मानवतेचा बांबू



निर्वासित आणि युरोप यांचे गेल्या काही वर्षात एक वेगळेच नाते तयार झाले आहे. मानवतेच्या दृष्टिकोनातून युरोपियन युनियन मधील काही देशांनी मोठ्या प्रमाणावर सीरिया, फिलिस्तीन वगैरे देशातून सुरू असलेल्या गृहयुद्धाला कंटाळून निर्वासितांना आश्रय दिला. या नंतर युरोपकडे अश्या निर्वासितांची रीघ लागली. जगात युरोपियन राष्ट्रांचे आणि युरोपियन युनियनचे यामुळे मोठे कौतुक झाले. पोलंड सारखे काही देश ज्यांनी अश्या निर्वासितांना कोणत्याही प्रकारे आपल्यात सामावून घ्यायला नकार दिला, त्यांच्या विरोधात भरपूर निंदा नालस्ती करण्यात आली. एकुणच निर्वासितांना युरोपमध्ये सोप्या पद्धतीने आश्रय मिळत असल्यामुळे त्या भागात जगातील अनेक भागातून निर्वासितांचे जथ्थे दाखल होऊ लागले. भारतातपण बांगलादेशी, रोहींग्या मुस्लिमांना शरण द्यावी म्हणून याच युरोपियन युनियनचे उदाहरण दिले जाते. मात्र इथे हे पण लक्षात घेणे गरजेचे आहे की युरोपियन युनियनने निर्वासितांबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे काही युरोपियन राष्ट्रांमध्ये सामाजिक, धार्मिक आणि राजकीय तंटे उभे राहिले. तेव्हा युरोपमधीलच काही देश आता निर्वासितांच्या समस्येवर नव्याने विचार करण्याची मागणी करीत आहे. 



अश्या वातावरणात आता युरोपच्या दरवाज्यावर एका नवीन संकट दारात उभे झाले आहे. मात्र पहिले ग्रीस मार्गे येणारे हे संकट आता स्पेन मार्गे येत आहे. मात्र हे प्रकरण जितके गंभीर आहे तितके मनोरंजकपण ! या निर्वासित संकटामुळे युरोप आणि आफ्रिकेतील दोन देश एकमेकांच्या समोर उभे राहिले आहेत. हे देश आहे स्पेन आणि मोरोक्को ! 



आफ्रिका खंडाच्या उत्तरेला माघरेब प्रदेश म्हणून जो भाग ओळखल्या जातो त्या भागातील मोठा, संपन्न आणि लष्करीदृष्टया शक्तिशाली असलेला देश म्हणजे मोरोक्को ! विशेषतः पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला आणि जगप्रसिद्ध कासा ब्लाँका शहर असलेला देश म्हणजे मोरोक्को ! या देशाला अटलांटीक महासागर आणि भूमध्य सागर या दोन्ही समुद्रांचे किनारे लाभलेले आहे. मोरोक्को हा राजेशाही असलेला मुस्लिम देश. जरी भौगोलिक दृष्ट्या आफ्रिका खंडात असला तरी स्वतःला अरब राष्ट्र म्हणून घेतो आणि त्याच मुळे हा देश आफ्रिकन युनियनचा सदस्य न होता, अरब लीगचा सदस्य आहे. अटलांटीक महासागर आणि भूमध्य सागर यांना जोडणारी जिब्राल्टरची सामुद्रधुनी याच देशाच्या उत्तरेला. या जिब्राल्टर समुद्रधुनीच्या पलीकडे आहे युरोपातील एकेकाळी शक्तिशाली असलेले देश पोर्तुगाल आणि स्पेन ! 



