प्रश्न केवळ खोट्या आरोपांचा नाही, तर आस्थेचा !



ख्रिश्चन मिशनरी संस्थांमध्ये भ्रष्टाचार होतो, जमिनीचे खोटे व्यवहार होतात कोण त्या विरुद्ध रकाने भरभरून लिहतात ? वक्फ बोर्डच्या जमिनीचा गैरव्यवहार होतो, त्या विरुद्ध आपणच बोलतो ना? मदरसे, हज हाऊस पासून साई बाबा मंदिरातील भ्रष्टाचार या विरोधात आपण लिहतो ना? मंदिरांच्या ट्रस्टवर नियुक्त असलेले लोकप्रतिनिधी, सरकार मंदिरांच्या जमिनीचा गैरव्यवहार करतात तेव्हा त्या विरुद्ध आवाज आपणच उचलतो ना?

मग आता कोणाला एखादा व्यवहार संशयित वाटला तर आणि त्याने काही प्रश्न विचारलेत तर इतका गदारोळ का?

हे एकदम सत्य आहे की प्रभू श्रीरामाच्या जन्मस्थळावर होणारे भव्य राममंदिर देशातील अनेकांच्या डोळ्यातील काटा आहे. हे श्रीराम मंदिर व्हायला नको म्हणून अनेकांनी अनेक आघाड्यांवर प्रयत्न केलेत. इतिहासात रणांगणावर लढलेल्या लढलेल्या लढायांपासून आधुनिक युगातील न्यायालयीन लढाईला यशस्वी तोंड देत आपण हा श्रीराम जन्मभूमितील श्रीराम मंदिराचा घाट घातला आहे. या प्रदीर्घ संघर्षामुळे आपल्या या मंदिराबाबतच्या भावना अतितीव्र आहेत. अजूनही काही नतद्रष्ट श्रीराम मंदिराच्या कामामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने खोडा घालायचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे फक्त न्यायालयीन लढाई जिंकून आपला संघर्ष संपला नाहीये हे लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे. हा संघर्ष तेव्हाच काहीसा मंदावेल जेव्हा श्रीराम मंदिराचे बांधकाम पूर्ण होत तेथे दणक्यात प्रभू श्रीरामाची आरती सकाळ संध्याकाळ व्हायला सुरुवात होईल. मात्र हा संघर्ष या नंतर पण आपल्याला सुरू ठेवावा लागणार आहे की आपण संघर्षाने उभारलेले हे प्रभू श्रीरामाचे मंदिर कायम राहील आणि सतत पुढच्या पिढीकडे हस्तांतरीत होत राहील. कारण ज्यांच्या डोळ्यात हे श्रीराम मंदिर सतत खुपत आहे आणि खुपत राहणार, सोबतच या मंदिराला, या संघर्षात अग्रभागी राहिलेल्या संस्था - संघटना, माणसे यांना बदनाम करणे हीच यांची प्राथमिकता राहणार आहे. सोबत असले भ्रष्टाचाराचे आरोप करत आपले राजकीय साध्य पूर्ण करणे हा या आरोपांमागील हेतू आहे हे पण लक्षात घेणे पण गरजेचे आहे.

पण म्हणून व्यक्त केलेल्या संशयावर, केलेल्या आरोपांवर योग्य उत्तरे देणार नाही हे कसे आपण म्हणू शकतो ? कोणी श्रीराम मंदिराकरता वर्गणी दिली नाही म्हणून त्याने या सगळ्या प्रकरणावर प्रश्नच विचारू नये ही कोणती मानसिकता? कारण या सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा नाही की कोणी श्रीराम मंदिर उभारणीसाठी वर्गणी दिली नाही, प्रश्न असा आहे की ज्यांनी श्रीराम मंदिरासाठी वर्गणी दिली त्यांच्या मनात आलेला किंतु, भलेही तो खोट्या आरोपाने का आला असेना तो काढणे अत्यंत आवश्यक नाही काय?

होय, हे खरे आहे की, माझा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि तत्सम संस्था - संघटना ज्यांनी या प्रभू श्रीरामाच्या मंदिराच्या उभारणीसाठी अपरिमित संघर्ष केला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि राहणार ! याच विश्वासातून जेव्हा श्रीराम मंदिर निर्माणाकरता श्रीराम मंदिर ट्रस्ट करता देणगी मागायाला आल्यावर एका शब्दानेही काही न विचारता देणगी दिल्या गेली. मात्र देशातील सगळेच देणगीदार या मानसिकतेचे होते काय?

