सरकार जमीन संपादन लवकर करत तर नाहीच आहे, वर जी जमीन संपादित केली आहे त्या वर पण वेगळाच प्रकल्प जाहीर करत या प्रकल्पाची अडवणूक करण्याचा प्रयत्न करत आहे. विशेष म्हणजे तरी केंद्र सरकार मुंबई - पुणे - हैद्राबाद, मुंबई - नाशिक - नागपूर असे दोन बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी सर्वेक्षण करत आहे. खरे तर मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प मुंबई ते दिल्ली प्रकल्पाचा एक भाग आहे. तरी या बाबत क्षेत्रीय राजकारण करत हा प्रकल्पच धोक्यात आणण्याचे काम महाराष्ट्र राज्य सरकार करत आहे. 



आपल्याकडे बुलेट ट्रेन बाबत असे राजकारण सुरू असतांनाच आपला शेजारी आणि सध्या ज्या देशासोबत आपले संबंध ताणले गेले आहे असा चीन मात्र आपले बुलेट ट्रेनचे जाळे सतत विस्तारत आहे. शुक्रवार २५ जून पासून चीनने आता आपली बुलेट ट्रेन थेट तिब्बेतची राजधानी ल्हासा पर्यंत विस्तारित केली आहे. या अगोदर १ जुलै २००६ साली शिंचुआन ते तिब्बेत रेल्वे चालवत जगाला आश्चर्य करायला लावले होते. तेव्हा पासून तिब्बेतची राजधानी असलेले ल्हासा शहर चीन मधील बीजिंग, चेंगदू, शंघाई, शिनिंग, लाझोऊ या शहरांशी थेट संपर्कात आले होते. सोबतच तिब्बेतमध्ये चीन लष्करी दृष्ट्यापण मजबूत झाला होता. 



आता त्याची पुढील पायरी म्हणजे हा बुलेट ट्रेन प्रकल्प ! पारंपरिक रेल्वेने चेंगदू ते ल्हासा प्रवासाला ४८ तास लागत, मात्र बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे हाच प्रवास फक्त १३ तासांचा झाला आहे. यातील मुख्य भाग असा की या बुलेट ट्रेन मार्गातील जवळपास ४३५.५ किलोमीटरचा मार्ग हा भारतातील अरुणाचल प्रदेश राज्याच्या सीमेजवळून जातो. या मार्गामुळे चीनला अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या सीमेवर आपल्या लष्कराचे दळणवळण जलद गतीने करता येणार आहे. या बुलेट ट्रेन मार्गाचा धोका या वरूनच लक्षात घ्यावा की चीन कधीही अरुणाचल प्रदेशाला भारताचा भाग मानत नाही, त्यावर आपला हक्क सांगतो.



चेंगदू ते ल्हासा बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम जरी आधी पासून सुरू असले तरी, गेल्या वर्षी झालेल्या भारत चीन चकमकी नंतर आणि चीनने घेतलेल्या माघारी नंतर चीनचे राष्ट्रपती शी झिंगपिंग यांनी नोव्हेंबर २० मध्ये या प्रकल्पाला जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. त्याच्या निर्देशाचे पालन करत आता हा मार्ग आजपासून कार्यान्वित करण्यात आला आहे. 



बुलेट ट्रेन प्रकल्प हा आधुनिक काळासाठी अत्यंत आवश्यक आहे हे आतातरी भारतातील राजकारण्यांच्या डोक्यात यायला हवे.

टिप्पण्या