महत्व कशाला ? जनतेच्या जीवाला की कथित मानवतावादाला



हुदा मुथाना, शमीना बेगम, आयेशा (सोनिया सेबीस्टिण ), राफीयेला, मरियाम (मेरिन जेकब ), फातिमा ईसा ( निमिषा ) आणि आरिफ माजित कोणाची नावे आहेत ही ? काय सबंध आहे यांचा आपसात? म्हंटला तर काहीच नाही आणि म्हंटला तर बराच काही. ही सगळी नावे आहेत मुस्लिम व्यक्तींची ! आणि इस्लामच्या वैश्विकतेच्या कल्पनेला आपलेसे मानणारी ही नावे, त्याच करता जगभरात चाललेल्या इस्लामच्या लढाईत आपली उपस्थिती दाखवायला उत्सुक अशी ही नावे !


याच उत्सुकतेतून म्हणा किंवा इस्लामच्या प्रेमातून म्हणा यांनी निर्णय घेतला तो इराक मध्ये लढत असलेल्या इसिस म्हणजेच इस्लामी स्टेट ऑफ सीरिया अँड इराक या सुन्नी कट्टरपंथी दहशतवादी संघटनेत भरती होण्याचा. हे सगळे जगातील तीन वेगवेगळ्या देशातील, वेगवेगळ्या आर्थिक-सामाजिक परिस्थितीमधील, मात्र एका समान धाग्यांनी बांधलेली, तो धागा म्हणजे इस्लाम !



हुदा मुथाना अमेरिकेतील, म्हणजे मूळची येमेनी, वडील संयुक्त राष्ट्र संघातील येमेनचे राजदूत, मात्र नंतर येमेन मध्ये सुरु झालेल्या हौथी संघर्षाला घाबरून अमेरिकेत राजकीय शरण घेतलेले. हुदा मुथाना हिचा जन्म जरी येमेन मधील असला तरी गेले वीस वर्षे हुदाचे जीवन आणि शिक्षण अमेरिकेतच झाले आहे. अमेरिकेतील अलबामा राज्यातील बर्गीहंम शहरात, मात्र २०१४ साली ही पळाली आणि आश्रयाला गेली इसिसच्या !



दुसरे नाव शमीना बेगम ! ब्रिटन मध्ये जन्माला आलेल्या या कन्येला जगभरात सुरू असलेल्या इस्लामवरील तथाकथित अत्याचाराचा राग आला. या रागाला मार्ग मिळाला तो इसिसचा ! वयाच्या १५ व्या वर्षी ही शाळकरी मुलगी अजून तीन मुली सोबत घेत लंडनच्या बेथलन ग्रीन येथून २०१५ साली पळाली आणि इसिसचा आश्रय घेतला.



या नंतरची नावे आहेत भारतातील ! आयेशा (सोनिया सेबीस्टिण ), राफीयेला, मरियाम (मेरिन जेकब ), फातिमा ईसा ( निमिषा ) आणि आरिफ माजित.



यातील आरिफ माजित हा भारताच्या आर्थिक राजधानी जवळ असलेल्या कल्याण येथील मुस्लिम मुलगा ! अभियांत्रिकीचा अभ्यास करणारा, आपल्या सहीम तनकी, अमीन तांडेल, फहाद शेख नावाच्या तीन मित्रांसह इराकला पळाला आणि इसिसच्या आश्रयाला गेला.

तर आयेशा (सोनिया सेबीस्टिण ), राफीयेला, मरियाम (मेरिन जेकब ), फातिमा ईसा ( निमिषा ) या केरळ राज्यातील तरुण मुली. ज्या याच पद्धतीने इसिसच्या नादाला लागल्या होत्या.

जगातील सगळ्यात बदनाम सुन्नी दहशतवादी संघटना इसिस आज जरी काही प्रमाणात कमकुवत वाटत असली आणि इराक मधील मोठ्या भूभागावरील तिचे वर्चस्व जरी कमी झाले असले तरी ही संघटना संपूर्णपणे संपली असे नाही. एकेकाळी जगातील विविध देशातून या संघटनेकडे आकर्षित झालेले युवा मोठ्या प्रमाणावर इराकमध्ये येत होते आणि इसिस कडून लढत होते. एका अंदाजानुसार हा आकडा जवळपास ३० हजार इतका होता. त्यातल्या त्यात समाधानाची बाब ही की इसिस कडे आकर्षित होत इराकला जाणाऱ्या तरुणांमध्ये भारतीय तरुणांची संख्या कमी होती. एका अहवालानुसार हा आकडा केवळ १०० इतका भरतो. यातील जास्तीजास्त तरुण आणि तरुणी या भारतातील केरळ या राज्यातून आहेत. केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांवर इसिस संघटनेची जम्मू आणि काश्मीर नंतर बारीक नजर आहे.