ज्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा संलग्न संस्था - संघटना यांच्याशी कोणताही संबंध नाही, ज्यांचा भाजप सारख्या हिंदुत्ववादी पक्षासोबत कोणताही भावनिक संबंध नाही, अश्या लाखो - करोडो हिंदूंनी पण या श्रीराम मंदिराच्या निर्माणकार्यासाठी दारात आलेल्या याचकांना इमाने इतबारे आपल्या ऐपतीनुसार दक्षिणा दिली, कशा साठी? तर फक्त प्रभू श्रीरामाच्या आस्थेपाई आणि प्रभू श्रीरामावर असलेल्या विश्वासातून ! त्या मुळे लक्षात हे घेणे अत्यंत महत्वाचे आहे की, या लाखो - करोडो भक्तांच्या विश्वासाला अश्या तथाकथित आरोपनी तडा बसतो. हेच प्रभू श्रीरामावर आस्था असणारे भक्त उद्या हिंदुत्वाच्या लढाईचे शिलेदार होऊ शकतात. आधीच तथाकथित बुद्धिवाद्यांच्या वैचारिक प्रदूषणाने भाषा, प्रांत, जाती, पंथात विभागलेल्या हिंदूंना एकत्र कोणी आणू शकेल तर तो धर्म आहे आणि प्रभू श्रीरामाचे मंदिर ही पहिली पायरी. अजून काशी आणि मथुराच्या निमित्याने आपल्याला बराच पल्ला गाठायचा आहे.

तेव्हा हे आरोप खोटे आहेत हे म्हणण्यापेक्षा योग्य पुरावे देत हे आरोप खोडून काढा. ज्यांनी खोटे आरोप केलेत त्यांना न्यायालयात खेचा, त्यांच्यावर योग्य ती न्यायालयीन कारवाई करा. नक्कीच थोडा वेळ लागेल, मनस्ताप होईल, मात्र त्या मुळे लोकांमध्ये हिंदुत्वाची पत अजून उजळून निघेल. राजपदावर बसल्यावर प्रभू श्रीराम आपल्या मुलांना अंतर देईल या एका शंकेमुळे कैकई ने राजा दशरथाकरावी प्रभू श्रीरामाला बारा वर्षे वनवासात पाठविले. तेव्हा प्रभू श्रीरामाने कोणतीही हुज्जत न घालता किंवा जे मी केलेच नाही त्याची शिक्षा मी का भोगू असा पवित्रा न घेता, शांतपणे आपल्या वनवासाला निघून गेले. त्या प्रभू श्रीरामाचा आदर्श तरी त्यांचे मंदिर बांधतांना नजरेसमोर ठेवा आणि केलेल्या आरोपांना योग्य आणि पुराव्यानिशी उत्तरे द्या.

"महात्मा गांधींचा खून केल्याचा आरोप आमच्यावर इतके वर्षे लागत आहे, तरी आमचे काहीही नुकसान झाले नाही. आरोप करणारे काहीही आरोप करू शकतात." वृत्तप्रतिनिधी समोर केलेली असली वक्तव्ये प्रभू श्रीराम मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांच्या तोंडी नक्कीच शोभत नाही. महात्मा गांधी यांच्या खुनानंतर आपल्याला कायदेशीर निर्बंधांना तोंड द्यावे लागले होतेच. तेव्हा पण महात्मा गांधी यांच्या खुनाचा आरोप खोटा आहे हे सिद्ध करण्यासाठी मोठी न्यायालयीन लढाई पण आपल्याला लढावी लागली होती, जसे सरकारी पक्षाला तेव्हा या खुनाच्या आरोपातील पुरावे न्यायालयासमक्ष ठेवता आले नाही, त्या पेक्षा या आरोपात तथ्य नसल्याचे पुरावे पण आपल्याला न्यायालयाच्या नजरेत आणून द्यावे लागले आहेत. त्याच जोरावर आज आपण असल्या हीन आरोपांना उत्तरे देत आहोत आणि आरोप करणाऱ्यांना न्यायालयात खेचत आहोत हे नक्कीच विसरायला नको.

त्या मुळे इच्छा एकच की आरोप कोणी केले ? का केले ? याचा विचार न करता या आरोपांना योग्य उत्तरे द्या, असला कोणताही कथित भ्रष्टाचार झाला नसल्याचे पुरावे जनतेसमोर ठेवा, नुसत्या निवेदनाने आणि प्रत्यारोपाने फक्त बाजू जनतेसमोर मांडता येईल, पूर्णतः दोषमुक्त नक्कीच होता येणार नाही. तेव्हा आरोप करणाऱ्यांवर न्यायालयीन कारवाई करा आणि आपण भष्टाचार केल्या नसल्याचे पुरावे जनतेसमोर, न्यायालयासमोर ठेवा. कारण प्रश्न फक्त खऱ्या खोट्याचा नसून आस्थेचा आहे.

टिप्पण्या