मात्र प्रकरण इतकेच नाही तर कोणे एकेकाळी मोरोक्को पोर्तुगालदेशाच्या अधिपत्याखाली होता. नंतर आले स्पेन, नंतर फ्रांस, नंतर काही वर्षे ग्रेट ब्रिटन. मात्र १९०४ मध्ये या देशावर पुन्हा फ्रांसचे सर्चस्व झाले. १९४४ साली मोरोक्कोची स्वातंत्र्यता चळवळ सुरू झाली. १९५३ साली फ्रांसने ही चळवळ दडपण्यासाठी म्हणून मोरोक्कोच्या राजाला सुलतान मोहम्मद वी निर्वासित केले आणि हे अमेरिकेच्या आश्रयाला गेले. मात्र या मुळे मोरोक्कोची स्वातंत्रता चळवळ काही थांबली नाही. १९५५ साली सुलतान पुन्हा देशात वापस आले. शेवटी २ मार्च १९५६ साली मोरोक्कोला स्वातंत्र्य मिळाले. तेव्हा पासून या देशाने कधी मागे वळून पाहिले नाही. या नंतर मोरोक्को सरकारने प्रयत्न करत देशाचे जे भाग पोर्तुगाल, स्पेन आणि ब्रिटनच्या ताब्यात होते त्यांना आपल्या देशात मिळवून घेतले. मात्र मोरोक्को एव्हड्यावरच थांबला नाही तर आपल्या दक्षिणेला असलेल्या, आफ्रिका खंडाच्या पश्चिमेला अटलांटीक महासागराच्या किनाऱ्यावर असलेल्या पश्चिम सहारा या देशाचा घास पण मरोक्कोने घेतला. १९७६ मध्ये पश्चिम सहाराचा काही भाग गिळंकृत केल्यावर १९७९ पर्यंत या देशावर संपूर्ण नियंत्रण मिळवले. या विरोधात चालणारे युद्ध मात्र जवळपास १९९१ पर्यंत सुरू होते, नंतर थांबले. मात्र पश्चिम सहारा देशातील लोकांच्या स्वातंत्र्य चळवळी मात्र थांबल्या नाहीत, त्या अजूनही सुरू आहेत. मात्र आता सुरू असलेल्या मोरोक्को आणि स्पेनच्या भांडणात मुख्य बिंदू आहे तो या पश्चिम सहारा देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचा !



इथे एक गोष्ट लक्षात घ्या की हे निर्वासित अजून सरळ युरोपच्या मुख्य भूमीवर पोहचले नाहीये तर ते पोहचत आहेत स्पेनमध्ये आता हे कसे? तर मोरोक्कोने जरी आपल्या देशाच्या इतरांच्या ताब्यातील प्रदेश वापस घेतले असले तरी काही प्रदेश मात्र सोडून दिले किंवा त्या प्रदेशावर मोरोक्कोने हक्क सांगितलं नाही. असेच दोन प्रदेश असलेला मोरोक्कोला लागून असलेला भाग म्हणजे "सेउटा" ! इंकलेज आणि मेलील्ला असे दोन प्रदेश मिळून हा सेउटा प्रदेश बनतो ज्यावर स्पेनचे नियंत्रण आहे. 


तर सध्या मोरोक्को मधून स्पेनच्या याच भागात जवळपास दोन हजार स्त्रिया आणि लहान मुलांसोबत जवळपास आठ हजार निर्वासित एकाएकी आले. बरे हा आकडा रोज वाढत आहे. याच निर्वासितांमुळे स्पेनची आणि युरोपची डोकेदुखी वाढली आहे. इतकेच नाही तर स्पेन आणि मोरोक्कोमध्ये या मुळे जबरदस्त राजकीय विवाद सुरू झाला आहे. प्रकरणाने इतके गंभीर रूप धारण केले आहे की दोन्ही देशांनी एकमेकांना राजनैतिक संबंध तोडण्याची धमकी दिली आहे. मात्र कोण आहे हे निर्वासित? आणि यात पश्चिम सहारा या मोरोक्को नियंत्रित भागाचा काय संबंध ?