बरे, इसिस मध्ये भरती झालेली मुले फक्त इराक आणि सिरियातच लढत आहेत का? तर नाही इराक, सीरिया नंतर बोस्निया, अफगाण या देशातपण जिहादची लढाई इसिस तर्फे लढली जात आहे. केरळ मधील मल्लपुरम येथील सैफउद्दीन नावाचा युवक जो नोकरी निमित्य दुबई येथे गेला आहे असे त्याच्या घरच्यांना वाटत होते तो अफगाण मध्ये अमेरिकन सैन्याच्या हल्ल्यात मारल्या गेला होता. या नंतर केरळ मधील मल्लपुरम, कन्नूर आणि कासरगोड हे जिल्हे इसिसच्या भरतीत पुढे असल्याचे आढळून आले होते. या नंतरच जम्मू आणि काश्मीर, केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यात मोठ्या प्रमाणावर या इसिस मुस्लिम तरुण आणि तरुणींच्या मनावर राज्य करत आहे. तुम्हाला आठवत असेल तर श्रीलंकेत २०१९ ला झालेल्या बॉंब स्फोटाची पाळेमुळे श्रीलंकेतून थेट केरळ पर्यंत पसरलेली होती. भारतीय गुप्तचर संस्थांना या कटाचा सुगावा आधीच लागला होता आणि त्या प्रमाणे श्रीलंकेच्या सुरक्षा संस्थांना सूचना पण देण्यात आली होती. मात्र या सुचनांकडे श्रीलंकेच्या सुरक्षा संस्थांनी दुर्लक्ष केले आणि ही दुःखद घटना घडली.



भारतीय गुप्तचर यंत्रणांना जी माहिती मिळाली होती ती दक्षिण भारतातील वेगवेगळ्या नावांनी वाढणाऱ्या इस्लामी दहशतवादी विचारांचा प्रसार आणि त्यातून इसिस सारख्या दहशतवादी संघटनांकरता भारतातून होणारी भरती याकडे लक्षठेवतांना हातात आलेली माहिती होती.

इसिस जो पर्यंत इराक आणि सीरिया मधील मोठ्या भूभागावरून संचालित होत होती तो पर्यंत तिच्या हालचालींवर नजर ठेवणे अपेक्षेने सोपे होते असे आता म्हणता येईल. कारण जेव्हा पासून ही संघटना तिथे कमकुवत झाली आणि आपल्या अधिपत्याखाली असलेल्या जमिनीपासून दुरावली, तेव्हा पासून तेथे इसिस करता लढत असलेले वेगवेगळ्या देशातील ही मुले पुन्हा एक तर स्वतःच्या नाही तर दुसऱ्या देशात आश्रयाला जायचा प्रयत्न करत आहे. जे उघडपणे जात आहेत त्यांना देशातील सुरक्षा संस्था ताब्यात घेत आहेत. मात्र जे लपून छपून वापस आले असतील त्यांचे काय? कारण त्यांच्यावर अजून इसिसच्या कट्टर आणि हिंसक विचारधारेचा प्रभाव कायम आहे आणि त्याचा उपयोग कोणतीही दहशतवादी संघटना करू शकते. थोडक्यात काय तर ही सगळी आता "टाइम बॉंब" बनून जगभर विखरली जात आहेत.



