पश्चिम बंगालचा धडा....



पश्चिम बंगाल राज्यात तुम्ही गाडी चालवत असाल तर तुम्हाला अनेक वाहतुकीचे नियम माहीत पाहिजे. कारण भारतातील कोणत्याही राज्यात नसतील इतके वाहतुकीचे संकेत (ट्राफिक साईन्स) पश्चिम बंगाल मध्ये आहेत असे मला तिथे कामानिमित्य फिरतांना टॅक्सीचा ड्रायव्हर सांगत होता. त्याच्या म्हणण्यानुसार एक वाळवंटी प्रदेश सोडला तर पश्चिम बंगाल मध्ये देशातील सगळ्या पद्धतीचे वातावरण बघायला मिळते. दक्षिणेकडे समुद्राकठी असलेला दमटपणा तर उत्तरेत हिमालयाची बर्फाच्छादित शिखरे. सतत येणारे वादळ, हिमवर्षाव आणि मान्सून हे सगळे धुमाकूळ घालणारे देशातील एकमेव राज्य म्हणजे पश्चिम बंगाल ! जसे इथले वातावरण आणि वाहतुकीचे संकेत तसेच इथले राजकारण !


रेशीमबागेत आलेल्या पश्चिम बंगाल मधील स्वयंसेवकांच्या टोळी सोबत संवाद साधला गेला होता. तो पण गेल्या वर्षी लॉक डाऊन लागायच्या अगोदर ! तेव्हा विधानसभा निवडणुकीचा विषय नव्हता, पण पश्चिम बंगाल मधील राजकीय परिस्थिती, ममता बॅनर्जीची राज्यावरील पकड आणि एकूण तेथील भाजपाचे भविष्य यावर बोलणे झाले. 



तेव्हा त्या टोळीतील जेष्ठ्य समोर आले, ते स्पष्टपणे म्हणाले की, "या निवडणुकीत तरी भाजपा सत्ता मिळवु शकणार नाही. कारण पश्चिम बंगाल मधील राजनीती अजून भाजप आणि संघाच्या अंगवळणी पडली नाहीये. जो पर्यंत भाजपा पश्चिम बंगाल मधील दहशतीचे राजकारण आत्मसात करत नाही तो पर्यंत भाजपा तिथे सत्ता स्थापन करू शकत नाही. आता कुठे त्याची सुरवात झाली आहे. सत्ता अजून खूप दूर आहे." ते किती खरे बोलत होते ते आज कळले असेल. 


मुळातच पश्चिम बंगाल मधील राजनीती गेली अनेक वर्षे चालत आहे ती दहशतीवर ! तुम्ही मान्य करा अथवा करू नका हेच सत्य आहे. बिहार मधील रक्तरंजित राजकारण आणि पश्चिम बंगाल मधील रक्तरंजित राजकारण यात जमीन आस्मानचा फरक आहे. उत्तर प्रदेश, बिहार या राज्यातील बहुबलींचे राजकारण आणि पश्चिम बंगाल मधील राजकीय गुंडगिरी यात खूप फरक होता आणि आहे. 



ममता बॅनर्जी यांचे राजकारण कितीही आक्रस्थाळे वाटत असले तरी तेच आक्रस्थाळे राजकारण हा पश्चिम बंगालच्या राजकारणाचा आत्मा आहे. याच पद्धतीने राजकारण करत पश्चिम बंगाल मध्ये डावे सत्तेत आले आणि सत्ता टिकवली. ती डावी सत्ता उलथवतांना ममता बॅनर्जी यांनी डाव्यांनी राजकारणाची पद्धत आत्मसात केली. ती पद्धत काँग्रेस आत्मसात करू शकत नव्हती म्हणून काँग्रेसच्या बाहेर त्या पडल्या. 