तुम्हाला "अरब स्प्रिंग" आठवते का? जेव्हा अरब देशांमध्ये राज्यकर्त्यांविरोधात आक्रोश तयार झाला आणि संप, आंदोलने सुरू झाली, काही देशांचे राज्यकर्ते पण बदलले. ते अरब स्प्रिंग याच भागात झाले होते. मोरोक्को, अल्जेरिया, लिबिया, सुडान इजिप्त पासून थेट सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती पर्यंत या आंदोलनाचे वारे पोहचले होते. काही राज्यकर्ते या वादळात उडून गेले तर काही तग धरून राहिले. मोरोक्को मध्ये पण या अरब स्प्रिंगचा जास्त असर झाला नाही राजेशाही कायम राहिली. मात्र अल्जेरिया, लिबिया, ट्युनिशिया, इजिप्त मधून हजारो निर्वासित झाले. ज्यांनी युरोपात जाण्याचा जवळचा मार्ग म्हणून मोरोक्कोमध्ये प्रवेश मिळवायचा प्रयत्न केला, काही मोरोक्कोत पोहचले पण ! मात्र मोरोक्कोने आपली युरोप बरोबर विशेषतः स्पेन बरोबर असलेली सीमा सील केली असल्यामुळे हे निर्वासित तिथेच अडकले होते. आता मात्र मोरोक्कोने स्पेन सोबत असलेली सीमा या निर्वासितांसाठी उघडली आणि स्पेन मध्ये निर्वासित संकट उभे झाले. हे निर्वासित एकाएकी इतक्या मोठ्या प्रमाणावर स्पेन मध्ये प्रवेश करत आहेत की यांना अडवण्यासाठी स्पेनला सेऊटाच्या किनाऱ्यावर आपल्या सैन्याला पाठवावे लागले. मोरोक्कोने असे का केले? 


तर मोरोक्कोने नियंत्रणात घेतलेल्या पश्चिम सहारा या देशात सुरू असलेल्या स्वातंत्र्य चळवळीचा याला संदर्भ आहे. मोरोक्कोने पश्चिम सहारा या देशावर मिळवलेले नियंत्रण हे पूर्णतः बेकायदेशीर असल्याचे अनेक आफ्रिकी देशांचे म्हणणे आहे. विशेषतः अल्जेरिया, माली, मॉरिटानिया या विरोधात आहेत. त्याचमुळे हे देश पश्चिम सहारामधील अश्या स्वातंत्र्यवादी चळवळीला सक्रिय पाठींबा देतात. पश्चिम सहारामध्ये चळवळी करणाऱ्या अनेक संघटना आहेत. त्या पैकी एक आहे संघटन आहे पोलिसारियो फ्रंट आणि या संघटनेचे प्रमुख आहेत ब्राहिम घाणी ! हे साहेब मोरोक्कोचे मोठे विरोधक ! तर या ब्राहिम घाणी साहेबांना झाला कोरोना. त्यांची तब्येत बिघडली. वृद्धत्वाकडे झुकलेल्या या झुंझार नेत्याला कुठल्याही परिस्थितीत वाचवायचे असे या पोलिसारियो फ्रंटच्या कार्यकर्त्यांना वाटले. मग त्यानी हालचाल सुरू केली. मोरक्कन सरकार आपल्याला मदत करणार नाही हे त्यांना पक्के ठाऊक होते. मग ते गुप्तपणे स्पेनमध्ये गेले आणि ब्राहिम घाणी यांना स्पेनच्या रुग्णालयात भरती केल्या गेले आणि अजूनही त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 



इकडे मोरक्कन सरकारला या सगळ्याची भनक लागली. मोरक्को सरकारने लगेच स्पेन सरकारकडे याबाबत नाराजी नोंदवली वर मागणी केली की ब्राहिम घाणी साहेबांना तत्काळ मोरक्को सरकारच्या ताब्यात द्यावे. सोबत स्पेन सरकारवर मोरोक्कोविरोधात फुटीरतावादी चळवळीला मदत करत असल्याचा आरोप केला. मात्र स्पेन सरकारने मोरोक्को सरकारला उत्तर दिले की, "मोरोक्को देशाने पश्चिम सहारावर जे काही नियंत्रण प्राप्त केले आहे त्याला आम्ही तटस्थ दृष्टीने बघतो. त्यामुळे आम्ही कोणत्याही दृष्टीने पश्चिम साहारा मधील कथित फुटीरतावादी चळवळीला पाठींबा देत नाही. मात्र ब्राहिम घाणी अत्यवस्थ अवस्थेत स्पेनमध्ये आले आणि आम्ही मानवतेच्या दृष्टीकोनातून त्यांच्यावर उपचार करत आहोत. आमचा आणि पश्चिम सहारा मधील फुटीरतावादी चळवळीचा कसलाही संबंध नाही." 