भारतातील आरिफ माजित या मुलाचे उदाहरण बोलके आहे. आरिफ आणि त्याचे मित्र पश्चिम आशियातील धार्मिक स्थळांची यात्रा करण्याच्या निमित्याने देशाच्या बाहेर पडले आणि सरळ इराक मध्ये प्रवेश करत इसिस मध्ये भरती झाले. काही काळाने आरीफचा एक मित्र साहिम तनकी याने आरीफच्या वडिलांना फोन करत आरिफचा इथे लढतांना मृत्यू झाल्याचे सांगितले. मात्र इराक मध्ये इसिसचा पडाव झाल्याच्या काही दिवसात स्वतः आरीफने फोन करत तो सध्या तुर्की येथे पोहचला असून त्याला वापस भारतात यायचे असल्याचे कळवले. भारतीय सुरक्षा संस्था या सगळ्याकडे लक्ष देऊन होत्याच, आरीफच्या वडिलांनी पण आरीफचा असा फोन आल्याचे यंत्रणेला सांगितले. लगेच यंत्रणा कामाला लागल्या आणि आरीफला तुर्कीवरून वापस आणत मुंबई विमानतळावर अटक केली. कारण आरिफ हा भारत आणि इसिसमधील संबंधातील एक कडी आहे आणि या संस्था त्याच्याकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र दुसरीकडे भारतातील काही लोक या रस्ता भटकलेल्या मुलासाठी न्यायालयीन लढा लढत त्याला जामीन मिळवून द्यायचा प्रयत्न करत आहेत. इथे हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की सध्या आरिफ माजित एकटाच आला असल्याने ठीक आहे, मात्र विचार करा की आरिफची न्यायालयीन लढाईतून सुटका झाली आणि आता पर्यंत शिक्षेच्या भीतीतून बाहेर आहेत ते भारतात येतील आणि सुटतील !

बाकी भारत सरकार किंवा भारतातील मुस्लिम बुद्धिवादी भारतातून इसिस कडे आकृष्ट होऊन गेलेले मुलं जगातील इतर देशांच्या संख्येपेक्षाअत्यंत कमी आहेत म्हणून स्वतःची पाठ थोपटत असले, तरी त्या मागे सामाजिक आणि आर्थिक कारणे आहेत. भारतातील मुस्लिमांमध्ये आधुनिक शिक्षणाचे प्रमाण अल्प आहे, त्यामुळे त्यांचे उत्पन्न कमी, साहजिकच पासपोर्ट बनवणे आणि इसिसच्या जवळील देशा पर्यंत विमान प्रवासाचे पैसे जमवणे अत्यंत कठीण, या मनाने अमेरिका आणि युरोपियन देशातील मुस्लिम तरुणांसाठी हे खूप सोपे आहे.

यातील सगळ्यात वाईट स्थिती आहे ती वेगवेगळ्या देशातून इसिसच्या मदतीला गेलेल्या मुलींची ! हुदा मुथाना, शमीना बेगम, आयेशा (सोनिया सेबीस्टिण ), राफीयेला, मरियाम (मेरिन जेकब ), फातिमा ईसा ( निमिषा ) ही फक्त प्राथमिक नावे आहेत. सध्या इसिसच्या ताब्यातून सोडवलेल्या भूमीवरून कुर्द सैन्याकडे जवळपास १५०० अश्या मुली बंधक आहेत. या मुलींना "आयसिस ब्राईड" म्हणजेच "इसिसच्या बायका" !

याचे कारण असे की इस्लामच्या लढाईसाठी म्हणून गेलेल्या वेगवेगळ्या या पोरींच्या आयुष्य मात्र फार वेगळे गेले. याचे काम फक्त इसिसच्या योध्यांची शय्यासोबत करणे आणि त्यांची सेवा करण्याचे राहिले. इसिसच्या ताब्यातील प्रदेश हा सुन्नी शरिया कायद्यावर चालणारा असल्यामुळे तिथे पक्के सुन्नी इस्लामी कायदे आणि त्याचे उनलंघन केल्यास सुन्नी हदीस प्रमाणे शिक्षा होत असे. अश्या वातावरणात या इसिसच्या भागातील स्त्रियांवर भयंकर निर्बंध कायम होते, ज्यात बुरखा घेतल्याशिवाय आणि कोणी पुरुष सोबत असल्याशिवाय घराच्या बाहेर निघायचे नाही, आपल्या नवऱ्याची संपूर्ण सेवा करायची, त्याच्या कोणत्याही इच्छेला (अगदी शय्यासोबतीला पण) नाही म्हणायचे नाही सारखे नियम आणि तसेच अगदी खरेदी करतांना साधा तळहात जरी कोणाच्या नजरेस पडला तरी हदिसच्या कायद्यानुसार चाबूक पाठीत पडायचा.