महत्वाची गोष्ट म्हणजे पश्चिम बंगाल मधील सत्ता बदलली तरी सिस्टीम मात्र तीच राहिली. म्हणजे पहिले डाव्यांच्या वार्ड कार्यालयातून आणि स्पोर्ट्स क्लब मधून सामान्य लोकांची कामे व्हायची, आता ती कामे तृणमूल काँग्रेसच्या वार्ड कार्यालयातून आणि स्पोर्ट्स क्लब मार्फत व्हायला लागली. ममता बनर्जीने सिस्टीम थोडी अजून अपग्रेड केली ज्याचा फायदा आज तृणमूल काँग्रेसला होतांना दिसत आहे. ती म्हणजे गुंडांची मदत घ्यायची पद्धत ! डाव्यांनी पश्चिम बंगाल मध्ये आपली सत्ता कायम ठेवायला स्थानीय गुंडांना हाताशी धरले. आपले राजकीय हिशोब बरोबर करायला या गुंडांची मदत डावे घ्यायचे. मात्र हे करत असतांना डाव्यांनी एक तत्व पाळले होते ते म्हणजे या गुंडांना कधी आपल्या राजकीय केडरमध्ये भरती केले नाही. त्यांना राजकारणाच्या दूरच ठेवले. 


मात्र ममता बॅनर्जी यांनी मात्र डाव्यांनी उभारलेली सिस्टीम वापरतांना जो बदल केला तो नेमका हा होता की तृणमूल काँग्रेसने या गुंडांना सरळ राजनीतीच्या आखाड्यात उतरवले. पंचायत समिती पासून महानगर पालिकेच्या निवडणुकीत सगळीकडे यांना राजकीय बस्तान बसवून दिले. या मुळे डाव्यांपेक्षा जास्त दहशत तृणमूल काँग्रेसला पश्चिम बंगाल मध्ये कायम करता आली. 


या सगळ्याला तोंड द्यायला भाजपा नक्कीच कमी पडली. दुसरे महत्वाचे म्हणजे डाव्यांची इको सिस्टीम सारखी सिस्टीम भाजपा अजून उभारू शकले नाही. बरे भाजपा उभारू शकले नाही किंवा भाजपाला उभारायची नाही हा भाग वेगळा, मात्र या निवडणुकीत डाव्यांच्या इको सिस्टीम मध्ये काही प्रमाणात भाजपा फसला हे नक्की !


पश्चिम बंगाल निवडणुकीत हेतुपुरस्सर पणे डाव्यांची मते भाजप कडे वळणार हे पसरवल्या गेले. होय, कारण एका बाजूने काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी आपल्या आघाडीत फुरपुरा शरिफचे मौलाना अब्बास सिद्दीकी यांना सोबत घेतले आणि मुस्लिम मतांचे विभाजन करण्याचा देखावा उभा केला. मात्र दुसरीकडे डाव्यांना मते देणारे आता भाजपा कडे वळत असल्याच्या बातम्या पण प्रसार माध्यमात पसरवल्या. याच मुळे पश्चिम बंगाल मधील मुस्लिम काँग्रेस - डाव्यांच्या आघाडी पेक्षा ममता बनर्जीच्या तृणमूलकच्या मागे उभे राहिले. काँग्रेस आणि डाव्या आघाडीला मिळालेल्या शून्य जागा आपल्याला तेच चित्र दाखवत आहे.


सोबतच इथले स्थानीय राजकारणाने पण आपला रंग दाखवलाच असणार. दार्जिलिंग भागातील गोरखा लँड आंदोलक कुठल्या बाजूला झुकले, त्यांनी नेमके कसे राजकारण खेळले हे पण बघावे लागेलच. त्या करता उद्या पर्यंत थांबावे लागेल.


होय, हे नक्कीच आहे की पश्चिम बंगाल मध्ये भाजपाने ज्या पण जागा मिळवल्या तो आकडा अभिमानास्पद आहे आणि ममता बॅनर्जीची पुढील काळात डोकेदुखी वाढवणारा पण आहे. मात्र इथे भाजपाला अजून बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे.


बाकी इथे भल्या मोठ्या आवेशाने भाजपा पूर्ण बहुमत घेणारचे लेख लिहणार्यांनी एक लक्षात घ्यावे हा भारत आहे. इंग्रजांनी सुद्धा भारतावर राज्य केले असले तरी त्यांनी देशांतर्गत ३०० संस्थाने तशीच ठेवली होती. त्यांना त्यांच्या स्थानीय भागात खेळू दिले आणि स्वतः संपूर्ण देशावर राज्य केले. तेव्हा थोडे जपूनच आपले म्हणणे मांडावे.

टिप्पण्या