पुन्हा एकदा टूल किटची रडारड...!



आता या वर्षाच्या सुरुवातीलाच भारतात एक मोठे टूल किट प्रकरण गाजले. शेतकरी आंदोलनाला समर्थन देण्यासाठी रेहाना, ग्रेटा, हॅरीस, मिया खलिपा सारख्या समाजसेवी महिला समाज माध्यमांवरून ट्विट करायला लागल्या आणि भारतातील एका कोपऱ्यात सुरू असणाऱ्या शेतकरी आंदोलनाला एकदम आंतराष्ट्रीय परिमाण मिळाले. त्या वेळेस या महिला समाजसेवी मधील एक असलेल्या ग्रेटा थनबर्ग हिने चुकून आपल्या ट्विट सोबत एक "8 GB Tool Kit" नावाचे एक दस्तावेज सार्वजनिक झाले आणि वाद सुरू झाला होता. या टूल किटचे तार भारत विरोधी खलीस्थानी संघटनेसोबत जुळले होते. 



काय होते या टूल किट मध्ये? थोडक्यात सांगायचे तर भारताची आंतराष्ट्रीय प्रतिमा मलिन करणे हाच मुख्य उद्देश होता. या दस्तावेजात स्पष्टपणे लिहले होते की भारताची योगा आणि चहा मुळे निर्माण झालेली जागतिक प्रतिमा धुळीला मिळवा. या प्रयत्नाला अधिक परिणामकारक करण्यासाठी देशातील अनेकांनी आपले योगदान या टूल किट मध्ये टाकले होते. असे योगदान देणारी बंगलोर मधील दिशा रवी ही पर्यावरणावर आंदोलन करणारी महाविद्यालय वयीन आंदोलकनजीवी पकडल्या गेली होती. याच कडीत मग भारत सरकारची अकारण बदनामी करणारा CNN मधील एक लेख भारतातील सगळे डावे, तथाकथित उदारमतवादी आणि सरकारचे विरोधक फडकवायला लागले होते. मात्र २६ जानेवारीला शेतकरी आंदोलकांनी राजधानीत जो गोंधळ घातला त्यामुळे खरे तर या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरले. तरी तेव्हा आपण सगळ्यांनी गळे काढले होते या "टूल किट" च्या विरोधात. 



अश्याच प्रकारची रडारड आपण पश्चिम बंगाल मधील निवडणुका झाल्यावर होणाऱ्या हिंसाचारावर पण केली होती. खरी गोष्ट ही की पश्चिम बंगाल राज्यात निवडणूकीच्या आधी, निवडणुकी मध्ये आणि निवडणुकी नंतर हिंसाचार होतोच. आधी डावे पक्ष आणि काँग्रेसमध्ये, नंतर तृणमूल काँग्रेस आणि डाव्या पक्षांमध्ये ! त्या मुळे आता तृणमूल काँग्रेस आणि भाजपात असा हिंसाचार होणार हे जगजाहीर होते. जो पर्यंत निवडणूक काळात राज्यातील यंत्रणांवर निवडणूक आयोग आणि केंद्रीय बाळाची नजर होती, तो पर्यंत काहीसा हिंसाचाराचा ग्राफ कमी होता. मात्र निवडणुकीचे निकाल लागल्यावर मात्र हा ग्राफ झपाट्याने वाढला. मात्र राष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी या हिंसाचाराची, भाजप कार्यकर्त्यांवर होणाऱ्या अत्याचाराची अजिबात दखल घेतली नाही. आपण या करता काय केले ? फक्त रडारड, बाकी काही नाही !



आता काँग्रेसची "टूल किट" समोर येत आहे. काँग्रेस पक्ष आजपर्यंत सत्तेत असल्यामुळे काँग्रेसची काळी बाजू नेहमीच लपलेली राहिली. कधी कधी काही प्रमाणात जनतेसमोर आली तरी त्या काळ्या बाजूला लगेच सफेदी फासणे काँग्रेसला चांगलेच जमले आहे. आता त्यांचा नवीन कारनामा समोर आला आहे. या निमित्याने पुन्हा "टूल किट" नव्याने समोर आली आहे. 



आता जी काँग्रेस आपल्या राजकीय फायद्यासाठी देशातील जनतेला, त्या ही पेक्षा काँग्रेसला मतदान करणाऱ्या मतदार राजाला अंधारात ठेऊन चिनी साम्यवादी पार्टी सोबत अंतर्गत करारमदार करते, ते पण भारतीय सरकारच्या अपरोक्ष ! डोकलाम विवादाच्या वेळेस राहुल गांधी गुप्तपणे चिनी दूतावासात जातात, ती भेट फुटल्यानंतर नाकारतात आणि पुरावे समोर आल्यावर पण तिथे नेमकी काय चर्चा झाली ते लपवतात. इतकेच नाही तर चीन सोबत गलवान येथे झालेल्या संघर्षा नंतर काँग्रेसने घेतलेली भूमिका असो किंवा राहुल गांधी यांची वक्तव्ये ही देशाच्या भल्यासाठी कमी आणि चीनच्या भल्यासाठी जास्त होती. आता काँग्रेसचा नेता पाकिस्थानमध्ये बसून तेथील वृत्तवहिनीच्या चर्चात्मक कार्यक्रमात शत्रू देशाला तुम्ही आम्हला भारतातील विद्यमान सरकार घालवायला मदत करा असे सांगतो. ती काँग्रेस या टूल किटच्या माध्यमातून देश हिताची कामे करेल असे मानणे मूर्खपणाचे ठरेल. 



त्या नुसतीच या टूल किट मधील निर्देश आहेत. काय नाही या टूल किट मध्ये? काँग्रेसच्या "हिंदू आतंकवाद" ची फोल गेलेली संकल्पना पुन्हा नवीन वेस्टनात आहे. इतकेच नाही कोरोना काळात देशातील जनतेला मदत करायची, या संकटाशी सामना करण्यासाठी लोकांमध्ये सकारात्मकता वाढवायची त्या ऐवजी देशवासीयांच्या मनात देशा विषयी, देशाच्या सरकरविषयी नकारात्मकता भरवण्याची तयारी आहे. मुख्य म्हणजे त्या करता आंतराष्ट्रीय स्तरावर देशाची भलेही कितीही बदनामी झाली तरी हे काँग्रेसला चालणार आहे. इतकेच नाही तर ही बदनामी नेमकी आंतराष्ट्रीय वृत्तसंस्थेला हाताशी धरून करून घेण्याचे निर्देश या टूल किट मध्ये आहे. 


या निमित्याने पुन्हा काँग्रेसी, इतर विरोधक, देशातर्गत आणि देशाबाहेरील भारताचे दुष्मन आणि मुख्य म्हणजे तथाकथित डावे उदारमतवादी यांची निर्लज्ज युती आपल्याला जनतेसमोर आली आहे. पुन्हा आपण या टूल किटच्या नावावर रडारड सुरू करणार आहे. 


मात्र या सगळ्या घटनाक्रमा नंतर पुन्हा एकच प्रश्न समोर आहे की सरकार जवळ मोठी यंत्रणा असतांना सुद्धा सरकार या सगळ्याला तोंड का देऊ शकत नाही आणि मुख्य म्हणजे आपली टूल किट का तयार होत नाही?

टिप्पण्या