मात्र या स्त्रियांच्या बुद्धीवर कट्टर इस्लामचा इतका प्रभाव होता की ही बंधन पण त्यांना प्रिय आणि त्यांच्या ईश्वराजवळ जाण्याचा मार्ग वाटत होती. वर नावे घेतलेल्या अनेक स्त्रियांची अनेक लग्ने झालीत. त्यांचा इसिस तर्फे लढत असलेला एक नवरा मेला की दुसऱ्या इसिसच्या योध्या सोबत त्यांचे लग्न लावून दिले जाई.

लक्षात घ्या इसिसच्या राज्यात ज्या बायका काफिर म्हणजेच कुर्द आणि यझदी जमातीच्या होत्या त्याचा वापर या योध्यांनी तर वेश्येसारखा केला. इसिसच्या लढाईसाठी तिथे पोहचलेल्या या पोरीची हालत वेगळी नव्हती, फक्त त्यांच्या मनात इस्लाम विषयी अपार श्रद्धा असल्यामुळे हे जुलूम त्यांना शिक्षा वाटत नसे इतकाच फरक.

यातील अनेक मुली समाज माध्यमातून स्वतःच्या देशात इस्लामी कट्टरता आणि इतर धर्माविषयी द्वेष पसरवण्याचे काम इमानेइतबारे करत होत्या हे विशेष. आता मात्र त्यांचे हेच कारनामे त्याची सुटका होण्याच्या आणि आपल्या घरी वापस जायच्या रस्त्यातील दगड बनले आहे.

हुदा मुथाना हिने इसिसच्या राज्यात अमेरिकेविरुद्ध अनेक ट्विट्स केले होते. त्यातही गंमत अशी की हुदाच्या वडलांनी अमेरिकेत राजकीय शरण घेतली होती, त्या मुळे हुदाला अमेरिकन नागरिकत्व मिळाले होते. मात्र आता अमेरिका हुदाला अमेरिकेत वापस यायला बंदी घालत आहे आणि हुदाचे नागरिकत्व पण या देशाने रद्द केले आहे. या विरोधात न्यायालयात गेल्यावर सरकारने स्पष्ट सांगितले की हुदाच्या वडिलांनी शरण मागितली होती जी दिल्या गेली, मात्र हुदाने अमेरिकन कायदे नाकारले त्यामुळे तिला देशात वापस घेणे अमेरिकन सरकारला योग्य वाटत नाही. तर शमीना बेगम ब्रिटिश नागरिक असूनही ब्रिटनने तिचे नागरिकत्व रद्द करत तिचे घरी परतायचे मार्ग बंद केले आहेत.

मग भारतीय मुलींचे काय? या भारतीय मुली इराक वरून इराण मार्गे अफगाणिस्थान पर्यंत प्रवास करून आल्या आहेत. तिथून त्यांनी भारत सरकारला आपल्याला देशात वापस येऊ द्यावे अशी विनंती आपल्या कुटुंबातर्फे केली. या मागणीनंतत त्यांच्याशी संपर्कात आलेल्या गुप्तचर संस्थांचे मत मात्र त्यांना भारतात प्रवेश द्यायच्या विरुद्ध आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार यांचा अगोदरच इतका ब्रेन वॉश केल्या गेला आहे की इतक्या हालअपेष्टा सोसूनही त्यांच्यातील कट्टरता आणि इसिसच्या शिकवणुकीवरील विश्वास अजिबात ढळलेला नाही. तेव्हा या आपल्या मुलांबरोबर वापस आल्या तरी शांत बसणार नाहीत.

अश्या वतावरणात या मुद्यात पुन्हा तथाकथित मानवतावादी संघटना या तरुण तरुणीसाठी वातावरण निर्मितीसाठी सज्ज झाले आहेत. या दहशतवाद्यांना पुन्हा त्यांच्या देशाने सन्मानाने आत घ्यावे आणि सामान्य लोकांसारखे जगू द्यावे यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. तेव्हा आता हा प्रश्न तुमच्या हाती आहे. आधीच आपण मानवतेच्या खोट्या कल्पनांपाई बांगलादेशी आणि रोहिग्या सारख्या समस्येशी झुंजत आहोत, त्यात पुन्हा अजून एका समस्येची वाढ करायची का ? हा खरा प्रश्न आहे.





टिप्पण्या