मात्र स्पेनचे हे उत्तर मात्र मोरोक्को सरकारच्या पचनी पडले नाही. स्पेनला केलेल्या कृत्याबद्दल धडा शिकवायचा असा मोरोक्को सरकारने पण केला. आता हा धडा कसा शिकवायचा? तर मानवतेच्या दृष्टिकोनातून शिकवायचा. मोरोक्कोने या करता मग या निर्वासित जनतेचा वापर केला. या हे निर्वासित जे युरोपात जायला म्हणून मोरोक्कोत किंवा मोरोक्कोच्या सीमेवर येऊन बसले होते त्यांच्या करता स्पेन कडील सीमा उघडली आणि स्पेनमध्ये ही निर्वासितांची टोळधाड आली. पहिल्या दिवशी आठ हजार, दुसऱ्या दिवशी नऊ हजार निर्वासित स्पेनच्या समुद्रकिनाऱ्यावर पोहचले. अजून जवळपास तितकेच निर्वासित स्पेन कडे पुढील काही दिवसात दोन दिवसात येऊ शकतात असा अंदाज आहे. 


मुख्य म्हणजे समजा यांना स्पेन आणि युरोपियन युनियनने सामावून घेतले तरी नंतर अजून निर्वासित आफ्रिका आणि अरब राष्ट्रांमधून येणार नाहीत अशी काही हमी नाही. हा सगळा विचार करून युरोपियन युनियनपण हादरून गेले आहे. आधीच युरोपच्या पूर्वेकडील देशांमधून आलेल्या सीरियन निर्वासितांच्या प्रश्नांनी युरोपियन राष्ट्र मेटाकुटीला आले आहेत, त्यात पुन्हा स्पेन कडून ही नवीन समस्या, ती पण जागतिक महामारी आणि उतरती आर्थिक परिस्थिती असतांना !


या मुळे स्पेन आपली सीमा बंद करत आहे, निर्वासितांना किनाऱ्यावरच ठेवत आहे या विरोधात एका शब्दाने तोंड न उघडता, मानवतावाद वगैरेचे नाव न काढता युरोपियन युनियन स्पेनच्या पाठी खंबीरपणे उभी आहे. आठवत असेल तर सीरियन निर्वासितांना प्रवेश करता येऊ नये म्हणून हंगेरीने आणि ग्रीस आपल्या देशाच्या सीमा सील केल्यानंतर किंवा पोलंडने आपल्या देशात वेगळ्या संस्कृती आणि धर्माच्या लोकांना शरण देणार नाही असे सांगत निर्वासितांचा ठरवलेला कोटा नाकारल्यावर याच युरोपियन युनियनने या देशांना मानवतेचा पाठ शिकवला होता. हंगेरी आणि पोलंडला तर त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची धमकी दिली होती. तीच युरोपियन युनियन मात्र आज स्पेनच्या सीमा प्रतिबंधित करण्याच्या निर्णयामागे भक्कमपणे उभी आहे. 


आता हा वाद समोर नक्की काय वळण घेतो हे बघण्यासारखे राहील. मात्र मोरोक्कोने एकदम स्वतात तेही आपल्या देशाचे एकही मनुष्यबळ न वापरता स्पेनला धडा शिकवायची कल्पना एकदम वेगळीच आहे. बरे या मुळे मानवतेच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या देशातील फुटीरतावाद्यांना मदत करणाऱ्यांना पण धडा मिळेल अशी आशा. बाकी युरोपियन युनियनला मात्र मानवतेच्या भाषणाचा मोठा बांबू मिळाला हे विशेष.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा